Monday, October 25, 2021

शेती व शेतकरी कल्‍याणासाठी कृषि पदवीधरांनी कार्य करावे .......... कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे

वनामकृविचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्‍साहात संपन्‍न 

सन २०२१ ते २०२२ हे वर्ष परभणी कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष म्‍हणुन साजरा करण्‍यात येत आहे. गेल्‍या पाच दशकापासुन मराठवाडा विभागातील कृषि विकासा करिता परभणी कृषि विद्यापीठ कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षण माध्‍यमातुन महत्‍वाची भुमिक बजावत आहे. परभणी कृषि विद्यापीठाने कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन मोठया प्रमाणात कुशल मनुष्‍यबळ नि‍र्माण केले असुन हे कृषि पदवीधर विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. कृषिच्‍या पदवीधरांनी कोणत्‍याही क्षेत्रातात कार्य करतांना शेती व शेतकरी कल्‍याणाकरिता कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा तेवीसावा दीक्षांत समारंभ दिनांक २५ ऑक्‍टोबर रोजी संपन्‍न झाला, कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्‍यक्ष तथा कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ मा डॉ सी डी मायी हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, आमदार मा डॉ राहुल पाटील, दापोली येथील डॉ बाबासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ संजय सावंत, डॉ एस टी बोरीकर, माजी कुलगुरू डॉ के पी गोरे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा ना श्री दादाजी भुसे पुढे म्‍हणाले की, नुकतेच महाराष्‍ट्र शासनाने शालेय अभ्‍यासक्रमात कृषि विषयाचा समावेश केला असुन यातही कृषि पदवीधर आपले योगदान देऊ शकतील. गेल्‍या पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात संशोधनाच्‍या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांच्या वाण, कृषि औजारे आणि कृषि तंत्रज्ञान विकसित केले असुन हे तंत्रज्ञान शेतकरी बांधवाच्‍या बांधापर्यंत पोहचले पाहिजे. आज शेतकामाकरिता वाढता मंजुरांचा खर्च व योग्‍य वेळी शेतमंजुरांची कमतरता ही मोठी समस्‍या शेतक-यांपुढे आहे. कृषि यांत्रिकीकरणास चालना देण्‍याकरिता संशोधनाच्‍या माध्‍यमातुन कृषि विद्यापीठाने शेतकरी बांधवाच्‍या किफायतीशीर व गरजेचे नुसार कृषि अवजारे व यंत्राचा निर्मिती करण्‍यावर भर देण्‍याची गरज आहे. अनेक शेतकरी स्‍वत: आपल्‍या शेतीत चांगले प्रयोग करतात, या शेतक-यांच्‍या प्रयोगास विद्यापीठाने संशोधनात समावेश करावा. राज्‍याचे मुख्‍यमंत्री मा श्री उध्‍दवजी ठाकरे साहेब शेतीकरी बाधवाप्रती संवेदनशील असुन ते नेहमीच म्‍हणतात शेतकरी चिंतामुक्‍त झाला पाहिजे. कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव परिस्थिती व लॉकडाऊन काळात मोठया प्रमाणात संपुर्ण मानव जातीचे जनजीवन ढवळुन निघाले. परंतु या काळात शेती व शेतकरी हे थांबले नाहीत, शेतीतील कामे अविरत चालु होती. कोठेही अन्‍नधान्‍य, फळ व भाजीपाला कमी पडला नाही की भाव वाढले ना‍ही, याचे सर्व श्रेय शेतकरी बांधवानांच जाते. केवळ पिकांचे उत्‍पादन वाढ करून शेतकरी बांधवाची परिस्थितीत फरक पडणार नसुन उत्‍पन्‍न वाढीकरिता प्रयत्‍न करावे लागतील. माननीय मुख्‍यमंत्री यांच्‍या मार्गदर्शनाखाली ‘विकेल ते पिकेल’ अभियान प्रारंभ करण्‍यात आला. यात शेतकरी बांधव आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्‍यावर भर देण्‍यात येत असुन शेतमालाच्या विक्रीसाठी पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. शेतकऱ्यांचं बाजारभावातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. कृषि शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढत आहे, ही चांगली बाब आहे, त्‍यामुळे राज्‍य शासनाने कृषि योजनेमध्‍ये महिलांना 30 टक्के राखीव ठेवण्‍यात आले असुन यामुळे महिलांचे नाव सात बारावर घेणे आवश्‍यक होईल.   

