Wednesday, September 24, 2025

अतिवृष्टीनंतर कापूस, सोयाबीन, तूर व हळद पिकातील विविध रोगांच्या व्यवस्थापनासाठी वनामकृवीच्या शास्त्रज्ञांचा सल्ला.

 


अतिवृष्टीनंतर कापूस, सोयाबीन, तूर व हळद पिकांवरील विविध रोगांचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. जी. डी. गडदे, डॉ. डी. डी. पटाईत आणि श्री. एम. बी. मांडगे यांनी केले.

कपाशी मधील बोंडसड व्यवस्थापन

सध्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% - 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) अधिक स्ट्रेप्टोमायसीन 40 ग्रॅम (2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) प्रति एकर या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)

बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग म्हणजेच बाह्य बोंडसड रोखण्यासाठी, पायराक्लोस्ट्रोबीन 20% - 200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)- 400 ग्रॅम (20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा प्रोपीनेब 70% - 500 ते 600 ग्रॅम (25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मिसळून प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी.

आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

सोयाबीन मधील शेंगा करपा, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगांचे व्यवस्थापन -

पावसाचा अंदाज घेऊन उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनमध्ये *टेब्युकोनॅझोल 10%+ सल्फर 65% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा टेब्युकोनॅझोल 25.9% -250 मिली ( 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20% - 150  ते 200 ग्रॅम ( 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3%+ इपिक्साकोनाझोल 5% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली ( 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) प्रति एकर फवारावे.

तसेच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी युक्त औषधाची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी.

तूरीवरील फायटोप्थेरा मर व्यवस्थापन

खोडावर काळे डाग पडून खाचा पडतात, हळु हळू झाड वाळायला लागते. हा फ्युजॅरियम मर रोग नाही, तर फायटोप्थेरा रोग आहे. त्यासाठी 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) मेटालॅक्झील एम 4 टक्के+ मॅन्कोझेब 64 टक्के (पुर्व मिश्रीत बुरशीनाशक)* प्रति एकर या प्रमाणात खोडावर आणि झाडावर फवारणी करून आळवणी पण करावी.

किंवा

ट्रायकोडर्मा 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) पाण्यात मिसळून प्रति एकर या प्रमाणात फवारणी व आळवणी करावी.

जमिनीत सततच्या पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे किंवा ओलाव्या मुळे हा रोग मोठ्या प्रमाणात पसरतो... अशा वातावरणात रोग आल्यानंतर फारसे नियंत्रण होत नाही त्यामुळे येण्यापुर्वीच प्रतिबंधात्मक स्वरूपात सर्वांनी वरील उपाययोजना लवकरात लवकर कराव्यात.

 

हळदीमधील पानावरील ठिपके, करपा आणि  कंदकुज व्यवस्थापन

करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.

रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

प्रादुर्भाव कमी असल्यास

कार्बेडेंझीम 50% - 400 ग्रॅम (20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)

किंवा

मॅन्कोझेब 75% -500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)

किंवा

कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% - 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

प्रादुर्भाव जास्त असल्यास

एजोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात)किंवा

प्रोपीकोनॅझोल 25% - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा

क्लोरथॅलोनील 75% - 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)

यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी - प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे.

जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.

कंदकूज झाली असल्यास जमिनीतून

कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा

मॅन्कोझेब 75% -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा

कॉपर ऑक्झीक्लोराइड 50% -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)

यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी.

(आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.)

वरील सर्व उपाययोजना करण्यापूर्वी सर्व पिकातील शेतात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व मगच वरील उपाययोजना कराव्यात.

सर्व पिकांमध्ये फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी:-

कुठलीही फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी

वरील बुरशीनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.

लागोपाठ एकच एक बुरशीनाशक फवारू नये.

फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही.

किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.








