Sunday, November 21, 2021

विज्ञान संकुल विकासाकरिता वनामकृवि व परभणी खगोलशास्‍त्र संस्‍था यांच्‍यात सामंजस्‍य करार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात भव्‍य विज्ञान संकुल उभारण्‍यात येणार असुन याकरिता विद्यापीठ व परभणी खगोलशास्‍त्र संस्‍था यांच्‍यात दिनांक २१ नोव्‍हेंबर रोजी सामंजस्‍य करार करण्‍यात आला. सदरिल विज्ञान संकुल उभारणी करिता आमदार माननीय डॉ राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला. सदरिल संकुलच्‍या न‍िर्मितीसाठी तीन कोटीचा निधी उपलब्‍ध होणार असुन लवकरच नियोजित विज्ञान संकुल निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्‍यात येणार आहे. सामंजस्‍य करार कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन माननीय आमदार डॉ राहुल पाटील हे होते होते. यावेळी विख्‍यात वैद्यकिय चिकित्‍सक डॉ रामेश्‍वर नाईक, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्राचार्य डॉ उदय खोडके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी करारावर विद्यापीठाच्‍या वतीने शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींनी सहया केल्‍या तर परभणी खगोलशास्‍त्र संस्‍थेच्‍या वतीने डॉ रामेश्‍वर नाईक, ओमप्रकाश तलरेजा, सुधीर सोनुनकर आदींनी सहया केल्‍या.

याप्रसंगी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, वनामकृवि व परभणी खगोलशास्‍त्र संस्‍थाचा यांच्‍यातील सांमजस्‍य करार हा एक ऐतिहासिक क्षण ठरेल. नियोजित विज्ञान संकुल हे विज्ञानातील विविध विद्याशाखेंचा समावेश असलेले आगळेवेगळे दालन तयार करण्‍यात येणार असुन यास भविष्‍यात ज्ञान गंगेचे स्‍वरूप प्राप्‍त होईल. नवीन शैक्षणिक धोरणात मुलभुत विज्ञान, उपयोजित विज्ञान व इतर शाखा एकत्रित येऊन बहुविद्याशाखीय शिक्षणाचा समावेश आहे, हे विज्ञान संकुल नवीन शैक्षणिक धोरणाची नांदी असेल. नुकतेच कृषि शिक्षण हे शालेय शिक्षणात समाविष्‍ठ केले आहे. कृषि विज्ञान सोबतच मुलभुत विज्ञान व उपयोजित विज्ञानातील नवनवीन संकल्‍पना एकाच ठिकाणी विद्यार्थ्‍यांना पाहण्‍यास मिळणार आहेत. यात अंतराळ विज्ञान, रसायनशास्‍त्र, भौतिकशास्‍त्र, अभियांत्रिकी पर्यावरणशास्‍त्र, खगोलशास्‍त्र आदींची समावेश असणार आहे. परभणी कृषि विद्यापीठाने डिजिटल शेती तंत्रज्ञानात आघाडी घेतली असुन विज्ञान संकुलाच्‍या माध्‍यमातुन ही चळवळ अधिक व्‍यापक होणार आहे. संकुलामुळे युवकांमध्‍ये वैज्ञानिक प्रबोधन होणार असुन मुलभुत व उपयोजित विज्ञानामुळे शेती विज्ञान ही अधिक प्रगल्‍भ होणार आहे. याचा लाभ विद्यार्थी व संशोधनकांना होणार असुन या माध्‍यमातुनच उदयाचे आतंरराष्‍ट्रीय दर्जाचे शास्‍त्रज्ञ घडतील. या प्रकल्‍पात परभणी कृषि विद्यापीठ नॉलेज पार्टनर राहणार आहे.

मार्गदर्शनात माननीय आमदार डॉ राहुल पाटील म्‍हणाले, परभणी हे शिक्षणाचे व संशोधनाचे माहेरघर निर्माण व्‍हावे, शालेय जीवनातच विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन निर्माण व्‍हावा. तसेच आपल्‍या भागातील विद्यार्थ्‍यांतुन आंतरराष्‍ट्रीय र्कीतीचे शास्‍त्रज्ञ घडावेत हा दृष्‍टीकोन ठेऊन विज्ञान संकुलाचे कार्य हाती घेण्‍यात आले आहे. विद्यापीठात आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे विज्ञान संकुल विकासत होणार असुन याकरिता तीन कोटीचा निधी उपलब्‍ध करून देण्‍यात आला आहे. यामुळे शैक्षणिक पर्यटनास चालना मिळणार आहे. हे विज्ञान संकुल उभारणीचे कार्य एक क्रांतीकारक पाऊल ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्‍यक्‍त केली.

