Saturday, October 16, 2021

कापुस पिकात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

कापसातील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा....वनामकृवितील किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

सद्यपरिस्थितीत कपाशी बोंड लागण्याच्या तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत असुन गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसुन येत आहे. गुलाबी बोंडअळी ही अतिशय नुकसानकारक कीड असुन ही बोंडाच्या आत राहून उपजिविका करते, बाहेरून या किडीच्या प्रादुर्भावाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, होणारे नुकसान टाळण्‍यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील किटकशास्‍त्रज्ञांनी दिला आहे.

गुलाबी बोंडअळी अंडयातून निघुन ताबडतोब कळया, फुले व बोंडाना छोटे छिद्र करून आत शिरते. सुरूवातीला अळया पाते, कळया, फुलांवर उपजीवीका करतात. प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमलेलल्या कळीसारखी दिसतात, अशा कळयांना डोमकळया म्हणतात. प्रादुर्भावग्रस्त पाते, बोंडे गळून पडतात किंवा परिपक्क न होताच फुटतात व गळून गेलेली बोंडे सडतात. बोंडामध्ये एकदा का ही अळी शिरली की तिची विष्ठा व बोंडाचे बारीक कण यांच्या साहाय्याने ही छिद्रे बंद करते. त्यामुळे बोंडावर या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही. अळी रूई कातरून नुकसान करते. त्यामुळे रूई सडते व खराब होते. प्रादुर्भावग्रस्त बोंडाची वाढ खुंटते, बोंडे पूर्णपणे फुटत नाहीत. अळी बोंडातील बिया खाते व एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात शिरते, त्यामुळे रूईची प्रत खालावते.

उपाय योजना

बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करून नष्ट करावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी डोमकळया दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसहीत नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळ्यांच्या सर्वेक्षणासाठी हेक्‍टरी ५ कामगंध सापळे तर मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी हेक्‍टरी २५ सापळे लावावेत. अळीच्‍या प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम २५ मिली प्रती दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीसाठी ट्रायेकोग्रामाटॉयडीया बॅक्ट्री या परोपजिवी कीटकाच्या अंडयाचे एकरी २ ते ३ कार्ड फुलोरा व बोंडअवस्थेत पिकावर लावावेत जेणेकरून अंडी अवस्थेत बोंडअळीचा नाश होईल.

शेतात प्रती कामगंध सापळा ८-१० पतंग सलग ३ रात्री किंवा ५ ते १० टक्के प्रादुर्भावग्रस्त हिरवी बोंडे, आढळल्‍यास ही किडीची आर्थिक नुकसानीची पातळी समजावी. ही पातळी ओलांडल्यानंतर प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा थायमिथोक्झाम १२.६ अधिक लॅमडासाहॅलोथ्रीन ९.५ झेडसी ४ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल ९.३० अधिक लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६० हे किडकनाशक ५ मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारणी करावी. कपाशीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी व्यवस्थापन करावे असे आवाहन कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. अनंत लाड, डॉ. राजरतन खंदारे, डॉ. संजोग बोकन यांनी केले आहे.

प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमलेलली कळी - डोमकळी

Thursday, October 7, 2021

वनामकृवित हॉयड्रोपॉनीक आणि पॉलीहाऊस यावर ऑनलाईन प्रशिक्षणास प्रारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि भारतीय कृ‍षी अनुसंधान पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत आधुनिक स्‍वयंचलित हॉयड्रोपॉनीक आणि पॉलीहाऊस या विषयावर दोन आठवडीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 04 ते 16 ऑक्टोबर दरम्यान करण्‍यात आले असुन दिनांक 4 ऑक्‍टोबर रोजी या प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्‍ली येथील कृषि व शेतकरी कल्‍याण विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त (उद्यानविद्या) डॉ. नवीन पटले हे उपस्थित होते तर नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ, गोपाळ शिंदे व उप-अन्वेषक डॉ. आर. पी. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. नवीन पटले म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होत आहे.  भारत सरकार विविध योजनांच्या मार्फत आधुनिक तंत्रज्ञानात स्वंयपुर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्‍नशील आहे. पॉलीहाऊस व हॉयड्रोपॉनीक सारख्या तंत्रज्ञानाची जोड शेतक-यांच्या सर्वांगीन विकासासाठी व नवीन व्यवसाय निर्मीतीसाठी आवश्‍यक असल्‍याचे ते म्‍हणाले. डॉ, गोपाळ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नाहेप प्रकल्पाविषयी माहिती दिली.

