देशातील कुपोषण
कमी करण्यासाठी आणि शाश्वत शेती विकास साधण्यासाठी जैवपोषक (Biofortified)
पिकांचा मुख्य प्रवाहात समावेश
करणे अत्यावश्यक आहे,
असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.
हार्व्हेस्टप्लस
सोल्यूशन्स (HarvestPlus
Solutions – HPS), वॉशिंग्टन डी.सी. (अमेरिका) या जागतिक स्तरावरील नेटवर्क
स्वरूपाच्या संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथील द पार्क, कनॉट
प्लेस येथे दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राष्ट्रीय पोषण व जैवपोषण विस्तार कार्यशाळा
(National Nutrition and Biofortification Scaling Workshop) मध्ये ते
पॅनेल चर्चेत सहभागी होऊन मार्गदर्शन करीत होते. या कार्यशाळेत देशभरातील धोरणकर्ते,
कृषी शास्त्रज्ञ, संशोधक तसेच विविध संस्थांचे
प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जैवपोषक
पिकांच्या संशोधन,
प्रसार व विस्तारात कृषि विद्यापीठांची भूमिका अधिक प्रभावी कशी
करता येईल, याबाबत बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, कृषि
विद्यापीठांनी सुधारित वाणांची चाचणी प्रक्रिया अधिक गतीने पूर्ण करणे, ब्रीडर
बियाणे उत्पादन वाढवणे तसेच प्रत्येक पिकासाठी शास्त्रशुद्ध कृषि पॅकेज विकसित
करणे गरजेचे आहे. यामुळे प्राधान्य राज्यांमध्ये
जैवपोषक पिकांचा वेगाने विस्तार होऊ शकतो.
ते पुढे
म्हणाले की,
महिला शेतकऱ्यांचे उत्पादन व धान्य गुणवत्ता सातत्याने सुधारण्यासाठी
विस्तार कर्मचाऱ्यांना व सीआरपी (Community Resource Persons) यांना विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. महिला-केंद्रित प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि
क्षेत्रीय मार्गदर्शनामुळे जैवपोषक पिकांचे प्रत्यक्ष फायदे अधिक प्रभावीपणे
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात.
संशोधन ते
शेतकरी हा प्रवास अधिक सक्षम करण्यावर भर देताना त्यांनी सांगितले की, जैवपोषक
पिकांना राज्य व केंद्र शासनाच्या मुख्य कृषि योजनांमध्ये स्थान मिळण्यासाठी कृषि
विद्यापीठे, कृषि विभाग, स्वयंसेवी
संस्था व खासगी भागीदार यांच्यात प्रभावी समन्वय आवश्यक आहे.
विद्यापीठांनी विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत थेट
पोहोचवण्यासाठी मजबूत संशोधन–विस्तार साखळी उभी करणे काळाची गरज आहे.
जैवपोषक पिकांचा
स्वीकार वाढल्यास केवळ उत्पादनात वाढ होणार नाही, तर ग्रामीण भागातील
पोषण सुरक्षा बळकट होऊन शाश्वत शेती विकासास चालना मिळेल, असा विश्वासही माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केला.
.jpeg)