दीक्षांत भाषणात ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ. सी. डी. मायी म्‍हणाले की, केवळ तंत्रज्ञानच शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक संपन्नता प्रदान करू शकतील. देशातील कृषी क्रांती ही संशोधनाच्‍या माध्‍यमातुन कृषि तंत्रज्ञान आधारित झाली असुन कृषि विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी अधिक निधी उपलब्ध करून देण्याची आवश्‍यकता आहे. एकीकडे, हरितक्रांतीचे फायदे कमी होतांना शाश्वत शेती करिता आपल्यासमोर असंख्य आव्हाने आहेत. हवामान बदल या पर्यावरणीय समस्यांनी जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरडवाहू क्षेत्रात अजुनही हरितक्रांतीची गरज आहे. अन्न सुरक्षसोबतच पोषण सुरक्षा यावर भर दयावा लागले. डॉ. ढवण यांच्या नेतृत्वात विद्यापीठाने पीक वाढीसाठी डिजिटल शेती संशोधन, जैवसमृध्‍द बाजरी व ज्‍वारीचे वाण, व्यावसायिक जैव मिश्रण बायोमिक्‍स संशोधन आदी मध्‍ये आघाडी घेतली आहे. परभणी कृषि विद्यापीठातील मनुष्‍यबळाचे केवळ शिक्षणाच्‍या क्षेत्रातच नाही तर राज्य आणि राष्‍ट्रीय स्‍तरावर सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातही फार मोठे योगदान राहिले आहे. विद्यापीठाचा इतिहास हा यशाने परिपूर्ण असा आहे, आता विद्यापीठातून बाहेर पडणा-या विद्यार्थ्‍यांनी या इतिहासाची पुनरावृत्ती करावी. हे विद्यापीठ या भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सतत सेवारत आहे. गेल्या ५० वर्षांमध्ये संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने मोठे योगदान दिले. विद्यापीठ संशोधनाने आधीच देशाच्‍या सीमा ओलांडल्‍या आहेत. आज देशाला खाद्यतेलाची तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असुन मराठवाडा विभागातील माती आणि हवामान पारंपारिक तेलवर्गीय पिकांसाठी अनुकूल आहे, त्‍यामुळे विद्यापीठाने तेलवर्गीय पिकांच्‍या नवीन संशोधित जातीं विकसित करण्‍यावर भर दयावा. हवामान बदलाचा शेतीवर मोठा परिणाम होत असुन भविष्यात आपणास अनेक आव्‍हानांना तोंड दयावे लागेल. पिकांतील अनुवांशिक सुधारणा, एकात्मिक शेती पध्‍दती, संतुलित नैसर्गिक संसाधनांचा वापर आणि वेळेवर हस्तक्षेप या बाबींचा कृषि विषयक धोरणात्‍मक निर्णय घेतांना विचार करावा लागेल. बदलत्या हवामानास अनुकुल नवीन प्रजातींच्या जलद विकासासाठी आनुवंशिक परिवर्तन, जनुक संपादन, जनुकीयरित्‍या परावर्तीत प्रजाती विकसित तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल, याला सार्वजनिक स्वीकृतीची आवश्यकता आहे. उदयोन्मुख बाजाराच्या गरजांशी नव कृषि पदवीधरांना जुळवून घ्यावे लागेल. जैव तंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, उच्च तंत्रशुद्ध उत्पादने आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बौद्धिक संपदा यासंबंधित समस्यांसह विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अलीकडे झालेल्या प्रगतीसाठी स्वत:ला सुसज्ज ठेवावे लागेल. कृषि पदवीधर भविष्‍यातील शेतीची आशा आहात, असे ते म्‍हणाले.