वनामकृवि संदेश क्रमांक: ०६/२०२५ ( २३ सप्टेंबर २०२५)


शेतकरी हितासाठी संशोधन व विस्तार एकत्र – वनामकृवितमध्ये क्रॉपसॅप कार्यशाळा

 शाश्वत शेतीसाठी पर्यावरणपूरक व वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातर्फे ‘पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प’ (क्रॉपसॅप) सन २०२५-२६ अंतर्गत दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर व लातूर विभागातील सर्व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रातील विषयविशेषज्ञ (पिक संरक्षण) तसेच जिल्हा क्रॉपसॅप समन्वयक यांच्यासाठी एकदिवसीय कीड-रोग सर्वेक्षण विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. एच. वैघ, विभागीय कृषि सहसंचालक (छ. संभाजीनगर) श्री. प्रकाश देशमुख, विभागप्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्ल घंटे, क्रॉपसॅप समन्वयक अधिकारी डॉ. अनंत लाड, रेशीम संशोधन योजनेचे प्रमुख डॉ. चंद्रकांत लटपटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (परभणी) श्री. स्वप्नील जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेत कृषि विभागातील १५० हून अधिक अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठ हे “शेतकरी देवो भव:” या भावनेतून कार्य करीत असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, आपण शेतकऱ्यांमुळे आहोत, शेतकरी आपल्यामुळे नाहीत. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की, नैसर्गिक संकटे टाळता येत नसली तरी अशा परिस्थितीत पिकांचे रक्षण करून शेतकऱ्यांचे नुकसान कमीत कमी करण्यासाठी विद्यापीठ व कृषि विभागाने संयुक्तरीत्या कार्य करणे आवश्यक आहे. शाश्वत शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून कीड व्यवस्थापनाचे महत्त्व ओळखणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, कृषि विद्यापीठ हे केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता संशोधन कार्याचा विस्तार शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने करत आहे. विद्यापीठ व कृषि विभागाची यंत्रणा एकत्रितपणे कार्यरत असल्यामुळे अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकरी आणि विस्तार अधिकारी यांच्यातील दुवा अधिक बळकट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना रबी हंगामाची तयारी करण्याचे आवाहन केले व शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषि विभागातील अधिकारी यांनी शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करावे, असे निर्देश दिले. याशिवाय त्यांनी प्रार्थना केली की, अशा नैसर्गिक संकटांना सामोरे जाण्यास शेतकऱ्यांना बळ मिळो.

यानंतर विभागीय कृषि सहसंचालक श्री. प्रकाश देशमुख यांनी कृषि अधिकाऱ्यांना क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत कीड-रोग सर्वेक्षण वेळेवर व अचूक करण्याच्या सूचना दिल्या, जेणेकरून शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांना योग्य सल्ला मिळू शकेल.

तांत्रिक सत्रात शास्त्रज्ञांनी विविध पिकांवरील कीड-रोग ओळख, सर्वेक्षण व व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. डॉ. बी.व्ही. भेदे यांनी कापूस, केळी, डाळिंब व टोमॅटोतील कीड व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. डॉ. अनंत लाड यांनी कीड उद्रेक, सर्वेक्षण व संत्रा-मोसंबीतील उपाय सांगितले. डॉ. पुरुषोत्तम नेहरकर व डॉ. आर.एस. जाधव यांनी सोयाबीन व गोगलगाय व्यवस्थापन स्पष्ट केले. डॉ. दिगंबर पटाईत (ऊस, मका, ज्वारी), डॉ. प्रफुल्ल घंटे (रोग व्यवस्थापन), डॉ. कैलास डाखोरे (हवामान-पीक व्यवस्थापन), डॉ. रणजित चव्हाण (प्रकल्प विश्लेषण), डॉ. प्रविण कापसे (महाविस्तार ॲप व सामाजिक प्रभाव), डॉ. हरिहर कौसडीकर (अन्नद्रव्य महत्त्व), डॉ. राजरतन खंदारे व डॉ. योगेश मात्रे (सर्वेक्षण पद्धती) यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. अनंत लाड, सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा धुरगुडे व आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले. आयोजनात डॉ. खंदारे, डॉ. म्हात्रे, श्री. बालाजी कोकणे व श्री. दिपक लाड यांचे योगदान लाभले.





