Sunday, August 16, 2015

वनामकृवित स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 69 व्‍या स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रागंणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा श्री केदार साळुंके, मा श्री रविंद्र पतंगे, मा श्री अनंतराव चोंडे यांच्‍यासह शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, कुलसचिव डॉ दिनकर जाधव, तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थ्‍यी मोठया संख्‍येने उपस्थित होते. राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या छात्रसैनिकांनी कुलगुरूंना सलामी दिली. कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी सर्वांना स्‍वातंत्र्यदिनाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.
 

Friday, August 14, 2015

वनामकृवित ऊती संवर्धित केळी रोपांची (टीश्यु कल्चर) उपलब्‍धता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या ऊती संवर्धन प्रकल्प, परभणी येथे ऊती संवर्धित केळी रोपांची (टीश्यु कल्चर) निर्मिती केली जाते. सदरील प्रकल्पात अर्धापुरी व ग्रँडनाईन जातीची ऊती संवर्धित रोपांची विक्री केली जाते. या ऊती संवर्धित रोपांची प्रत उच्च दर्जाची असुन दरवर्षी शेतकरी वर्गाकडुन दोन्हीही जातीची भरपुर मागणी असते व प्रकल्पाकडुन शेतकर्‍यांना पूर्वनोंदणी करूनच पुरवठा / विक्री केली जाते. सध्या या प्रकल्पात चाळीस हजार अर्धापुरी व दहा हजार ग्रँडनाईन जातीची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अर्धापुरी जातीच्या रोपांची वैशिष्टय म्हणजे सदरील रोपे कमी उंचीची, मजबूत खोडाची व वादळवार्‍याला प्रतिरोधक आहेत. शेतकरी बंधुनी रोपे उपलब्धतेसाठी प्रभारी अधिकारी, ऊती संवर्धन प्रकल्प, परभणी दुरध्वनी (०२४५२) २२८९३३ मोबाईल क्रमांक  ९८५००९०३१० यांच्‍याशी संपर्क साधवा.

Thursday, August 13, 2015

कीड-रोग व्‍यवस्‍थापन सल्‍ला जास्‍तीस जास्‍त बागायतदारांपर्यंत पोहचला पाहिजे....कुलसचिव डॉ दिनकर जाधव

