Thursday, January 8, 2015

प्राचार्य डॉ विलास पाटील हे शिक्षण महर्षी वसंतराव काळे शिक्षण सेवागौरव पुरस्कारांनी सन्‍मानित


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांना शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठानचा विभागीय स्तरावरील सन २०१४-१५ चा शिक्षण महर्षी वसंतराव काळे शिक्षण सेवागौरव पुरस्कारांनी दि ३ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे पुरस्‍कार वितरण सोहळात विधान परिषदचे उपसभापती मा ना वसंतरावजी डावखरे यांच्‍या हस्‍ते सन्‍मानित करण्‍यात आले. या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्थानी माजी उच्‍च व तंत्र शिक्षण मंत्री मा आ राजेश टोपे होते तर मा आ सतिश चव्‍हाण, मा आ विक्रम काळे, डॉ बाबासाहेब आंबडेकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डी आर माने, डॉ सुधीर गव्‍हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृषी आणि मृदविज्ञानातील मागील २५ वर्षात केलेल्‍या योगदानाबद्दल डॉ विलास पाटील यांना हा पुरस्कार देण्‍यात आला असुन त्यांनी माती परीक्षण, दूरस्थसंवेदन, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन यावर विशेष संशोधन केले आहे. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक संशोधन लेख त्यांनी सादर केले असुन अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे. त्‍यांनी जर्मनी, फ्रांस, नेदरलँ, बेल्जियम, तुर्की, इस्रायल, इंग्लंड, थायलंड आदी देशाचे अभ्‍यासदौरे केले असून या देशातील वैज्ञानिकाबरोबर काम केले आहे. जमिनीची सुपीकता पिक उत्पादन या विषयाचे महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठाचे संयुक्त संशोधन समितीचे समन्वयक म्हणून शेतक-यांसाठी उपयुक्‍त अशा त्‍यांच्‍या १५ पेक्षा जास्त कृषी तंत्रज्ञानाच्या शिफारशी केल्या आहेत. जमिनीचे आरोग्य, अन्नद्रव्ये व्यवस्थापन, कृषीमध्ये दूरस्थ संवेदनाचा उपयोग, पिक उत्पादन, जमिनीची उत्पती तिचे गुणधर्म विषयावर १५० पेक्षा जास्त लेख लिहून प्रसिध्‍द केले असुन अनेक कार्यक्रमात त्‍यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. सामाजिक जाणीव ठेवून विद्यापीठातील विद्यार्थ्यांत व समाजामहात्मा गांधीजीचे विचार पोचविण्याचे कार्य त्‍यांनी केले आहे. त्याच्या या कार्याचे माजी पंतप्रधान मा श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी कौतुक करून प्रषतीपत्र देवून गौरविले आहे.

Tuesday, January 6, 2015

एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन तंत्रज्ञानाचा काटेकोर अवलंब शेतक-यांच्‍या शेतावर होणे आवश्‍यक..... कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

पीक उत्‍पादन वाढीसाठी तणनाशकाचा योग्‍य वापर या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

