Wednesday, November 25, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, सगुणा रूरल फाउंडेशन आणि सीक्वेस्टर (CQUESTER) कंपनी यांच्यात सामंजस्य करार

सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक (SRT) चा प्रसार, शेतकरी सक्षमीकरण, जमिनीचे आरोग्य संवर्धन आणि उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी संयुक्तपणे विविध उपक्रम राबविणार

कृषि क्षेत्राचा शाश्वत विकास, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, नेरळ येथील सगुणा रूरल फाउंडेशन (Saguna Rural Foundation – SRF), आणि सीक्वेस्टर (CQUESTER) कंपनी यांच्यात दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून कृषि संशोधन, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक (SRT) शेती पद्धतीच्या संशोधन व विस्तारासह शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तिन्ही संस्था संयुक्तपणे विविध उपक्रम राबविणार आहेत.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, सगुणा रूरल फाउंडेशनच्या वतीने संस्थापक संचालक श्री. चंद्रशेखर भडसावळे आणि सीक्वेस्टर कंपनीच्या वतीने श्री. मयूर बन्नोरे यांनी स्वाक्षऱ्या करून तिन्ही संस्थांमधील परस्पर सहकार्याला अधिकृत स्वरूप दिले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विभाग प्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. गोपाल शिंदे, उपसंचालक संशोधन डॉ. रणजीत चव्हाण, कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे आणि शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे, सगुणा रूरल फाउंडेशनच्या संचालक श्रीमती अनुराधा भडसावळे, अधिकारी श्री. प्रमोद शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे विद्यापीठातील कृषि संशोधन, शास्त्रज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि सगुणा रूरल फाउंडेशनचा शेतकरी स्तरावरील प्रत्यक्ष कार्यानुभव यांची प्रभावी सांगड घातली जाणार आहे. विशेषतः जमिनीचे आरोग्य सुधारणे, मृद व जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करणे आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती अधिक सक्षम, टिकाऊ व अनुकूल बनविणे यावर भर देण्यात येणार आहे.

विद्यापीठातील संशोधक आणि शास्त्रज्ञांच्या सहकार्याने SRT पद्धतीचा विविध पिकांवरील परिणाम, पीक उत्पादकता, उत्पादन खर्च, जमिनीचे आरोग्य, जलव्यवस्थापन आणि पर्यावरणीय फायदे यांचा शास्त्रीय अभ्यास व संशोधन करण्यात येणार आहे. या माध्यमातून SRT शेती पद्धतीच्या उपयुक्ततेचे मूल्यमापन करून शेतकऱ्यांना शास्त्रीय आधारावर तंत्रज्ञान व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

याशिवाय, कार्बन उत्सर्जन कमी करणे, कार्बन संचयन आणि कार्बन क्रेडिटसंबंधी संकल्पना व संधींबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीही तिन्ही संस्थांच्या माध्यमातून संयुक्त उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

तिन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी या सहकार्याबाबत विश्वास व्यक्त करताना सांगितले की, बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत शेती अधिक शाश्वत, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक बनविणे ही काळाची गरज आहे. यासाठी विद्यापीठाचे शास्त्रीय संशोधन, तांत्रिक मार्गदर्शन आणि सगुणा रूरल फाउंडेशनचे शेतकरी स्तरावरील कार्य यांचा समन्वय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.