Tuesday, December 19, 2023

मौजे पाळोदी ता. मानवत येथे प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रशिक्षण संपन्‍न

आत्मा (कृषि विभाग), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या संयुकत विद्यमाने दिनांक १९  डिसेंबर रोजी रेशीम उद्योजक शेतकरी श्री. देवराव माधवराव टरपले यांच्या शेतात प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्री. आकाश लाटे हे होते तर मंडळ कृषि अधिकारी मानवत श्री.रघुवीर सिंह नाईक, एस.बी.आय. परभणीचे श्री. सुनिल हट्टेकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम, कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेचे डॉ. चंद्रकांत लटपटे आदीची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात श्री. धनंजय मोहोड यांनी तुती लागवडीसाठी योग्य वाणाची निवड व रेशीम किटकांना उच्च प्रतिची पाने खाद्य देण्यास सांगीतले. तर डॉ. चंद्रकात लटपटे यांनी तुती रोपांची लागवड करण्याबद्दलचे मार्गदर्शन केले, रेशीम किटक संगोपनगृह निर्जतुकिकरण, रेशीम किटकावरील रोग नियंत्रण व उझी माशी नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस या परोपजिवी किटकाचे महत्व सांगुन एन.टी. पाऊच रेशीम संशोधन योजना येथे उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच श्री. सुनिल हट्टेकर यांनी पिक कर्ज व सिल्क आणि मिल्कची माहिती दिली.

प्रास्ताविकात श्री. गोविंद कदम यांनी रेशीम शेती संबधीत योजनेबाबत विस्तृत माहिती देऊन विविध शासकिय योजना जसे मनरेगा, पोक्रा या बाबत शेतक­यांना मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन श्री. केशव काकडे यांनी केले तर आभार श्री. अभिजीत देशमुख यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील ९९ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वतीतेसाठी सौ. कांचन जाधव, सौ. जि. डब्ल्यु रनेर, श्री. पदमाकर टरपले, श्री. मोहन काकडे, श्री. मोहन कापसे, श्री. सिराज, श्री. गुंडे व गावातील रेशीम उद्योजक शेतक-यांनी परीश्रम घेतले.

Saturday, December 16, 2023

मौजे डोंगर पिंपळा ता. गंगाखेड येथे रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

आत्मा (कृषि विभाग), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना, व जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या संयुक्‍त विद्यमाने मौजे डोंगर पिंपळा (ता. गंगाखेड) येथे प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक डिसेंबर रोजी रेशीम उद्योजक शेतकरी श्री. सिताराम सुदाम कवडे यांच्या शेतात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्‍थानी श्री. वैद्यनाथ ज्ञानोबा तिडके हे होते तर  पोलीस पाटील श्री. शिवराज गवळी, मंडळ कृषि अधिकारी श्री.ए.एस.शिसोदे, एस.बी.आय.चे श्री. सुनिल हट्टेकर, केंद्रीय रेशीम बोर्डचे श्री. अशोक जाधव, रेशीम संशोधन योजनेचे डॉ. चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमात श्री.ए.एस.शिसोदे यांनी तुती लागवडीसाठी योग्य वाणाची निवड व रेशीम किटकांना उच्च प्रतिची पाने खाद्य देण्यास शेतक­यांना सांगितले श्री अशोक जाधव यांनी रेशीम शेती संबधीत मार्गदर्शन करुन सिल्क समग्र-२ या योजनेबाबत विस्तृत माहिती दिली. विविध शासकिय योजना जसे मनरेगा, पोक्रा याबाबत क्षेत्र सहाय्यक श्री. सागर मिसाळ मार्गदर्शन केले. डॉ. सी.बी. लटपटे यांनी शेतात पटटा पध्दतीने तुती रोपांची लागवडीबाबत मार्गदर्शन केले तसेच उझी माशी नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस या परोपजिवी किटकाचे महत्व सांगुन एनटी पाऊच रेशीम संशोधन योजना, वनामकृवि, परभणी येथे उपलब्ध असल्याचे सांगितले. श्री. सुनिल हट्टेकर यांनी पिक कर्ज व सिल्क आणि मिल्कची माहिती दिली.

