Sunday, November 22, 2026

प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर यांना वनामकृवितर्फे मानद ‘कृषिरत्न’ उपाधी प्रदान

आंबा उत्पादनातील नाविन्यपूर्ण प्रयोग, नैसर्गिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापराची दखल

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या वतीने दिनांक २० नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित २८ व्या दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि मान्यवरांच्या शुभहस्ते कृषि व शेतीपूरक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना विविध मानद पदव्यांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये परभणी तालुक्यातील वरपूड येथील प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत वरपूडकर यांना कृषि क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग, संशोधनशील वृत्ती आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन मानद ‘कृषिरत्न’ उपाधी प्रदान करण्यात आली.

श्री. वरपूडकर हे पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत विविध प्रयोगांच्या माध्यमातून शेतीत नवनवीन यशस्वी पद्धती विकसित करणारे प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. त्यांनी आंबा लागवड व उत्पादनामध्ये विशेष प्राविण्य मिळविले असून, त्यांच्या आनंदिता फार्मच्या माध्यमातून देशी आणि विदेशी अशा सुमारे ७९ आंब्यांच्या जातींचे संवर्धन व लागवड केली आहे. यामध्ये भारतीय आंब्यांच्या ३७, तर विदेशी आंब्यांच्या ४२ जातींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, त्यांनी ‘सिंदूर’ या आंब्याच्या जातीच्या माध्यमातून आंबा उत्पादनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून दर्जेदार फळांचे उत्पादन घेण्याबरोबरच आंब्याच्या विविध जातींचे जतन, संवर्धन आणि उत्पादनवाढीसाठी ते सातत्याने प्रयोग करीत आहेत. त्यांच्या आंबा उत्पादनाची दखल घेत या प्रयोगांना व्यापक प्रसिद्धीही मिळाली आहे.

शेतीमध्ये पाणी व्यवस्थापनाला विशेष महत्त्व देत त्यांनी सूक्ष्म तुषार सिंचनासह आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब केला आहे. तसेच विविध पिकांच्या सुधारित वाणांची लागवड, पीक व्यवस्थापन आणि उत्पादन खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने ते सातत्याने प्रयोग करतात. त्यांच्या शेतावरील प्रयोगांची पाहणी करण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने शेतकरी भेट देतात. शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर मार्गदर्शन करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्यही ते करतात.

त्यांच्या या प्रयोगशीलतेमुळे आंबा लागवड, नैसर्गिक शेती, पाणी व्यवस्थापन आणि नाविन्यपूर्ण कृषि पद्धतींना नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या दीर्घकालीन योगदानाची दखल घेऊन विद्यापीठाने मानद ‘कृषिरत्न’ उपाधीने त्यांचा गौरव केला आहे. हा सन्मान त्यांच्या शेतीतील प्रयोगशीलतेचा तसेच मराठवाड्यातील प्रगतशील शेतकरी वर्गाच्या योगदानाचा गौरव ठरला आहे.