नम्मा बेंगळुरू स्मॅशर्स संघाने तब्बल ५ लाख रुपयांना केले करारबद्ध; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथील विद्यार्थी तथा प्रतिभावान व्हॉलीबॉलपटू शाश्वत
धारणकर यांची प्रतिष्ठेच्या व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप लीग (VCL) साठी निवड झाली असून, त्यांच्या उत्कृष्ट खेळाच्या
कामगिरीची दखल घेत नम्मा बेंगळुरू स्मॅशर्स (Namma Bengaluru Smashers –
NBS) या संघाने त्यांना तब्बल ५ लाख रुपयांना करारबद्ध केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कृषि महाविद्यालय, गोळेगाव
तसेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला
आहे.
शाश्वत धारिणकर हे कृषि महाविद्यालय, गोळेगाव
येथे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशित झाले आहेत.
शिक्षणासोबतच खेळाच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द
आणि उत्कृष्ट कौशल्याच्या बळावर त्यांनी व्हॉलीबॉल क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख
निर्माण केली आहे. आता प्रतिष्ठेच्या व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप लीगमध्ये झालेली
त्यांची निवड ही त्यांच्या कठोर परिश्रमाची आणि गुणवत्तापूर्ण खेळाची पावती मानली
जात आहे.
नम्मा बेंगळुरू स्मॅशर्स संघाकडून तब्बल ५ लाख रुपयांच्या करारावर निवड होणे
ही शाश्वत धारणकर यांच्यासाठीच नव्हे, तर
कृषि महाविद्यालय, गोळेगाव आणि विद्यापीठ परिवारासाठी
अभिमानाची बाब आहे. ग्रामीण व कृषि शिक्षणाच्या परिसरातून राष्ट्रीय स्तरावरील
व्यावसायिक क्रीडा स्पर्धेत स्थान मिळवत त्यांनी इतर विद्यार्थ्यांसमोर परिश्रम,
चिकाटी आणि ध्येयवेडेपणाचा आदर्श निर्माण केला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत धारणकर यांचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करून
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच कृषि महाविद्यालय, गोळेगावचे
अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांनी शाश्वत धारणकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या
भावी क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच विद्यापीठातील सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध महाविद्यालयांचे
अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक,
अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही
शाश्वत धारणकर यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप लीगमध्ये मिळालेली ही संधी शाश्वत धारणकर यांच्या क्रीडा कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असून, आगामी काळातही ते आपल्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास विद्यापीठ परिवाराने व्यक्त केला आहे.


