दुष्काळसदृश्य परिस्थितीत योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनासह फळबागा जगविण्यावर भर द्यावा – डॉ. हरिहर कौसडीकर
दुष्काळसदृश्य
परिस्थितीत जमिनीतील ओलावा, पिकांची अवस्था आणि
जमिनीची सुपीकता लक्षात घेऊन अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत
महत्त्वाचे आहे. खतांचा संतुलित वापर, योग्य वेळी खतांची
मात्रा देणे आणि उपलब्ध साधनसंपत्तीचे काटेकोर नियोजन केल्यास पिकांची वाढ व
उत्पादकता टिकवून ठेवणे शक्य आहे. विशेषतः फळबागांच्या बाबतीत यंदा अधिक उत्पादन
घेण्यापेक्षा उपलब्ध बागा जगविण्याला प्राधान्य द्यावे, असे
प्रतिपादन माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात
मृद विज्ञान विभागाचे विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी केले.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयांतर्गत विभागीय कृषि विस्तार
शिक्षण केंद्र तथा कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र,
परभणी आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'खेत बचाओ अभियान – २०२६' अंतर्गत दिनांक २० नोव्हेंबर
२०२६ रोजी आयोजित १२५ व्या ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात ते बोलत
होते.
ऑनलाइन
शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद दर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित केला जातो. या
उपक्रमांतर्गत दर आठवड्याला शेतीशी संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
आयोजित करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले जाते. यापूर्वीच्या
कार्यक्रमांमध्ये दुष्काळी परिस्थितीत हळद पीक व्यवस्थापन तसेच जनावरांचे आरोग्य व
चारा व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले होते.
पुढे मार्गदर्शन
करताना डॉ. कौसडीकर म्हणाले की, जमिनीत ओलाव्याची कमतरता असल्यास पिकांकडून अन्नद्रव्यांचे शोषण आणि
त्यांची कार्यक्षमता प्रभावित होते. त्यामुळे खतांचा वापर करताना पिकांची अवस्था,
जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण आणि उपलब्ध अन्नद्रव्यांची स्थिती
विचारात घेणे आवश्यक आहे. अनावश्यक खतांचा वापर टाळून संतुलित अन्नद्रव्य
व्यवस्थापन करावे तसेच जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य उपाययोजना
कराव्यात.
पिकांना
पाण्याच्या ताणाचा सामना करता यावा,
यासाठी पानांद्वारे अन्नद्रव्यांची फवारणी करण्यावर त्यांनी विशेष
भर दिला. पिकांच्या गरजेनुसार १३:००:४५, ००:००:५० किंवा
पोटॅशियम सोनाईट यांची दर पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. यासोबत ग्रेड-२
सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून फवारणी केल्यास प्रतिकूल परिस्थितीत पिकांची ताण सहन
करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
फळबाग
उभारण्यासाठी शेतकरी चार ते पाच वर्षे मेहनत,
वेळ आणि आर्थिक गुंतवणूक करतो. अशा परिस्थितीत बाग नष्ट झाल्यास
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे यंदा अधिक उत्पादन घेण्याऐवजी
उपलब्ध फळबागा जगविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी
त्यांनी पुढील उपाययोजना सुचविल्या.
- उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन
करून झाडांच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
- योग्य पद्धतीने छाटणी करून
फांद्यांची संख्या कमी करावी. छाटलेल्या भागांवर बोर्डोपेस्ट लावावी.
- झाडांमधील पाण्याचा ताण कमी
करण्यासाठी केओलीनची फवारणी करावी.
- झाडांच्या गरजेनुसार योग्य
अन्नद्रव्यांची फवारणी करावी.
या
उपाययोजनांमुळे झाडांवरील पाण्याचा ताण कमी होण्यास मदत होऊन प्रतिकूल परिस्थितीत
फळबागा जगविणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट
केले.
जमिनीचे
आरोग्य आणि पिकांची प्रतिकारक्षमता टिकवून ठेवण्यासाठी जीवामृत, गोकृपामृत, विद्यापीठनिर्मित
बायोमिक्स आणि ट्रायकोडर्मा यांसारख्या जैविक निविष्ठांचा शास्त्रीय पद्धतीने वापर
करावा, असेही त्यांनी सांगितले. रासायनिक निविष्ठांसोबत
जैविक निविष्ठांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास जमिनीचे आरोग्य सुधारण्यास आणि
पिकांचे संरक्षण करण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या
प्रारंभी विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी आगामी आठवड्यातील
हवामानाचा सविस्तर अंदाज सादर करून शेतकऱ्यांना शेती नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.
विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी प्रास्ताविकात सध्याच्या
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची वाढ व उत्पादकता टिकविण्यासाठी अन्नद्रव्य
व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले. याच अनुषंगाने आजच्या कार्यक्रमासाठी हा विषय
निवडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या
कार्यक्रमात विद्यापीठाचे मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख
यांच्यासह विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे आणि मराठवाड्यासह
महाराष्ट्राच्या विविध भागांतील १२० हून अधिक शेतकऱ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला.
सहभागी शेतकऱ्यांनी हळद, विविध फळबागा,
भाजीपाला, आंबा आणि डाळिंब बागांचे
दुष्काळसदृश्य परिस्थितीत संरक्षण कसे करावे, उपलब्ध पाण्याचे
नियोजन कसे करावे तसेच पिकांना अन्नद्रव्ये कोणत्या पद्धतीने द्यावीत, यासंदर्भात प्रश्न विचारले. डॉ. कौसडीकर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना
सविस्तर उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील डॉ. दिगंबर पटाईत, श्री. मधुकर मांडगे, डॉ.
दिपाली सवंडकर, श्री. अनिल शिंदे, श्री.
अमोल झाडे आणि श्री. नितीन मोहिते यांनी परिश्रम घेतले.
दर शुक्रवारी
सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या पुढील भागातही शेतीशी
संबंधित विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या
उपक्रमात नियमित सहभाग नोंदवून शास्त्रीय मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



.jpeg)