नियोजित विज्ञान संकुलाबाबत बोलतांना मा डॉ रामेश्‍वर नाईक म्‍हणाले की, मराठवाडयातील ग्रामीण विद्यार्थ्‍यांमध्‍ये आंतरराष्‍ट्रीय कीर्तीचे शास्‍त्रज्ञ बनन्‍याची क्षमता आहे, त्‍या क्षमतेस वाव देण्‍याची गरज आहे. परभणी खगोलशास्‍त्र संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांमध्‍ये वैज्ञानिक दृष्‍टीकोन विकस‍ित करण्‍याची चळवळीस नियोजित विज्ञान संकुलामुळे गती प्राप्‍त होणार आहे. परभणीतीलच नव्‍हे तर राज्‍यातील विज्ञान प्रेमी करिता नियोजित विज्ञान संकुल दिशादर्शक ठरेल. विद्यार्थ्‍यांना करिअर मार्गदर्शक म्‍हणुन हे संकुल कार्य करेल. नवीन शैक्षणिक धोरणानुसार कोणतेही विद्याशाखे एक स्‍वतंत्रपणे कार्य न करता, सर्व विद्याशाखा एकत्रित कार्य करणार आहेत, हे विज्ञान संकुल राज्‍यातीलच नव्‍हे देशातील एक अनोखे संकुल राहणार आहे. या करिता आंतरराष्‍ट्रीय व राष्‍ट्रीय संस्‍थेची मदत होणार आहे. औंढ नागनाथ परिसरात गुरूत्‍व लहरीचा अभ्‍यास करणारी जागतिक किर्तीची नासानंतरचे तिस-या क्रमांकाची लिगो नावाची प्रयोगशाळेेेची उभारणी होत आहे. सदरिल प्रयोगशाळेत आपल्‍याही विद्यार्थ्‍याना संधी प्राप्‍त होऊ शकेल. लवकर विज्ञान संकुल संकल्‍पने मुर्त स्‍वरूप देण्‍याकरिता पुढील महिन्‍या दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रकल्‍पाचे मुख्‍य डॉ कैलास डाखोरे यांनी केले. कार्यक्रमास डॉ संजीव बंडेवाड, डॉ गोपाल शिंदे, डॉ एम जी जाधव, डॉ ए एस जाधव, डॉ के एस बेग, डॉ एस पी मेहत्रे, डॉ संतोष कदम, डॉ अनंत लाड, ओमप्रकाश तलरेजा, सुधीर सोनुनकर, विजयकिरण नरवाडे, बालाजी कोंढरे, वेदप्रकाश आर्या, डॉ रंजीत लाड, पदमाकर पवार, दिपक शिंदे, प्रसन्‍ना भावसार आदी उपस्थित होते.

 



Wednesday, November 17, 2021

शेतीत शाश्वतता निर्माण करण्याकरीता पीक संरक्षण तंत्रज्ञानावर भर द्यावा लागेल ..... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

लातूर कृषि महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिसंवादात प्रतिपादन

