Wednesday, July 22, 2015

भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची राष्‍ट्रीय पुरस्‍कारासाठी निवड

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने देण्‍यात येणा-या हरिओम आश्रम ट्रस्‍ट पुरस्‍कार २०१४ करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची निवड झाली असुन परिषदेच्‍या ८७ व्‍या वर्धापन दिनी पटना (बिहार) येथे दि २५ जुलै रोजी पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येणार आहे. हवामान बदलाचा मातीच्‍या आरोग्‍यावरील परिणाम यावरील केलेल्‍या संशोधन योगदानबाबत कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांची या पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली आहे.

वनाम‍कृवि विद्यार्थी संघटने तर्फे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा सत्‍कार

नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि संशोधन परिषदेच्‍या वतीने देण्‍यात येणा-या हरिओम आश्रम ट्रस्‍ट पुरस्‍कार व वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍कार सन्‍मान प्राप्‍त केल्‍याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांचा विद्यार्थी संघटने तर्फे सत्‍कार करण्‍यात आला. याप्रसंगी कुलसचिव डॉ दिनकर जाधव, कर्मचारी संघटनेचे अध्‍यक्ष प्रा दिलीप मोरे, डॉ बी व्‍ही आसेवार व विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी संजय चिंचाणे, कृ‍ष्‍णा होगे, भारत खेलबाडे, दत्‍ता पांचाळ, विशालकुमार राठोड, अमोल चव्‍हाण, सारंग काळे, चंद्रकांत मुदिराज, अजित पवार आदी.

माननीय मुख्‍यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍काराने कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु सन्‍मा‍ननित

हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्‍यमंत्री वसंतराव नाईक यांच्‍या स्मृतिप्रीत्‍यर्थ दिले जाणारे वसंतराव नाईक कृ‍षी पुरस्‍कार वितरण सोहळा दिनांक १० जुलै रोजी मुंबईत येथे पार पडला. यात मुख्‍यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणीस व विधानसभा अध्‍यक्ष मा ना श्री हरिभाऊ बागडे यांच्‍या हस्‍ते मृद्संधारण व जलसंधारणाच्‍या कामाबरोबरच कोरडवाहु शेती संशोधनास दिशा देणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांना यंदाच्‍या कृ‍षी पुरस्‍काराने सन्‍माननित करण्‍यात आले. याप्रसंगी वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्‍ठानचे कार्याध्‍यक्ष श्री अविनाश नाईक, अध्‍यक्ष डॉ बी आर बारवाले व माजी मंत्री श्री मनोहर नाईक आदी उपस्थित होते.

Sunday, July 19, 2015

आपत्‍कालीन परिस्थितीत पिकांची घ्‍या काळजी

वनामकृविचा कृषि सल्‍ला
सध्‍या हवामानातील उष्‍णता व जमिनीत असणारा ओलाव्‍याचा अभाव यामुळे परभणी व हिंगोली जिल्‍हयातील सोयाबीन पिकाची वाढ खुंटली आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषि तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. यु.एन. आळसे, सोयाबीन पैदासकर डॉ. एस. पी. म्‍हेत्रे आणि मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांनी मौजे जोडपरळी, हटटा व ब्राम्‍हणगाव येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर दिनांक १५ जुलै रोजी भेट दिली व सोयाबीन पीकाची पाहणी केली. या संदर्भात असे आढळुन आले आहे कि, केवळ पेरणीपुरताच पाऊस झाल्‍यानंतर पुन्‍हा पावसात खंड पडला असुन जमिनीतील ओलावा सिमांतपातळी पेक्षा कमी झाला आहे, त्‍यामुळे पाणी व अन्‍नद्रव्‍यांचे सोयाबीन पीकाकडुन शोषण बंद झाले असुन पिके मलुल झाले व पिकाची वाढ खुंटली आहे. करिता सर्व सोयाबीन शेतक-यांनी पाऊस येईपर्यंत पिक टिकवण्‍यासाठी  १०:००:४५ (पोटॅशियम नायट्रेट ०.५ टक्‍के  ५० ग्रॅम १० लिटर पाणी व झिंक सल्‍फेट ०.५ टक्‍के) ४० ग्रॅम १० लिटर पाणी याच प्रमाणात एकत्रित फवारणी करावी. किंवा ग्रेड-२ चे सुक्ष्‍म अन्‍नद्रव्‍ये ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्‍यात मिसळुन फवारणी करावी, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले व डॉ यु एन आळसे यांनी केले आहे. 