हॉर्टसॅप प्रकल्‍पांतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन
मार्गदर्शन करतांना कुलसचिव डॉ दिनकर जाधव
मोसंबी कीड व रोग व्‍यवस्‍थापन या पुस्तिकेचे विमोचन करतांना कुलसचिव डॉ दिनकर जाधव, प्राचार्य डॉ डि एन गोखले व विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी
*******************************************
मराठवाडयातील यावर्षीची खरीप हंगामातील पिक परिस्थिती अत्‍यंत बिकट असुन फळबाग व्‍यवस्‍थापनाचेही मोठे आव्‍हान बागायतदार शेतक-यांपुढे आहे. हॉर्टसॅप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन बागायतदार शेतक-यांना बागा वाचविण्‍यासाठी मार्गदर्शन अत्‍यंत आवश्‍यक असुन कीड-रोग व्‍यवस्‍थापनाबाबतचा सल्‍ला जास्‍तीस जास्‍त बागायतदारापर्यंत विविध माध्‍यमातुन पोहचला पाहिजे, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी व‍ महा‍राष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने फलोत्‍पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण, सल्‍ला व व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प (हॉर्टसॅप) अंतर्गत दिनांक १३ व १४ ऑगस्‍ट रोजी कीड सर्वेक्षक, कृषि पर्यवेक्षक, कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्‍या साठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले असुन दि १३ ऑगस्‍ट रोजी कुलसचिव डॉ दिनकर जाधव यांच्‍या हस्‍ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्‍यात आले, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. व्‍यासपीठावर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले व विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलसचिव डॉ दिनकर जाधव पुढे म्‍हणाले की, हॉर्टसॅप प्रकल्‍पातील प्रत्‍यक्ष प्रक्षेत्रावर कार्य करणारे सर्वेक्षक यांची भुमिका महत्‍वाची असुन त्‍यांना फळबागेतील कीड-रोगाची चांगल्‍या प्रकारे ज्ञान अवगत असणे गरजेच आहे. यावरच प्रकल्‍पाचे यश अवलंबुन आहे, त्‍यामुळे वेळोवेळी त्‍यांना प्रशिक्षित करावे लागेल.
सहयोगी अधिष्‍ठाता डॉ डि एन गोखले आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, मराठवाडयातील हवामान परिस्थितीत आबा व मोसंबी फळबागेवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव होण्‍याची शक्‍यता असुन हॉर्टसॅप प्रकल्‍पांतर्गत योग्‍य सल्‍ला बागायतदार शेतक-यापर्यंत पोहचविला पाहिजे. प्रास्‍ताविकात विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर यांनी हॉर्टसॅप प्रकल्‍पाबाबत माहिती देतांना सांगितले की, प्रकल्‍पातर्गंत मराठवाडातील मोसंबीवरील कीड-रोगाचे सर्वेक्षण औरंगाबाद, जालना, नांदेड व बीड या जिल्‍हयात होणार असुन त्‍यावर आधारीत सल्‍ला बागायतदारांना देण्‍यात येणार आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ एम बी पाटील यांनी मोसंबी बागेची लागवड, मोसंबीवरील किडीची ओळख व व्‍यवस्‍थापन यावर प्रा बी व्‍ही भेदे, मोसबी बागेसाठी अन्‍नद्रव्‍ये व्‍यवस्‍थापन यावर डॉ एच के कौसडीकर, मोसंबी रोग व्‍यवस्‍थापन यावर डॉ डी डी निर्मल यांनी, कीड सर्वेक्षक व पर्यवेक्षण यावर डॉ ए जी बडगुजर, नमुना तक्‍त्‍यातील नोंदणी प्रात्‍यक्षिक यावर डॉ डी पी कुळधर तर ऑनलाईन प्रपत्राच्‍या नोंद यावर नवी दिल्‍ली येथील एनसीआयपीएम चे संशोधन सहयोगी श्री निलेश पटेल यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यापीठ कीटकशास्‍त्रज्ञ लिखित ‘मोसंबी कीड व रोग व्‍यवस्‍थापन’ या पुस्तिकेचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ ए जी बडगुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा बी व्‍ही भेदे यांनी केले. उद्घाटन कार्यक्रमास कृषि विभागातील व कृषि विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करतांना प्राचार्य डॉ डि एन गोखले

Monday, August 10, 2015

ग्रामिण कृषि कार्यानुभवातंर्गत मौजे मांडाखळी येथे जनावरांचे लसीकरण

********************
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या परभणी येथील कृषि महाविद्यालयाचे ज्‍वार संशोधन केंद्र येथे कार्यरत असलेल्‍या कृषिदुतांच्‍या वतीने ग्रामीण कृषि कार्यानुभवातंर्गत मौजे मांडाखळी (ता. जि. परभणी) येथे दिनांक १० ऑगस्‍ट रोजी पशुपालक मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. मेळाव्‍याचे उद्घाटन जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ एस बी सोनटक्‍के यांच्‍या हस्‍ते झाले तर पशुधन विकास अधिकारी डॉ ओ डि भंडारे, ज्‍वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ एच व्‍ही काळपांडे, पशुधन पर्यवेक्षीका सौ व्हि यु कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
मेळाव्‍यात उद्घाटनपर भाषणात जिल्‍हा पशुसंवर्धन उपायुक्‍त डॉ एस बी सोनटक्‍के यांनी लसीकरणाचे महत्‍व सांगुन शासनाच्‍या पशुसंवर्धन विभागातील विविध योजनेचा पशुपालकांनी लाभ घेण्‍याचे आवाहन केले तर पशुधन विकास अधिकारी डॉ ओ डि भंडारे यांनी शेळीपालनासाठी मिळणा-या अनुदानाबाबत माहिती दिली. प्रभारी अधिकारी डॉ एच व्हि काळपांडे यांनी ग्रामीण कृषि कार्यानुभवाची पार्श्‍वभूमी विषद केली तर पशुधन पर्यवेक्षिका सौ व्हि यु कावळे यांनी घटसर्प व फ-या रोगाची माहिती दिली.
मेळाव्‍यात गावातील साधारणत: शंभर जनावरांचे घटसर्प व फ-या रोग नियंत्रण लसीकरण करण्‍यात आले. कार्यक्रमास गांवातील पशुपालक मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिदुत एन एस थोरात यांनी तर आभार प्रदर्शन योगेंद्र बनसोड यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ व्हि एम घोळवे यांच्‍या मार्गदर्शनाखाली कृषिदुत पी आकाश, सुर्यवंशी अनील ए एस, जॉन के पी, ढगे, साईचरण, तुम्‍मोड, मीना आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, August 4, 2015

