Monday, December 22, 2025

‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’: वनामकृविच्या मुख्यालयासह मराठवाड्यातील १२ कृषि विज्ञान केंद्रांत कार्यक्रम; माननीय केंद्रीय कृषि श्री. शिवराज सिंह चौहान यांचे ऑनलाईन मार्गदर्शन

 

२३ डिसेंबर हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिवस (National Farmers Day) म्हणून साजरा केला जाणार आहे. चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक धोरणे राबवून कृषि क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. या दिवशी देशाच्या अन्नसुरक्षेसह ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करण्यात येतो तसेच त्यांच्या कष्टांचे कौतुक केले जाते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री नामदार श्री. शिवराज सिंह चौहान हे ऑनलाईन पद्धतीने देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी ते केंद्र शासनाच्या विकसित भारत – ‘जी रामजी’ योजनेसह विविध शेतकरी कल्याणकारी योजना तसेच शेतकरी हितासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत.

या निमित्ताने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाच्या वतीने परभणी मुख्यालयासह विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण मराठवाड्यातील एकूण १२ कृषि विज्ञान केंद्रांमध्ये राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील मुख्यालयात तसेच विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व १२ कृषि विज्ञान केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाच हजाराहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असून, उपस्थित शेतकऱ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे शेती व्यवसायास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विविध विषयतज्ज्ञ व शास्त्रज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सद्यस्थितीतील पिकांचे नियोजन, विविध लागवड पद्धती, राष्ट्रीय कडधान्य व तेलबिया मिशन तसेच एकात्मिक शेती पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 विकसित भारत – जी रामजी योजना’बद्दल थोडक्यात माहिती

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना मनरेगा योजनेत आवश्यक सुधारणा करूनविकसित भारत – जी रामजी योजना’ लागू करण्यात आली आहे. या योजनेबाबत उद्या दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी शेतकऱ्यांना सविस्तर व सर्वंकष माहिती देण्यात येणार आहे. ही योजना शेतकरी तसेच ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी कशी लाभदायक ठरणार आहे, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या योजनेत प्रामुख्याने सिंचन सुरक्षा व व्यवस्थापन, पायाभूत सुविधा विकास, ग्रामीण रस्ते विकास, तसेच ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणे यावर भर देण्यात आला आहे. यासोबतच शेतकरी कंपन्यांचे सक्षमीकरण, कृषि प्रक्रिया उद्योगांची उभारणी, हवामान-अनुकूल  तंत्रज्ञानाचा अवलंब आणि विशेषतः मृदा व्यवस्थापन यास महत्त्व देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत १२५ दिवसांचा रोजगार उपलब्ध होणार असून, त्यापैकी ६० दिवस शेतकऱ्यांच्या अति व्यस्त कालावधीसाठी—म्हणजे पेरणी व काढणीच्या काळासाठी—राखीव ठेवण्यात आले आहेत. सध्या मनरेगा अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे पूर्वनियोजित पद्धतीने पूर्ण करण्यात येतील, तसेच पुढील नवीन कामेजी रामजी’ योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार राबविण्यात येतील. याशिवाय योजनेतील इतर अनेक महत्त्वपूर्ण बाबींवरही सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.