आज शेती क्षेत्रापुढे अनेक समस्या आहेत तसेच अनेक संधी देखील आहेत, देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊन अतिरिक्त धान्य निर्मिती करित आहे. दर्जेदार व किफायतशीर अन्नधान्य निर्मितीचे आपले ध्येय असले पाहिजे. सुरक्षित अन्न पोषणाचे ध्येय साध्य करण्यासाठी शेतीत रासायनिक किडनाशक व रोगनाशकांचा अतिरेकी वापर टाळणे अत्यावश्यक आहे. शाश्वत शेतीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापना बरोबरच जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान इत्यादींचा कृषि विकासासाठी अवलंब करणे गरजेचे आहे, असे मत कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी व्यक्त केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष, नवी दिल्ली येथील भारतीय वनस्पती रोगशास्त्र संस्थेचे अमृत महोत्सवी वर्ष आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिनांक 17 व 18 नोव्हेंबर रोजी शाश्वत पीक उत्पादनाकरिता अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि पीक संरक्षण यावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचेए लातूर येथील कृषि महाविद्यालयात आज उद्घाटन झाले या परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोपात ते बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून नॅचरल शुगर व संलग्न उद्योग समुहाचे अध्यक्ष कृषिभुषण मा बी बी ठोंबरे हे होते व्यासपीठावर संचालक शिक्षण डॉ धर्मराज गोखले, नवी दिल्ली येथील भारतीय पीक रोगशास्त्र संस्थेच्या अध्यक्षा डॉ प्रतिभा शर्मा, सचिव डॉ रॉबिन गोगाई, अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ आर एम गाडे, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, परिसंवादाचे आयोजक कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ अंगद सुर्यवंशी, विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा हेमंत पाटील, विभाग प्रमुख डॉ कल्याण आपेट, माजी विभाग प्रमुख डॉ व्‍ही व्‍ही दातार, सचिव डॉ चंद्रशेखर अंबाडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 कुलगुरू मा डॉ अशोक ढवण पुढे म्हणाले कि, किटकशास्त्रज्ञ, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, कृषि विद्या, मृदा शास्त्रज्ञ आणि अनुषंगीक कृषि शाखांनी वाढत्या लोकसंख्येला पोषक व सुरक्षित अन्नपुरवठा करण्यासाठी एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे. सदरील परिसंवादातून शाश्वत शेती उत्पन्नाचे धोरण निश्चित करण्यासाठी पीक शास्त्रज्ञांनी वाढत्या लोकसंख्येला पोषक व सुरक्षित अन्न पुरवठा करण्यासाठी एकत्रित संशोधन करणे आवश्यक आहे.

मार्गदर्शनात कृषिभुषण मा श्री बी बी ठोंबरे म्हणाले कि, आज देश अन्नधान्य व चारा पीकात स्वयंपूर्ण झाला आहे, परंतू जगभर इंधन तुटवाडयाची गंभीर समस्या जाणवत आहे. भारत देश लौकिक अर्थाने आत्मनिर्भर करण्यासाठी कृषि शास्त्रज्ञांनी शेतीतील टाकावू पदार्थापासून व इतर वनस्पतीपासून जैवइंधन निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित करणे ही काळाची निकड आहे.

परिसंवादात भारत सरकारचे माजी कृषि आयुक्त तथा माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्त मायी यांनी आभासी माध्यमाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनात ते म्‍हणाले की, प्राप्त परिस्थितीत विविध पीकांवर नवीन रोगांचा प्रादुर्भाव होत असून त्यामुळे सुमारे 25 टक्के लोकसंख्येला पुरेल इतक्या अन्नधान्यांची नासाडी व नुकसान होत आहे, त्यामुळे पीकांवरील विविध रोग व किडींच्या व्यवस्थापनासाठी रसायनांचा अतिरेकी वापर टाळून जैविक किड व रोगनाशकांचा सरसकट वापर करणे अत्यावश्यक आहे.

याप्रसंगी डॉ प्रतिभा शर्मा यांनी भारतीय पीक रोगशास्त्र संस्थेच्या कारर्किदीचा लेखाजोखा मांडला तर डॉ रॉबिन गोगोई यांनी या संस्थेच्या विविध क्षेत्रातील विशेषत: रोगशास्त्रातील संशोधन कार्याचा आढावा दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे यांनी केले तर आभार डॉ चंद्रशेखर अंबाडकर यांनी मानले.  कार्यक्रमात विद्यापीठातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सदरिल दोन दिवसीय परिसंवादात राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील तसेच गुजरात व गोवा राज्यातील कृषि शास्त्रज्ञ, अभ्यासक, प्राध्यापक, कृषि उद्योजक, विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी आदींनी सहभाग नोंदविला असुन परिसंवादात पीक संरक्षणावर मंथन करणार आहे. परिसंवादाचे आयोजन सचिव लातूर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंगद सुर्यवंशी, सहसचिव डॉ चंद्रशेखर अबाडकर, स्थानिक आयोजन समितीचे चेअरमन डॉ आनंद कारले हे असून परिसंवादाचे आयोजन लातूर कृषि महाविद्यालय कै विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषितंत्र विद्यालय, गळीत धान्य संशोधन केंद्र येथील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