Tuesday, September 23, 2025

१७ व्या भारतीय कृषि विद्यापीठ संघाच्या राष्ट्रीय परिसंवादाचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात आयोजन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावशाली नेतृत्वामुळे वनामकृविस मिळाला बहुमान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि भारतीय कृषि विद्यापीठे संघ (इंडियन अॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज असोसिएशन - IAUA), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने भारतातील एकूण ७४ कृषि विद्यापीठांच्या समन्वयाने भारतीय कृषि विद्यापीठ संघाचा दोन दिवसीय (दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२५) १७ वा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या  परिसंवादाचा ‘लघु व सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती यांत्रिकीकरण आणि कृषी रोबोटिक्स : आव्हाने आणि संधी’ (Farm Mechanization and Agricultural Robotics for Small and Marginal Farmers: Challenges and Opportunities) हा विषय आहे. या परिसंवादाचा उद्घाटन समारंभ गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी सभागृहात होणार आहे.

या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषिमंत्री तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय प्रति कुलपती ना. श्री. दत्तात्रय भरणे हे भुषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून माननीय राज्यमंत्री वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल आणि माननीय राज्यमंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, उर्जा, महिला व बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे स्वागतपर भाषण करणार आहेत.

उद्घाटन समारंभाला राज्यसभा सदस्य मा. खा. श्रीमती फौजिया खान, लोकसभा सदस्य मा. खा. श्री. संजय जाधव, विधान परिषद सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. सतीश चव्हाण, विधान परिषद सदस्य मा. आ. श्री. विक्रम काळे, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. डॉ. राहुल पाटील, विधानसभा सदस्य मा. आ. श्री. रत्नाकर गुट्टे, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. रमेश कराड, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्री. अभिमन्यू पवार, विधानसभा सदस्य मा. आ. श्री. राजेश विटेकर, विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण, पुणे येथील कृषि परिषदेचे माननीय उपाध्यक्ष श्री. तुषार पवार, पंतनगर येथील जीबीपीयुएटीचे माननीय कुलगुरू व भारतीय कृषि विद्यापीठे संघाचे महासचिव डॉ. एम. एस. चौहान, कृषि परिषदेच्या महासंचालिका श्रीमती वर्षा लड्डा-उंटवाल (भा. प्र. से.), यांच्यासह देशभरातील सर्व कृषि विद्यापीठांचे सन्मानीय कुलगुरू आणि कृषि परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. विवेक दामले, श्री. जनार्दन कातकडे, श्री. प्रविण देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य मा. डॉ. व्ही. एम. मायंदे, मा. श्री. दिलीप देशमुख, मा. श्री. भागवत देवसरकर, मा. डॉ. आदिती सारडा, मा. श्री. सुरज जगताप, मा. श्री. विठ्ठल सकपाळ, मा. डॉ. कौशिक बॅनर्जी, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, विद्यापीठे संघाचे सचिव श्री. दिनेश कुमार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

आजवर भारतीय कृषि विद्यापीठे संघातर्फे (IAUA) ४८ कुलगुरू अधिवेशने, १६ राष्ट्रीय परिसंवाद, १४ मंथन सत्रे व ९ प्रादेशिक बैठका देश भरातील विविध कृषि विद्यापीठात आयोजित करण्यात आल्या आहेत. १७ वा राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्याचा बहुमान वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रभावशाली नेतृत्वामुळे मिळाला आहे.