सुत्रसंचालन श्री. धनंजय मोहोड यांनी केले तर आभार श्री. पि.एम.साळूंके यांनी मानले. कार्यक्रमास परिसरातील ६८ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यसस्वीतेसाठी श्री. दत्तात्रय सोनटक्के, श्री. रामेश्वर राऊत, श्री. जोगदंड, श्री. रामेश्वर कवडे, श्री. अंगद पांढरे, श्री. पंढरीनाथ घोगरे, श्री. राहुल कातकडे व गावातील रेशीम उद्योजक शेतक्य­यांनी परीश्रम घेतले.

Friday, December 8, 2023

वनामकृविच्‍या वतीने आयोजित १२ वी राष्‍ट्रीय बियाणे परिषद - तांत्रिक कार्यक्रम

















वनामकृविच्‍या वतीने १२ वी राष्ट्रीय बियाणे परिषदेचे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजन

वनामकृवित आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू माननीय डॉ. इन्‍द्र मणि यांची माहिती 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्था, नवी दिल्ली, आणि राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वाराणसी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भारत सरकारच्‍या कृषि व शेतकरी कल्याण विभाग, कृषि मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन दिनांक ११ ते १३ डिसेंबर दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल ताज विवांतरा येथे करण्यात आले आहे. परभणी कृषि विद्यापीठास प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय बियाणे परिषदेचे यजमान पद भूषवीत आहे, अशी माहिती दिनांक ८ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिली.

शेती नियोजनामध्ये जमीन, हवामान, बियाणे, पेरणी, आंतरमशागत, पाणी व खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, पीक काढणी, मळणी, साठवण व विक्री हे महत्त्वाचे घटक असुन अधिक उत्‍पादनाच्या दृष्‍टीने दर्जेदार बियाणे हे अत्‍यंत महत्‍वाचा मुलभुत निविष्‍ठा आहे. बियाणे शुद्ध व दर्जेदार असल्याशिवाय इतर बाबींवर केलेल्या खर्चाचा पुरेसा मोबदला मिळत नाही. आज आपल्यासमोर बियाण्याशी संबंधित अनेक प्रश्न आहेत, यामध्ये शुद्ध व दर्जेदार बियाणे निर्मिती व उपलब्धता, बियाणे बदल दर, बियाणे प्रक्रिया व साठवण पद्धती व व्यवस्था, बियाणे उद्योगातील प्रश्न व त्यांचे इतर राज्यात होणारे स्थलांतर, बियाणे संदर्भातील कायदे व नियमन इत्यादी बाबी महत्वाच्या असून त्यावर सखोल चर्चा करणे व पुढील दिशा ठरवणे आवश्यक आहे. बीजोत्पादक, बियाणे उद्योजक आणि सामान्य शेतकरी यांच्या दृष्टीने बियाणे व उपलब्धता यावर विचार करण्याची गरज आहे. आज तंत्रज्ञान फार पुढे  गेले आहे त्याचा शुद्ध व दर्जेदार बियाणे उत्पादन, प्रक्रिया व साठवणूक, हाताळणी आणि पुढे सुयोग्य वापर व उत्पादन वाढ यासाठी संशोधन संस्था, बियाणे महामंडळ, बिजोत्पादन संस्था, उत्पादक, बियाणे उद्योजक यांच्यात योग्य समन्वय, चर्चा व एक निश्चित धोरण ठरवणे ही काळाची गरज आहे. हाच दृष्टीकोन समोर ठेवून भारतीय कृषि अनुसंधान, नवी दिल्ली, राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वाराणसी किंवा देशातील कृषि विद्यापीठे यासाठी कार्यरत आहेत. यादृष्टीने ही राष्ट्रीय बियाणे परिषद अत्यंत महत्वाची व दिशादर्शक ठरणार असल्‍याचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी दिली.  