एकात्मिक तण व्‍यवस्‍थापनातील मशागतीय, रासायनिक व जैविक पध्‍दती तंत्रज्ञान शिफारशींचा काटेकोर अवलंब शेतक-यांच्‍या शेतावर होणे आवश्‍यक असुन हे तंत्रज्ञान अवलंब करतांना शेतक-यांच्‍या समस्‍या शास्‍त्रज्ञांनी जाणुन घ्‍याव्‍यात, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
केंद्रीय कृषि मंत्रालयाच्‍या सौजन्‍याने व वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी वि़द्यापीठाच्‍या संशोधन संचालनालय व कृषिविद्या विभाग यांच्‍या विद्यमाने पीक उत्‍पादन वाढीसाठी तणनाशकाचा योग्‍य वापर या विषयावर राज्‍याच्‍या कृषी विभागातील कृ‍षी पदवीधारक कर्मचारी, कृषि विद्यापीठातील, कृषि विज्ञान केंद्रातील कृषि विस्‍तारकांसाठी दि ६ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्‍यान आठ दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्‍यात आले असुन या प्रशिक्षणाच्‍या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्‍ठाता डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले, की जे कृषि विस्‍तारक प्रत्‍यक्ष शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर कार्य करतात त्‍यांनी विद्यापीठ शास्‍त्रज्ञांशी आपले तण व्‍यवस्‍थापनातील अनुभवांची देवाणघेवाण करावी म्‍हणजे संशोधनास दिशा मिळेल. तणामुळे मोठयाप्रमाणात शेतक-यांचे नुकसान होते तसेच मजुरांची कमतरता व वाढती मजुरी यामुळे तण व्‍यवस्‍थापनाचा खर्च वाढत असुन आगामी काळात जैवतंत्रज्ञानव्‍दारे विविध पीकांची तण प्रतिकारक जनुकीयदृष्‍टया सुधारित - जीएम (जेनेटीकली मोडीफार्इड) वाणे येतील, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
कार्यक्रमात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एन गोखले आदींनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक समन्‍वयक डॉ अशोक जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ के डी जाधव व आभार प्रदर्शन डॉ बी व्‍ही आसेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे, डॉ पी बी केदार, डॉ डी एस पेरके, प्रा अवसरमल आदींनी परिश्रम घेतले.
आठ दिवसीय प्रशिक्षणात पीकांसाठी तणनाशकांचा वापर, खरेदी, हाताळणी, साठवणुक, तणनाशकांचे मिश्रण करणे, विविध तण व्‍यवस्‍थापन पध्‍दती, नगदी पीकातील तण व्‍यवस्‍थापन, तणनाशक फवारणी यंत्रे, तणांची ओळख, तणनाशकांचा कार्यक्षमरित्‍या वापर, जैविक किड नियंत्रण व एकात्मिक तण व्‍यवस्‍थापन आदीं विषयावर विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ मार्गदर्शन करणार असुन प्रत्‍यक्ष प्रक्षेत्र भेटीचेही आयोजन करण्‍यात आले आहे. 

Saturday, January 3, 2015

शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी स्‍त्रीयांनीच पुढाकार घ्‍यावा......प्रख्‍यात लेखिका मा डॉ प्रतिमा इंगोले