परिसंवादात देशभरातील सर्व कृषि विद्यापीठांचे सन्मानीय कुलगुरू सहभागी होणार असून मेकेट्रॉनिक्स, कृषि रोबोटिक्स, ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI-ML), बिग-डेटा, इंटरनेट ऑफ थिंकिंग (IoT), ऊर्जा कार्यक्षम शेती यंत्रसामग्री, स्मार्ट शेती पद्धती, अचूक शेती व्यवस्थापन तसेच नवीन उर्जेच्या तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सखोल चर्चा होईल.

भारतीय शेतीसमोरील हवामान बदल, नैसर्गिक संसाधनांची कमतरता, मजुरांची टंचाई आणि शेतकऱ्यांचे घटते उत्पन्न या गंभीर समस्यांचा सामना करण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी स्वस्त व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान उपलब्ध करून देत त्यांचे उत्पन्न व उत्पादनक्षमता वाढवणे हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश आहे.

या परिसंवादात नवीन शास्त्र व तंत्रज्ञान : शासन उपक्रम (महाविस्तार-AI, पोक्रा, स्मार्ट प्रोजेक्ट),
शेती यंत्रीकरण : सेन्सर्स IoT व रोबोटिक्स (लहान शेतकऱ्यांसाठी यंत्रसामग्री, स्मार्ट रोबोटिक्स, बीज पेरणी यंत्रणा), कृषि ड्रोन, AI-ML, बिग-डेटा व LLM (ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता व अचूक शेती) आणि हरित व पर्यायी ऊर्जा (सौरऊर्जा, बायो-एनर्जी व शाश्वत शेतीसाठी पुनर्नवीन ऊर्जा उपाय) यावर विषयावर देखील चर्चा करण्यात येणार आहे.

या परिसंवादातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचे लाभ मिळवून देत, खर्चात बचत व उत्पादनात वाढ करण्यासाठी व्यवहार्य उपाय सुचवले जाणार आहेत. देशभरातील कृषि विद्यापीठांचे अधिकारी, तज्ज्ञ व संशोधकांच्या सहभागामुळे हा राष्ट्रीय परिसंवाद मोठ्या उत्साहात पार पडणार आहे, असे परिसंवादाचे आयोजक विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विद्यापीठे संघाचे सचिव श्री. दिनेश कुमार यांनी कळविले आहे.

भारतीय कृषि विद्यापीठ संघ (IAUA) संक्षिप्त माहिती

नवी दिल्लीस्थित भारतीय कृषि विद्यापीठ संघ (IAUA) या संघटनेची स्थापना १० नोव्हेंबर १९६७ रोजी झाली होती. संघटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे कृषि संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याचा प्रसार करून ग्रामीण विकासाला चालना देणे हे आहे.

सध्या भारतीय कृषि विद्यापीठ संघामध्ये देशातील एकूण ७४ कृषि विद्यापीठांचा समावेश असून त्यामध्ये ६६ राज्य कृषि विद्यापीठे, ४ मानद विद्यापीठे (भा कृ अ. संस्था- नवी दिल्ली, आय व्ही आर आय - इझतनगर, एनडीआरआय - कर्नाल व सीआयएफइ - मुंबई), ३ केंद्रीय कृषि विद्यापीठे (सीएयू - इंफाळ, आरपीसीएयू - पूसा व आर एलबीसीएयू - झाशी) तसेच एक केंद्रीय विद्यापीठ कृषि शाखेसह, (बीएचयू वाराणसी) यांचा समावेश आहे.

विशेष शाखेनुसार ४६ कृषि, ७ उद्यानविद्या, १७ पशुवैद्यक व प्राणिशास्त्र तसेच ४ मत्स्य विज्ञान विद्यापीठे भारतीय कृषि विद्यापीठ संघामध्ये सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सर्व कृषि विद्यापीठांमध्ये शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण यांचा एकात्मिक कार्यक्रम राबविला जातो.

भारतीय कृषि विद्यापीठ संघा मार्फत शेतकरी व ग्रामीण विकासासाठी परिषद, परिसंवाद, कार्यशाळा व व्याख्याने आयोजित केली आणि त्याद्वारे कृषि संशोधन व शिक्षणाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा घडवून आणली आहे. 