Tuesday, November 16, 2021

तुरीवरील किडींचे फुलोरा अवस्थेपासूनच व्यवस्थापन करा

वनामकृविच्‍या किटकशास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

तुरीमध्ये फुलोरा व शेंगा भरणे या अतिशय संवेदनशील अवस्था असून यावर मारूका, शेंगा पोखरणारी अळी व शेंग माशी या किडींचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. पिकाचे नुकसान शेवटी पीक काढणी झाल्यावर उत्पादनात घट दिसून येते. नॆसर्गिक वातावरणात क्रायसोपा, भक्षक कोळी, ढालकिडा या मित्र कीटकांची संख्या वाढत असते. त्यामुळे थेट रासायनिक किटकनाशकाची फवारणी न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा म्हणजे मशागतीय, यांत्रिकीय, जैविक पध्दतींचा अवलंब करावा. या पध्दती कमी खर्चिक व पर्यावरणपूरक असुन मित्रकीटकांना व मानवी आरोग्याला हानी होत नाही. पीक ५० टक्के फुलोऱ्यात आल्यापासून जैविक कीटकनाशकाचा व किडींच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. जर किडींनी आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास तेव्हाच लेबलक्लेमनुसार रासायनिक किटकनाशकाची फवारणी केली पाहीजे. शेतकरी बांधवानी पिकाचे संरक्षण करण्यासाठी सुरवातीपासून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणे गरजेचे आहे.किडींच्या वेळीच व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवाना किडींची ओळख, जीवनक्रम माहीत असणे आवश्यक आहे.

पाने व फुले जाळी करणारी अळी - या किडीला मारूका व ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी या नावाने सुध्दा ओळखले जाते. या किडीचा प्रौढ मादी पतंग पिवळसर रंगाची असते. ती उभट आकाराची अंडी पुंजक्यात शक्यतो झाडाच्या शेंडयावर घालते. अळी १४ मि.मि. लांबीची हिरवट पांढरी व दोन्ही बाजुस काळे ठिपके असलेली असते.अळी अवस्था १२ ते १४ दिवसांची असून पतंग अवस्था ६ ते ७ दिवसात पूर्ण होते. या किडीचा जीवनक्रम २६ ते ३१ दिवसात पूर्ण होतो. या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पिक फुलोऱ्यात येण्याच्या कालावधीत जास्त आद्रता व मध्यम तापमान वेळी आढळून येतो. ही अनुकूलता सप्टेंबर ते ऑक्टोम्बरमध्ये मिळाल्याने किडीचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. ही अळी पाने फुले कळया व शेंगा यांचा एकत्र गुच्छ तयार करुन त्यात लपुन बसते आणि उदर्निवाह करते. वाढ होणारे कोवळे शेंडे, पाने एकमेकांना चिकटल्याने खोडाची वाढ खुंटते, तेथील फुले निस्तेज दिसतात व शेंगाची वाढ होत नाही अशाप्रकारे ५ ते २५ टक्केपर्यंत उत्पादनात घट होऊ शकते.

शेंगा पोखरणारी अळी - तुर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या कीडीमध्ये हिरवी अळी किंवा घाटे अळी ही भयंकर नुकसानकारक कीड आहे. ही किड बहुभक्षी असून जवळपास २०० पिकांवर (तुर, कापूस, सोयाबीन,भेंडी, टोमॅटो,हरभरा इ.) पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. या किडीचा जीवनक्रम चार अवस्थेत म्हणजेच अंडी, अळी, कोष व पतंग अशा प्रकारे पुर्ण होतो. अळी रंगाने हिरवट पिवळसर असुन अंगावर तुरळक समांतर रेषा असतात. पुर्ण वाढ झालेली अळी साधारणपणे ४ सें.मी. लांब  असते. या अळीच्या वर्षातुन ७ ते ९ पिढया तयार होतात. एक मादी सरासरी ८०० अंडी कोवळी पाने, देठे किंवा कळया, फुले तसेच शेंगावर सुध्दा घालते. ४ ते ७ दिवसांनी या अंडयातुन अळया बाहेर पडतात व १४ ते १६ दिवसांपर्यंत पुर्ण वाढ होवुन त्या झाडाच्या बुंध्याजवळ जमिनीत मातीच्या वेष्ठणात कोषावस्थेत जातात. कोषातुन पतंग बाहेर पडतात अशाप्रकारे अळीचा जिवनक्रम पुर्ण होतो. हया किडीचा जीवनक्रम ४-५ आठवडयात पुर्ण होतो. अंडयातून बाहेर निघालेल्या प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्या अगोदर तुरीची कोवळी पाने खाते, पिक फुलोऱ्यात आल्यावर कळयावर उपजिवीका करते. नंतर शेंगा लागल्यावर शेंगांना छिद्र पाडून अर्धे शरीर बाहेर व अर्धे शरीर आत ठेवून आतील दाणे खाते. तसेच मोठया अळया शेंगाना छिद्रे करुन आतील दाणे पोखरुन खातात. अशा प्रकारे एक अळी ३० ते ४० शेंगाना नुकसान पोहचवुन अळी अवस्था पुर्ण करते. ढगाळ  वातावरणात  या  कीडींची संख्या वाढून जास्त प्रादुर्भाव असल्यास २५ ते ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते.