सदर १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेसाठी देशभरातील कृषि संशोधक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, खाजगी बियाणे उद्योजक, बिजोत्पादक शेतकरी, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सदरील राष्ट्रीय बियाणे परिषदेचे उद्घाटन दिनांक ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता असुन प्रमुख पाहुणे केंद्रीय कृषिमंत्री मा. ना. श्री. नरेंद्रजी तोमर यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून राज्‍याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. धनंजयजी मुंढे, यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे सचिव श्री. मनोज अहुजा, विशेष सचिव श्री. राकेश रंजन, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. हिमांशू पाठक, आयसीएआरचे माजी महासंचालक डॉ. मंगला राय, कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव (बियाणे) श्री. पंकज यादव, अतिरिक्त मुख्यसचिव श्री. अनुप कुमार, पद्मश्री बीजमाता श्रीमती राहीबाई पोपरे, कृषी आयुक्त (भारत सरकार) डॉ. पी. के. सिंग, सोनीपत (हरियाणा) येथील प्रगतीशील शेतकरी पद्मश्री श्री कंवल सिंह चौहान, कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष तथा माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, नवी दिल्लीचे अध्यक्ष श्री. अजय राणा, महिको ग्रुप, मुंबईचे अध्यक्ष श्री. राजू बारवाले, स्‍वागताध्‍यक्ष कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि, भारतीय बीज तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. एच.एस. गुप्ता, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, वाराणसी येथील राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक श्री. मनोज कुमार आदींची उपस्थित लाभणार आहेत.

तीन दिवसीय सदर परिषदेस देशाचे व राज्याचे माननीय कृषि मंत्री, आजी व माजी सचिव, कृषि संशोधन व शिक्षण विभाग, भारत सरकार व महासंचालक, भाकृअप, नवी दिल्ली, पद्मभूषण शास्त्रज्ञ, पद्मश्री शेतकरी, विविध विद्यापीठांचे आजी व माजी कुलगुरू, नामांकित शास्त्रज्ञ, बियाणे उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी यांची उपस्थिती लाभणार आहे. परिषदेमध्ये एकूण सहा तांत्रिक सत्रांमध्ये व तीन समूह चर्चा सत्रांमध्ये बियाणे विषयक विविध विषयांवर संशोधन व तंत्रज्ञाना संबंधी शास्त्रज्ञांचे सादरीकरण व चर्चा होणार आहे. यात शास्त्रज्ञ, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बियाणे महामंडळाचे प्रतिनिधी, खाजगी बियाणे उद्योजक, बिजोत्पादक शेतकरी, विद्यार्थी सहभागी होणार आहेत. परिषदेमध्ये दिनांक १२ डिसेंबर रोजी भारतीय बीज तंत्रज्ञान संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या श्री. अमीर सिंह जीवन गौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे. परिषदेचा समारोप समारंभ दिनांक १३ डिसेंबर रोजी संपन्न होणार असून यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण भाकृअपचे माजी सचिव डॉ. आर. एस. परोडा उपस्थित राहणार आहे.

सदरील १२ व्या राष्ट्रीय बियाणे परिषदेचे आयोजन वनामकृविच्‍या वतीने कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि, यांचा अध्यक्षतेखाली करण्यात येत असून या परिषदेचे निमंत्रक संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर व आयोजन सचिव डॉ. के.एस. बेग आहेत. विद्यापीठस्‍तरावर विविध समित्यांचे गठन करण्यात आले असुन विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य या परिषदेच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

सदर पत्रकार परिषदेस संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ उदय खोडके, कुलसचिव श्री पी के काळे, विद्यापीठ नियंत्रक श्री प्रविण निर्मल, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, डॉ के एस बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Thursday, December 7, 2023

परळी येथील 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात वनामकृवि अंतर्गत दोन नुतन महाविद्यालये आणि एक संशोधन उपकेंद्राचे लोकार्पण

बीड जिल्ह्यातील परळी येथे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे दिनांक ५ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्याचे माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, कृषी मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे, माजी आमदार मा पंकजाताई मुंडे आदीसह अनेक मान्‍यवर नेते उपस्थित होते. कार्यक्रमात बीड जिल्‍हयातील अनेक प्रस्‍तावित योजनांचे भुमिपूजन आणि लोकार्पण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते पार पडलं. यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत जिरेवाडी (ता. परळी) येथील कृषि महाविद्यालय आणि कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालय तसेच धर्मापुरी (ता. परळी) येथील सोयाबीन संशोधन, प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र याचे लोकार्पण करण्‍यात आले.

