Thursday, September 17, 2026

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वनामकृवित ‘रब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन’ संपन्न

शेतकरी देवो भव’ भावनेतून वनामकृविचे विस्तार कार्य; परिसंवाद व कृषि प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद




मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानेरब्बी पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन’ गुरुवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन, कृषि, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय तथा कामगार राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनी आभासी माध्यमातून केले. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते.

कार्यक्रमास भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापर नियोजन ब्युरोचे संचालक डॉ. एन. जी. पाटील, पद्मश्री माननीय श्री. श्रीरंग देवबा लाड, प्रगतिशील महिला शेतकरी श्रीमती मीरा चोपडे तसेच विद्यापीठाच्या विस्तार समितीचे सदस्य श्री. भिमराव डोणगापुरे यांची विशेष उपस्थिती होती.

व्यासपीठावर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, संचालक शिक्षण डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संचालक संशोधन डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भास्कर कोळेकर आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले. मराठवाड्यात मागील काही काळात पावसाने ओढ दिल्यामुळे काही भागांत पिकांचे नुकसान होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या परिस्थितीत शासन आणि विद्यापीठ शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शेतीसमोरील विविध आव्हाने सोडविण्यासाठी शासन तत्पर असून, खरीप हंगामातील अडचणींचा विचार करून आगामी रब्बी हंगामाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यमंत्री मा. ना. ॲड. श्री. आशिष जयस्वाल यांनी आभासी माध्यमातून मार्गदर्शन करताना कृषि क्षेत्रासाठी राज्य शासनाकडून करण्यात येणारी गुंतवणूक आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना होत असल्याचे नमूद केले. तसेच त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरे केले जात असून, महिलांना महिला शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी केले आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विविध कार्यक्रमांमध्ये महिलांचा सातत्याने मोठा सहभाग असतो. विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध उपक्रमांमुळे हा सहभाग वाढत आहे, असे प्रतिपादन केले.

पुढे त्यांनी नमूद केले की, विद्यापीठाकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम सातत्याने माझ्यापर्यंत पोहोचत असतात. शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच विद्यापीठ सातत्याने प्रयत्नशील आहेत.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मागील चार वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठाच्या कार्याला सातत्याने गती मिळाली असून, विद्यापीठ प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. सुरुवातीच्या काळात माझ्याकडे मंत्री पदाचा पदभार नसताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एका शास्त्रज्ञाने पाच शेतकरी दत्तक घेऊन त्यांच्या विकासासाठी कार्य करावे, अशी सूचना मी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने कार्यवाही करून जवळपास ५०० शेतकऱ्यांना दत्तक घेतले असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.

परभणी जिल्ह्यातसिल्क आणि मिल्क’ यांसारखे उपक्रम कार्यान्वित करण्यात आले असून, त्यातून काही शेतकरी वर्षाला दहा ते पंधरा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवीत आहेत. शेतीसोबत विविध जोडधंदे करून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व टिकून राहण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे सर्व माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली तसेच विद्यापीठाच्या प्रयत्नांतून घडत असल्याचा अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी तग धरणाऱ्या वाणांचे आणि बियाण्यांचे निर्मितीकार्य हाती घेतल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. शासनाने शेतकऱ्यांसाठी दोन वेळा कर्जमाफी केली असून, वीजबिलाच्या संदर्भातही शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सध्या  काही शेतकऱ्यांना शून्य वीजबिलाचा लाभ मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेतीमध्ये गरजेपेक्षा अधिक खते व रासायनिक घटकांचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि जमिनीची सुपीकता व प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा वाढतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषि विभागाच्या सल्ल्यानुसारच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती करावी, असे आवाहन पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र राज्याने कृषि क्षेत्रात देशाला दिशादर्शक ठरणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याचे नमूद केले. ‘महा-ई-पीक पाहणी’ व ‘महाविस्तार’ ॲपसारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.

