Monday, September 14, 2026

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात येथे श्री गणेशाची भक्तिभावात स्थापना

 श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीचा आकर्षक देखावा; टाळ-मृदंगाच्या गजरात गणरायाचे स्वागत


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, परभणी येथे गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाची उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात महाविद्यालयात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वात स्थापना करण्यात आली. शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.

कृषि महाविद्यालयातील गणेशोत्सव समिती-२०२६च्या वतीने यावर्षी महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीचा आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. या देखाव्यातून महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा, भक्तिभाव आणि सांस्कृतिक वारसा यांचे सुंदर दर्शन घडविण्यात आले आहे. तसेच श्री गणरायाच्या आगमनावेळी विद्यार्थ्यांनी टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी काढून गणरायाचे उत्साहात स्वागत केले.

गणेशाच्या आगमन मिरवणुकीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, टाळ-मृदंगाचा गजर आणि भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी साकारलेल्या देखाव्यातून भारतीय संस्कृती, अध्यात्म, भक्तीपरंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला आहे.

याप्रसंगी कृषि महाविद्यालय, परभणीचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, कृषि वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा कृषि विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. राजेश कदम, कीटक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कृषि हवामानशास्त्र विभागप्रमुख डॉ. किरण जाधव, तसेच पूजा समितीचे सदस्य डॉ. आसमान खोब्रागडे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. गजानन गोटे, डॉ. बरकुले, डॉ. धीरज पाथ्रीकर यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.