शेंगमाशी – या कीडीची मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. अंडी पांढ­या रंगाची, लांब गोलाकार असतात. बारीकअळी, गुळगुळीत व पांढ­या रंगाची असुन तिला नसतात. तिचा तोंंडाकडील भाग निनमुळता असताते.ही अंडी 3 ते 7 दिवसात उबवुन अळी बाहेर पडते. ही अळी अवस्था १० ते १८ दिवसात पुर्ण होवून शेंगेतच कोषावस्थेत जात. कोषावरण तपकिरी रंगाचे असुन लांब गोलाकृती असतो. कोषावरणाच्या आत कोष असुन, सुरुवातीस हा कोष पिवळसर पांढरा असुन नंतर तपकिरी रंगाचा होतो. कोषावसथेच्या ४ ते ९ दिवसांत माशी शेंगेतुन बाहेर पडते. अशा प्रकारे शेंगमाशीचा जीवनक्रम ३ ते ४ आठवडयात पुर्ण होतो.  सुरुवातीस शेंगमाशीच्या प्रादुर्भावाचे कोणतेही लक्षण शेंगेवर दिसत नाही. परंतु जेव्हा वाढ झालेली अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी शेंगेला छिद्र पाडते व त्या छिद्रातुन माशी बाहेर पडते तेव्हा नुकसानीचा प्रकार लक्षात येतो. अळी शेंगेत प्रवेश करुन अर्धवट दाणे खाते तसेच दाण्यावर नागमोडी खाचा तयार होतात. यामुळे बुरशीची वाढ होते व दाणे कुजतात.


एकात्मिक कीड व्यवस्थापन : वातावरणाशी समन्वय साधुन एकमेकास पुरक अशा सर्व तंत्रज्ञानाचा वापर करुन कीडीची संख्या आर्थिक नुकसान पातळीच्या खाली ठेवणे त्यामध्ये मशागतीय, यांत्रिक, जैविकव कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापर तसेच फुलोरा अवस्थेपासूनच किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

यांत्रिक पध्दती: पाने गुंडाळणाऱ्या अळीची प्रादुर्भावग्रस्त पाने गोळा करून अळीसहीत नष्ट करावीत. शेताच्या बांधावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीची पर्यायी खाद्यतणे कोळशी, रानभेंडी, पेटारी ही तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. तूर पीक कळी लागण्याच्या अवस्थेत आल्यापासून एकरी २ कामगंध सापळे व २ नरसाळे सापळे पिकाच्या वर एक फुटी उंचीवर लावावेत. जेणेकरूनशेंगा पोखरणाऱ्या अळी व मारूकाची आर्थिक नुकसानीची पातळी कळेल.शक्य असल्यास तुरीवरील मोठया अळया वेचुन नष्ट कराव्यात. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून हलकेसे झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. शेतामध्ये पक्षी बसण्यासाठी पिकाच्या एक ते दोन फुट उंचीवर पक्षी थांबे हेक्टरी 50 ते 60 ठिकाणी उभारावे. यामुळे पक्ष्यांना आश्रय मिळून ते पिकातील अळयांचे भक्षण करतील.

जैविक पध्दती : पिकास फुलकळी येऊ लागताच प्रतिबंधात्मकउपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टिन ३०० पीपीएम ५० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. दुसरी फवारणी शेंगा पोखरणारी हिरवी अळी प्रथम व द्वितीय अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. विषाणूची ५ मि.ली. १० लिटर पाण्यातून फवारणी सायंकाळी करावी म्हणजे त्याची तिव्रता कमी होणार नाही हे औषध अन्नाद्वारे पोटात जावुन अळीच्या शरीरात विषाणुची वाढ होते व त्यामुळे अळया ५-७ दिवसात मरतात.

रासायनिक पध्दत : ज्यावेळी इतर व्यवस्थापन पध्दतींचा वापर करुन कीडींची संख्या आर्थीक नुकसान पातळीच्या वर जात असल्यास तेव्हाच शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करावी.

