Tuesday, September 8, 2026

हवामान बदलास अनुकूल व शाश्वत कापूस उत्पादनासाठी सर्व संबंधित घटकांनी एकत्रित प्रयत्न करावेत : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

देशी कापूस संशोधनातील वनामकृविच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक; ‘अकॅडेमिया–इंडस्ट्री–गव्हर्नमेंट’ (AIG) मॉडेलला पसंती

इंडो कॉटन डेव्हलपमेंट असोसिएशन (ICDA) यांच्या वतीने मुंबई येथे विशेष बैठकीचे आयोजन

महाराष्ट्रातील कापूस–वस्त्रोद्योग मूल्यसाखळी अधिक शाश्वत, हवामान बदलास अनुकूल आणि कमी कार्बन उत्सर्जनाची करण्यासाठी संशोधन संस्था, उद्योग, शासन, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच इतर सर्व संबंधित घटकांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.

इंडो कॉटन डेव्हलपमेंट असोसिएशन (ICDA) यांच्या वतीने महाराष्ट्रात हवामान बदलास अनुकूल व कमी कार्बन उत्सर्जनावर आधारित कापूस–वस्त्रोद्योग मूल्यसाखळी विकसित करण्यासंदर्भात मुंबई येथे दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथील मॅकिया (MACCIA) संस्थेच्या आर. बेदमुथा सभागृहात आयोजित या बैठकीतील ‘Role of Farm Groups, Supply Chains and Supporting Ecosystem to Build Carbon-Neutral Traceable Supply Chains in Maharashtra’ या विषयावरील दुसऱ्या परिसंवादात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या मित्रा (MITRA) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री प्रवीण परदेशी (सेवानिवृत्त भाप्रसे), माजी कृषी आयुक्त तथा व्हीएसटीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री उमाकांत दांगट (सेवानिवृत्त भाप्रसे), आयसीडीएचे अध्यक्ष श्री हेमंत राजपूत तसेच ग्रँट थॉर्न्टन भारतचे सोशल पार्टनर श्री चेतन भक्कड यांच्यासह कापूस व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

या चर्चेदरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन व विस्तार कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. विशेषतः देशी कापसाच्या संशोधन व विकासातील विद्यापीठाच्या उल्लेखनीय उपलब्धींची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. तसेच विद्यापीठाने सुचविलेल्या अकॅडेमिया–इंडस्ट्री–गव्हर्नमेंट’ (AIG) या समन्वित कार्यप्रणालीचेही मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत आणि हवामान बदलास अनुकूल कापूस उत्पादनासाठी संशोधन संस्था, उद्योग आणि शासन यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सर्व संबंधित भागधारकांना एकाच व्यासपीठावर आणून सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून कापूस क्षेत्रासमोरील आव्हानांवर प्रभावी उपाययोजना करता येतील, असे त्यांनी नमूद केले.

परिसंवादामध्ये हवामान बदलास अनुकूल कापूस वाण, उच्च घनता लागवड पद्धती (HDPS), एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM), एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM), संवर्धन शेती, नत्रयुक्त खतांचा कमी व कार्यक्षम वापर, ‘त्रिशूल’ तंत्रज्ञान, सूक्ष्म सिंचन, खत-सिंचन (फर्टिगेशन) तंत्रज्ञान तसेच यांत्रिकीकरण आदी महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम करण्याबरोबरच कापूस उत्पादनापासून वस्त्रोद्योगापर्यंत पारदर्शक व शोधण्यायोग्य (Traceable) मूल्यसाखळी विकसित करण्यावरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. शेतकरी उत्पादक कंपन्या व संस्था, संशोधन संस्था आणि विस्तार यंत्रणा यांच्या माध्यमातून हवामान-स्मार्ट तसेच कमी कार्बन उत्सर्जनावर आधारित कापूस उत्पादन पद्धतींचा व्यापक प्रसार करण्याची गरज परिसंवादात अधोरेखित करण्यात आली.

या परिसंवादात विविध शेतकरी गट, पुरवठा साखळीतील घटक, वस्त्रोद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, संशोधन संस्थांचे अधिकारी व शास्त्रज्ञ तसेच संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्रातील कापूस क्षेत्र अधिक स्पर्धात्मक, शाश्वत आणि जागतिक बाजारपेठेच्या मागणीनुसार विकसित करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे उपस्थित मान्यवरांनी यावेळी नमूद केले.