Wednesday, July 15, 2015

पहिला जागतिक युवा कौशल्‍य दिन वनामकृवित उत्‍साहात साजरा

सन्‍माननीय पतंप्रधानाच्‍या भाषणाच्‍या थेट प्रक्षेपणाचा घेतला कृषि महाविद्यालयाच्‍या विद्यार्थीनी लाभ
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुल‍सचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले आदी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने दि १५ जुलै रोजी पहिला जागतिक युवा कौशल्‍य दिन साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍‍थानी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण हे होते तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्‍यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, जगात भारत हा युवा राष्‍ट्र म्‍हणुन ओळखले जातो, देशाच्‍या एकुण लोकसंख्‍येत युवकांचे प्रमाण अधिक असुन त्‍यांच्‍यात उद्योजकता कौशल्‍य वाढीस कौशल्‍य विकास व उद्योजकताचे राष्‍ट्रीय धोरणाचा निश्चित लाभ होणार आहे, त्‍याचा लाभ कृषि पद्वीधरांनाही घ्‍यावा, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.
याप्रसंगी कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्‍या वतीने ‘स्किल इंडिया’ मोहिमेस नवी दिल्‍ली येथील विज्ञान भवनात सन्‍माननीय पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते प्रारंभ करण्‍यात आला व कौशल्‍य विकास आणि उपक्रमशीलता २०१५ या राष्‍ट्रीय धोरणाची घोषणा सन्‍माननीय पंतप्रधान यांनी केली व देशातील युवकांना संबोधीत केले. या संपुर्ण कार्यक्रमाचे दुरदर्शनच्‍या माध्‍यमातुन थेट प्रक्षेपण कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात मोठया पडदयावर करण्‍यात आले, याचा लाभ विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थीनी घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन प्रा रणजित चव्‍हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा एस एल बडगुजर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 

Monday, July 13, 2015

सद्य परिस्थितीत शेतक-यांनी काय करावे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सल्‍ला
मराठवाडयात यावर्षी मोसमी पावसाने जुन महिन्‍याच्‍या पहिल्‍या पंधरवाडयातच हजेरी लावल्‍यामुळे बळीराजा सुखावला होता, परंतु ब-याचशा भागात पेरणी योग्‍य पाऊस न झाल्‍यामुळे अजुनही पेरण्‍या झालेल्‍या नाहीत. अजुन‍ही पेरणीचा हंगाम गेलेला नाही. १५ जुलैपर्यंत साधारणत: मुग, उडीद, ज्‍वार वगळता सर्वच पीकांची पेरणी करू शकतो तर १६ ते ३१ जुलै दरम्‍यान पेरणी झाल्‍यास संकरित बाजरी, सुर्यफुल, आंतरपीक पध्‍दतीत तुर व सोयाबीन, बाजरी व तुर, एरंडी व धने या पीक पध्‍दतीची पेरणी करता येते.
ज्‍या ठिकाणी पेरणी झालेली आहे व पावसाचा खंड पडला आहे, अशा परिस्थितीत सतत कोळपणी करून तणांचा बंदोबस्‍त होऊन जमिनीतील ओलावा टिकवुन ठेवण्‍यासाठी मदत होईल. तण नियंत्रण केल्‍यामुळे तणांमधुन होणारे बाष्‍पोत्‍सर्जन कमी होईल व उपलब्‍ध ओलावा पीकांना मिळेल. तसेच पिकावर पोटॅशियम नायट्रेट (१३.००.४५) खत १.० ते १.५ टक्‍के (१०० ते १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन) याप्रमाणे फवारणी केल्‍यास पिकातील बाष्‍पोत्‍सर्जन कमी होईल व त्‍यामुळे भारी जमिनीतील पीके पुढे ८ ते १० दिवस तग धरू शकतील. ज्‍या ठिकाणी शक्‍य असेल तेथे तुषार सिंचनाने पिकास पाणी द्यावे.
ब-याचशा ठिकाणी १५ जुन दरम्‍यान पेरणी झालेलया सोयाबीनवर उंटअळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन यासाठी २५ ईसी क्‍वीनॉलफॉस किंवा २० र्इसी क्‍लोरपायरीफॉस किंवा ४० ईसी ट्रासझोफॉस २० मिली १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी. तसेच कपाशी पिकावर तुडतुडे या रसशोषण किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन या किडीच्‍या नियंत्रणासाठी अॅसिफेट ७५ टक्‍के २० ग्रॅम किंवा असिटामाप्रिड २० टक्‍के २ ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी.
जमिनीच्‍या मगदुराप्रमाणे पीकांची निवड करावी. हलक्‍या जमिनीत कापुस लावु नये. त्‍या ठिकाणी बाजरी, सुर्यफुल, कुलथी, मटकी, कारळ यासारखी पीके घ्‍यावीत. मध्‍यम ते भारी जमिनीत कापुस, सोयाबीन, तुर, एरंडी ही पीके घ्‍यावीत. आंतरपीक पध्‍दतीचा अवलंब करावा उदा. तुर व सोयाबीन (२:४), बाजरी व तुर (४:२), तुर व ज्‍वार (२:४).
रूंद-वरंबा सरी पध्‍दतीने सोयाबीन पीकाची पेरणी करावी. म्‍हणजे पडलेल्‍या पाऊसाचे पाणी जमिनीत साठवता येईल व त्‍याचा पीकाला दिर्घकाळ उपयोग होईल. असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे कृषि विद्यावेत्‍ता डॉ यु एन आळसे व प्रा डि डि पटाईत यांनी केले आहे.

