दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत, हवामान अनुकूल आणि कृषी-केंद्रित उपाययोजनांवर भर
महाराष्ट्रातील
दुष्काळी परिस्थिती, हवामान बदलाचे परिणाम
आणि विशेषतः मराठवाड्यातील शेती व ग्रामीण क्षेत्रासमोरील आव्हानांच्या
पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड
- NABARD), महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या वतीने “महाराष्ट्रातील दुष्काळ – शाश्वत
उपाययोजनांचे मार्ग – (Drought in Maharashtra – Sustainable Pathways)” या विषयावर प्रादेशिक सल्लागार समितीची (Regional
Advisory Committee – RAC) बैठक दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे
येथे आयोजित करण्यात आली.
या बैठकीत
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,
परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या वतीने
विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी “
दुष्काळप्रवण मराठवाड्यासाठी शाश्वत विकासाचा मार्ग (A Sustainable Pathway for
Drought-Prone Marathwada)” या विषयावर
सविस्तर सादरीकरण केले. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
शाश्वत शेती, कृषी संशोधनातून विकसित तंत्रज्ञानाचा
शेतकऱ्यांपर्यंत प्रसार, बदलत्या हवामान परिस्थितीशी जुळवून
घेणाऱ्या कृषी पद्धती आणि शेतकऱ्यांची दुष्काळ प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी
आवश्यक उपाययोजनांवर त्यांनी प्रकाश टाकला.
नाबार्डच्या
महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालय, पुणे येथे नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक (CGM) डॉ.
ए. व्ही. भवानी शंकर यांनी आयोजित या बैठकीत कृषि विभाग, महाराष्ट्र
शासन, बँकिंग क्षेत्र, कृषि संशोधन
संस्था, कृषि विद्यापीठे, पशुसंवर्धन
क्षेत्र तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित विविध संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले
होते. बैठकीत महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, एल निनोचा
संभाव्य प्रभाव, शेती व ग्रामीण उपजीविकेवरील परिणाम आणि
दुष्काळाचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांबाबत विचारविनिमय करण्यात
आला.
डॉ. भगवान
असेवार यांनी आपल्या सादरीकरणात मराठवाड्यातील दुष्काळप्रवण परिस्थिती लक्षात घेऊन
कृषी संशोधन, तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि शाश्वत कृषी पद्धती यांच्या समन्वयातून दुष्काळाचा
प्रभाव कमी करण्यासाठी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक दृष्टिकोनाची मांडणी
केली. यामध्ये मृद् व जलसंधारण, शेततळ्यांची निर्मिती,
विहिरी व बोअरवेलचे पुनर्भरण (Recharge), तसेच
रुंद वरंबा-सरी (BBF – Broad Bed and Furrow) तंत्रज्ञानाचा
अवलंब यांसारख्या प्रभावी उपाययोजनांवर त्यांनी विशेष भर दिला. संशोधनातून विकसित
झालेल्या तंत्रज्ञानाचे प्रभावी क्षेत्रीय प्रसारकार्य, शेतकऱ्यांच्या
गरजांनुसार तंत्रज्ञानाचा अवलंब, पावसाच्या पाण्याचे
व्यवस्थापन, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवणे आणि कृषी उत्पादन
प्रणाली अधिक सक्षम व हवामान बदलास अनुकूल करण्याच्या दिशेने या उपाययोजनांचे
महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या प्रादेशिक
सल्लागार समितीच्या बैठकीत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी दुष्काळी परिस्थितीशी
सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्न,
संस्थात्मक समन्वय, शाश्वत कृषि पद्धती आणि
ग्रामीण उपजीविकेच्या विविधीकरणावर चर्चा केली.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी संशोधनाधारित, शाश्वत व शेतकरी-केंद्रित उपाययोजनांची मांडणी या बैठकीत करण्यात आली.
.jpeg)

.jpeg)
.jpeg)