Monday, November 23, 2026

वनामकृवि आणि ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

शेतकरी सक्षमीकरण, नैसर्गिक शेती, वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनासाठी संयुक्तपणे विविध उपक्रम राबविणार

शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशन यांच्यात कृषी व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात संयुक्तपणे विविध उपक्रम राबविण्यासाठी दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. हा करारावर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या करारावर विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, तर ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशनच्या वतीने संस्थापक श्री. मोतीराम पौळ यांनी स्वाक्षऱ्या करून दोन्ही संस्थांमधील सहकार्याला अधिकृत स्वरूप दिले.

या सामंजस्य करारांतर्गत शेतकऱ्यांमध्ये नैसर्गिक व सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता निर्माण करणे, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, मृद आरोग्य संवर्धन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय कृषी निविष्ठांचा वापर, बांबू लागवड, वृक्षलागवड तसेच कार्बन क्रेडिटविषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि पर्यावरणपूरक कृषी विकासाला प्रोत्साहन देणे हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

याशिवाय, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कृषिमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्था विकसित करणे, कृषी प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे तसेच ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी दोन्ही संस्थांच्या माध्यमातून संयुक्त प्रयत्न करण्यात येणार आहेत. शेतकरी, युवक आणि महिलांसाठी कृषी व पर्यावरणविषयक प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे.

यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. गोपाल शिंदे, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाचे डॉ. आनंद गोरे, डॉ. पपीता गौरखेडे, उपसंचालक संशोधन डॉ. रणजित चव्हाण यांच्यासह ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशनचे संस्थापक श्री. मोतीराम पौळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषी विकासासोबतच पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यापीठात विकसित होणारे कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अशा संस्थात्मक सामंजस्य करारांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. या सहकार्याच्या माध्यमातून शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संसाधनांचा कार्यक्षम वापर आणि पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. या दृष्टीने आवश्यक असलेल्या कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ नेहमीच अग्रेसर असल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशनचे संस्थापक श्री. मोतीराम पौळ यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी हरित व समृद्ध पर्यावरण निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. विद्यापीठाच्या तांत्रिक सहकार्याने शेतकरी, युवक आणि महिलांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सामंजस्य करारामुळे विद्यापीठाचे कृषी संशोधन, तांत्रिक मार्गदर्शन आणि ग्लोबल वॉर्मिंग फाउंडेशनचे सामाजिक कार्य यांचा प्रभावी समन्वय साधला जाणार आहे. परिणामी, नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा प्रसार, वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन, कृषिमालाचे मूल्यवर्धन आणि ग्रामीण उद्योजकता विकासाला चालना मिळणार आहे.

'नैसर्गिक शेती – समृद्ध शेतकरी – हरित पर्यावरण – सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्था' या संकल्पनेतून करण्यात आलेला हा सामंजस्य करार शाश्वत कृषी विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.