आपत्‍कालीन पिक व्‍यवस्‍थापन मार्गदर्शन मेळावा बाभुळगांव येथे संपन्‍न

मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना कृषिविद्या शास्‍त्रज्ञ डॉ ए के गोरे
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍पाच्‍या हवामान बदलानुरूप राष्‍ट्रीय कृषि उपक्रम अंतर्गत मौजे बाभुळगाव (ता. जि. परभणी) येथे दि. १६ जुलै रोजी आपत्‍कालीन पिक व्‍यवस्‍थापन मार्गदर्शन मेळावा घेण्‍यात आला. मेळाव्‍यात शास्‍त्रज्ञ डॉ ए के गोरे व डॉ जी के गायकवाड यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. कृषिविद्या शास्‍त्रज्ञ डॉ ए के गोरे मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, सदयस्थितीत पडलेल्‍या पावसाच्‍या खंडामुळे पिकांना पाण्‍याचा ताण पडला असुन शेतात पडलेल्‍या भेगांसाठी हलकी कोळपणी करावी तसेच शेतात असलेला काडीकचरा किंवा सोयाबीनचा भुसा पिकात आच्‍छादन म्‍हणुन वापरावा, शक्‍य असेल तर पाण्‍याची फवारणी करावी. आर्थिक स्‍थैर्यासाठी शेतक-यांना शेती पुरक जोडधंद्या करण्‍याबाबत त्‍यांनी मार्गदर्शन केले. मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. जी. के. गायकवाड यांनी शेतकरी बांधवांना जमिनीचे आरोग्‍य महत्‍वाचे असुन हवामान बदलामध्‍ये सेंद्रीय खतांचा वापर आवश्‍यक असल्‍याचे सांगितले. तसेच त्‍यांनी कपाशी, सोयाबीन या पिकांमध्‍ये खत व्‍यवस्‍थापन यावर मार्गदर्शन केले. जमिनीत ओल असल्‍याशिवाय कोरडवाहू कपाशीला नत्र खताची मात्रा देऊ नये, जर पाण्‍याची सोय असल्‍यास हलके पाणी देऊनच खताची मात्रा दयावी. जेथे जमिनीत ओलावा नाही तेथे पोटॅशीयम नायट्रेट १ ते १.५ टक्‍के पाण्‍यात मिसळुण फवारणी करावी. पोटॅशियममुळे पिकात पाण्‍याचा ताण सहन करण्‍याची क्षमता निर्माण होते व पीक कीड- रोगांना कमी प्रमाणात बळी पडते, असा असे त्‍यांनी सां‍गितले.
  विद्यापीठाने वितरीत केलेल्‍या पोटॅशीयम नायट्रेट व आच्‍छादनाचा वापराबाबत माणीक संमीद्रे यांनी प्रात्‍यक्षिकाव्‍दारे माहिती दिली तर प्रगतशील शेतकरी गिरीष पारधे यांनी विहीर पुनभरण व आंतरपिक पध्‍दती याबाबत आपले अनुभव सांगितले. सुत्रसंचालन सारीका नारळे यांनी तर आभार प्रदर्शन माणीक समीद्रे यांनी केले. मेळावास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते. सदरिल मेळावा मुख्‍य शास्‍त्रज्ञ डॉ बी व्‍ही आसेवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली घेण्‍यात आला तर मेळावा यशस्‍वतीतेसाठी प्रा. मदन पेंडके, डॉ मेघा जगताप, श्री. पिंगळे आदीसह ग्रामिण कृषि कार्यानुभव उपक्रमाच्‍या विद्यार्थीनी सहकार्य केले.
मेळाव्‍यात मार्गदर्शन करतांना मृदा शास्‍त्रज्ञ डॉ जी के गायकवाड

