Thursday, September 17, 2026

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वनामकृवित स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन

शेतकरी हितासाठी हवामानविषयक दीर्घकालीन माहिती व कृषि संशोधनावर भर देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

परभणी, दि. १७ सप्टेंबर २०२६ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख्य प्रांगणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या विकासासोबतच मराठवाड्यातील शेतकरी बांधवांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.

संघर्ष, त्याग आणि बलिदानाची स्मृती जपणारा दिवस

पुढे बोलताना माननीय कुलगुरू यांनी नमूद केले की, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हा केवळ एक ऐतिहासिक दिवस नसून संघर्ष, त्याग आणि बलिदानाची स्मृती जपणारा दिवस आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतरही हैदराबाद संस्थानातील मराठवाडा स्वतंत्र भारताचा भाग होऊ शकला नव्हता. तत्कालीन निजामाच्या राजवटीविरुद्ध मराठवाड्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी जनजागृती, सत्याग्रह आणि विविध आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष केला. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रविनारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाबासाहेब परांजपे यांच्यासह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी या लढ्याचे नेतृत्व केले.

१७ सप्टेंबर १९४८ रोजी ‘ऑपरेशन पोलो’नंतर हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण झाले आणि मराठवाडा स्वतंत्र भारताचा अविभाज्य भाग बनला. या ऐतिहासिक लढ्यात बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान सदैव स्मरणात राहील, असे त्यांनी सांगितले.

मराठवाड्याला समृद्ध संतपरंपरा, सांस्कृतिक वारसा, साहित्य आणि लोककलेची मोठी परंपरा लाभली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत बहिणाबाई यांच्यासह अनेक संतांनी समाजाला भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश दिला. या भूमीने साहित्य, शिक्षण, समाजसुधारणा तसेच कृषि क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

पावसाच्या खंडाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हिताला प्राधान्य

सध्या मराठवाड्यात मागील महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने विविध पिकांवर प्रतिकूल परिणाम होत असून शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची आवश्यकता असल्याने अनेक ठिकाणी समाधानकारक व सातत्यपूर्ण पाऊस पडावा, यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना केवळ अल्पकालीन पावसाच्या अंदाजाची नव्हे, तर त्यापुढील कालावधीतील हवामानविषयक माहितीचीही आवश्यकता आहे. बदलत्या हवामान परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना योग्य वेळी निर्णय घेता यावेत, यासाठी हवामानविषयक माहिती अधिक प्रभावीपणे आणि सुलभ पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासंदर्भातील मुद्दा पुणे येथे झालेल्या भारतीय हवामान विभागाच्या बैठकीतही उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

कृषि संशोधनाच्या ४१ शिफारशींना मान्यता

दापोली येथे नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या (जॉइंट ॲग्रेस्को) बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने सादर केलेल्या कृषि तंत्रज्ञानाच्या ४२ शिफारशींपैकी ४१ शिफारशींना मान्यता मिळाली. तसेच विद्यापीठाने सादर केलेल्या पाचही वाणांच्या आणि चारही कृषि अवजारांच्या शिफारशींनाही मान्यता मिळाली.

यामध्ये सोयाबीनचा ‘एमएयूएस-७९१’, आंब्याचा ‘राजकेशर (FRSMC-1)’, खरबुजाचा ‘परभणी खरबूज (VNMKVMH-1)’, ‘परभणी दुधी भोपळा (LTRBG-3×4)’ आणि ‘परभणी कारले (VNMKVBGH-01)’ या वाणांचा समावेश आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांचे त्यांनी अभिनंदन केले.

शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणात उल्लेखनीय कामगिरी

विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यापीठाला ICAR-NAEAB कडून ‘A’ श्रेणीचे मानांकन प्राप्त झाले असून, IIRF क्रमवारीत महाराष्ट्रातील राज्य कृषि विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांक आणि देशात ३४ वे स्थान प्राप्त झाले आहे.

विद्यापीठाच्या कार्याचा केंद्रबिंदूविद्यार्थी-केंद्रित शिक्षण, शेतकरी-केंद्रित विस्तार, नवाचार-केंद्रित संशोधन आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन” हा आहे. ‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन कृषि प्रसार सेवा अधिक सक्षम करणे, कृषि क्षेत्रातील समस्यांवर उपयुक्त संशोधन करणे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व कौशल्य प्रदान करणे, यावर भर देण्यात येत आहे.

मराठवाड्याच्या कृषि विकासासाठी तसेच शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे भविष्यातही विद्यापीठातील सर्वांनी एकसंघ भावनेने, परस्पर सहकार्याने आणि कोणताही हेवा-दावा, द्वेष अथवा मत्सर न ठेवता कार्य करावे. सामूहिक प्रयत्नांतून विद्यापीठाला उच्च मानांकन मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन माननीय कुलगुरूंनी केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन ब्युरोचे संचालक माननीय डॉ. एन. जी. पाटील, आरएस - जीआयएसचे प्रमुख डॉ जी. पी. ओबी रेड्डी उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी राष्ट्रीय छात्र सैनिकांनी छात्र अधिकारी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली माननीय कुलगुरूंना सलामी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिने गायक श्री. उदय वाईकर यांनी केले.

शेवटी, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देत सर्वांनी एकजुटीने व आत्मविश्वासाने कार्य करण्याचे आवाहन केले.