नुकतेच महाराष्‍ट्र शासनाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत चार नवीन शासकीय महाविद्यालय व एक संशोधन उपकेंद्रास मान्‍यता दिली. यात सोयगांव (छत्रपती संभाजीनगर) येथे शासकीय कृषि महाविद्यालय, मौजे जिरेवाडी (ता परळी जि बीड) येथे शासकीय कृषि महाविद्यालय आणि कृषि व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन महाविद्यालय, नांदेड येथे कृषि महाविद्यालय तसेच धर्मापुरी (ता. परळी) येथे सोयाबीन संशोधन, प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र स्‍थापनेस महाराष्‍ट्र शासनाने मंजुरी दिली आहे.


विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाच्‍या वतीने सदर महाविद्यालये आणि संशोधन उपकेंद्राचे प्रस्‍ताव सादर करण्‍यात आले होते. राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री धंनजय मुंढे यांच्‍या पाठबळामुळे सदर प्रस्‍तावास महाराष्‍ट्र शासनाची मंजुरी प्राप्‍त झाली. याबाबत कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी राज्‍याचे माननीय मुख्‍यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार, कृषी मंत्री मा ना श्री धनंजय मुंडे आदींचे आभार व्‍यक्‍त केले.

मौजे आलेगाव ता. पुर्णा येथे तुती रेशीम उद्योग प्रात्याक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

परभणी आत्मा (कृषि विभाग), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना व जिल्हा रेशीम कार्यालय परभणी यांच्या संयुकत विद्यमाने प्रौढ रेशीम किटक संगोपन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक ५ डिसेंबर रोजी मौजे आलेगाव ता. पुर्णा येथे रेशीम उद्योजक शेतकरी  श्री. हनमंत गरड यांच्या शेतात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. विश्वनाथ सवराते होते तर आत्मा प्रकल्प संचालक श्री. दैालत चव्हाण, एसबीआयचे श्री. सुनिल हट्टेकर, मंडळ कृषि अधिकारी श्री. संभाजी वाघमोडे, मार्गदर्शक म्हणून जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम व रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात श्री. दौलत चव्हाण यांनी तुती लागवडीसाठी योग्य वाणाची निवड व रेशीम किटकांना उच्च प्रतिची पाने खाद्य यावर मार्गदर्शन केले. तर श्री. गोविंद कदम यांनी रेशीम शेती संबधीत विविध शासकिय योजना जसे मनरेगा, पोक्रा तथा सिल्क समग्र-२ याबाबत मार्गदर्शन करून या योजनांचा जास्तीत जास्त शेतक­यांनी लाभ घेवून यशस्वी रेशीम उद्योग करावा व २० डिसेंबर २०२३ पर्यंत नोंदणी करावी असे आवाहन केले. मार्गदर्शनात डॉ. सी.बी. लटपटे यांनी शेतात पटटा पध्दतीने फुट तुती रोपांची लागवड करण्या बददल मार्गदर्शन केले तसेच उझी माशी नियंत्रणासाठी निसोलायनेक्स थायमस या परोपजिवी किटकाचे महत्व सांगुन एनटी पाऊच रेशीम संशोधन योजना येथे उपलब्ध असल्याचे सांगीतले. श्री. सुनिल हट्टेकर यांनी पिक कर्ज व सिल्क आणि मिल्कची माहिती सांगितली तर ग्लोबल विकास ट्रस्ट परळी श्री. अतुल घाडगे यांनी रेशीम शेतक­यांना ट्रस्ट तर्फे एकरी १० हजाराची मदत तुती लागवडीसाठी असल्याबाबत माहिती दिली.