प्रास्‍ताविकात श्री.रहीम खॉन यांनी प्रशिक्षण आयोजनाच्या मागील संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंजी. खेमचंद कापगते यांनी केले तर आभार डॉ. हेमंत रोकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. शिवराज शिंदे, इंजी. तझीम पठाण, इंजी. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, डॉ. अनिकेत वाईकर, इंजी. शिवानंद शिवपुजे,इंजी. गोपाळ रनेर, इंजी. अपुर्वा देशमुख, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, रेखा ढगे व मारोती रणेर, गंगाधर जाधव व जगदीश माने आदींनी परीश्रम घेतल. प्रशिक्षणास पन्‍नास पेक्षा जास्‍त विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्तर विद्यार्थ्‍यी यांनी सहभाग नोंदविला.  

Saturday, October 2, 2021

राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या वतीने आयोजित फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

महात्‍मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त फिट इंडिया फ्रीडम रन २.० कार्यक्रमाचे ५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड, शिवाजी महाविद्यालय, परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक २ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्‍यात आले होते. इंडिया फ्रीडम रनला प्रमुख पाहुणे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडा दाखवुन सुरूवात करण्‍यात आली. यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल, नांदेड येथील एनएनसी कमांडिंग ऑफिसर श्री वेटरी वेल्‍लु, श्री हेमंतराव जामकर, उपप्राचार्य  डॉ  केशेट्टी, वाहतूक नियंत्रक अधिकारी श्री सचिन इंगेवार, प्रबंधक श्री विजय मोरे, लेफ्टनंट डॉ प्रशांत सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आज देश स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष साजरे करीत आहे. जगाला अहिंसा, सत्‍य व सहिष्‍णुता यांची शिकवण देणारे देशाला स्‍वातंत्र मिळविण्‍यात अमुल्‍य असे योगदान महात्‍मा गांधी यांचे होते तर स्‍वातंत्र्यानंतर देशा निर्माणात अतुलनीय योगदान देणारे भारतरत्‍न लाल बहादुर शास्‍त्री यांचे कार्य आजही स्‍मरणीय आहे, त्‍यांनी देशाच्‍या संरक्षणात जवानांचे व प्रगतीत शेतक-यांचे महत्‍व ओळखुन जय जवान जय किसान हा नारा दिला. कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावात मानव आपल्‍या आरोग्‍याबाबत अधिक सजग झाला आहे, स्‍वाथ्‍यपुर्ण जीवन जगण्‍याकरिता रोज व्‍यायाम व धावण्‍याचे महत्‍व लक्षात घेता देशाच्‍या माननीय पंतप्रधान यांच्‍या संकल्‍पनेतुन देशात फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. प्रत्‍येक व्‍यक्‍तींने व्‍यायाम व धावणे हे आपल्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग म्हमुण अंगीकार केला पाहिजे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  

