माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात मोठे यश
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास ‘वेटरन्स इंडिया – प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय परीक्षक समितीने विद्यापीठाची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी शिफारस केली होती. हा सन्मान सोहळा मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता, नवी दिल्ली येथील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटर, संसद मार्ग येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माननीय संरक्षण राज्यमंत्री नामदार श्री. संजय सेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विद्यापीठ अनुदान आयोग (UGC), राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषद (NAAC), अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE), भारतीय विद्यापीठ संघ (AIU) आदी नामांकित संस्थांचे अध्यक्ष व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष उपस्थित
राहून मान्यवरांच्या शुभहस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला. वेटरन्स इंडिया
संस्थेचे राष्ट्रीय समन्वयक श्री. सुनील पारेख यांनी माननीय कुलगुरूंना प्रत्यक्ष
उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याची विनंती केली होती.
माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी
मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त होऊ शकले आहे. यानिमित्ताने प्रतिक्रिया देताना
त्यांनी सांगितले की, विद्यापीठ विद्यार्थी-केंद्रित
शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित
विस्तारकार्य आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन या तत्त्वांवर कार्यरत आहे. हा पुरस्कार
विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन, विस्तार
व नवोपक्रमात्मक कार्यक्षमतेची पावती आहे. हे यश विद्यापीठातील सर्व शिक्षक,
संशोधक, विस्तार अधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे सामूहिक यश असल्याचेही त्यांनी
स्पष्ट केले. विद्यापीठ सातत्याने यशाची नवनवी शिखरे गाठत असून, विद्यापीठाच्या कार्यास महाराष्ट्र शासन, पुणे येथील
कृषि परिषद तसेच विद्यापीठाची कार्यकारी व विद्वत परिषद यांचे मोलाचे सहकार्य लाभत
असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
या यशात शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता
श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, तसेच सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख,
प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे,असे त्यांनी नमूद केले.
विद्यापीठाचे उल्लेखनीय कार्य -
मागील तीन
वर्षांत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात राबविलेले विविध विशेष उपक्रम ‘प्राईड ऑफ नेशन अवॉर्ड २०२५’ मिळण्यासाठी निर्णायक ठरले आहेत. यामध्ये
विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे, वसतिगृहांची
दुरुस्ती, विद्यापीठ परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण, तसेच सीएसआर निधीतून ‘महाराष्ट्र यांत्रिकीकरण
केंद्र’, कौशल्य विकास उपक्रम आणि ‘कॉमन इन्क्युबेशन सेंटर’
(सामायिक उद्योजकता संवर्धन केंद्र, नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) मान्यताप्राप्त ‘रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (वनामकृवि – आरपीटीओ /
VNMKV–RPTO) प्रशिक्षण केंद्र यांची स्थापना यांचा समावेश
आहे.
तसेच नवीन
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सहाव्या अधिष्ठाता समितीच्या पदवी अभ्यासक्रमांची तसेच पदव्युत्तर
स्तरावरील बीएसएमए (BSMA) अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी
करण्यात आली आहे. बाह्यस्त्रोत निधीच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेले संशोधन
प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर केलेले
सामंजस्य करार, विद्यापीठ विकसित तुरीचा ‘गोदावरी’ वाण,
सोयाबीनचे विविध वाण, हरभऱ्याचा ‘परभणी चना’
वाण, तसेच विविध पिकांसाठी विकसित करण्यात आलेली आधुनिक,
शाश्वत व परिणामकारक तंत्रज्ञाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली.
यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उत्पादनक्षमता वाढवून आपले जीवनमान उंचावले आहे.
शेतकरी
बांधवांसाठी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासोबत’ हा उपक्रम, नियमितपणे
आयोजित होणारा ऑनलाईन शेतकरी–शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम, संशोधनातून
विकसित नवीन वाण, अवजारे व तंत्रज्ञान आणि त्यांचे प्रभावी
विस्तार कार्य यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व
विस्तार कार्याला लक्षणीय गती मिळाली असून, त्याचा सकारात्मक
परिणाम विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकीतून दिसून येतो.
