Monday, December 15, 2025

विद्यार्थी सुविधांसाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी; तातडीच्या दुरुस्ती व सुधारणा निर्देश

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या परभणी येथील विद्यार्थी वसतिगृहांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, उपविद्यापीठ अभियंता श्री. एस. पी. धारासुरकर तसेच मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. आर. जी. भाग्यवंत उपस्थित होते.

माननीय कुलगुरूंनी विद्यापीठातील वसंत, ग्रीष्म व मुलांचे वसतिगृह तसेच वसुंधरा मुलींच्या वसतिगृहाची पाहणी केली. यावेळी वसतिगृहांतील सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, सुरक्षितता तसेच इतर मूलभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.  

माननीय कुलगुरूंनी ग्रीष्म व वसंत वसतिगृहांतील खोल्या विद्यार्थ्यांच्या वास्तव्यासाठी तातडीने उपलब्ध करून देऊन आवश्यक सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या. तसेच वसुंधरा मुलींच्या वसतिगृहाबाबत स्वच्छता राखणे, प्रथमोपचार पेटी अद्ययावत करणे, पंखे व दिव्यांची दुरुस्ती, स्वच्छतागृहांतील नळ दुरुस्ती, वायरिंगची कामे, सायकल स्टँड उभारणे, दरवाजे व खिडक्यांना कडी-कोंडे बसवणे, सुरक्षा भिंतीवरील पडलेली पत्रे बसवून उंची वाढवणे, सेप्टिक टँक दुरुस्ती, कपडे धुण्यासाठी दगड बसवणे, छत गळती दुरुस्त करणे तसेच अभ्यासिकेत विद्यार्थिनींसाठी खुर्च्यांची उपलब्धता सुनिश्चित करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. विद्यार्थिनींना सुरक्षित, स्वच्छ व सोयीसुविधायुक्त वातावरण मिळावे, यासाठी सर्व संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश माननीय कुलगुरूंनी दिले.

या सुविधांच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी सर्व वसतिगृह प्रमुखांची बैठक घेऊन कामकाजाची तातडीने अंमलबजावणी करण्यास तसेच सुविधा व दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यामुळे विद्यापीठातील विद्यार्थी सुविधांमध्ये अधिक गुणवत्तावाढ होण्यास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.