सुत्रसंचालन श्री. धनंजय मोहोड यांनी केले तर आभार श्री. विलास जोशी यांनी मानले.  ७८ शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यसस्वीतेसाठी श्री. एस.बी.शिंदे, कृषि पर्यवेक्षक चुडावा, श्री. आर.डी.माने, एटीएम आत्मा, पुर्णा, सौ. कांचन जाधव, क्षेत्र सहाय्यक, श्री. रत्नाकर मुंढे, तांत्रीक सहाय्यक, श्री. आर.टी. इक्कर, बीटीएम आत्मा, परभणी, श्री. एच.आर.ढगे, सौ. सविता सोनटक्के व गावातील रेशीम उद्योजक शेतक्य­यांनी परीश्रम घेतले.

Wednesday, December 6, 2023

आत्मनिर्भर भारताच्या निर्मीतीसाठी एकात्मिक प्रयत्नांची गरज..... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि राष्ट्रीय कर्तव्य अभियान व ग्राम विकास गतिविधी (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक डिसेंबर रोजी एक दिवसीय नैसर्गिक शेती ते आत्मनिर्भर ग्राम अभ्यास सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते तर विशेष अतिथी म्हणुन ग्राम विकास गतिविधीचे क्षेत्र प्रमुख मा.श्री. विनय कानडे उपस्थित होते. व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सेंद्रीय शेती प्रकल्‍पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे, परभणी आत्माचे प्रकल्प संचालक श्री. दौलत चव्हाण, दे-आसरा फाउंडेशन, पुणेचे श्री. प्रकाश आगाशे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, राष्ट्रीय कर्तव्य अभियानाचे संयोजक श्री. विजय वरुडकर, गो-संवर्धन विभाग प्रमुख श्री. रमाकांत जोशी, कृषि यंत्र व शक्ती विभागाच्‍या विभाग प्रमुख डॉ. स्मिता सोंलकी आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय मार्गदर्शनात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्‍हणाले की, आपले पुर्वीचे ग्रामीण जीवनाची संरचना ही अतिशय योग्य होती, पुर्वीचे शिक्षण हे मातृभाषेतून होते. आपले मानवी जीवन व जीवनशैली ही निसर्गाला अनुसरून होती. नैसर्गिक शेती ही आज मानवी आरोग्य, जमिनीचे आरोग्य तसेच पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी काळाची गरज आहे. नैसर्गिक शेतीला केंद्र व राज्य सरकार प्रोत्साहन देत आहे. नैसर्गिक साधनसामग्रीचा ­हास होत असून या साधनसामग्रीचे संवर्धन करून ते पुढील पिढीला सुरक्षितपणे हस्तांतरीत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. शेतकरी बंधु-भगिनी यांनी नैसर्गिक शेतीकडे शाश्वत शेती म्हणून बघावे. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून सकस अन्नधान्य उत्पादन व आत्मनिर्भर भावी पिढी निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारताच्या निर्माणासाठी सर्वांनी एकत्र यावे व पुढील पन्नास वर्षाचा नियोजन आराखडा तयार करावा. शास्त्रज्ञांनी नैसर्गिक शेतीमध्ये शास्त्रीय दृष्टीकोनातून मार्गदर्शन करावे. आज शेतीमधे कमीत कमी रसायनांचा वापर व रसायने रहीत शेती असा प्रवास टप्याटप्याने करणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संतुलन व नैसर्गिक साधन सामुग्रीचे संवर्धन करण्यासाठी शेतीमध्ये जास्तीत जास्त किंवा आधिकतम पीक उत्पादन पातळीपेक्षा समतोल उत्पादन पातळी हे आपले भावी काळात उद्दीष्ट असले पाहिजे. शास्त्रज्ञांनी मानवी राहणीमान, आहार, स्वास्थ याबाबतचा निर्देशांक नव्याने विकसित करण्याची गरज आहे. नैसर्गिक शेती उत्पादनाचा किंवा विषमुक्त अन्नाचा मानवी आरोग्यावर व अन्नधान्य गरजेवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करावा, असे आवाहन त्‍यांनी केले.