Saturday, July 18, 2015

सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग मराठवाडयातील शेतक-यांसाठी सुवर्णसंधी.....शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात सोयाबीन प्रक्रिया लघुउद्योगावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्‍न
कार्यशाळेत प्रशिक्षण घेतांना शेतकरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्‍या कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाव्‍दारे “सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग’’ या विषयावर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दि. १६ जुलै रोजी एक दिवसीय कार्यशाळाचे आयोजित करण्यात आले होते. कार्यशाळाचे उद्घाटन शिक्षण संचालक तथा आधिष्ठाता डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते झाले तर हिंगोली जिल्ह्याचे माजी खासदार मा. श्री. शिवाजीराव माने, विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्य डॉ उद्य खोडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, मराठवाडयातील सोयाबीनचे क्षेत्र वाढत असुन शेतक-यांच्‍या आर्थिक उन्‍नतीसाठी सोयाबीनवर आधारित लघुउद्योगाचा विकास होणे गरजेचे आहे. मराठवाडयातील शेतक-यांसाठी सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग ही सुवर्णसंधी असुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ याबाबत तांत्रिक मदत करण्‍यास तत्‍पर असल्‍याचे ते म्‍हणाले.
प्रमुख पाहुणे माजी खासदार मा. श्री. शिवाजीराव माने यांनी आपल्‍या भाषणात सोयाबीन प्रक्रीया लघुउदयोग उभारण्याचे शेतकऱ्यांना आव्हान केले तर विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी मराठवाड्यातील सोयाबीनचे महत्व व प्रक्रियायुक्त पदार्थांची विक्री व्यवस्था यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. उदय खोडके यांनी सोयाबीनचे तेलाव्यतिरिक्त इतर उदयोगाबाबत मा‍हीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुहास जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सुमंत जाधव यांनी केले. कार्यशाळेत तोंडापूर (जि हिंगोली) येथील कृषी विज्ञान केंद्रांनी स्थापन केलेल्या शेतकरी गटातील अनेक शेतकरी प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक यांनी हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन प्रक्रिया लघुउदयोग उभारण्याचा मानस व्यक्त केला. तांत्रिक चर्चासत्रात सोया दुध, सोया पनीर व सोयाआधारित इतर लघूउदयोगाच्या तंत्रज्ञानाबद्दल डॉ.स्मिता खोडके यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी कृषि प्रक्रिया विभागाचे प्रा. प्रमोदिनी मोरे, श्री. शिवणकर, पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. वनामकृवि अंतर्गत असलेले “सोयबीन प्रक्रिया केंद्र” हे महाराष्ट्रातील एकमेव संशोधन आणि विस्तार केंद्र असून या मार्फत आजपर्यंत राज्‍यातील अनेक लघुउद्योजक, शेतकरी गटांसाठी प्रशिक्षण व चर्चासत्र कार्यक्रम राबविण्यात आले असुन या केंद्राची उभारणी नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि वैधानिक विकास महामंडळ यांचे सहकार्यांने करण्‍यात आलेली आहे.

