Wednesday, March 31, 2021

समाजाची गरज असतांना योग्‍य वेळी रक्‍तदान ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवितील कृषी महाविद्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजनेंतर्गत रक्‍तदान शिबिर

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयात परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या वतीने राष्‍ट्रीय सेवा योजनेंतर्गत दिनांक 31 मार्च रोजी रक्‍तदान शिबिराचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, शासकीय रक्‍तपेढीचे प्रमुख डॉ उदय देशमुख, श्री कुणाल चव्‍हाण, श्री मोतीराम चव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आज थॅलेसिमिया व इतर रूग्‍नांना  रक्‍ताची मोठी गरज भासत आहे. करोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थितीत रक्‍तदान करतांना मर्यादा येत आहेत. समाजाची गरज असतांना योग्‍य वेळी रक्‍तदान करून कृषिच्‍या विद्यार्थीनी सामाजिक बांधीलकी जपली, असे ते म्‍हणाले.   

डॉ उदय देशमुख म्‍हणाले की, रक्‍त देण्‍याची गरज नियमितपणे थॅलेसेमिया, गरोदर महिला, अनेमिया, अपघातात जखमी आदी रग्‍नांना जास्‍त असते. सद्यस्थिती राज्‍यात रक्‍ताचा तुडवटा जाणवत आहे,

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ अनुराधा लाड यांनी केले तर आभार डॉ अनंत बडगुजर यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील 25 पेक्षा जास्‍त अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्‍यांनी रक्‍तदान केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ विनोद शिंदे, डॉ सुहास देशमुख, डॉ आशाताई देशमुख, डॉ डि एफ राठौड आदींनी परिश्रम घेतले.

Saturday, March 27, 2021

वनामकृवि तर्फे दोन दिवसीय स्पर्धा परिक्षा ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि विद्या विभागाद्वारे व राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सहकार्याने मागासवर्गीय पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विषयज्ञान विकासासाठी “दोन दिवसीय ऑनलाईन मार्गदर्शन प्रशिक्षण वर्गाचे दिनांक २६ ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्‍यात आले असुन दिनांक २६ मार्च रोजी मार्गदर्शन वर्गाचे उदघाटन गुंटुर (आंध्रप्रदेश) येथील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रतापकुमार रेडडी, वनामकृविचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एस. जाधव यांच्‍या प्रमुख उपस्थित झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक डॉ. डी. पी. वासकर हे उपस्थित होते. 

मार्गदर्शनात प्रमुख पाहुणे डॉ. प्रतापकुमार रेड्डी यांनी राष्‍ट्रीय पातळीवरील कृषि संशोधनाशी संबंधीत स्पर्धा परीक्षासाठी तयारी करतांना कशा प्रकारे नियोजन करावे याबाबत मार्गदर्शन केले. स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना निश्चित ध्‍येय ठेवुन तयारी करावी. योग्‍यरित्‍या नियोजन करून तयारी केल्‍यास निश्चितच यश प्राप्‍त होते असे ते म्‍हणाले. तर डॉ. जी. एस. जाधव यांनी सदरिल मार्गदर्शन वर्गाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. डी. पी. वासकर म्‍हणाले की, स्‍पर्ध परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्‍यांकरता वेळोवेळी प्रश्नमंजुषा, चर्चासत्रे, अभ्यासवर्ग आदींचे आयोजन करावे. नावाजलेल्या संस्‍थेस व विद्यापीठांना भेटी देवून माहिती जाणून घ्यावी असे आवाहन करून मार्गदर्शन वर्ग आयोजीत केल्याबद्दल आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

प्रास्‍ताविकात कृषिविद्या विभाग विभाग प्रमुख तथा आयोजक डॉ. बी. व्ही. आसेवार यांनी केले. सुत्रसंचलन डॉ. मिर्झा आय.ए.बी तर आभार प्रा. ज्योती गायकवाड यांनी म्‍हणाले. सदरिल प्रशिक्षण वर्गाचे आयोजन कुलगुरु मा डॉ अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनानुसार करण्‍यात आले असुन दोन दिवसीय प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना कनिष्‍ठ संशोधन फेलो, वरिष्‍ठ संशोधन फेलो, राष्‍ट्रीय पात्रता परिक्षा, कृषि संशोधन सहाय्यक आदी राष्‍ट्रीय पातळीवरील कृषिच्‍या स्पर्धापरीक्षाबाबत राष्ट्रीय पातळीवरील नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन करणार आहेत. यात विद्यापीठातील डॉ. मिर्झा आय. ए. बी., तिरुपाथुर (तामीळनाडू) येथील फिनीक्स कोचिंग सेंटरचे डॉ. एम. जगदीश, जोधपुर (राजस्थान) येथील कृषी संशोधन केंद्राचे संशोधक डॉ. मुला राम, कानपुर येथील कृषी विद्याचे शास्‍त्रज्ञ डॉ. कांनचेती मृनालीनी आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Wednesday, March 24, 2021