वनामकृविच्या कृषि महाविद्यालयात एनसीसी कॅडेट्सची नोंदणी प्रक्रिया संपन्न

 एनसीसीमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयात ५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड अंतर्गत एनसीसी विभागाच्या वतीने नव्या कॅडेट्सची नोंदणी प्रक्रिया दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठाच्या मुख्यालयातील पाच महाविद्यालयांतील प्रथम वर्षातील २५० पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेची चाचणी घेण्यासाठी १६०० मीटर धावणे, उंची, वजन आणि इतर शारीरिक तंदुरुस्तीचे निकष तपासण्यात आले. सर्व चाचण्या काटेकोरपणे पार पडल्या असून विद्यार्थ्यांनी त्यात उत्साहाने सहभाग नोंदविला.

या प्रक्रियेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन एनसीसी कॅडेट म्हणून निवडले गेले. एनसीसीमध्ये प्रवेश मिळवणे ही विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब असून शिस्त, देशभक्ती, नेतृत्त्वगुण तसेच आत्मविश्वास निर्माण करण्याची ही एक उत्तम संधी आहे.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांशी सवांद साधून त्यांचे मनोबल वाढविले व मार्गदर्शन करताना सांगितले की, एनसीसीमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होतोच, तसेच सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्यही जोपासले जाते.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, कमांडिंग ऑफिसर कर्नल श्री दिलीप रेड्डी, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, प्रा. शाहू चव्हाण व इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी एनसीसीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

एनसीसी विभाग प्रभारी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, बटालियनचे नायब सुभेदार अर्जुन राम कुमार, नायब सुभेदार राकेश कुमार, हवालदार रामसेवक आणि इतर अधिकारी तसेच विद्यमान कॅडेट्स यांनी भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

महाविद्यालयातील एनसीसी युनिट अधिक सक्षम व उत्साही होणार असून विद्यार्थ्यांना विविध शिबिरे, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उपक्रमांतून स्वतःला सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कृषि महाविद्यालय, परभणीतील हा उपक्रम अत्यंत यशस्वी व प्रेरणादायी ठरला.










Sunday, September 21, 2025

वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा सल्ला - दुर्लक्ष न करता, शंखी गोगलगायीचे व्यवस्थापन वेळीच करा

 


मराठवाड्यात बऱ्याच भागात मोठ्या पावसानंतर सुप्तावस्थेतील गोगलगायी बाहेर पडताना आढळून येते आहे, त्यामुळे सोयाबीन कापूस यासारख्या पिकामध्ये तसेच भाजीपाला व फळ बागेमध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढून मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी या गोगलगायींना वेळीच लक्ष देऊन सामुहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे गरजेचे आहे जेणेकरून पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे आणि श्री.एम.बी.मांडगे यांनी केले.

कसे कराला शंखी गोगलगायीचे एकात्मिक व्यवस्थापन...

नियंत्रणात्मक उपाययोजना

सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत मध्येच मरून जातील.

गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच  करणे गरजेचे आहे.

शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.

गोगलगायींना आकर्षित करण्यासाठी शेतात ठिकठिकाणी गोणपाट ओले करून त्यावर पत्ताकोबी अथवा पपई ची पाने बारीक करून ठेवावीत, त्याला आकर्षित होऊन जमा झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क ५ लिटर (२५० ग्रॅम तंबाखू भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून ५ लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद द्रावण ५ लिटर (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर द्रावण फवारावे, त्याच्या संपर्कात आल्याने गोगलगायी मरतात.