यावेळी छात्रसैनिक, महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी फिट इंडिया फ्रीडम रन मध्‍ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिवाजी महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, कृषि महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, सैन्य दलाचे श्री जमन सिंग, श्री सुनील कुमार, डॉ संतोष कोकीळ, डॉ राजू बडूरे, प्रा. प्रल्‍हाद भोपे, प्रा. राजेसाहेब रेंगे, प्रा तुकाराम फिसफिसे, श्री व्ही आर मोरे, महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी, राष्‍ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, वाहतुक नियंत्रक विभाग व जिल्हा रुग्णालय बचाव पथक कर्मचारी आदीनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन छात्रसैनिक श्री चंद्रकांत सातपुते यांनी केले तर आभार लेफ्टनंट श्री प्रशांत सराफ यांनी मानले. यावेळी छात्रसैनिक, महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी फिट इंडिया फ्रीडम रन मध्‍ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिवाजी महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, कृषि महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, सैन्य दलाचे श्री जमन सिंग, श्री सुनील कुमार, डॉ संतोष कोकीळ, डॉ राजू बडूरे, प्रा. भोपे, प्रा. रेंगे, प्रा फिसफिसे, श्री व्ही आर मोरे, महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी, राष्‍ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, वाहतुक नियंत्रक विभाग व जिल्हा रुग्णालय बचाव पथक कर्मचारी आदीनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन छात्रसैनिक श्री चंद्रकांत सातपुते यांनी केले तर आभार लेफ्टनंट श्री प्रशांत सराफ यांनी मानले.






Friday, October 1, 2021

वनामकृवित डॉ. आर.एस. मुर्ती स्मृती व्याख्यान संपन्न

“अण्विक मृद विज्ञान” यावर भोपाळ येथील मृद शास्त्रज्ञ डॉ. तपन अधिकारी यांनी केले मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था नवी दिल्ली शाखा परभणी व मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. आर.एस. मुर्ती स्मृती ऑनलाईन व्याख्यानाचे दिनांक 30 सप्‍टेबर रोजी आयोजन करण्‍यात आले होते, यात अण्विक मृद विज्ञान यावर भोपाळ येथील भारतीय मृद विज्ञान संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. तपन अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे तर सहअध्यक्ष माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील हे होते.

मार्गदर्शनात डॉ. तपन अधिकारी यांनी मृदशास्त्रातील नविनतम विषयास अनुसरुन मृद विज्ञानातील भविष्यातील संशोधनाची दिशा स्पष्ट केली. माती, पिके यातील जीवभौतिक व रासायनिक अभिक्रियांचा परस्पर संबंधावरील संशोधनाचे सादरीकरण दिले. जमिनी कशा प्रकारे होते याची माहिती दिली. आण्विक मृद विज्ञानात संशोधन पदव्युत्तर संशोधकांस व शास्त्रज्ञास संधी उपलब्ध असल्‍याचे ते म्‍हणाले. तर अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा.डॉ. अशोक ढवण यांनी सेंद्रीय घटक पदार्थाचे विघटन आणि ह्रुमस पदार्थांचे उत्पादन आणि अन्नद्रव्यांचा परस्पर संबंधाचा विस्तारीत अभ्यास या अण्विक शास्त्रात संशोधनाच्‍या अनेक संधी असल्‍याचे म्‍हणाले तसेच कै. डॉ. आर.एस. मुर्ती यांचे मृदशास्त्रातील सुक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकातील महत्व या संशोधनाविषयी मोठे योगदान असल्‍याचे ते म्‍हणाले.  यावेळी डॉ. विलास पाटील मृदा शास्त्रातील मातीचे मुळ संशोधन आण्विक शास्‍त्राव्दारे अभ्यासता येते असे स्पष्ट केले आणि आधुनिक दुरस्थ संवेदन उपकरणांचा या आण्विक मृदशास्त्रास मोठा उपयोग होतो असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमात भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणीचे अध्‍यक्ष तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी कै. डॉ. आर.एस. मुर्ती यांच्या मृद विज्ञानातील योगदानाबाबत माहिती देऊन प्रमुख पाहुण्‍याचा परिचय दिला. सुत्रसंचालन सचिव तथा प्राध्यापक डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. स्नेहल शिलेवंत, अजय चरकपल्ली आदीसह विभागातील कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी सहकार्य केले. अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणा­या स्मृती व्याख्यान मालेचा मान यंदा परभणी विद्यापीठास मिळाला. ऑनलाईन व्याख्यानात संपुर्ण देशातुन मृद शास्त्रज्ञ, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी असे दोनशे पेक्षा जास्‍त सहभाग नोंदविला.