बाल विकास व शिक्षण केंद्राचे व्यवस्थापन प्रमाणपत्र अभ्याससक्रमाचा शुभारंभ


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या गृहविज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास व कौटुंबिक अभ्‍यास विभागातर्फे दि ३ ऑगस्‍ट ते ३ नोव्‍हेंबर या तीन महिने कालावधीत बाल विकास व शिक्षण केंद्राचे व्‍यवस्‍थापन या प्रमाणपत्र अभ्‍यासक्रमाचे आयोजन करण्‍यात आले असुन अभ्‍यासक्रमाचे उद्घाटन दि ३ ऑगस्‍ट रोजी कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रा विशाला पटणम, डॉ रम्‍मना देसेट्टी, डॉ जया बंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   उद्घाटनपर भाषणात कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, आजचे बालक हे उद्याचे नागरिक असुन त्‍यांच्‍या विकासात पालक व‍ बालशिक्षकाची भुमिका महत्‍वाची आहे. शास्‍त्रोकरीत्‍या बालसंगोपनाचे महत्‍त्‍व लक्षात घेऊन समाजाच्‍या गरजेनुसार या अभ्‍यासक्रमाची आखणी करण्‍यात आली असुन राष्‍ट्रीय पातळीवर नावलौकीक प्राप्‍त झालेल्‍या विभागामार्फत राबविल्‍या जात, याचा प्रशिक्षणर्थ्‍यांना निश्चितच लाभ होणार असे सांगुन प्रमुख समन्‍वयीका प्राचार्या प्रा विशाला पटणम यांच्‍या नेतृत्‍वाखाली तयार करण्‍यात आलेल्‍या अभ्‍यासक्रमाबाबत त्‍यांनी प्रशंसा केली.

   या तीन दिन महिन्‍याच्‍या अभ्‍यासक्रमाचा उद्देश्‍य उत्‍कृष्‍ट पालक व बालशिक्षक निर्माण करणे हा असुन या अभ्‍यासक्रमाव्‍दारे प्रशिक्षणार्थींना दर्जेदार बाल विकास व शिक्षण केंद्र जसे की, पाळणाघर, प्‍ले स्‍कुल, नर्सरी स्‍कुल, किन्‍डर गार्डन, बाल विकास केंद्र, पुर्व प्राथमिक शाळा, बाल छंद वर्ग आदी सुरू करण्‍यासाठी किंवा अश्‍या केंद्रात संगोपक शिक्षकांची नौकरी करून अर्थार्जन करण्‍यासाठी सक्षम केले जाणार आहे. यावेळी प्राचार्या प्रा विशाला पटणम लिखित ‘प्रायोगिक पुर्व प्राथमिक शाळेच्‍या दर्जेदार माहिती’ घडीपत्रिकेचे विमोचन कुलगुरूंच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. सदरिल कार्यक्रमात प्राचार्य प्रा विशाला पटणम यांनी बाल विकास व शिक्षणाचा दर्जा उंचावण्‍याची गरज यावर मार्गदर्शन केले. डॉ रम्‍मना देसेट्टी यांनी उत्‍तेजनात्‍मक वातावरणातुन बालविकास कसा घडवावा याविषयी तर डॉ जया बंगाळे यांनी बालकांच्‍या विकासात्‍मक गरजा व‍ त्‍यांची पुर्तता या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विभागाच्‍या प्राध्‍यापीका, प्रशिक्षणार्थी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उ‍पस्थित होते.