लहान शंखीच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची (१०० ग्रॅम प्रती १ लिटर पाणी) फवारणी फायदेशीर दिसून आली आहे. बोर्डो मिश्रण (१ किलो मोरचूद + १ किलो चुना १०० लिटर पाण्यात), कॉपर सल्फेट (३०० ग्रॅम  १० लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम १० लिटर पाण्यात) इत्यादीच्या फवारण्या गोगलगाय नियंत्रणासाठी नोंदणीकृत नाहीत, परंतु गोगलगाय नियंत्रणासाठी किंवा त्यांना परावृत करण्यासाठी फळबागेत काही प्रमाणात परिणामकारक आहेत.

गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड दाणेदार या गोगलगायनाशकाचा वापर करावा.

कापसासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड २ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे.

तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार मेटाल्डिहाईड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे.

शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या गोळ्या पपईच्या पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात. मेटाल्डिहाईड चा वापर, जास्त तापमान व कमी आर्द्रता असते अशावेळी जास्त प्रभावी दिसून येतो.

जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे.

दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ अधिक २५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबविण्यासाठी ठेवावे. त्यानंतर त्यामध्ये थायामिथोक्झाम २५ टक्के ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.

सदरील आमिषा पासून पाळीव प्राणी, लहान मुलांना दूर ठेवावे. वरील गोगलगायनाशक अथवा अमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच काळजीपूर्वक करावा.

अशाप्रकारे शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव ज्या भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल त्या भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या वरील प्रमाणे उपाय योजना सुरवातीपासूनच केल्यास गोगलगायीचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे होते.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.


वनामकृवि संदेश क्रमांक: ०५/२०२५ ( २० सप्टेंबर २०२५)

वनामकृविच्या नांदेड येथील शासकीय कृषि महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाची माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची पाहणी – उच्च दर्जाचे बांधकाम करण्याचे निर्देश

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथे गतवर्षी सुरू झालेल्या शासकीय कृषि महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी विद्यापीठ अभियंता आणि कामाचे कंत्राटदार यांना स्पष्ट सूचना देताना सांगितले की, बांधकाम उच्च दर्जाचे, मजबूत व शंभर वर्षे टिकेल असे असावे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणे ही विद्यापीठाची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

माननीय कुलगुरूंनी पुढे असेही नमूद केले की बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वसतिगृह, प्रयोगशाळा, वाचनालय व वर्गखोल्या यांसारख्या सोयींचा लाभ लवकर मिळू शकेल. त्यांनी आधुनिक कृषिशिक्षणाच्या गरजांनुसार पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देण्याचे निर्देशही दिले.

या पाहणीवेळी माननीय आमदार श्री. बालाजी कल्याणकर, कृषि परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. जनार्दन कातकडे, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, शिक्षण प्रभारी डॉ. नरेशकुमार जायेवार, विद्यापीठ उपअभियंता श्री. सुहास धारासुरकर तसेच अभियंता कार्यालयातील इतर अधिकारी उपस्थित होते.






वनामकृविच्या नांदेड येथील शासकीय कृषि महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा संपन्न

