Friday, December 26, 2025

कोरडवाहू शेतीच्या शाश्वत विकासासाठी संशोधन, तंत्रज्ञान व समन्वय आवश्यक — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कोरडवाहू शेतीवर शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या वतीने कोरडवाहू शेतीवर शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद दिनांक २५ डिसेंबर रोजी माननीय कुलगुरू यांच्या बैठक दालनात पार पडला. या संवादादरम्यान कोरडवाहू शेतीतील उपयुक्त तंत्रज्ञान, कोरडवाहू शेतीतील समस्या तसेच भविष्यातील विकास आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली. या संवाद सत्राच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आयसीएआर–क्रिडा, हैदराबादचे संचालक डॉ. विनोद कुमार सिंह आणि प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद उपस्थित होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रभारी अधिकारी डॉ. दयानंद टेकाळे, डॉ.किरण जाधव तसेच विविध संशोधन केंद्रांचे प्रभारी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, कोरडवाहू शेती ही एक व्यापक व सर्वसमावेशक संकल्पना आहे. या शेती पद्धतीमध्ये कोरडवाहू फळपिके, पशुधनाची जोड म्हणजेच पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, मृद व जलसंधारण, यांत्रिकीकरण, कृषी सिंचनशास्त्र तसेच हवामानशास्त्रातील आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे ही काळाची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, हवामान बदल, अनिश्चित व असमतोल पर्जन्यमान, कधी पावसाचे दीर्घकालीन खंड तर कधी अतिपाऊस व अतिवृष्टी, जमिनीचे ढासळलेले आरोग्य, जमिनीची होणारी धूप, नैसर्गिक संसाधनांची झालेली घट तसेच वाढता उत्पादन खर्च यामुळे कोरडवाहू शेतीसमोर अभूतपूर्व आव्हाने उभी ठाकली आहेत. मराठवाड्यासारख्या कोरडवाहू शेतीचे अधिक प्रमाण असलेल्या प्रदेशात शेती अधिकाधिक जोखमीची होत असताना, कोरडवाहू शेती यशस्वी करण्यासाठी संशोधनाधारित तंत्रज्ञानाचा अवलंब, शेतीपूरक जोड व्यवसायांची जोड, शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग तसेच शासन व संशोधन संस्थांमधील सुसूत्र समन्वय हाच शेतीच्या शाश्वत विकासाचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन माननीय कुलगुरू यांनी केले.

