‘शेतकरी देवो भव’ या संकल्पनेतून शेतकऱ्यांशी संवाद; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रेरणा
हवामान बदलाच्या परिस्थितीत ‘त्रिशूल तंत्रज्ञान’ आत्मसात करणे काळाची गरज
– डॉ. हरीश आवारी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या
मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून ‘माझा
एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ हा अभिनव कृषि विस्तार उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘शेतकरी देवो भव’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील आठही
जिल्ह्यांमध्ये दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, प्रक्षेत्र भेटी, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी
मेळावे आयोजित केले जातात.
या उपक्रमांतर्गत दिनांक ९ सप्टेंबर २०२६ रोजी करडगाव (ता. व जि. परभणी)
येथे शेतकरी संवाद व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. यावेळी विविध
विषयांवरील तज्ज्ञ मार्गदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी
हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर ‘त्रिशूल
तंत्रज्ञान’ आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पावसाळ्यात अतिरिक्त
वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवणे, सौरऊर्जेवर चालणाऱ्या
पंपाद्वारे त्याचा उपसा करणे आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना गरजेनुसार
पाणी देणे, या तीन बाबी त्रिशूल तंत्रज्ञानाचे प्रमुख घटक
असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ठिबक सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन उत्पादनक्षमता वाढविता
येते. तुरीसारख्या पिकांमध्ये ठिबक सिंचनाचा वापर केल्यास ४० ते ६० टक्क्यांपर्यंत
पाणी बचत होऊ शकते. त्यामुळे पारंपरिक पाट सिंचनाच्या तुलनेत उपलब्ध पाण्यात
सुमारे दोन ते अडीच पट अधिक क्षेत्र सिंचनाखाली आणता येते, असे डॉ. आवारी यांनी सांगितले. कमी पाण्यात येणारी तसेच
बाजारपेठेत चांगली मागणी आणि दर असलेली पिके निवडल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात
वाढ होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.
ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तुरीचे उत्पादन घेऊन एकरी एक लाख रुपयांपर्यंत
उत्पन्न मिळविण्याचे अनुभव विविध शेतकऱ्यांनी घेतले असल्याचे उदाहरणांसह स्पष्ट
करत त्यांनी शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करावा, असे आवाहन केले.
कोरडवाहू शेती संशोधन केंद्रातील मृद व जलसंधारण विभागाचे वरिष्ठ
शास्त्रज्ञ डॉ. मधुकर मोरे यांनी पावसाच्या खंड काळात जमिनीतील ओलावा
टिकविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच ‘सुखा
रक्षक’ ॲपचा वापर याबाबत मार्गदर्शन केले.
सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विशाल इंगळे यांनी
सिंचन व्यवस्थापन व ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक श्री.
भास्कर सुरनर यांनी पिकांवरील कीड व रोगांच्या प्रभावी नियंत्रणाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठातील सहाय्यक लेखाधिकारी, संशोधन व उपनियंत्रक श्री. नामदेवराव वल्लमवाड यांनी
ग्रामस्थांच्या सहकार्याने केले. यावेळी ४८ शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. माऊली खिस्ते यांनी केले.
कार्यक्रमानंतर तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसोबत प्रक्षेत्र भेट देऊन विविध
पिकांची पाहणी केली. पिकांची सद्यस्थिती, पाण्याची
उपलब्धता आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत त्यांनी प्रत्यक्ष
शेतावर मार्गदर्शन केले.
या उपक्रमात अशोक किसनराव मुंढे, अमोल
यशवंतराव भिसे, दत्तराव रामराव मुंढे, सुरेश
रामचंद्र वल्लमवाड, अर्जुन दगडीराम वल्लमवाड, सूर्यकांत मुरलीधर वल्लमवाड, सुदाम उत्तमराव मुंढे,
कोंडीबा मुंडे, विनायक मुंढे, शिवाजी दगडीराम वल्लमवाड, दिलीप बाबुराव कुलकर्णी,
अजय आसाराम वल्लमवाड, रावसाहेब बाबुराव मुंढे,
माऊली नामदेवराव खिस्ते, महेश सुदामराव मुंढे यांच्यासह
करडगाव येथील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला.

.jpeg)
