Tuesday, September 8, 2026

वनामकृवि शास्त्रज्ञांचे कपाशीवरील फुलकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन

सद्यस्थितीत मराठवाड्यात अनेक ठिकाणी कपाशी पिकावर फुलकिडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीची प्रौढ अवस्था व पिल्ले पानांच्या खालच्या बाजूस खरवडून रस शोषतात. परिणामी पाने सुरुवातीला पांढुरकी होऊन नंतर तपकिरी पडतात. तसेच पाने व फुलकळ्या आकसून झाडांची वाढ खुंटते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची नियमित पाहणी करून फुलकिडीच्या प्रादुर्भावाची तीव्रता ओळखावी व प्रभावी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत करण्यात आले आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील क्रॉपसॅप प्रकल्पाचे समन्वयक डॉ. अनंत लाड, विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर तसेच डॉ. राजरतन खंदारे आणि डॉ. योगेश मात्रे यांनी शेतकऱ्यांना फुलकिडीच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले आहे.

फुलकिडीचे एकात्मिक व्यवस्थापन

फुलकिडीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील उपाययोजनांचा अवलंब करावा—

  • पिकामध्ये नियमित अंतरमशागत करून शेत तणविरहित ठेवावे. तसेच नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.
  • प्रति हेक्टरी १० ते १२ निळे चिकट सापळे लावावेत. तसेच ढालकीडा व क्रायसोपा यांसारख्या मित्रकीटकांचे संवर्धन करावे.
  • प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन ३०० पीपीएमची ५० मिली मात्रा प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • फुलकिडीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक झाल्यानंतर प्रति लिटर पाण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची शिफारशीनुसार फवारणी करावी—
    • स्पिनेटोरम ११.७ टक्के एससी – ०.८४ मिली
    • आयसोसायक्लोसेरम ९.२ टक्के डीसी – १.२ मिली
    • फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रिड ४० टक्के डब्ल्यूजी – ०.२५ ग्रॅम
    • डायफेन्थुरॉन ५० टक्के डब्ल्यूपी – १.२ ग्रॅम
    • फिप्रोनील ८० टक्के डब्ल्यूजी – १.५ ग्रॅम
    • डायफेन्थुरॉन ४०.१ टक्के + असिटामिप्रिड ३.९ टक्के डब्ल्यूपी – १ ग्रॅम
    • टॉल्फेनपायरॅड १५ ईसी – २ मिली
    • फ्लोनीकॅमीड ५० टक्के डब्ल्यूजी – ०.३ ग्रॅम
    • थायमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी – ०.२ ग्रॅम
    • फिप्रोनील १५ टक्के + फ्लोनीकॅमीड १५ टक्के डब्ल्यूडीजी – ०.८ ग्रॅम
    • फिप्रोनील ५ टक्के + बुप्रोफेझिन २० टक्के एससी – २ मिली

वरीलपैकी एका कीटकनाशकाची निवड करून आलटून-पालटून फवारणी करावी, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

वरील कीटकनाशकांचे प्रमाण साध्या अथवा नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपाद्वारे फवारणी करताना हे प्रमाण तीनपट वापरावे. फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.

कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फवारणीदरम्यान हातमोजे, तोंडावर मास्क आणि डोळ्यांच्या संरक्षणासाठी चष्म्याचा वापर करावा तसेच कीटकनाशकांचा वापर करताना सर्व सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन क्रॉपसॅप प्रकल्पाच्या तज्ज्ञांनी केले आहे.