वनामकृवित महिला शेतकरी मेळावास मोठा प्रतिसाद
महिला शेतकरी  मेळाव्‍याचे उदघाटन करतांना
मार्गदर्शन करतांना प्रख्‍यात लेखिका मा डॉ प्रतिमा इंगोले
मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु 
प्राचीन युगात शेतीचा शोध स्‍त्रीनेच लावला असुन समाज हा मातृसत्‍ताक होता. संस्‍कृतीचे रक्षण स्‍त्रीनेच केले आहे. आर्यांच्‍या काळात समाज हा पित्रसत्‍ताक बनला, पुरूष मालक व स्‍त्री मजुर झाली. आजची शेतक-यांची बिघडलेली परिस्थिती बदलायची असेल तर स्‍त्री शेतीत निर्णयकर्ती झाली पाहिजे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्‍या पुणे येथील प्रख्‍यात लेखिका मा डॉ प्रतिमा इंगोले यांनी केले.
     वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विस्‍तार शिक्षण संचालनालयगृहविज्ञान महाविद्यालय व कृषि विभाग यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतिज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दि  जानेवारी रोजी आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन परभणी महानगरपालिकाच्‍या महापौर मा सौ संगीता वडकर उपस्थित होत्‍या. याप्रसंगी व्‍यासपीठावर विद्यापीठ कार्यकारी परिषदचे सदस्‍य श्री रविंद्र पतंगे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ डि एल जाधव, जिल्‍हा परिषदेच्‍या महिला व बाल विकास समीतीच्‍या सभापती सौ अनिता जैस्‍वाल, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ हेमांगिनी सरंबेकर, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री साहेबराव दिवेकर, आत्‍माचे संचालक एम एल चपळे, आदिवासी प्रकल्‍प अधिकारी यु ए धाबे आदींची प्रमुख उपस्थिती होती.  
     प्रख्‍यात लेखिका मा डॉ प्रतिमा इंगोले पुढे म्‍हणाल्‍या की, शेतीचे तंत्रज्ञान स्‍त्रीला उपजतच माहित असते. स्‍त्री व माती यात साधर्म्‍य असुन बहिनाबाईच्‍या साहित्‍यात स्‍त्री व भुमी समान मानले आहे. स्‍त्रीला ताकद द्या, शेतीच्‍या सात-बारावर स्‍त्रीचे नाव लागले गेले पाहीजे. पुरूषांनी गृहविज्ञान शिकावे तर स्‍त्रीयांनी शेती तंत्रज्ञान शिकवा. आज समाजात शेतक-यांप्रती संवेदनशिलता कमी होत असुन शेतक-यांची उपेक्षा होत आहे. शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी स्‍त्रीनेच पुढाकार घ्‍यावा, असे मत यावेळी त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
     अध्‍यक्षयीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, शेतीतील ८० टक्‍के कामे ही स्‍त्रीयाच करतात, त्‍यांची शेतीतील भुमिका महत्‍वाची असुन महिलांच्‍या कार्याचा गौरव समाजात झाला पाहिजे. शेतक-यांच्‍या चांगल्‍या शेत मालाला बाजारपेठ उपलब्‍ध व्‍हावी यासाठी शेती उत्‍पादक – ग्राहक उपक्रम राबविण्‍याचा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा मानस असुन भविष्‍यात प्रत्‍येक जिल्‍हयात महिला शेतकरी मेळावा घ्‍यावा म्‍हणजे महिला शेतक-यांना मेळाव्‍यात सहभाग वाढेल, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
     परभणी महानगरपालिकाच्‍या महापौर मा सौ संगीता वडकर यांनी आपल्‍या भाषणात आजच्‍या विज्ञान युगात स्‍त्रीची जबाबदारी वाढली असुन पिढी घडविण्‍याचे कार्य महिला करते, असे प्रतिपादन केले. मनोगतात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी शेतकरी आत्‍महत्‍या टाळण्‍यासाठी विद्यापीठ उमेद उपक्रम राबवीत असुन त्‍यात शेतकरी महिलांनी योगदान देण्‍याचे आवाहन केले तर कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या प्राचार्या डॉ हेमांगिनी सरंबेकर यांनी केले.
      मेळाव्‍यात प्रगतशील महिला शेतकरी सौ पुष्‍पाताई मुंढे यांचा सत्‍कार मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. विभाग प्रमुख डॉ राकेश आहिरे व श्री चंद्रशेखर नखाते यांनी संपादीत केलेल्‍या कृषि दिनदर्शीकेचे प्रकाशन तसेच शेतीभाती मासिकाच्‍या महिला विशेषांकाचे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध प्रकाशनाचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. वि‍द्यापीठातील विविध तंत्रज्ञानावर आधारित दालनाचा कृषि प्रदर्शनीस मोठा प्रतिसाद लाभला. मेळाव्‍यास महिला शेतक-यांनी व शेतकरी बांधवानी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विना भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ माधुरी कुलकर्णी यांनी केले. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात डॉ बी एम ठोंबरे हे कुक्‍कुटपालन व दुग्‍धव्‍यवसाय व्‍यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले तसेच महिलांसाठी खाद्यपदार्थ निर्मितीशी निगडीत गृहउद्योग यावर डॉ विजया नलावडेशेतीतील टाकाऊ पदार्थापासुन उपयुक्‍त वस्‍तुची निर्मितीबाबत डॉ जयश्री झेंडभाज्‍या व फळांचे संरक्षण व साठवणुक यावर प्रा दिलीप मोरेकौटुंबिक ताण-तणाव व्‍यवस्‍थापनात गृहिणीची भुमिका यावर डॉ जया बंगाळे व कपडयांचे नुतनीकरण यावर डॉ सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले.
कृषि प्रदर्शनीचे उदघाटन करतांना
कृषि दिनदर्शीकचे विमोचन करतांना


शेतीभाती मासिकाचे विमोचन करतांना

प्रख्‍यात लेखिका मा डॉ प्रतिमा इंगोले यांनी मेळाव्‍यात सादर केलेली कविता
सात बारा
शेतक-याची बाई तील मुलखाची घाई,
हे कर ते कर, सगळे कष्‍टाचे डोंगर,
उपटती बिचारी कमरेवर हात ठेऊन
जगत असते बिचारी दैवावर हवाला ठेऊन
घर नव-याच, दार नव-याच,
शेतीवाडी नव-याची, मुलबाळ तिही नव-याची
करडा कोंडा खात जगत असते शेतक-याची बाई
घरातलं दारातलं व शेतातलं निपटते शेतक-याची बाई
गोल करकरीत कुंकू तिच्‍या कपाळावर
तर चिरेचिरे तिच्‍या खरबडीत तळहातावर
पण हातात तिच्‍या काही काहीच नाही
अनं सात बारावर तिचे नाव तेही नाही,


Thursday, January 1, 2015