शासनाच्या पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांच्या चर्चासत्रात आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या व अपेक्षा; तीन महिन्यांतून एकदा विद्यापीठात बैठक आयोजित करण्याचे माननीय कुलगुरूंचे निर्देश
शेतकरी हा
देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असून शेती आणि शेतकऱ्यांचे योगदान अनन्यसाधारण
आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामांना प्राधान्य देत विद्यापीठातील सर्व अधिकारी व
शास्त्रज्ञांनी ‘शेतकरी देवो भव’ या भावनेतून कार्य करावे. शेतकऱ्यांसाठी काम
करताना कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल न पाळता त्यांच्या भेटीला आणि समस्यांच्या
निराकरणाला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी केले.
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि शासकीय
पुरस्कारप्राप्त शेतकरी संघ, मराठवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित
शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकरी चर्चासत्रात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाचे पदाधिकारी तथा
कृषिभूषण प्रकाश भुता पाटील उपस्थित होते. व्यासपीठावर कृषिभूषण श्री. नाथराव कराड,
कृषिभूषण श्री. सोपानराव अवचार, कृषिभूषण श्री.
कांतराव देशमुख, शेतीनिष्ठ शेतकरी श्री. गंगाधर शृंगारे,
शेतीनिष्ठ शेतकरी श्री. अजित मगर, श्री. सदाशिवराव
थोरात, कृषिरत्न श्री. चंद्रकांत वरपूडकर, श्री. चंद्रशेखर
भडसावळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमास संशोधन
संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश अहिरे, अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर
यांचीही उपस्थिती होती. कृषि रसायनशास्त्र व मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर
कौसडीकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) येथील कार्यपद्धतीचा अनुभव सांगितला. तेथे
कार्यरत असताना कोणतेही महत्त्वाचे काम असले तरी शेतकऱ्यांच्या भेटीला आणि
त्यांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देण्याची कार्यसंस्कृती अवलंबली जात
असल्याचे त्यांनी नमूद केले. हीच कार्यपद्धती विद्यापीठातही कार्य करत असताना अवलंबली
असल्याचे नमूद केले, व पुढेही सातत्याने अवलंबण्याची गरज असल्याचे त्यांनी
सांगितले. जागतिक स्तरावर आर्थिक असमतोल निर्माण होत असला तरी भारताची
अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित असल्यामुळे देशात आर्थिक स्थैर्य
टिकून राहण्यास शेतकऱ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. ‘उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी’ या पारंपरिक उक्तीचा संदर्भ देत त्यांनी
शेती आणि शेतकऱ्यांच्या सन्मानाचे महत्त्व विशद केले.
शेतकऱ्यांना
काही वेळा जाहिराती किंवा अन्य माध्यमांतून गरीब अथवा अज्ञानी असल्याचे चित्रित
केले जाते, ही बाब योग्य नाही.
शेतकरी हा अनुभव, ज्ञान आणि कौशल्याने समृद्ध असून त्याला
शास्त्रज्ञ म्हणूनही सन्मान मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी
स्पष्ट केले. याच भावनेतून विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात २१ प्रगतशील
शेतकऱ्यांना ‘शेतकरी शास्त्रज्ञ’ आणि ‘नवोन्मेषी शेतकरी’ पुरस्कारांनी गौरविण्यात
आल्याचे त्यांनी सांगितले. पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील इतर
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठीही पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा
त्यांनी व्यक्त केली.
ज्याप्रमाणे
पाण्याशिवाय शेती शक्य नाही, त्याचप्रमाणे ज्ञानाशिवाय प्रगत शेती शक्य नाही. पुरस्कारप्राप्त शेतकरी
हे आपल्या अनुभवातून आणि प्रयोगांतून ज्ञान संपादन करणारे आहेत. त्यांनी हे ज्ञान
इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. मराठवाड्यातील शेतकरी इतर राज्यांत जाऊनही
मार्गदर्शन करतात. मंगेश देशमुख यांनी मध्य प्रदेशात जाऊन सोयाबीन तंत्रज्ञानाबाबत
केलेले मार्गदर्शन हे त्याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या समाधानासाठी वेळेचे बंधन न ठेवता त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी
प्रयत्न करावेत, यातून विद्यापीठाची विश्वासार्हता वाढेल,
असेही ते म्हणाले.
शासकीय
पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाची दर तीन महिन्यांतून एक बैठक विद्यापीठात आयोजित
करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकांमधून शेतकऱ्यांचे अनुभव, समस्या आणि अपेक्षा जाणून घेऊन संशोधन व
विस्तार शिक्षणाच्या पुढील कामाची दिशा निश्चित करण्यात यावी. पूर्वी
प्रयोगशाळेतून शेतावर तंत्रज्ञान पोहोचविण्याची संकल्पना होती; मात्र आता ‘शेत हेच प्रयोगशाळा’ ही विचारधारा महत्त्वाची ठरत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतावरील अनुभव आणि त्यांनी मांडलेल्या समस्यांना संशोधनात
महत्त्वाचे स्थान देण्यात यावे. आजच्या चर्चासत्रात मांडण्यात आलेल्या समस्यांच्या
निराकरणासाठी विद्यापीठ निश्चितच प्रयत्नशील राहील, असे
आश्वासनही त्यांनी दिले.
या
चर्चासत्रात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून सहभागी झालेल्या महाराष्ट्र
शासनाच्या विविध पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांतील शेतीविषयक
समस्या, त्यावरील उपाययोजना तसेच
विद्यापीठ आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षा मांडल्या. यामध्ये शेतीसाठी आवश्यक
असलेल्या केओलीनसारख्या निविष्ठा व इतर साधनसामग्रीच्या किमती नियंत्रणात
ठेवण्याची आवश्यकता, रेशीम शेतीसाठी योग्य मार्गदर्शन व
प्रशिक्षण मेळाव्यांचे आयोजन आदी विषयांचा समावेश होता.
शेतकऱ्यांनी
स्वतःच्या शेतमालाची किंमत ठरविण्याची क्षमता निर्माण करावी, बाजारपेठेत आपल्या मालाला योग्य भाव
मिळविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे मतही चर्चेत
व्यक्त करण्यात आले. शिक्षण घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करताना आलेले अनुभव तसेच
पारंपरिक पद्धतीने शेती करताना आलेल्या अडचणी शेतकऱ्यांनी मांडल्या. विद्यापीठाचे
शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन मार्गदर्शन करीत असल्यामुळे ‘माझा एक दिवस
माझ्या बळीराजासोबत’ आणि ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद यांसारख्या उपक्रमांचा
लाभ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ‘शेतकरी देवो भव’ ही भावना व्यक्त करून
शेतकऱ्यांचा सन्मान केल्याबद्दल त्यांनी माननीय कुलगुरूंचे आभार मानले.
शासनाचे
पुरस्कारप्राप्त शेतकरी त्यांच्या अनुभव,
ज्ञान आणि कार्याच्या गुणवत्तेनुसार विद्यापीठाच्या विविध मंडळांवर
प्रतिनिधित्व देऊन विद्यापीठाच्या नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घ्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या चर्चासत्रामुळे शेतकरी, शास्त्रज्ञ आणि विद्यापीठ प्रशासन यांच्यात थेट संवाद साधण्याची संधी
उपलब्ध झाली.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन प्रा. राहुल औंढकर यांनी केले,
तर शासकीय पुरस्कारप्राप्त शेतकरी संघाचे पदाधिकारी श्री. सदाशिव
थोरात यांनी आभार मानले. या चर्चासत्रास मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शासनाचे
पुरस्कारप्राप्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
