Wednesday, September 9, 2026

५४ व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीला दापोलीत उत्साहात प्रारंभ; कृषि संशोधनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर

 

राज्यातील चारही कृषि विद्यापीठे आणि पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथे दिनांक ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान ५४ वी संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती (जॉइंट ॲग्रेस्को) बैठक–२०२६ आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज्यातील कृषि विद्यापीठांमध्ये विकसित झालेल्या संशोधन तंत्रज्ञानांचा आढावा घेण्यासोबतच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान व कृषि शिफारशींवर सविस्तर विचारविनिमय केला जात आहे.

बैठकीचा उद्घाटन समारंभ दिनांक ९ सप्टेंबर रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. भरत गोगावले होते. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाचे सचिव माननीय डॉ. परिमल सिंह (भाप्रसे), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक माननीय श्री. राहुल महिवाल (भाप्रसे) यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील चारही कृषि विद्यापीठांचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि (वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ), डॉ. संजय भावे (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ), डॉ. शरद गडाख (डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ) आणि डॉ. विलास खर्चे (महात्मा फुले कृषि विद्यापीठ) यांच्यासह महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी, कृषि परिषदेचे सदस्य श्री. विनायक काशिद, कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीसमोरील आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रभावी कृषि संशोधनाचा वापर वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. चारही कृषि विद्यापीठांनी परस्पर समन्वयातून संशोधन व विस्तार कार्याला अधिक गती देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसित करावे, असे आवाहन करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री माननीय ना. श्री. भरत गोगावले यांनी शेतकऱ्यांना सुखी व समृद्ध करण्यासाठी कृषि क्षेत्रातील सर्व घटकांनी कटिबद्धतेने कार्य करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र फलोत्पादन क्षेत्रात देशात आघाडीवर असून, कृषि विद्यापीठांच्या संशोधन व विस्तार कार्यामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्याचे कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती माननीय ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्याची आवश्यकता व्यक्त केली. कृषि विद्यापीठांतील संशोधनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कृषि राज्यमंत्री राज्यमंत्री माननीय ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनी कृषि विद्यापीठांच्या संशोधन कार्याचे कौतुक करताना कोकणातील आंबा व काजू लागवड क्षेत्राच्या विकासात विद्यापीठाच्या संशोधनाचे योगदान अधोरेखित केले. प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार कृषि विकासाचे नियोजन करून देशाच्या कृषि उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा वाढविण्यासाठी शास्त्रज्ञांनी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत वनामकृविच्या संशोधन कार्याला अधोरेखित स्थान

या राज्यस्तरीय बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याचे प्रभावी प्रतिनिधित्व झाले. हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान, शेतकरीकेंद्रित संशोधन आणि कृषि क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या कृषिविषयक एकूण ५५ प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच उल्लेखनीय संशोधन कार्य करणाऱ्या शास्त्रज्ञांचाउत्कृष्ट शास्त्रज्ञ’ पुरस्काराने गौरव करण्यात आला.

यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांना यावर्षीचाउत्कृष्ट शास्त्रज्ञ’ पुरस्कार शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रदान करण्यात आला. कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या उपस्थितीत झालेला हा सन्मान विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेणारा ठरला.

बैठकीदरम्यान मान्यवरांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या बांबू प्रक्रिया, रबर लागवड आणि मसाला पिके आदी प्रक्षेत्रांना भेट देऊन तेथील संशोधन व तंत्रज्ञानाची माहिती घेतली.

या तीन दिवसीय बैठकीस वनामकृविचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्यासह विद्यापीठातील सुमारे ५० शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. राज्यातील अन्य तीन कृषि विद्यापीठांमधील जवळपास ३०० शास्त्रज्ञ व अधिकारी अशा एकूण ३५० हून अधिक शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांच्या सहभागाने विविध कृषि संशोधन विषयांवर सखोल विचारमंथन होत आहे.