शेंगा पोखरणारी अळी - इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ४.४ ग्रॅम किंवा फ्ल्यूबॅडामाईड ३९.३५ एससी २ मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. ८ मि.ली. प्रति १० लि. पाणी.

शेंगा पोखरणारी अळी (मारूका): नोवॅल्युरोन ५.२५ अधिक इंडोक्झाकार्ब ४.५०एससी १६ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी ६.६६ मि.ली. प्रति १० लि. पाणी.

शेंगमाशी: डेल्टामेथ्रीन २.८ इसी१०मिली, लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ई.सी. १० मि.ली.प्रति १० लि. पाणी.


आर्थिक नुकसानीची पातळी –

शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी) :कामगंध सापळ्यात सलग २ ते ३ दिवस ८ ते १०पतंग प्रति सापळा किंवा फुलोऱ्याच्या वेळी अथवा फुलोऱ्यानंतर 2अळ्या प्रति झाड किंवा १० टक्के कीडग्रस्त शेंगा

ठिपक्याची शेंगा पोखरणारी अळी (मारूका) : १-२अळ्या प्रति झाड

शेंगमाशी: ५ टक्के हिरव्या प्रादुर्भावग्रस्त शेंगा


महत्वाचे लक्षात ठेवावे: पीक ५० टक्के फुलोऱ्यात असताना जैविक कीटकनाशकाची फवारणी करावी.  प्रथम व द्वितीय अवस्थेतच शेंगा पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करताना कीटकनाशकाची योग्य मात्रा वापरून दोन कीटकनाशकाचे मिश्रण न करता केवळ एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी. दुसरी फवारणीकरायची झाल्यास सलग एकाच कीटकनाशकाची फवारणी न करता कीटकनाशक बदलून १५ दिवसाच्या अंतराने करावी. फवारणी करताना हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा. कीटकनाशकाचे प्रमाण नॅपसॅक पंपासाठी असून पेट्रोल पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.

नुकसान टाळण्यासाठी योग्य वेळी व्यवस्थापन करावे असे अवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, कृषि कीटकशास्त्र विभागाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. अनंत लाड, डॉ. संजोग बोकन, डॉ.राजरतन खंदारे यांनी केले आहे. 





Thursday, November 11, 2021

वनामकृविच्‍या लातुर येथील कृषि महाविद्यालयात राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष, नवी दिल्‍ली येथील भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍थेचे अमृत महोत्‍सवी वर्ष आाणि भारतीय स्‍वातंत्रयाच्‍या अमृत महोत्‍सवी वर्षचे औचित्‍य साधुन दिनांक 17 व 18 नोव्‍हेंबर रोजी शाश्‍वत पिक उत्‍पादनाकरिता अन्‍नद्रव्‍य व्‍यवस्‍थापन आणि पिक सरंक्षण यावर दोन दिवसीय राष्‍ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्‍यात आले असुन परिसंवादाचे उदघाटन दिनांक 17 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता लातुर कृषि महाविद्यालयाच्‍या मुख्‍य सभागृहात होणार आहे. उदघाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन भारत सरकारचे माजी कृषी आयुक्‍त तथा माजी कुलगुरू मा डॉ चारूदत्‍त मायी हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे राहणार आहेत. कार्यक्रमास दापोली येथील डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ संजय सावंत, कुषिभुषण मा श्री बी बी ठोंबरे, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, नवी दिल्‍ली येथील भारतीय पीक रोगशास्‍त्र संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ प्रतिभा शर्मा, सचिव डॉ रोबिन गोगोई आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. स‍दरिल परिसंवादात देशातील विविध राज्‍यातील कृषि शास्‍त्रज्ञ, अभ्‍यासक, प्राध्‍यापक, कृषि उद्योजक, विद्यार्थी, प्रगतशील शेतकरी सहभागी होऊन पीक संरक्षणावर मंथन करणार असुन परिसंवादाकरिता 350 पेक्षा जास्‍त संशोधनपर लेख प्राप्‍त झाले आहेत. परिसंवादाचे आयोजन सचिव लातुर कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अंगद सुर्ववंशी, सहसचिव डॉ चंद्रशेखर अंबडकर, स्‍थानिक आयोजन समितीचे सचिव डॉ आनदं कारले हे असुन परिसंवादाचे आयोजन लातुर कृषि महाविद्यालय, कै विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, कृषि तंत्र विद्यालय, गळीत धान्‍य संशोधन केंद्र येथील प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी यांच्‍या सहकार्याने करण्‍यात आले आहे.