शेतकरी देवो भव’ या भावनेतून विद्यापीठाने शेतकऱ्यांना सेवा देण्याचे कार्य केले असून, त्यातून विद्यापीठाला राज्यात प्रथम आणि राष्ट्रीय पातळीवर ३४ वे स्थान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीच्या नियोजनासाठी कृषि विभागाशी समन्वय साधून विद्यापीठ कार्य करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री मा. ना. श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सहकार्याने हवामानाचा अधिक अचूक अंदाज मिळण्यासाठी विद्यापीठात डॉप्लर रडारची स्थापना करण्याच्या दिशेने कार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून परभणीचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिक अधोरेखित होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगून, सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि उपलब्ध शास्त्रीय मार्गदर्शनाच्या आधारे रब्बी हंगामाचे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

माननीय पद्मश्री श्री. श्रीरंग देवबा लाड यांनी विद्यापीठाकडून सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांमध्ये विद्यापीठाबद्दल विश्वास निर्माण झाल्याचे नमूद केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासारख्या सणाच्या दिवशीही महिला शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी कार्यक्रमास उपस्थित राहिले, ही विद्यापीठाच्या विस्तार कार्याची पोहोच दर्शविणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले. परभणी जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असून, या ठिकाणी कृषि विद्यापीठाची स्थापना होणे ही परभणी आणि मराठवाड्यासाठी गौरवाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या शास्त्रीय ज्ञानाचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले.

माननीय डॉ. एन. जी. पाटील यांनी भारत सरकारच्या डिजिटल कृषि उपक्रमाच्या अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापर नियोजन ब्युरो यांच्यातील सामंजस्य करारातून विकसित करण्यात आलेल्या ‘मराठवाडा जिओपोर्टल’ ची माहिती दिली.

या पोर्टलच्या माध्यमातून जमिनीची क्षमता, भूजल उपलब्धता, मृदेची खतधारण क्षमता यांसह विविध भौगोलिक व मृदाविषयक माहिती उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. माती परीक्षणातून प्रामुख्याने अन्नद्रव्यांची माहिती मिळते; मात्र जिओ पोर्टलच्या माध्यमातून जमिनीची अधिक सखोल माहिती उपलब्ध होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या हा उपक्रम प्रायोगिक स्वरूपात असून, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यात येणारा हा उपक्रम देशासाठी दिशादर्शक ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकरी, कृषि व संलग्न यंत्रणा तसेच शासनाला जलसंधारण, पीक नियोजन आणि संसाधन व्यवस्थापनासाठी या पोर्टलचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी सद्यःस्थितीतील हवामान व पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन रब्बी हंगामातील पीक नियोजनाची माहिती दिली. तसेच विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमात ‘मराठवाडा जिओ पोर्टल’, विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी लिखित विविध पुस्तके तसेच महिलांसाठी विकसित करण्यात आलेल्या स्त्री आरोग्य’ या मोबाईल ॲपचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

तसेच कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांनी प्रदर्शनातील विविध दालनांना भेट देऊन दालनधारकांशी संवाद साधला व त्यांचे उत्साहवर्धन केले.

अधिष्ठाता तथा ‘मराठवाडा जिओ पोर्टल’चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण वैद्य आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन वापर नियोजन ब्युरोचे आरएस-जीआयएस प्रमुख डॉ. जी. पी. ओबी रेड्डी यांनी ‘मराठवाडा जिओ पोर्टल’विषयी सविस्तर माहिती दिली.

स्त्री आरोग्य’ या मोबाईल ॲपची संकल्पना, लेखन व निर्मिती अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाच्या घटक समन्वयिका डॉ. नीता गायकवाड यांनी केली आहे.

कार्यक्रमासाठी प्रायोजक म्हणून सहकार्य करणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सुनील पवार तसेच इफकोच्या अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले.

रब्बी पीक परिसंवादाच्या तांत्रिक सत्रात हवामान अंदाज, पर्जन्यमानाची सद्यःस्थिती व पिकांचे व्यवस्थापन, सुधारित हरभरा, रब्बी तेलबिया, रब्बी ज्वारी, गहू व रब्बी भाजीपाला पिकांचे लागवड तंत्रज्ञान, शेतीला जोडधंदा म्हणून पशुधनाचे महत्त्व, तसेच सद्यःस्थितीतील कापूस, तूर व हळद पिकांचे संरक्षण व व्यवस्थापन आदी विषयांवर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ निर्मित बियाणे विक्रीने करण्यात आली. विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या विविध बियाण्यांची माहिती व त्यांचे दर सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे आणि बीज प्रक्रिया केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संतोष शिंदे यांनी मान्यवरांना दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले, तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.