स्‍वागतपर भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्‍थापनेचे हे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष असुन आज पर्यंत कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन ४७३४५ पदवीधारक विद्यापीठाने निर्माण झाले आहेत, हे उच्‍च शिक्षित कुशल मनुष्‍यबळ विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. गेल्‍या पन्‍नास वर्षाच्‍या कार्यकाळात संशोधनाच्‍या आधारे परभणी कृषि विद्यापीठाने विविध पिकांच्या सुमारे १४४ उन्नत वाण विकसित केले आहेत. शेती पध्दती, पिकनिहाय व पिकपध्दती निहाय व्यवस्थापन, पिकांवरील रोग आणि किडीपासून संरक्षण करण्याचे पुरक तंत्रज्ञान विकसित केले असुन सुमारे ८५० पेक्षा अधिक कृषि तंत्रज्ञान शिफारशी दिलेल्‍या आहेत. शेतीतील मजुरांचे काबाडकष्ट कमी करणे आणि त्यांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ३५ पेक्षा जास्‍त यंत्रे व औजारे विकसित केलेली आहेत. आज सोयाबीन व तुर पिकांचे विद्यापीठाने केलेले वाणे मोठया प्रमाणात शेतकरी बाधवामध्‍ये प्रचलित आहेत.

मा ना श्री दादाजी भुसे यांच्‍या हस्‍ते विद्यार्थ्‍यांना पदवी अनुग्रहीत करण्‍यात आले. समारंभात मा ना श्री दादाजी भुसे यांच्‍या हस्‍ते कृषि संशोधन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल डॉ डि के पाटील व डॉ गिते (२०१७-१८), डॉ एम के घोडके (२०१८-१९), डॉ के टी आपेट व डॉ सी व्‍ही अंबडकर (२०१९-२०) यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पोरितोषिकाने गौरविण्‍यात आले. दीक्षांत समारंभात २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण १०,९९७ स्‍नातकांना विविध पदवी, पदव्‍युत्‍तर व आचार्य पदवीने माननीय प्रतिकुलपती व्‍दारा अनुग्रहीत करण्‍यात आले. विविध विद्याशाखेतील ९९२२ स्‍नातकांना पदवी, ९७८ स्‍नातकांना पदव्‍युत्‍तर तर ९७ स्‍नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्‍यात आले. समारंभात विविध अभ्‍यासक्रमातील विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदके, रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून गौरविण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे व डॉ विणा भालेराव यांनी केले. कार्यक्रमास विव्‍दत परिषदेचे माननीय सदस्‍य, शहरातील प्रतिष्‍ठीत नागरीक, विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


कृषि संशोधनात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल शास्‍त्रज्ञ डॉ डि के पाटील व डॉ गिते यांना २०१७-१८ वर्षातील राधाकिशन शांती मल्‍होत्रा पोरितोषिकाने गौरविण्‍यात आले. 





अधिक छायाचित्र करिता खालील पोस्‍ट पाहावी 

https://promkvparbhani.blogspot.com/2021/10/blog-post_25.html

छायाचित्रे - वनामकृविचा २३ वा दीक्षांत समारंभ

मार्गदर्शन करतांना माननीय कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे 


मार्गदर्शन करतांना माननीय कृषिमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे 

दीक्षांत भाषण करतांना ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ मा डॉ सी डी मायी



स्‍वागतपर भाषण करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण







Saturday, October 23, 2021

वनामकृविचा २३ वा दीक्षांत समारंभ सोमवारी

दीक्षांत समारंभात तीन वर्षातील १०,९९७ स्‍नातकांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार  ....... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांची पत्रकार परिषदेत माहिती