Saturday, August 1, 2015

कृषि विद्यापीठ व कृषि विभागांनी आपत्का‍लीन पिक व्यवस्थापन शिफारशींचा प्रसार करावा..... कुलगुरू मा डॉ बी व्यंकटेश्वरलु

क्रॉपसॅप प्रकल्‍पाची एक दिवसीय विभागीय कार्यशाळा संपन्‍न 
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ डि पी वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी
कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना लातुर विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु, संशोधन संचालक डॉ डि पी वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, , विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदी
 *****************
मराठवाडा विभागात यावर्षी आजपर्यंत पाऊसाचे प्रमाण अत्‍यल्‍प झाले असुन देशाचा विचार करता सर्वात बिकट अवस्‍था मराठवाडयात पाहावयास मिळत आहे. काही भागात पेरणीच झाली नाही तर काही भागात पेरणी झाली परंतु पिके जगण्‍याची शाश्‍वतता नाही. अशा परिस्थितीत पुढील काही दिवसात पाऊस पडला तर कोणती पिके लागवडीसाठी योग्‍य असतील याबाबत विचारमंथन करून कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांनी आपत्‍कालीन पिक व्‍यवस्‍थापनाच्‍या शिफारशींचा प्रसार करावा, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांनी केले. महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग व वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचा कीटकशास्‍त्र विभाग यांचया संयुक्‍त विद्यमाने सोयाबीन, कापुस, तूर व हरभरा पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्‍ला (क्रॉपसॅप) प्रकल्‍पांतर्गत दि १ ऑगस्ट रोजी कृषि विभागातील अधिका-यांसाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, या कार्यशाळेच्‍या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्‍यासपीठावर संशोधन संचालक डॉ डी पी वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार, कुलसचिव डॉ डि एल जाधव, विभाग प्रमुख डॉ पी आर झंवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू मा डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु पुढे म्‍हणाले की, बियाण्‍याची उपलब्‍धता, बाजारपेठेतील मागणी, आर्थिक लाभ आदीं बाबींचा विचार करूनच कृषि विद्यापीठ व कृषी विभाग यांनी पुढील काळासाठी शेतक-यांना योग्‍य पिक लागवडीबाबत शिफारस करावी, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.
विभागीय कृषि सहसंचालक श्री एस आर सरदार मार्गदर्शन आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, मराठवाडातील काही भागात पाऊसाचा ४० दिवसांपेक्षाही जास्‍त खंड पडला असुन पिके होरपळत आहेत. हलक्‍या जमिनीवरील पिके जवळपास सुकली असुन मध्‍यम ते भारी जमिनीवरील पिके काहीअंशी तग धरून आहेत. पिकांना सरंक्षित पाणी देण्‍यासाठीही पाण्‍याची  उपलब्‍धता नसुन कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व कृषि विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांनी एकत्रितपणे शेतक-यांना या परिस्थितीतही तंत्रज्ञानाचे बळ देण्‍याची गरज असल्‍याचे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.
मराठवाडातील भुजल पातळी अधिकाधिक घटत असुन पाण्‍याचे दुर्भक्ष निर्माण होत असल्‍याचे संशोधन संचालक डॉ डि पी वासकर आपल्‍या भाषणात म्‍हणाले तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले म्‍हणाले की, मराठवाडातील काही जिल्‍हयात हुमणी किडीचा प्रादुर्भाव आढळुण येत असुन विद्यापीठ याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहे, हुमणी किडीच्‍या नियंत्रणासाठी कृषि विद्यापीठ कृषि विभागाच्‍या सहकार्यातुन लवकरच प्रकल्‍प हाती घेणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
कार्यशाळेत विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांनी सद्यस्थितीत मराठवाडयातील बहुभक्षी किडींचा प्रादुर्भाव यावर मार्गदर्शन केले तर आपत्‍कालीन पीक नियोजनावर डॉ यु एन आळसे, मराठवाडयातील किडींची अति प्रादुर्भावग्रस्‍त ठिकाणे यावर डॉ पी आर झंवर यांनी मार्गदर्शन केले. वातावरण बदलाचा किडींवरील परिणाम यावर प्रा बी व्‍ही भेदे यांनी तर खरिप पिकातील आपत्‍कालीन रोग व्‍यवस्‍‍थापन यावर प्रा पी एच घंटे व सर्वेक्षण प्रपत्र नोंदी व सर्वेक्षणाच्‍या पध्‍दती यावर डॉ ए जी बडगुजर यांनी मार्गदर्शन केले तसेच विविध जिल्‍हयातील सद्य पिक परिस्थितीबाबत कृषि विभागातील अधिका-यांनी सादरीकरण केले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात क्रॉपसॅप प्रकल्‍पाची माहिती दिली तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ दयानंद मोरे यांनी केले. कार्यक्रमात कीटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या ‘प्रमुख पिकावरील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन’ यावर चलचित्राच्‍या सीडीचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमास लातुर विभागातील कृषि विभागातील अधिकारी, विद्यापीठ शास्‍त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते. 
कार्यक्रमात कीटकशास्‍त्र विभागाच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या ‘प्रमुख पिकावरील एकात्मिक कीड व्‍यवस्‍थापन’ यावर चलचित्राच्‍या सीडीचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले त्‍याप्रसंगी. 