संचालक डॉ. विनोद कुमार सिंह म्हणाले की, आजच्या काळात कोरडवाहू शेती ही केवळ कमी पावसावर अवलंबून असलेली शेती न राहता ती हवामान बदलाच्या थेट परिणामांना सामोरे जाणारी शेती बनली आहे. पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी–अल्पवृष्टीची चक्रे, तापमानातील वाढ, मृदेतील सेंद्रिय घटकांचे कमी झालेले प्रमाण, जलस्रोतांची घट आणि निविष्ठांच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा हवामान बदलानुरूप राष्ट्रीय कृषी उपक्रम (NICRA) कोरडवाहू शेतीला नवदिशा देणारा ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरडवाहू शेती क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमुळे शेती उत्पादनक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली असून सरासरी उत्पादनात १.२ ते २.४ टन प्रति हेक्टर इतकी वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात या उत्पादनक्षमतेत आणखी वाढ करण्यासाठी वैज्ञानिक व क्षेत्रनिहाय प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले की, क्षेत्रनिहाय (Area-specific) नियोजन अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक भागाच्या हवामान, माती व सामाजिक परिस्थितीनुसार तंत्रज्ञान व उपाययोजना राबविल्या पाहिजेत. राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा व तंत्रज्ञानाचा राज्य व जिल्हा स्तरावर प्रभाव (Impact Assessment) मोजला गेला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सिंह यांनी कोरडवाहू शेतीसाठी संशोधन, विकास व विस्तार क्षेत्रात पुढील पाच वर्षांचा कृती आराखडा स्पष्टपणे मांडण्याची आवश्यकता दर्शविली. संशोधन व विस्तार उपक्रम हे शेतकरी-केंद्रित असावेत तसेच शेतकऱ्यांच्या गरजांशी सुसंगत असले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. आगामी काळात शेतकरी समुदायासाठी उपयुक्तता (Relevance to Farming Community) ही केंद्रस्थानी ठेवून कार्य करणे गरजेचे आहे. याबरोबरच गावपातळीवर कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून आधुनिक शेती अवजारे उपलब्ध करून देण्यावर भर दिला. नव्या यंत्रांची प्रात्यक्षिके घेऊन शेतकऱ्यांमध्ये तंत्रज्ञान स्वीकार वाढवावी व यासाठी संस्था सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले. मृदा आरोग्याबाबत त्यांनी गंधक, जस्त व बोरॉन या अन्नद्रव्यांची कमतरता वाढत असल्याने मृदा तपासणीवर आधारित खत वापर आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मका पिकाच्या उदाहरणातून त्यांनी सांगितले की, कॉम्पोझिट मक्यासाठी सुमारे ७५ कि.ग्रॅ. तर संकरीत मक्यासाठी सुमारे १५० कि.ग्रॅ. खत लागते, त्यामुळे शेतकऱ्यांनी खर्च–उत्पन्नाचा विचार करून योग्य पर्याय निवडावा,असा सल्ला दिला.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी बीटी कापूस व्यवस्थापन, करडई तेलाचे पोषणमूल्य आणि जमिनीच्या खोलीनुसार योग्य ज्वारी वाणांची निवड यावर मार्गदर्शन केले. संशोधनाधारित पीक नियोजन केल्यास उत्पादन व उत्पन्नात निश्चित वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एन. एस. प्रसाद यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेणे, तसेच रुंद वरंबा-सारी पद्धत, कमी कालावधीचे वाण व फवारणीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन यांसारख्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता तपासणे हा उद्देश असल्याचे सांगितले. तसेच शेतीसोबत पशुपालन, कुक्कुटपालन व पूरक व्यवसाय जोडल्यास उत्पन्न अधिक स्थिर राहते, असे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडले. श्री. सुनील शेळके यांनी कृषि तंत्रज्ञान अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्षम विस्तार उपक्रम व माहिती तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. श्री. राजेश मगर यांनी बीबीएफ (रुंद वरंबा–सरी) तंत्रज्ञान उपयुक्त असल्याचे तसेच सोयाबीनचे एमएयुएस-७२५, एमएयुएस-६१२ व किमया हे वाण चांगले आढळल्याचे नमूद केले. श्री. रमाकांत पोशेट्टी यांनी कोरडवाहू शेतीसोबत पशुधनाची जोड व त्यासाठी संरक्षित जागा व पौष्टिक चारा आवश्यक असल्याचे सांगितले. श्री. गजानन अंभोरे यांनी कमी व जास्त पावसातही बेड पद्धतीमुळे उत्पादन वाढल्याचे सांगितले.

यावेळी उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यानंतर मान्यवरांनी कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या प्रक्षेत्रासह विद्यापीठाच्या विविध केंद्रांना भेट दिली. आंतरपिक पद्धती, अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व शेततळे यावरील संशोधन प्रयोगांची माहिती डॉ. आनंद गोरे, डॉ. मदन पेंडके, डॉ. गणेश गायकवाड व डॉ. पापिता गौरखेडे यांनी दिली.

बायोमिक्स उत्पादन व संशोधन केंद्रात डॉ. चंद्रशेखर आंबाडकर यांनी बायोमिक्स निर्मिती, वापर व प्रसाराबाबत माहिती दिली. सिंचन जल व्यवस्थापन प्रकल्पातील अमृत सरोवर (शेततळे), सौरपंप, ठिबक सिंचन व तूर प्रक्षेत्रास भेट देण्यात आली, तसेच त्रिशूल तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. हवामान वेधशाळेत दीर्घकालीन हवामान बदल व त्याचा शेतीवरील परिणाम याबाबत डॉ. कैलास डाखोरे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. गणेश गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. याप्रसंगी डॉ. हरीश आवारी, डॉ. प्रफुल घंटे, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. पी. आर. देशमुख, डॉ. स्मिता सोळंकी, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. पी. व्ही. पडघन, डॉ. अंबिका मोरे यांच्यासह विद्यापीठातील इतर शास्त्रज्ञ व मान्यवर शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील श्री एस. पी. काळे, श्री व्ही. जे. रिठे, श्री संतोष धनवे, श्री सुरेश खटिंग व श्री सादिक शेख यांनी परिश्रम घेतले.