Thursday, July 9, 2015

दर्जात्मक कृषि संशोधनासाठी संशोधकांनी आग्रही असावे..... कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु

वनामकृवितील आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांशी कुलगुरूंनी साधला थेट संवाद

संशोधकांचा संशोधनातील प्रामाणिकपणा हा महत्‍वाचा गुण असुन संशोधनाची कार्यप्रणाली भक्‍कम असली तरच संशोधनातील निष्‍कर्ष योग्‍य येतील. शेतक-यांच्‍या प्रगतीसाठी दर्जात्‍मक संशोधनासाठी कृषि संशोधकानी प्रयत्‍नशील असावे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. दर्जात्‍मक कृषि संशोधनासाठी आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांशी दि ७ जुलै रोजी एका कार्यक्रमात संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, परभणी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ धर्मराज गोखले, गोळेगांव कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास पाटील, कृषि अभियांत्रिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय खोडके, लातुर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शटगार, गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या डॉ हेमांगिनी सरंबेकर, अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा ए आर सावते यांची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांनी संशोधनाचा विषय शेतक-यांच्‍या बदलत्‍या परिस्थितीचा सखोल अभ्‍यासांती निवडावा. विदेशात आचार्य पदवी प्राप्‍त करणे अत्‍यंत अवघड असुन विकसित देशातील समाजात आचार्य पदवीधरकांचा मोठा आदर केला जातो. भारताच्‍या तुल‍नेत विदेशातील संशोधकांना संशोधन सुविधा निश्चितच अधिक आहेत. संशोधन करतांना अनेक समस्‍या आहेत, परंतु त्‍यावर मात करून शेतक-यांना उपयुक्‍त तंत्रज्ञान दिल्‍यास शेतक-यांसाठी आपण ईश्‍वरा समान व्‍हाल. अनेक वेळा संशोधक संशोधनाच्‍या आधारे शेतक-यांना शिफारशी देतो, परंतु त्‍या शिफारशी प्रत्‍यक्ष शेतात अवलंबीत असतांना अनेक अडचणी येतात, त्‍याचा विचारही संशोधकांनी करावा. आपल्‍या विचारांना चालना दया व कृषि क्षेत्राच्‍या विकासासाठी अधिकाधिक उपयुक्‍त संशोधनावर भर दया. कृषि संशोधकच कृषि विद्यापीठाची प्रतिमा बदलु शकतात, असे मत त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, कृषि क्षेत्रातील तांत्रिक तफावतीचा अभ्‍यास करून आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍यांनी संशोधनाची दिशा ठरवावी. कार्यक्रमात आचार्य पदवीच्‍या विद्यार्थ्‍याच्‍या संशोधनाच्‍या विषय तसेच संशोधनात येणा-यां विविध समस्‍यावर चर्चा करण्‍यात आली. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्राचार्य डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन कविता देशमुख व सुप्रिया पाचपुते हिने तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची वसंतराव नाईक कृषि पुरस्‍कारासाठी निवड झाल्‍याबाबत सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विविध शाखेचे आचार्य पदवीचे विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते.