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा तेवीसावा दीक्षांत समारंभ दिनांक २५ ऑक्‍टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात ऑनलाईन व ऑफलाईन पध्‍दतीने आयोजित करण्‍यात आला असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र राज्‍याचे कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा ना श्री दादाजी भुसे हे राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन विद्यापीठाचे माजी कुलगुरू, दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्राचे अध्‍यक्ष तथा कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ मा डॉ सी डी मायी हे उपस्थित राहुन दीक्षांत भाषण करणार आहे, अशी माहिती कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी दिनांक २३ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, उपकुलसचिव डॉ गजानन भालेराव, मुख्‍य विस्‍तार शिक्षणाधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्‍थापनेचे हे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष असुन आज पर्यंत कृषि शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन ४७३४५ पदवीधारक विद्यापीठाने निर्माण झाले आहेत, हे उच्‍च शिक्षित कुशल मनुष्‍यबळ विविध क्षेत्रात आपले योगदान देत आहेत. विद्यापीठाने विविध पिकांचे १४४ वाण निर्मिती केली असुन तुर, सोयाबीन पिकांचे अनेक चांगले वाण शेतकरी बांधवात मोठया प्रमाणात प्रचलित झाले आहेत. राज्‍यातील एकुण तुर लागवड क्षेत्रापैकी पन्‍नास टक्के क्षेत्रावर विद्यापीठाचे बीडीएन ७११ हा वाण घेतला जातो. गेल्‍या वर्षी साडे आठ हजार क्विंटल बियाणे निर्मिती विद्यापीठाच्‍या वतीने करण्‍यात आली असुन यावर्षी दहा हजार क्विंटल बीजोत्‍पादनाचे लक्ष आहे. गेल्‍या तीन वर्षाच्‍या कार्यकाळात केवळ मुख्‍यालयी विद्यापीठ निर्मित दर्जेदार बियाणे विक्री न करता मराठवाडयातील प्रत्‍येक जिल्‍हयातील शेतकरी बांधवाना विकेंद्रीत विक्री व्‍यवस्‍था करून बियाणे उपलब्‍ध करण्‍यात आले. कोरोना विषाणु रोगाच्‍या परिस्थितीतही विद्यापीठाचे विस्‍तार कार्य कोठेही न थांबता, ऑनलाईन पध्‍दतीने चालुच होते, या काळात मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन मोहिम राबविण्‍यात आली, असे माहिती त्‍यांनी दिली.

सदरिल दीक्षांत समारंभ कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे स्‍वागतपर भाषण करणार असुन दीक्षांत समारंभात २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० वर्षातील विविध विद्याशाखेतील एकुण १०,९९७ स्‍नातकांना विविध पदवीने माननीय प्रतिकुलपती व्‍दारा अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. विविध विद्याशाखेतील ९९२२ स्‍नातकांना पदवी, ९७८ स्‍नातकांना पदव्‍युत्‍तर तर ९७ स्‍नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे, परंतु कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभुमीवर केवळ पारितोषिके पात्र स्‍नातक व आचार्य पदवी स्‍नातक यांनाच मान्‍यवरांच्‍या हस्‍ते गौरविण्‍यात येणार असुन इतर स्‍नातकांना ऑनलाईन पध्‍दतीने अनुग्रहीत करण्‍यात येणार आहे. समारंभात विविध अभ्‍यासक्रमातील विद्यापीठाने व दात्‍यांनी ठेवलेली सुवर्ण पदके, रौप्‍य पदके व रोख पारितोषिके पात्र स्‍नातकांना प्रदान करून गौरविण्‍यात येणार आहे. तसेच कृषि संशोधन क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केल्‍याबद्दल विद्यापीठातील प्राध्‍यापक / संशोधक यांना राधाकिशन शांती मल्‍होत्रा पोरितोषिकाने गौरविण्‍यात येणार आहे. दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्‍या युटुब चॅनेल youtube.com/user/vnmkv यावर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्‍यात येणार आहे.

पत्रकार परिषदेचे सुत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार डॉ व्‍ही बी कांबळे यांनी मानले. पत्रकार परिषदेस शहरातील प्रसार माध्‍यमांचे प्रतिनिधी मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरिल दीक्षान्‍त समारंभात पुढील प्रमाणे विद्यार्थ्‍यांना विविध पदवीने अनुग्रहीत करण्‍यात येणार असल्‍याचे सांगण्‍यात आले. 

