Friday, December 5, 2025

मृद विज्ञान, कृषि अभियांत्रिकी व कृषि विद्या शाखेतील विभागांमध्ये समन्वय होऊन संशोधनाची दिशा ठरली पाहिजे – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृविमध्ये जागतिक मृदा दिन साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि महाविद्यालयातील मृद विज्ञान विभाग आणि भारतीय मृदविज्ञान संस्था, नवी दिल्ली (परभणी शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिनानिमित्तडॉ. डी. के. पाल स्मृती व्याख्यानाचे” आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाइन भूषविले.

प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण (वनामकृवी, परभणी); तर व्याख्याते म्हणून माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य (बासाकोकृवि, दापोली, ऑनलाइन) उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रविण वैद्य, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जागतिक मृदा दिनाच्या शुभेच्छा देत यावर्षीच्या “निरोगी शहरांसाठी निरोगी माती (Healthy Soils for Healthy Cities)” या घोषवाक्याचे महत्त्व स्पष्ट केले. जमिनीचे आरोग्य हे शहरांच्या आरोग्याशी निगडित असल्याचे सांगून सेंद्रिय पदार्थांचा वापर, निविष्ठांचा काटेकोर वापर व शेतीतील यांत्रिकीकरणाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. मृद विज्ञान, कृषि अभियांत्रिकी व कृषि विद्या शाखांमधील समन्वयातून संशोधनाच्या दिशा ठरवून नवनवीन शोध शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

माजी कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी बदलत्या हवामानाचा जमिनीच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम या विषयावर सखोल संशोधनपर सादरीकरण केले. जमिनीचे मूलभूत प्राकृतिक गुणधर्म जतन करणे आणि कृषि उत्पन्न वाढीसाठी आवश्यक संशोधनाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी मृद विज्ञानातील संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कसे पोहोचवता येईल याबाबत मार्गदर्शन केले.

 शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी ‘माती म्हणजेच जीवाची सुरुवात’ हा संदेश देत सांगितले की शेती, जलसंवर्धन, हवामान आणि भविष्यातील खाद्यसुरक्षिततेसाठी मातीचे आरोग्य व समतोल अत्यंत महत्त्वाचा आहे. शेतकरी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि कृषी क्षेत्रातील सर्व भागधारकांनी माती स्वास्थ्य व्यवस्थापन, माती चाचणी, शेतकरी जागरूकता, संरक्षण शेती, पाणी–माती समन्वय तसेच युवकांच्या सहभागावर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

डॉ. प्रवीण वैद्य यांनी डॉ. डी. के. पाल यांच्या कार्याचा स्मरण करून देत त्यांच्या मृदा संशोधनातील योगदानाचा आढावा घेतला. प्रास्ताविकात डॉ. हरिहर कौसडीकर यांनी भारतीय मृदविज्ञान संस्थेच्या परभणी शाखेच्या उपक्रमांची माहिती देऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने मृदा दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला.

कार्यक्रमात माती पूजन करण्यात आले. जैविक खत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, शेणखत, लेंडीखत, बायोगॅस स्लरी आणि पाणी अर्पण करून मातृभूमीच्या पोषणाचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले.

डॉ. सुरेश वाईकर यांनी प्रमुख व्याख्याते डॉ. तपस भट्टाचार्य यांचा परिचय करून दिला. शेतकरी प्रतिनिधी श्री. सुरेंद्र रोडगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जमिनीच्या आरोग्यावरील माहितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे पत्रक परभणी शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानक, विद्यापीठ गेट तसेच वर्तमानपत्रांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. हा अभिनव उपक्रम डॉ. कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.

कार्यक्रमास विविध महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. राहुल रामटेके, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. सचिन मोरे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्लकुमार घंटे, डॉ. मधुकर जाधव, प्राध्यापक, कर्मचारी व पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सुदाम शिराळे यांनी केले. आभासी सादरीकरणाची तांत्रिक व्यवस्था डॉ. संतोष फुलारी, श्री. इंगळे आणि संगणक कक्ष यांच्या टीमने केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. संतोष चिक्षे, डॉ. संतोष पिल्लेवाड, डॉ. स्नेहल शिलेवंत, श्री. भानुदास इंगोले, श्री. धीरज कदम, कु. निशिगंधा चव्हाण तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.