विद्यापीठाने
विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसह जनसमुदायामध्ये राष्ट्रभक्तीची भावना निर्माण
करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ या यशोगाथेचा प्रचार-प्रसार
करण्यासाठी पदयात्रा काढली. तसेच ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम
प्रत्येकाच्या घरी राबवण्याचे आवाहन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल
जयंतीनिमित्त ‘एकता पदयात्रा (युनिटी मार्च)’ आयोजित करण्यात
आली.
यासोबतच “हमारा संविधान – माझे संविधान” या
संकल्पनेच्या आधारे संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच वंदे मातरम् सार्धशताब्दी
महोत्सवही उत्साहात साजरा करण्यात आला.
या सर्व
उल्लेखनीय कार्याची दखल निवड समितीने घेऊन विद्यापीठाचा सन्मान केल्याबद्दल तसेच
मराठवाड्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविल्याबद्दल विद्यापीठ प्रशासनाने वेटरन्स
इंडिया संस्थेचे आभार मानले आहेत.,
या प्रतिष्ठित
राष्ट्रीय सन्मानामुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आनंदाचे वातावरण
निर्माण झाले असून, विद्यापीठाच्या
शैक्षणिक, संशोधन व समाजोपयोगी कार्याची देशपातळीवर दखल
घेतली गेल्याबद्दल संपूर्ण विद्यापीठ परिवारात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
व्हेटरन्स इंडिया बाबत
व्हेटरन्स
इंडिया ही केवळ एक संस्था नसून, भारताच्या एकता, प्रगती आणि सशक्तीकरणासाठी समर्पित
असलेली एक देशभक्तीची चळवळ आहे. माननीय डॉ. बी. के. मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली
सन २०१५ मध्ये स्थापन झालेली ही राष्ट्रीय, राजकीयदृष्ट्या
अलिप्त आणि लोककेंद्रीत चळवळ अल्पावधीतच ३८ लाखांहून अधिक सदस्यांचा भक्कम परिवार
बनली असून, देशातील सर्वात मोठ्या देशभक्तीच्या
व्यासपीठांपैकी एक ठरली आहे.
राष्ट्रीयत्वाची
भावना दृढ करणे, युवकांना सशक्त बनवणे,
शहीदांना सन्मान देणे आणि सामाजिक परिवर्तनाला चालना देणे या
उद्दिष्टांसह व्हेटरन्स इंडिया आत्मनिर्भर, प्रगत भारताची
संकल्पना साकार करण्यासाठी कार्यरत आहे. भारताने पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ म्हणून
आपले स्थान प्राप्त करावे, हीच या चळवळीची दूरदृष्टी आहे।
“जो कोणी ‘जय हिंद’ आणि
‘वंदे मातरम्’ म्हणू शकतो, तो व्हेटरन्स इंडियाचा सदस्य होऊ
शकतो” ही साधी पण प्रभावी विचारधारा या चळवळीचा पाया आहे. या समावेशक
दृष्टिकोनामुळे जात, धर्म, प्रांत आणि
सामाजिक स्तर यांच्या भिंती दूर सारल्या गेल्या असून, राष्ट्रनिर्मितीच्या
समान ध्येयासाठी लाखो भारतीय एकत्र आले आहेत.
व्हेटरन्स
इंडिया – दृष्टी (VISION)
व्हेटरन्स इंडियाची
दृष्टी अशी आहे की, प्रत्येक नागरिक राष्ट्रप्रेमाच्या भावनेने एकत्र आलेला असा
भारत.
सामाजिक, आर्थिक व प्रादेशिक विषमता मुक्त
समाज. नावीन्य, शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रात
जागतिक नेतृत्व करणारा भारत. संयुक्त राष्ट्रांच्या १७ शाश्वत विकास
उद्दिष्टांमध्ये (SDGs) सक्रिय योगदान देणारा देश.
मुख्य
उद्दिष्टे:
१.
माजी सैनिक व शहीदांच्या कुटुंबांना पाठबळ – त्यांच्या
त्यागाचा सन्मान करणे व त्यांच्या कल्याणाची काळजी घेणे.
२.
युवक सशक्तीकरण – नेतृत्वगुण
विकास, शिक्षण व कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध करून देणे.
३.
समावेशक विकासाचा प्रसार – ग्रामीण
व शहरी समुदायांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे.