अक्र

अभ्‍यासक्रम

एकुण पात्र स्‍नातक

 

१

आचार्य पदवीचे स्‍नातक (पीएच.डी पदवी)

 

२

पीएच.डी (कृषि)

७२

३

पीएच.डी (गृहविज्ञान)

०३

४

पीएच.डी (अन्‍नतंत्र)

१०

५

पीएच.डी (कृषि अभियांत्रिकी)

१२

 

एकुण आचार्य पदवी स्‍नातक

९७

 

 

 

 

पदव्‍युत्‍तर अभ्‍यासक्रम

 

१

एम. एस्सी. (कृषि)

७१९

२

एम. एस्सी. (गृहविज्ञान)

१८

३

एम. एस्सी. (उद्यानविद्या)

९७

४

एम. टेक. (कृषि अभियांत्रिकी)

२३

५

एम. टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

४१

६

एम.बी.ए.(कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन)

८०

 

एकुण पदव्‍युत्‍तर पदवी स्‍नातक

९७८

 

 

 

 

पदवी अभ्‍यासक्रम

 

१

बी. एस्‍सी. (कृषि)

६३३३

२

बी. एस्‍सी. (उद्यानविद्या)

८९

३

बी. एस्‍सी. (गृहविज्ञान)

७४

४

बी.टेक. (कृषि अभियांत्रिकी)

५२६

५

बी.टेक. (अन्‍नतंत्रज्ञान)

१८३३

६

बी. एस्‍सी. (कृषि जैवतंत्रज्ञान)

९१७

७

बी.बी.ए. (कृषि)

१५०

 

एकुण पदवी अभ्‍यासक्रमातील स्‍नातक

९९२२

 

एकुण आचार्य, पदव्‍युत्‍तर, पदवी स्‍नातक

१०९९७













Wednesday, October 20, 2021

पाथरी तालुक्‍यातील मौजे बाभुळगाव येथे एक दिवसीय वेबिनार संपन्‍न

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत नागपुर येथील केंद्रीय कापूस संशोधन केंद्र व वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापुस संशोधन योजना यांच्‍या वतीने दिनाकं १७ ऑक्‍टोबर रोजी कपाशीवरील गुलाबी बोंडअळी व्‍यवस्‍थापन यावर एक दिवसीय वेबीनारचे आयोजन करण्‍यात आले होते. सदरिल वेबीनान मध्‍ये किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन: गुलाबी बोंडअळी व्यवस्थापन धोरण प्रसार प्रकल्पाच्या (आयआरएम) लाभार्थी शेतकरी बांधवानी सहभाग नोंदविला. या प्रकल्पातंर्गत कापूस संशोधन योजनाच्‍या वतीने जिल्हयातील ५ गावातील एकुण ५० शेतक­यांच्या शेतावर कापूस किटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक राबविण्यात येत आहे. या वेबिनारचे पाथरी तालुक्यातील बाभुळगाव येथे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवी दिल्‍ली येथील कृषि मंत्रालयाच्‍या कृषि सहयोग आणि शेतकरी कल्याण विभागाच्‍या सहसचिव (पिके) श्रीमती. शुभा ठाकुर या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन सहयोगी महासंचालक (आसीएआर) डॉ. आर. के. सिंह हे होते. कार्याक्रमातंर्गत तालुक्‍यातील बाभुळगाव येथील शेतक­यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवुन मान्यवरांशी संवाद साधला.  यावेळी प्रकल्पाची ओळख व प्रकल्पामुळे शेतक­यांना झालेला फायदा व भविष्यातील उपाययोजना याविषयी चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात बाभुळगाव येथील रमेश गिरी, दिपक नाईकवाडे, वेकंट रणेर, दादाराव रणेर, बाबासाहेब रणेर, भागवत रणेर, हिराजी शेख या लाभार्थी शेतक­यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. विद्यापीठातर्फे प्रकल्पाचे समन्वयक व सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ. डी.डी.पटाईत, वरीष्ठ संशोधन सहकारी कु. प्रियंका वाघमारे, प्रकल्प सहाय्यक, श्री. इरफान बेग व श्री. नारायण ढगे हे सहभागी होते. कार्यक्रमाकरीता विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.डी.पी.वासकर, कापूस संशोधन योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ  डॉ. ए. एस. जाधव व केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपुर येथील प्रकल्प प्रमुख डॉ. विश्लेश नगराळे यांचे मार्गदर्शन लाभले.