Wednesday, November 3, 2021

कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण यांची दुग्धतंत्रज्ञान प्रकल्पास भेट

विद्यापीठातील पशुसंवर्धन विभागातील दुग्धजन्‍य पदार्थास वाढती मागणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुसवंर्धन व दुग्धशास्‍त्र विभागातील नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान संस्थ पुरस्कृत दुग्धतंत्रज्ञानावर आधारित अनुभवातुन शिक्षण प्रकल्पास दिनांक 3 ऑक्‍टोबर रोजी कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांनी भेट दिली. सदरिल प्रकल्‍पात अनुभवातुन शिक्षण कार्यक्रमाच्‍या माध्‍यमातुन कृषिच्‍या विद्यार्थांना दर्जेदार दुग्‍धजन्‍य पदार्थ निर्मिती व विपणन याबाबत आठव्‍या सत्रात प्रशिक्षणाच्‍या माध्‍यमातुन व्‍यावसायिक ज्ञान दिले जाते. या प्रकल्‍पात वर्षभर नियमितपणे बर्फी, खवा, पनीर, बासुंदी, आईसक्रीम आदी दर्जेदार दुग्धजन्‍य पदार्थांची निर्मिती करण्‍यात येऊन विक्री करण्‍यात येते. सणासुदीस काळात या दुग्धजन्‍य पदार्थास मोठया प्रमाणात मागणी वाढत आहे.

भेटी दरम्‍यान मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी म्‍हणाले की, आरोग्याच्‍या दृष्‍टीने दुग्धजन्‍य पदार्थास विशेष महत्‍व आहे, परंतु काही वेळेस बाजारात या पदार्थात भेसळ होते. सदरिल प्रकल्‍पात निर्मिती करण्‍यात येणा-या दर्जेदार दु्ग्धजन्‍य पदार्थास शहरातील नागरिकांची मागणी वाढत आहे, प्रकल्‍पात स्‍वच्‍छता व पॅकेजिंग कडे विशेष लक्ष देण्‍यात येत आहे, ही चांगली बाब आहे. असे सांगुन प्रकल्‍पातील निर्मिती करण्‍यात येत असलेल्‍या पदार्थाच्‍या गुणवत्तेची प्रशंसा केली. गेल्‍या दोन ते तीन वर्षात विद्यापीठास बीजोत्‍पादन, रोपवाटीका, जैविक खते आदीपासुन प्राप्‍त होणा-या महसुलात निश्चितच वाढ करण्‍यात आपणास यश मिळाले आहे, तसेच सदरिल पदार्थ विक्री वाढीसाठी प्रयत्‍न करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

प्रकल्‍पाबाबत माहिती देतांना विभाग प्रमुख तथा प्रकल्पाचे प्रभारी डॉ. जी. के. लोंढे म्‍हणाले की, प्रकल्‍पातील दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीसाठी विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराजवळ सुविधा निर्माण केल्‍यास दुग्धजन्‍य पदार्थ विक्रीत वाढ होईल. तसेच विभागात कुक्‍कटपालन व शेळीपालन यांचे व्‍यावसायिक ज्ञान विद्यार्थी व शेतकरी बांधवांना नियमित दिले जात, असल्‍याचे सांगितले.  या प्रसंगी  माननीय कुलगुरु यांनी पनीर, खवा, बासुंदी आदीं पदार्थाची स्‍वत: खरेदी केली. यावेळी शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, डॉ. एस. डी. बंटेवाड, डॉ. के. टी. अपेट, डॉ. एम. जी. जाधव, डॉ.  एस. एस. मोरे आदीसह विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

Sunday, October 31, 2021

राष्‍ट्रीय पात्रता परीक्षेत परभणी कृषी विद्यापीठाच्‍या विद्यार्थ्‍यांचे मोठे यश, १५१ विद्यार्थी झाले नेट परीक्षेत उत्‍तीर्ण

एवढया मोठया प्रमाणात विद्यार्थी पात्र होण्‍याची विद्यापीठाच्‍या पन्‍नास वर्षाच्‍या इतिहासात पहिलीच वेळ 