Friday, July 17, 2015

आपत्‍कालीन पीक नियोजन शिफारसी जास्‍तीत जास्‍त शेतक-यांपर्यंत पोहचवा.....कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु

वनामकृवित विस्‍तार शिक्षण परिषदेची विसावी बैठक संपन्‍न
जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातुन केलेल्‍या जलसंधारणाच्‍या कामामुळे प्राप्‍त होणा-या पाऊसाच्‍या पाण्‍याचा कार्यक्षमरित्‍या वापराबाबत कृषि विद्यापीठाच्‍या शास्‍त्रज्ञांनी शेतक-यांना मार्गदर्शन करावे. अनिश्चित पाऊसमानासाठी आपत्‍कालीन पीक नियोजनाच्‍या विद्यापीठाच्‍या शिफारसी विविध माध्‍यमाव्‍दारे जास्‍तीस जास्‍त शेतक-यांपर्यत पोहचवाव्‍यात, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या आगामी वर्षातील कृषि विस्‍ताराची दिशा निश्चित करण्‍यासाठी विस्‍तार शिक्षण संचालनालयच्‍या वतीने दि १६ जुलै रोजी आयोजीत विस्‍तार शिक्षण परिषदेच्‍या विसाव्‍या बैठकीच्‍या अध्‍यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीस शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, परिषदेचे सदस्‍य प्रगतशील शेतकरी श्री कांतरावजी देशमुख, प्रगतशील शेतकरी श्री उध्‍दवरावजी खेडेकर, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, हिंगोलीचे जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री एस के पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, सद्याची परिस्थिती पाहाता भविष्‍यात जनावरांचा चा-याचा प्रश्‍न गंभीर होऊ शकतो, त्‍या अनुषंगाने शेतक-यांना चारापिक लागवडीबाबत मार्गदर्शन करावे. विद्यापीठात शेतक-यांना उप‍युक्‍त तंत्रज्ञानावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे वार्षिक वेळापत्रक तयार करून जास्‍तीत जास्‍त शेतक-यापर्यंत पोहचवुन त्‍यांचा सहभाग वाढवावा. आंतरपिक पध्‍दत, रूंद वरंबा व सरी पध्‍दत, द्रव्‍यरूप खत व्‍यवस्‍थापनाबाबत मार्गदर्शन करण्‍याची आवश्‍यकताही त्‍यांनी दिला.
प्रगतशील शेतकरी श्री उध्‍दवरावजी खेडेकर यांनी भाषणात शेतकरी एकाच जमिनीत सतत एकचएक पीक घेत असुन मातीतील काही अन्‍नद्रव्‍याची कमतरता निर्माण होत असुन त्‍यांना पीक फेरपालटीबाबत विद्यापीठाने मार्गदर्शन करावे असे मत मत व्‍यक्‍त केले. शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या विभागीय कृषी विस्‍तार केंद्राची  बळकटीकरणाची आवश्‍यकता असल्‍याचे सांगितले तर कुलसचिव डॉ दिनकर जाधव आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, प्रत्‍येक जिल्‍हातील विविध पीकात यशस्‍वी शेतक-यांच्‍या यशोगाथा तयार करून त्‍यांची यादी विद्यापीठाने प्रसिध्‍द करावी जेणेकरून इतर शेतकरी त्‍यांच्‍याशी संपर्क करू शकतील. याप्रसंगी श्री कांतराव देशमुख यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.

कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांना वसंतराव नाईक कृषी पुरस्‍काराने सन्‍माननित करण्‍यात आल्‍याबाबत विस्‍तार शिक्षण संचालनालयाच्‍या वतीने सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी गत वर्षीच्‍या विद्यापीठाच्‍या विस्‍तार कार्याची माहिती दिली तर सुत्रसंचालन मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ पी आर देशमुख यांनी केले. बैठकीत डॉ यु एन आळसे, डॉ एस बी पवार, प्रा अरूण गुट्टे, डॉ व्‍ही जी टाकणखार, डॉ निर्मल यांनी विस्‍तार कार्याची माहिती दिली तर प्राचार्य डॉ विलास पाटील, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, प्राचार्य डॉ डि एन गोखले, डॉ हेमांगिनी संरबेकर आदीसह मराठवाडयातील सर्व कृषि विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, विभागीय कृषि विस्‍तार केंद्राचे प्रभारी अधिकारी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी चर्चेत सहभाग नों‍दविला.