वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा ‘शेतकरी–शास्त्रज्ञ
ऑनलाईन कृषि संवाद’ या मार्गदर्शनपर उपक्रमाचा ७८ वा भाग दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी
यशस्वीरीत्या पार पडला. विद्यापीठ आणि कृषि विज्ञान केंद्र, गांधेली (छत्रपती संभाजीनगर) यांच्या संयुक्त
विद्यमाने, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
प्रेरणेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा
कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव (अहिल्यानगर) येथील विषयतज्ज्ञ डॉ. नारायण निंबे यांनी “सुधारित ऊस लागवड तंत्रज्ञान” या विषयावर
शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
डॉ. निंबे यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी पारंपारिक तीन डोळा लागवड
पद्धतीऐवजी एक डोळा लागवड पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. तसेच एकात्मिक खत
व्यवस्थापन, योग्य बेणे निवड,
ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांचा वापर यावर भर देण्याचे आवाहन
केले. सध्या अनेक शेतकरी कोकोपीट व ट्रे पद्धतीने रोपे तयार करतात; मात्र त्याऐवजी कमी खर्चाची, सोपी व परिणामकारक सुपर
केन नर्सरी पद्धत अवलंबण्याची शिफारस त्यांनी केली.
सुपर केन नर्सरीसाठी सपाट गादीवाफे तयार करून त्यावर रिकाम्या
खतांच्या गोण्या पसरवाव्यात. त्यावर शेणखत,
पोयटा माती व गांडूळ खत यांचे एकास एक प्रमाणातील मिश्रण तीन इंच
जाडीने टाकावे. बेणे निर्मितीसाठी ९ ते ११ महिने वयाचा ऊस निवडावा. खोडवा ऊस तसेच
अतिजुना ऊस बेण्यासाठी वापरू नये. शेंड्याकडील भाग व बुडाकडील ३–४ पेरे वगळून उर्वरित ऊस वापरावा.
एक किंवा दोन डोळे असलेले बेणे ओळीमध्ये अंथरून १ ते २ सेंमी
अंतर ठेवावे. त्यावर मिश्रण भरून पाचट किंवा प्लास्टिकचे आच्छादन करावे. साधारण एक
आठवड्यानंतर उगवण दिसू लागल्यावर आच्छादन काढावे. या पद्धतीने एका महिन्यात निरोगी
व मजबूत रोपे लागवडीसाठी उपलब्ध होतात. खतांच्या गोण्यांमुळे रोपे सहजपणे काढता
येतात तसेच ऊसातील गवताळ वाढ ही विकृती रोखण्यास ही पद्धत उपयुक्त ठरते.
ऊस लागवड करताना खोल सरीऐवजी सहा इंच खोलीच्या सरीचा अवलंब
करावा. एका एकरात सुमारे १५ हजार रनिंग फूट सरी उपलब्ध होऊन १५ हजार एक डोळ्यांचे
बेणे वापरता येते. यामधून साधारण ९० हजार फुटवे निर्माण होतात. काढणीपर्यंत ४० ते
५० हजार फुटवे टिकले तरी एकरी ८० ते ९० टन उत्पादन मिळू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात खोडवा ऊस व्यवस्थापनावर कृषि विज्ञान केंद्र, गांधेली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
श्री. काकासाहेब सुकासे यांनी मार्गदर्शन केले. चांगल्या उत्पादनासाठी खोडवा उसाची
बुडखा छाटणी करून छाटलेल्या बुडख्यावर एक लिटर पाण्यात १ ग्रॅम कार्बेन्डाझिम व
०.३६ ग्रॅम इमिडाक्लोप्रिड (७० टक्के) मिसळून फवारणी करावी, असा
सल्ला त्यांनी दिला. तसेच ऊस काढणीनंतर शेतात राहिलेले पाचट न जाळता सर्व
सऱ्यांमध्ये आच्छादनासाठी वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यापीठाच्या वतीने शेतकरी–शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद उपक्रमांतर्गत डिसेंबर २०२५ महिन्यात कृषि
विज्ञान केंद्र गांधेली मार्फत प्रत्येक शुक्रवारी विविध विषयांवर चर्चासत्रांचे
आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मृदा आरोग्य – डॉ. हरिहर
कौसडीकर, कीड व रोग नियंत्रण – श्री.
तुषार चव्हाण, तसेच मोसंबी व आंबिया बहार व्यवस्थापन –
डॉ. एस. आर. पाटील व डॉ. पं. दे. कृषि विद्यापीठ, अकोला यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. चौथ्या शुक्रवारी सुधारित
ऊस लागवड तंत्रज्ञान या कार्यक्रमाने डिसेंबर महिन्यातील उपक्रमाचा समारोप झाला.
सदर कार्यक्रमास विस्तार शिक्षण संचालनालयाचे मुख्य विस्तार शिक्षण
अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी
कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषि
विज्ञान केंद्राच्या संपूर्ण टीमने विशेष योगदान दिले.