विद्यापीठाच्‍या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा

नवी दिल्‍ली येथील कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाच्‍या वतीने ऑगस्‍ट २०२१ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या राष्‍ट्रीय पातळीवरील राष्‍ट्रीय पात्रता परिक्षा – नेट परिक्षेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या विविध विद्याशाखेतील १५१ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले असुन परभणी कृषि विद्यापीठाच्‍या पन्‍नास वर्षाच्‍या इतिहासात प्रथमच एवढया मोठया प्रमाणात विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. यात तीन विद्यार्थी कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळ व्‍दारे आयोजित कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षेत उत्‍तीर्ण झाले आहेत. विविध राज्‍यातील कृषि विद्यापीठे तथा कृषि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्‍यापक व समकक्ष पदाकरिता राष्‍ट्रीय पात्रता परीक्षा अनिवार्य आहे. एकुण १५१ विद्यार्थी पैकी परभणी कृषि महाविद्यालयाचे ८५ विद्यार्थ्‍यांचा समावेश असुन लातुर कृषि म‍हाविद्यालयाचे ३४ विद्यार्थी तसेच बदनापुर कृषि मह‍ाविद्यालयाचे १२ विद्यार्थी आहेत.

परभणी येथील अन्‍नतंत्रज्ञान महाविद्यालयाचे १६ विद्यार्थी नेट परिक्षेत उत्‍तीर्ण  झाले असुन यात प्रशांत पावसे व विर शैलेश हे विद्यार्थी कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळ व्‍दारे आयोजित कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षा उत्‍तीर्ण झाले आहेत तर कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे पाच विद्यार्थी नेट परिक्षेत उत्‍तीर्ण झाले असुन अजय सातपुते हा कृषि संशोधन सेवा भरती परीक्षेच्‍या लेखी परीक्षा उत्‍तीर्ण झाला आहे.

परभणी कृषि महाविद्यालयाचे ८५ विद्यार्थी यशस्‍वी झाले असुन यात कृषि विद्याशाखेच्‍या २९, कृषि हवामानशास्‍त्राच्‍या १२, कृषि किटकशास्‍त्राच्‍या ११, विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या १०, कृषि वनस्‍पतीशास्‍त्राच्‍या ८, मृदविज्ञान व रसायनशास्‍त्राच्‍या ५, उद्यानविद्याच्‍या ४, कृषि अर्थशास्‍त्राच्‍या ४, तर वनस्‍पती रोगशास्‍त्राच्‍या २ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. लातुर कृषि महाविद्यालयाचे ३४ विद्यार्थी यशस्‍वी झाले असुन यात कृषि किटकशास्‍त्राच्‍या १५, कृषी विद्याच्‍या ११, मृदा विज्ञान व रसायनशास्‍त्राच्‍या ४, कृषि वनस्‍पतीशास्‍त्राच्‍या २, कृषि अर्थशास्‍त्राच्‍या १, उद्यानविद्याच्‍या १ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे. बदनापुर कृषि महाविद्यालयाचे १२ विद्यार्थी यशस्‍वी झाले असुन यात कृषि विद्या शाखेच्‍या ८ तर कृषि किटकशास्‍त्राच्‍या ४ विद्यार्थ्‍यांनी यश संपादन केले आहे.

सदरिल यशाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन करतांना म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ स्‍थापनेचे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष साजरे करित असुन नेट परीक्षेतील यश म्‍हणजे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा आहे. गेल्‍या दिड वर्षापासुन कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव व लॉकडाऊनच्‍या काळाचा विद्यार्थ्‍यांनी सदोपयोग केला, प्राध्‍यापकांनीही ऑनलाईन माध्‍यमातुन विद्यार्थ्‍यांना योग्‍य ते मार्गदर्शन केले. याचाच अर्थ राष्‍ट्रीय स्‍तरावरील शैक्षणिक दर्जेचे शिक्षण विद्यापीठातुन दिले जात असुन विद्यापीठाचा शैक्षणिक स्‍तर उंचावल्‍याचे हे द्योतक आहे. तसेच कृषि संशोधन व कृषि शिक्षण क्षेत्रात करियर करण्‍याकडे विद्यार्थ्‍याचा ओढा वाढत आहे, असेही ते म्‍हणाले. सदरिल यशाबाबत शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ अंगद सुर्यवंशी, प्राचार्य डॉ राकेश अहिरे आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख व प्राध्‍यापकांचे माननीय कुलगुरू यांनी अभिनंदन केले. सदरिल १५१ हा आकडा अंतिम नसुन यात अधिक भर पडु शकते.