तेलबिया संशोधनाच्‍या दृष्‍टीने वनामकृवि व हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्यात सामंजस्य करार

तेलबिया पिकांच्‍या संशोधन कार्य होणार अधिक वृध्दिंगत

तेलबिया संशोधनाच्‍या दृष्‍टीने हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्यात दिनांक २२ मार्च रोजी सामंजस्य करार हैद्राबाद येथे करण्यात आला. सामंजस्य करार विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या प्रमुख उपस्थिती करण्‍यात आला. सामंजस्‍य करारावर भारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्‍या संचालिका डॉ. एम. सुजाता व विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी स्वाक्ष-या केल्या. यावेळी विद्यापीठातील लातुर येथील तेलबिया संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एम. के. घोडके, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, हैद्राबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. सुधाकर बाबु, डॉ. रत्नकुमार हे उपस्थित होते.

भारतीय तेलबिया संशोधन संस्‍था देशातील तेलबिया पिक संशोधनात अग्रगण्‍य संस्‍था असुन दोन संस्थांमध्ये होत असलेल्या संशोधन कार्यासाठी तसेच पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनासाठी हा सामंजस्य करार महत्‍वाचा ठरणार आहे. करारामुळे विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषि जैवतंत्रज्ञान तसेच कृषि विद्याशाखेतील विविध विद्यार्थ्यांना भारतीय तेलबिया संशोधन संस्था, हैद्राबाद येथील विविध प्रयोगशाळेत संशोधनात्मक कार्य करता येणे शक्य होणार आहे. विद्यापीठास्तरावरील तेलबिया पिकांच्‍या संशोधन कार्य अधिक वृध्दिंगत होण्याच्या दृष्टीने या कराराचा फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच दोन्ही संस्थांमध्ये विविध तंत्रज्ञानाचे देवाणघेवाण होणार आहे. भविष्यात दोन्ही संस्थांमार्फत एकत्रित संशोधन प्रकल्प सादर करण्यात येतील तसेच तेलबियांपासुन विविध मुल्यवर्धीत पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान विविध महिला बचत गट व शेतकरी गटांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येईल.

दिनांक २२ मार्च रोजी जागतिक जल दिनाचे औचित्य साधुन विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांचे कृषि क्षेत्रात पाण्याचा सुयोग्य वापर या विषयावर विशेष व्याख्यानही ऑनलाईन आयोजित करण्यात आले होते. यात देशातील विविध संशोधन केंद्र व संस्थेतील शास्‍त्रज्ञांनी सहभाग घेतला होतो.

मराठवाडयात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी ...... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवितील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आयोजित शेतमाल प्रक्रिया लघुउद्योग प्रशिक्षणाचे उदघाटन

देशांतर्गत शेतमाल प्रक्रिया आणि मुल्यवर्धनाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात अत्‍यंत कमी असुन कृषी माल प्रक्रियेच्या अभावी अन्‍नधान्ये, भाजीपाला व फळे यांची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. शेतमालेचे नुकसान टाळण्यासाठी छोटे छोटे कृषी उद्योग सुरु होणे आवश्यक आहे. मराठवाडयात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मत कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण यांनी व्‍यक्‍त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग यांचे तर्फे भारतीय कृषी अनुसंधान परिषद अनुदानित कौशल्य विकास योजने अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थीकरिता “शेतमाल प्रक्रिया लघु उद्योग” याविषयावर दिनांक २३ ते २६ मार्च दरम्यान प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात असुन दि. २३ मार्च रोजी प्रशिक्षणाचे उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, मुख्‍य आयोजक सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्‍या भाषणात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले म्हणाले कि, अन्नधान्य, डाळ आणि अन्य शेतमाल यांचे प्रक्रिया करून आवश्यक पाकेजिंग केल्यास शेतकऱ्यांना निश्चितपणे अधिक आर्थिक मोबदला मिळतो. तर संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर मार्गदर्शनात म्‍हणाले की, आहारातील चिंच, अद्रक, लसून यावर प्रक्रिया करून त्यावर आधारित छोटे छोटे उद्योग सुरु करण्यास मराठवाडयात खूप वाव असल्याचे नमूद केले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके म्‍हणाले की, कृषी प्रक्रिया उद्योग याचा देशाच्या विकासातील सहभाग वाढत असून सध्या देशात २५ लाख असंघटीत प्रक्रिया उद्योग आहेत ज्यामुळे अनेकांना रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होत आहे.