डॉ. धर्मराज गोखले म्‍हणाले की, नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आत्मनिर्भर ग्राम विकसित करता येतील. यासाठी एकात्मीक पीक व्यवस्थापण, शेतीपुरक उद्योग, विविध विकास विभागांचा सहयोग यावर भर देणे गरजेचे आहे. तर प्रमुख पाहुणे श्री. विनय कानडे यांनी सांगितले की, प्रत्येक ग्राम हे गावक­यांच्या व शेतक­यांच्या गरजा पूर्ण करण्यासठी आत्मनिर्भर झाले पाहिजे. यासाठी विविध उपक्रम राबवून एकात्मीक दृष्टीकोन समोर ठेवून काम करणे गरजेचे आहे.

श्री. प्रकाश आगाशे यांनी शेतकरी बंधु-भगिनी व उद्योजक यांनी बाजारपेठ व बाजारपेठ व्यवस्थापणासाठी पुढे येणे व तांत्रिक मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे, असे सांगितले.

 

श्री. विजय वरुडकर यांनी सोशल रिस्पॉनसीबीलीटी (राष्ट्रीय कर्तव्य अभियान, महाराष्ट्र) या संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल, भावी नियोजनाबद्दल माहिती दिली तसेच कृषि विद्यापीठाच्या सहाय्याने आत्मनिर्भर ग्राम चळवळ मोठ्या स्तरावर राबविण्याचा मानस व्यक्त केला.

प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी नैसर्गिक शेती ही एक व्यापक संकल्पना असून नैसर्गिक शेतीमध्ये दीर्घकालीन व्यवस्थापन गरजेचे असल्‍याचे सांगितले. तांत्रिक सत्रात डॉ. आनंद गोरे यांनी नैसर्गिक शेती संकल्पनेवर, श्री. दौलत चव्हाण यांनी कृषी विभागाच्या योजना यावर, डॉ. एल. एन. जावळे यांनी ज्वार लागवड तंत्रज्ञान यावर, डॉ. पी. व्ही. पडघन यांनी चारा पीक व्यवस्थापन यावर, श्री. विकास कदम यांनी बाजारपेठ व्यवस्थापन यावर, श्री. परमेश्वर स्वामी यांनी गोवंश संवर्धन व कल्याण व ग्रामविकास यावर, श्री. अजेगांवकर यांनी सिंचनव्यवस्था यावर, श्री. शिवप्रसाद कोरे यांनी गो-कृपा अमृत यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रम सत्रामध्ये प्रगतशील शेतकरी कृषिभुषण श्री. कांतरावजी देशमुख झरीकर, श्री. नरेश शिंदे, श्री. कमल किशोर अग्रवाल, आदी उपस्थित होते. याप्रसंगी यशस्वी नैसर्गिक शेती करणा­या शेतकरी बांधवानी आपले अनुभव व्यक्त केले व त्यांचा सत्कार करण्यात आला. सदर अभ्यास सत्रामध्ये शेतकरी बंधु-भगिनी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनीधी, सरपंच, स्वयंसेवी संस्थांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, विद्यार्थी, कृषि विद्यापीठाचे अधिकारी / कर्मचारी व सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. प्रितम भुतडा यांनी तर आभार प्रदर्शन श्री. रमाकांत जोशी व तांत्रिक सत्राचे आभार प्रदर्शन सौ. शैलजा भोसले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. रमाकांत जोशी, डॉ. राजगोपाल कालाणी, श्री. आशीष लोया, श्री. वैष्णव, श्री. कदम, डॉ.सौ. मिनाक्षी पाटील, डॉ.सौ. श्रध्दा धुरगुडे, श्री. रघुनाथ थोरात, श्री. सतिश कटारे, श्री. सुनिल जावळे, श्री. भागवत वाघ, श्री. सचिन रणेर, श्री. नागेश सावंत, श्री. किशोर ढगे, श्री. भिकुलाल मगरे, श्री. दत्ता खटींग, श्री. अजय कटारे यांनी परिश्रम घेतले.