Thursday, December 11, 2025

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत वनामकृविने ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ उपक्रम उत्साहात राबविला

विद्यापीठाचे तंत्रज्ञान अवलंबनामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले; प्रगतशील शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ’ सन्मान — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे आयोजित केला जातो. त्या अनुषंगाने दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी हा उपक्रम विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठातील १२ चमूतील ३१ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळावे यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या शास्त्रज्ञांनी सुमारे ४०० शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने पिकांच्या सद्य व्यवस्थापनासोबतच खर्चात बचत होण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. शास्त्रज्ञांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती, कीडनियंत्रण, पिकसंरक्षण, मृदा आरोग्य संवर्धन, सुधारित वाणांचा वापर, पीक उत्पादनवाढीसाठी आवश्यक लागवड तंत्रज्ञान तसेच पशुधन आणि फळबाग व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर माहिती दिली.

या उपक्रमात मौजे साळापुरी (ता. जि. परभणी) येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आणि माननीय संचालक विस्तार शिक्षण डॉ. राकेश अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत हा उपक्रम शेतकऱ्यांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाने तुरीचा गोदावरी वाण, सोयाबीन, कापूस, हरभऱ्याचा परभणी चना वाण यासह विविध पिकांसाठी विकसित केलेल्या विविध आधुनिक, शाश्वत आणि परिणामकारक तंत्रज्ञानांची माहिती देताना सांगितले की, या तंत्रज्ञानांच्या अवलंबामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्पादनक्षमता वाढवून आपले जीवनमान उंचावण्यास मोठे यश मिळवले आहे. विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार उपक्रमांचा प्रत्यक्ष लाभ ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ सारख्या उपक्रमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचा अभिमान व्यक्त करत त्यांनी असेही नमूद केले की, तंत्रज्ञान अवलंबनातून उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभात शेतकरी शास्त्रज्ञ’ या सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. माननीय कुलगुरूंनी विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यापीठ–शेतकरी नातेसंबंध अधिक दृढ करण्यावर भर देत, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला कृषी महाविद्यालय, गोळेगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, तसेच सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे माजी विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. उद्धव आळसे, प्रा. उद्धव घाटगे, डॉ. डी. एम. नाईक, डॉ. खरवडे, परभणीचे सुप्रसिद्ध डॉ. रामेश्वर नाईक, डॉ. केदार कटिंग, प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर आणि इतर मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

या उपक्रमात परभणी येथील विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र,  छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र, फळ संशोधन केंद्र. बदनापूर येथील कृषि महाविद्यालय, कृषि संशोधन केंद्र, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छ. संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर, परभणी), कृषि विज्ञान केंद्रे (छ. संभाजीनगर, खामगाव, तुळजापूर, बदनापूर) आणि लातूरचे गळीत धान्य संशोधन केंद्र आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात सहयोगी अधिष्ठाता तथा तुर संशोधक डॉ. दीपक के. पाटील, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. संजय पाटील, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सुर्यवंशी, डॉ. हनुमान गरुड, डॉ. तुकेश सुरपाम, डॉ. भैय्यासाहेब गायकवाड, डॉ. एफ आर तडवी, डॉ.आर एल. कदम, डॉ. सचिन दिग्रसे, श्री. मधुकर मांडगे, श्री रामेश्वर ठोंबरे, श्री आनंद नंदनवरे तसेच कृषि विभागातीलअधिकारी श्री.प्रकाश देशमुख, प्रा. नरेंद्र जोशी, डॉ. गायकवाड, श्री साळवे, श्री गरजे, यांनी मार्गदर्शन केले.