प्रास्ताविक कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख व आयोजक डॉ. स्मिता खोडके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. मधुकर मोरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रमोदिनी मोरे यांनी केले. सदरिल प्रशिक्षणात लघुउद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विविध विषयावर जसे विविध शासकीय योजना, अर्थ सहाय्यासाठी बँक व इतर संस्थांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे यासह सोयबिन प्रक्रिया उद्याग, हळद व अद्रक प्रक्रिया, फळे व भाजीपाला प्रक्रिया, जवसापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे इ. माहिती व प्रात्यक्षिके घेण्यात घेणार असल्याचे सांगितले.याशिवाय विविध शेतमाल प्रक्रिया यंत्रे व सामुग्री, वेष्ठ्नीकरण, ब्रान्डईंग व विपणन यावर प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणात ३० पेक्षा जास्त पुरुष आणि महिलांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थी सहभाग नोंदविलेला आहे. कार्यक्रमास महाविद्यालयातील विभागप्रमुख, प्राध्यापक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

वनामकृवित मधमाशी पालनावर तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

पिकामध्‍ये परागसिंचनात मधमाध्‍यांचे महत्‍वाचे स्‍थान ...... शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी किटकशास्त्र विभागाच्‍या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली अनुदानीत कौशल्य विकास आधारित अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मधमाशी पालन या तीन दिवसीय प्रशिक्षनाचे  २३ ते २५ दरम्यान आयोजित करण्यात असुन दिनांक 23 मार्च रोजी प्रशिक्षणाचे उदघाटन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांच्‍या हस्‍ते झाले. उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे, विभाग प्रमुख डॉ.संजीव बंटेवाड, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ धर्मराज गोखले म्‍हणाले की, पिकामध्‍ये परागसिंचनासाठी किटकसृष्‍टीतील मधमाध्‍यांचे महत्‍वाचे स्‍थान असुन शेतक-यांनी शेतीपुरक जोडधंद्या म्‍हणुन मधमाशी पालन केल्‍यास आर्थिकदृष्टया फायदा होऊन मधमाश्‍यांमुळे पिक उत्‍पादनात वाढ होते. मधामध्‍ये औषधी गुणधर्मा असुन औषधी उद्योगात मोठी मागणी आहे.

उपविभागीय कृषी अधिकारी श्री. सागर खटकाळे यांनी कृषि विभागा मार्फत सदरील मधमाशी पालनासाठी असलेल्या विविध शासकीय योजना व अनुदान याची माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ.संजीव बंटेवाड यांनी केले. सुत्रसंचालन डॉ.फारीया खान यांनी केले तर डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी आभार मानले. तांत्रिक सत्रात डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी परागसिंचनासाठी कीटकसृष्टीतील मधमाश्यांचे स्थान व मधमाशांच्या प्रजाती यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विभागातील डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ धीरजकुमार कदम, डॉ. सदाशिव गोसलवाड, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. अनंत लाड, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरतन खंदारे, श्री. दिपक लाड आदीसह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Tuesday, March 23, 2021

वनामकृवित आयोजित काढणीपश्चात तंत्रज्ञान व अन्न प्रक्रिया यावरील प्रशिक्षणास सुरूवात

शेतकरी महिलांनी शेतमाल प्रक्रिया व मुल्‍यवर्धनाचे कौशल्‍य अवगत करून प्रक्रिया उद्योग सुरू करावेत ..... शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या अन्नतंत्र महाविद्यालयातील अन्न प्रक्रिया विभागाच्‍या वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानीत कौशल्य विकास योजने अंतर्गत अनुसुचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थीसाठी दिनांक 22 मार्च ते 27 मार्च दरम्‍यान काढणीपश्चात तंत्रज्ञान व अन्न प्रक्रिया यावर सहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन प्रशिक्षणाचे उद्घाटन 22 मार्च रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले होते तर आयोजक प्राचार्य डॉ. उदय खोडके, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या परभणी जिल्हा समन्वयक श्रीमती निता अंभोरे, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाच्‍या विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, डॉ.सुरेंद्र सदावर्ते आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले म्हणाले की, पिक काढणी वेळेस बाजारातील आवक वाढल्यामुळे कमी किमतीत शेतकरी बांधवाना कच्च्या मालाची विक्री करावी लागते. शेतमालावर प्रक्रिया व मुल्यवर्धन केल्यास निश्चितच आर्थिक लाभ जास्‍त होऊन उन्‍नती साधता येते. शेतकामात महिलांचा प्रमुख वाटा असुन त्यांच्यात उपजतच कौशल्यामुळे पीक लागवड ते काढणीपर्यंत सर्व काम चांगल्‍या प्रकारे केले जाते. शेतमाल प्रक्रिया व मुल्‍यवर्धनाचे कौशल्‍य शेतकरी महिलांनी अवगत करून शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, असा सल्‍ला  त्‍यांनी दिला.

