Monday, September 7, 2026

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने ‘विकसित भारत युवा नेते संवाद–२०२७’ प्रश्नमंजुषेत सहभागी होण्याचे आवाहन

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे महाविद्यालयातील सर्व पदवीपूर्व विद्यार्थी तसेच एनएसएस स्वयंसेवकांना युवा कार्य व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित विकसित भारत युवा नेते संवाद–२०२७’ (VBYLD 2027) या प्रश्नमंजुषेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात आले.

ही प्रश्नमंजुषा मेरा युवा भारत’ (MY Bharat) पोर्टलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी केवळ पाच मिनिटांचा वेळ देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेरा युवा भारत (MY Bharat) पोर्टलवर नोंदणी अथवा लॉगिन करून आपला सहभाग नोंदवावा. या उपक्रमात सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व पदवीपूर्व विद्यार्थी आणि विशेषतः एनएसएस स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने या प्रश्नमंजुषेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

या प्रश्नमंजुषेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार असून, राष्ट्रीय स्तरावर आपले विचार आणि नेतृत्वगुण प्रदर्शित करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या विकसित भारत युवा नेते संवाद–२०२७’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. याशिवाय, पात्र एनएसएस स्वयंसेवकांना प्रजासत्ताक दिन संचलन–२०२७ साठी एनएसएस पथकाचा भाग होण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

याबाबत मेरा युवा भारत कार्यालयाचे कक्ष अधिकारी श्री. गजानन गाडेकर व समन्वयक श्री. दीपक खुळे यांनी महाविद्यालयातील उपस्थित विद्यार्थ्यांना या उपक्रमाची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी सर्व पदवीपूर्व विद्यार्थी व एनएसएस स्वयंसेवकांनी या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

प्रश्नमंजुषा व नोंदणीसाठी : MY Bharat – VBYLD 2027 Portal