Wednesday, July 8, 2015

वनामकृवितील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेस अखिल भारतीय प्रकल्प समन्वयक डॉ. महाराणी दिन यांची भेट


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वयक संशोधन प्रकल्प पशुशक्तीचा योग्य वापर या योजनेस प्रकल्पाचे अखिल भारतीय समन्वयक तथा भोपाल येथील केंद्रीय अभियांत्रिकी संस्थानचे डॉ. महाराणी दिन व त्यांचा सहकाऱ्यांनी नुकतीच भेट देउुन योजनेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रकल्पांतर्गत परभणी, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्‍हयातील योजनेने शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावरील घेतलेल्या चाचण्याला भेट देऊन शेतकऱ्यांशी शेतीतील बैलाचा वापर व सुधारित कृषी औजारे बाबत चर्चा केली.
   योजनेव्‍दारे संशोधित धसकटे गोळा करण्याचे औजार, तीन फासाचे खत कोळपे, बैलचलीत फवारणी यंत्र, बैलचलीत खत पसरणारे यंत्र, शेततळे व बोअर मधील पाणी उपसणे यंत्र, कृषी प्रक्रिया यंत्राचे प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केले. बैलचलीत औजारांचा वापर वाढवून शेतकऱ्यांचे व बैलाचे कष्ट कमी करण्‍यासाठी केलेल्‍या प्रकल्पाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ. महाराणी दिन व त्‍यांच्‍या सहकार्यानी लातूर व शिराढोण (ता. कंधार जि नांदेड) येथील परिसंवादात मार्गदर्शन केले. कार्यक्रमास इंजीनीयर सचिन कवडे, प्रा.डीग्रसे, इंजीनीयर नांदेडे, इंजीनीयर शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी योजनेचे इंजीनीयर अजय वाघमारे, सहाय्यक कृषी अभियंता प्रा. दयानंद टेकाळे, सहदेव वडमारे, दीपक यंदे, प्रा. पंडित मुंढे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्‍या आयोजन करण्यासाठी संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवन, प्राचार्य डॉ. उदय खोडके, विभाग प्रमुख प्रा. जे एम  पोतेकर आदींनी मार्गदर्शन केले. 

Monday, July 6, 2015

घाणा देशातील विदेशी विद्यार्थ्यांस पदव्युत्तर पदवी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्‍या कृषिविद्या शाखेतील घाणा देशातील विद्यार्थी केटेकु अ्रगबेसी क्‍वाडझो यांने डॉ व्‍ही एन नारखेडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली मका पीकावर संशोधन करून पदव्‍युत्‍तर पदवी अभ्‍यासक्रम पुर्ण केला. त्‍यास कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते दि ४ जुलै रोजी पदवी प्रदान करण्‍यात आली. याप्रसंगी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, विद्यापीठातील केलेल्‍या संशोधनाचा उपयोग घाणा देशातील कृषि क्षेत्राच्‍या विकासासाठी करावा व हेच विद्यापीठाच्‍या दृष्‍टीने मोठे योगदान ठरेल, असा सल्‍ला त्‍यांनी विद्यार्थ्‍यास दिला. यावेळी शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ व्‍ही एन नारखेडे आदी उपस्थित होते. 

Saturday, July 4, 2015

तुरीवरील खोडमाशीचे वेळीच व्‍यवस्‍थापन करा.....विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले


मागील वर्षी तुरीला मिळालेल्‍या चांगल्‍या भावामुळे व यावर्षी आजपर्यंत झालेल्‍या कमी पावस पहाता तुर लागवडीकडे शेतक-यांचा कल वाढलेला दिसतो. विशेषत: ज्‍या शेतक-यांकडे पाण्‍याची उपलब्‍धता आहे अशांनी पुर्व हंगामी तुरीच ब-याच भागात लागवड केली आहे. सद्यस्थितीत बहुतेक ठिकाणी तुरीची शेंडे जळालेली किंवा करपलेली दिसुन येत असुन  शेतक-यांचा असा समज दिसतो की, कमी पावसामुळे अथवा वापरलेल्‍या काही खतांमुळे मर रोग दिसत आहे. परंतु सनपुरी (ता. जि. परभणी) शिवारातील शेतकरी नरेश शिंदे यांच्‍या शेतावर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्‍या समवेत कृषि विद्यावेत्‍ता प्रा. बी. एन. आगलावे, पिक रोग शास्‍त्रज्ञ प्रा. पी. एच. घंटे व किटकशास्‍त्रज्ञ प्रा. डी. डी. पटाईत यांच्‍या चमूने भेट दिली असता, या ठिकाणी तुरीमध्‍ये खोडमाशी या किडीचा प्रादुभार्व दिसुन आला असुन ७० ते ८० टक्‍के झाडे प्रादुर्भावग्रस्‍त दिसुन आली आहेत. या किडीची मादी खोडावर स्‍वत: केलेल्‍या खाचेत अंडी घालते. अशा अंड्यातुन पिवळसर रंगाची अळी निघुन ती खोड पोखरुन आत शिरते. कोवळे खोड पोखरल्‍यामुळे रोपाचा शेंड्याकडील भाग वाळुन जातो. यामुळे झाडाच्‍या वाढीवर विपरीत परिणाम होऊन झाडास फुले व कळ्या कमी लागतात. पीक उगवल्‍यानंतर एक महिन्‍याच्‍या आत या किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्‍यास खुप मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. सततचे आर्द्र वातावरण व कमी पाऊस या किडीच्‍या वाढीस पोषक असुन शेतक-यांनी वेळीच उपायायोजना करणे गरजेचे आहे. अश्‍या वेळी किडग्रस्‍त झाडे, फांद्या आतील किडीसह उपटुन नष्‍ट करावीत व पीकाची विरळणी करावी. प्रादुर्भाव जास्‍त असल्‍यास जमिनीतुन फोरेट १० टकके दाणेदार १ किलो अथवा क्‍लोरॅनट्रानीलिप्रोल ०.४ टकके दाणेदार (फरटेरा) १० किलो प्रति हेक्‍टरी जमिनीत ओल असतांना टाकावे किंवा ट्रायझोफॉस ४० टकके प्रवाही २० मि.ली. किंवा थायमि‍थोक्‍झाम २५ टक्‍के प्रवाही २ ग्रॅम किंवा अॅसिफेट ७५ टक्‍के पाण्‍यात मिसळणारी पावडर २० ग्रॅम १० लिटर पाण्‍यात मिसळुन साध्‍या पंपाने फवारावे. पावर पंपाकरीता किटकनाशकाची मात्रा तीन पट करावी. जेणे करुन किडीच्‍या प्रादुर्भवामुळे होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी केले आहे. 
 

Friday, July 3, 2015

वनामकृवि परभणी येथील बीजोत्पादन व संशोधन प्रक्षेत्राची मोठी नासधुस

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने नागरिकांना आवाहन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत प्रशासकीय इमारतीच्‍या पाठीमागे ६० एकर प्रक्षेत्रावर विविध पिकांचे संशोधन प्रात्‍यक्षिक व बिजोत्‍पादन घेतले जाते. परंतु विद्यापीठात परिसरात वावरत असतांना परिसरातील नागरिकांकडुन व फिरण्‍यासाठी येणा-या नागरिकांकडुन जाणते किंवा अजाणतेने या प्रक्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. त्‍यामुळे संशोधनाच्‍या दृष्‍टीने मोठी हानी होत आहे. तसेच विद्यापीठ विकसित बियाण्‍यास शेतक-यांत मोठी मागणी पाहाता विद्यापीठ करित असलेल्‍या अधिक बीजोत्‍पादनाच्‍या प्रयत्‍नात बाध येत आहे. याप्रक्षेत्रावर सध्‍या पिकांची पेरणी झालेली असुन पावसाअभावी आणखी काही पिकांची पेरणी होणे बाकी आहे. संपुर्ण परिसरासाठी संरक्षण भिंतीचे कुंपन करण्‍यात आलेले असुनही अनेक ठिकाणी परिसरातील नागरिकांनी भिंतीस मोठी‍ छिद्रे पाडलेली आहेत. विद्यापीठाने अनेक वेळा ही छिद्रे बुजवुन घेतली आहेत. तरि नागरिकांना विद्यापीठाच्‍या वतीने आवाहन करण्‍यात येते की, विद्यापीठात वावरत असतांना विद्यापीठाच्‍या मालमत्‍तेचे व पिकांचे कोणतेही नुकसान होऊ नये याची दक्षता घ्‍यावी व विद्यापीठास सहकार्य करावे.