Monday, December 22, 2025

आधुनिक कृषि यांत्रिकीकरणाचा स्वीकार आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवित आधुनिक कृषि  अवजारांवर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ, परभणी सी.एन.एच. इंडस्ट्रियल इंडिया (न्यू-हॉलंड), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “आधुनिक कृषि अवजारांची ओळख, कार्यपद्धती भविष्यातील शेतीया विषयावर आधारित हे प्रशिक्षण दिनांक १८ ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले.

प्रशिक्षनाचा समारोप दिनांक २० डिसेंबर २०२५ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमुख अतिथी शिक्षण संचालक डॉ. भगवान सेवार होते. यावेळी व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, शास्त्रज्ञ डॉ. स्मिता सोलांकी, डॉ. जी. यू. शिंदे, डॉ. दयानंद टेकाळे सरपंच श्रीमती सुगंधे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आधुनिक कृषि  यांत्रिकीकरणाचे महत्त्व विशद केले. बदलत्या काळात शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचा स्वीकार अपरिहार्य असून, शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रसामग्री व नव्या तांत्रिक पद्धतींचा अवलंब करून उत्पादन खर्चात बचत करावी व उत्पन्नात वाढ साधावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

माननीय कुलगुरू पुढे म्हणाले की, मजूर टंचाई, वाढते उत्पादन खर्च आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर यांत्रिकीकरण ही काळाची गरज बनली आहे. योग्य यंत्रांचा वापर केल्यास शेतीतील कामे वेळेत व अचूकरीत्या पूर्ण होऊन उत्पादनात वाढ होते. तसेच शेतकऱ्यांचा श्रम व वेळ वाचून शेती अधिक फायदेशीर ठरते.

विद्यापीठामार्फत विकसित करण्यात आलेल्या विविध आधुनिक कृषि  यंत्रे, तंत्रज्ञान शिफारसी व प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. “शेतकरी देवो भव:” या भावनेतून विद्यापीठाचे कार्य सुरू असून शेतकरी हा केवळ लाभार्थी नसून तो विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी कृषि  क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान तसेच नाविन्यपूर्ण कृषि  अवजारे आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष वापरात आणावीत. सध्याच्या बदलत्या हवामान परिस्थितीत आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतीत यांत्रिकीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आधुनिक कृषि  अवजारे व यंत्रसामग्रीच्या वापरामुळे विविध शेती कामे कमी वेळेत, कमी श्रमात आणि अधिक कार्यक्षमतेने पार पाडता येतात. त्यामुळे मजुरीचा खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होते तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस लागते. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठामार्फत विकसित करण्यात आलेल्या शिफारसी, सुधारित पीक व्यवस्थापन पद्धती तसेच विविध यांत्रिक साधनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांनी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान डॉ. राहुल रामटेके यांनी सौर ऊर्जेच्या वापरामुळे शेतीतील वीज इंधन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होऊन पर्यावरणपूरक शाश्वत शेती शक्य होते, असे नमूद केले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून सिंचन, फवारणी इतर यांत्रिक कामे अधिक किफायतशीररीत्या करता येतात, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. स्मिता सोलांकी यांनी बीबीएफ (Broad Bed Furrow) यंत्राच्या सहाय्याने पीक व्यवस्थापन उत्पादनवाढीच्या संधी अधोरेखित केल्या. डॉ. जी. यू. शिंदे यांनी कृषि  ड्रोन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करत ड्रोनच्या सहाय्याने अचूक फवारणी, खतांचा समतोल वापर, वेळेची बचत उत्पादनवाढ कशी साधता येते, यावर भर दिला. ड्रोन तंत्रज्ञानामुळे श्रमखर्च कमी होऊन आधुनिक शेती अधिक परिणामकारक होते, असे त्यांनी सांगितले. डॉ. पंडित मुंडे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी युवकांनी यांत्रिकीकरणाचा स्वीकार करून उत्पादनक्षमता कशी वाढवावी याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. दयानंद टेकाळे यांनी बैलचलित उपकरणांचे महत्व त्याद्वारे कमी खर्चात शेती कशी अधिक प्रभावी करता येईल, यावर भर दिला.

उपकरणांचे महत्त्व व त्याद्वारे कमी खर्चात शेती कशी अधिक प्रभावी करता येईल, यावर प्रा. दत्तात्रय पाटील यांनी भर दिला. त्यांनी सी.एन.एच. कंपनीच्या आधुनिक कृषि  अवजारांची माहिती देत तांत्रिक प्रगतीची ओळख करून दिली. आधुनिक कृषि  अवजारांच्या वापरामुळे महिलांचे श्रम कमी होतात, वेळेची बचत होते तसेच उत्पादनक्षमता वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच डॉ. पी. जी. मोरे यांनी महिला व शेतकरी युवकांसाठी कृषि  प्रक्रिया उद्योगातील विविध संधी स्पष्ट केल्या. डॉ. नीता गायकवाड व डॉ. शैलेजा देशविन यांनी महिलांनी शेतीतील काबाडकष्ट कमी करून यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा, यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. ओंकार गुप्ता यांनी ड्रोनच्या सहाय्याने शेती केल्यामुळे होणारी उत्पादनवाढ व कार्यक्षमतेचे फायदे विषद केले, तसेच ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखविले.

सदरिल प्रशिक्षण कृषि  अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठ (वानामकृवि), परभणी येथील सभागृहात संपन्न झाले. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतात उपयोग करण्याचा संकल्प सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. दत्तात्रय पाटील, अभियंता के. एच. जोंधळे, अभियंता आर. के. कराळे तसेच श्री रणबावळे, श्री एकनाथ रणेर, श्री मानिक खर्डींग व श्री बगाटे यांनी विशेष परिश्रम घेतले.