मार्गदर्शनात श्रीमती निता अंभोरे म्हणाल्या की, अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये महिला सक्षम होत असुन अन्न प्रक्रिया उद्योगासाठी लागणारा कच्चामाल, मनुष्यबळ उपलब्ध असल्यामुळे घरगुती आधुनिक यंत्र सामुग्रीचा वापर करुन अन्न प्रक्रिया गृहउद्योग सुरु करता येतील व त्यांच्या निर्यातीसाठी संधी उपलब्ध होतील. 

प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राज्यस्तरावरील अन्न प्रक्रिया व नियोजन या योजने बाबत माहिती दिली. तसेच जागतिक जल दिनानिमीत्त्त अन्नाबरोबर पाण्याचे महत्व नमुद केले. तसेच डॉ. विजया पवार यांनी सहा दिवसीय प्रशिक्षणाबाबत माहिती दिली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपाली गजमल यांनी केले व आभार डॉ. सुरेंद्र सदावर्ते यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. राजेश क्षिरसागर, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. दिलीप मोरे, डॉ. कैलास गाढे आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशिक्षणासाठी ग्रामीण भागातील निवडक 30 अनुसुचित जातीच्या महिलांनी सहभाग नोंदविला आहे. प्रशिक्षणार्थीसाठी कोव्हिड-19 च्या नियमांचे पालन करत सर्व आवश्यक सामग्रीच्या किटचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

वनामकृविच्‍या वतीने आयोजित तण व्‍यवस्‍थापन प्रशिक्षणाचे उदघाटन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषिविद्या विभागाद्वारे व राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सहकार्याने मागासवर्गीय कृषि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विषयज्ञान विकासासाठी “एकात्मिक तण व्यवस्थापन तथा तणनाशकाचा कार्यक्षम वापर” या विषयावर तीन दिवसीय विशेष ऑनलाईन प्रशिक्षण दि. 23 ते 25 मार्च दरम्यान आयोजित केले असुन प्रशिक्षणाचा उदघाटन दिनांक 23 मार्च रोजी झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन जबलपूर येथील भारतीय तण विज्ञान संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुशिलकुमार हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी परभणी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल हे होते. आयोजक कृषिविद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बी.व्ही. आसेवार, नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे आदींची प्रमुख उपस्थित होते.

मार्गदर्शनात डॉ. सुशिलकुमार म्‍हणाले की, सद्यस्थितीत तणामुळे उदभवणारे पीक नुकसान व तणनाशकांच्या अति वापराने होणारे दुष्परिणाम, सेंद्रीय शेतीमध्ये तण व्यवस्थापन, तणनाशकांना प्रतीकारक करणारी तणे आदी बाबींचा विचार केल्यास एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन हाच योग्य पर्याय आहे. अध्यक्षीय समारोपात डॉ. सय्यद इस्माईल यांनी तणनाशकांच्या अयोग्य वापरामुळे जमीनीतील सुक्ष्म जीवावर विपरीत परिणाम घडवुन जमिनीचे जैविक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते, त्यामुळे तणनाशकांचा योग्य प्रमाणात वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात आयोजक डॉ. बी.व्ही. आसेवार प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. सुत्रसंचालन सचिव डॉ. सुनिता पवार यांनी केले तर आभार डॉ. मिर्झा आय.ए.बी यांनी मानले. सदरिल प्रशिक्षणाचे आयोजन कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण व शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले यांच्‍या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले असुन प्रशिक्षणात कौइमतुर येथील तामिळनाडु कृषि विद्यापीठातील कृषिविद्या विभागाचे प्रमुख डॉ. चिन्ना मुथु, डॉ. मुरली अर्थनारी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. सुनिता, अकोला कृषि विद्यापीठातील तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ. जे. पी. देशमुख, संशोधन उपसंचालक डॉ. ए.एस. जाधव, वनस्पती शरीर क्रियाशास्त्रज्ञ डॉ. सुधीर आदी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तीन दिवसीय प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना तण व्यवस्थापन या विषयातील राष्ट्रीय पातळीवरील नामवंत तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे, तरी कृषिच्‍या विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडुन आवाहन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. विशाल अवसरमल, डॉ. मेघा जगताप, इंजि. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. शिवराज शिंदे, रामदास शिंपले आदींनी सहकार्य केले.