 विद्येचे माहेरघर घडविण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना आवाहन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी संलग्न शासकीय कृषि महाविद्यालय, नांदेड येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा रविवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा सदस्य व कार्यकारी परिषद सदस्य मा. आ. श्रीमती श्रीजया चव्हाण, विधानसभा सदस्य मा. आ.श्री.बालाजी कल्याणकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड येथील माननीय अपर जिल्हाधिकारी श्री. पी. एस. बोरगावकर हे उपस्थित होते. व्यासपीठावर कृषि परिषदेचे कार्यकारी परिषद सदस्य श्री. जनार्दन कातकडे, विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य मा. श्री. भागवत देवसरकर, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, प्रभारी अधिकारी डॉ. शिवाजी शिंदे आदींची उपस्थिती होती.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सांगितले की, आपण स्वयंस्फूर्तीने या महाविद्यालयाची निवड केली आहे, ही आपल्या जीवनातील एक सुवर्णसंधीच आहे. या संधीचे सोने करून आपण केवळ आपल्या भविष्याची दिशा बदलणार नाही, तर समाजाला आणि राष्ट्राला नवीन उंचीवर नेणार आहात. त्यांनी पुढे सांगितले की, विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीत सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळते. अभ्यासासोबतच व्यक्तिमत्त्व विकास, चारित्र्य, नैतिक मूल्ये, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण आत्मसात करणे आवश्यक आहे. केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे हे शिक्षणाचे ध्येय नसून, जीवन जगण्याची कला आत्मसात करणे, समाजाला दिशा देणे आणि नव्या संधी निर्माण करणे हेच खरे शिक्षण आहे. माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, आपल्या ज्ञानाचा प्रकाश स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तो कुटुंब, समाज आणि शेतकरी यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या यशामुळे महाविद्यालयाचे, कुटुंबाचे आणि आपल्या गावाचे नाव उज्ज्वल व्हावे.  शेवटी त्यांनी आशावादी शब्दांत म्हटले की, हे महाविद्यालय भविष्यात ‘विद्येचे माहेरघर’ ठरावे आणि येथे शिकलेला प्रत्येक विद्यार्थ्याने ज्ञान, विज्ञान आणि संस्कारांचा दीपस्तंभ होऊन समाजास  प्रकाशमान करावा.

माननीय आ. श्रीमती श्रीजया चव्हाण यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करून सांगितले की, महिला ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्त्वपूर्ण शक्ती आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील शिक्षणाचा उपयोग करून आपले सबलीकरण साधावे, असे आवाहन त्यांनी केले.

माननीय आमदार श्री बालाजी कल्याणकर यांनीही मार्गदर्शन करताना हे महाविद्यालय नांदेड येथे सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. श्री जनार्दन कातकडे यांनी हे महाविद्यालय सुरू व्हावे म्हणून अनेक दिवस प्रयत्न झाले असून अखेर त्याला यश मिळाले, असे सांगितले. तसेच हे महाविद्यालय कृषी शिक्षणाच्या दृष्टीने नांदेड जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरेल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच मा. श्री भागवत देवसरकर यांनीही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यापीठाने नवे शैक्षणिक धोरण अवलंबल्याचे सांगितले. या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यवृद्धी होणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी विद्यापीठातील संशोधनाची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी भविष्यात उत्कृष्ट शास्त्रज्ञ होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

अपर जिल्हाधिकारी श्री पी. एस. बोरगावकर यांनी कृषी शिक्षणाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ३५ ते ४० टक्के अधिकारी हे कृषी पदवीधर आहेत. ते अतिशय उत्कृष्टरीत्या जनतेची सेवा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनीही शेतीसोबत उद्योजकता व प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्यासाठी स्वतःला तयार ठेवावे, असे त्यांनी नमूद केले.

प्रस्ताविकात डॉ. राजेश कदम यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कार्यप्रणालीचा आढावा घेतला तसेच महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा, नव्या उपक्रमांची माहिती दिली. शिस्त आणि नियमावली यांचे महत्त्व पटवून देताना त्यांनी विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून घडण्याचे आवाहन केले. महाविद्यालय हे केवळ शिक्षणाचेच नव्हे तर चारित्र्य, संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मअनुशासन, वेळेचे नियोजन आणि जबाबदारीची जाणीव ठेवून प्रगतीकडे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थी भावेश जोशी आणि प्रणाली बिल्लेवाड यांनी आपली मते व्यक्त केली, तर पालक प्रतिनिधी म्हणून श्री. कच्छवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी समीक्षा पोकळे आणि निकिता कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी मानले.

कार्यक्रमास महाविद्यालयाचे डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. पवन ढोके, डॉ. देवकुळे, डॉ. सुजाता धोतराज, प्रा. संजय पवार, प्रा. सिंगरवाड, कृष्णा वारकळ, जाधव, माधवी कल्याणकर तसेच महाविद्यालयातील इतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.