Monday, September 14, 2026

पर्यावरणपूरक सजावटीतून वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात गणेशोत्सवास उत्साहात सुरुवात

 वडाच्या पारंब्या व नैसर्गिक साहित्यापासून साकारला आकर्षक देखावा



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात आणि शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सवास उत्साहात सुरुवात करण्यात आली. दिनांक १४ सप्टेंबर २०२६ रोजी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यंदाच्या गणेशोत्सवासाठी महाविद्यालयात वडाच्या पारंब्या, बांबू, पाने, फुले आणि इतर विविध नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा कल्पकतेने वापर करून आकर्षक सजावट व देखावा साकारण्यात आला आहे. या सजावटीतून पारंपरिक कलात्मकतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे.

महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड आणि जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२४ मध्ये पदवी अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांनी ही अभिनव सजावट तयार केली. उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य व सर्जनशील वापर करून विद्यार्थ्यांनी साकारलेला हा देखावा गणेशोत्सवाच्या सौंदर्यात भर घालणारा ठरला आहे.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन, प्लास्टिकचा कमीतकमी वापर आणि पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला आहे. विशेषतः सजावटीसाठी कृत्रिम व प्लास्टिक साहित्याला पर्याय म्हणून नैसर्गिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उत्सवाचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

विद्यार्थ्यांच्या या सर्जनशील उपक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

गणेशोत्सवानिमित्त महाविद्यालयात पूजन, प्रसाद वितरण, विविध मनोरंजक व बौद्धिक खेळ तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणपूरक सजावट, नैसर्गिक साहित्याचा अभिनव वापर आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक आकर्षक, पर्यावरणस्नेही आणि सामाजिकदृष्ट्या प्रेरणादायी ठरला आहे.