अवर्षण प्रवण परिस्थितीत ट्रॅक्‍टर चलीत रुंद वरंबा सरी पध्‍दतीचे दृष्‍य परिणाम

सेलु तालुक्‍यातील ढेंगळी पिंपळगांव येथील शेतकरी श्री गोविंदभाऊ जोशी यांच्‍या रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरणी केलेल्‍या मुगाच्‍या शेतीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, डॉ यु एन आळसे, प्रा पी एस चव्‍हाण, प्रा टेकाळे आदी.
****************************
मराठवाडयात साधारणत: 135.2 मिमी. पाऊस झाला असुन हंगामातील सरासरी पावसापेक्षा 48 % कमी पाउस पडला तर परभणी व हिंगोली जिल्‍हयात सर्वात कमी पाऊस (33%) पडला, या पावसाचे वितरणही पीकांच्‍या दृष्‍टीने समाधानकारक नाही. कधी रिमझिम पाऊस पडत असुन कशीबशी पीके तग धरुन आहेत. साधारणपणे चार ते पाच आठवडयाचा खंड पडला आहे. त्‍याच बरोबर 32 ते 380 सें. तापमान व वा­याचा वेग यामुळे जमिनीतील पाण्‍याचे बाष्‍पीभवन जलद गतीने होत आहे. अशा परिस्थितीत मराठवाडयात पीकांची पाहणी केली असता रुंद वरंबा व सरी (बीबीएफ) वर पेरणी केलेली सोयबीन व मुग ही पीके तग धरुन आहेत. ढेंगळी पींपळगाव (ता. सेलू) येथील शेतकरी श्री. गाेविंदभाऊ जोशी यांचे शेतात रुंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरलेल्‍या मुग पीकाला शेंगा लागत आहेत तरी श्री उध्‍दवराव सोळंके यांचे शेतात मुग मोडुन टाकण्‍याची अवस्‍था झाल्‍याचे त्‍यांनी सांगितले. सदरील शेतक-यांच्‍या शेतीस नुकतेच वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॅा.बी.बी. भोसले, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ. यू. एन. आळसे, विस्‍तार शिक्षण अधिकारी प्रा.पी.एस. चव्‍हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. शेतक­यांचे मत असे आहे की, रुंद वरंबा व सरी पध्‍दतीने पेरलेले सोयबीन व मुग अजून आठ ते दहा दिवस तग धरु शकतात, परंतू पारंपारिक पध्‍दतीने पेरलेली पीके मोडावीच लागतात.
      यावर्षी ब­याच शेतक­यांनी ट्रॅक्‍टरचलित बीबीएफ यंत्र घेतले पण काही तांत्रिक अडचणीमुळे पेरणी करता आली नाही. शेतकरी बंधुनी बीबीएफ पेरणी यंत्राची जोडणी करत असतांना ट्रॅक्‍टरची अश्‍वशक्‍ती व सरीच्‍या अंतर पीकाचे शिफारशीनुसार दोन ओळीतील अंतर, हेक्‍टरी झाडांची संख्‍या याचा विचार केला पाहिजे. ट्रॅक्‍टरच्‍या चाकाच्‍या मागे सरी पडली पाहिजे जेणे करुन पीकांची टायरच्‍या बाजुच्‍या ओळीची उगवण होण्‍यास अडचण येणार नाही. ट्रॅक्‍टरचे पुढील व मागील चाक एकाच चाकोरतुन गेले पाहिजे. ट्रॅक्‍टरच्‍या मोठया टायरच्‍या पाठीमागे फण येत असेल तर ट्रॅक्‍टरचे सर्व टायर पल्‍टी करुन बसवावेत. दोन सरीतील अंतर मोजून पीकाच्‍या शिफारशीनुसार 150 सेमी. अंतराच्‍या बेडवर सोयबीनच्‍या तीन ओळी घ्‍यावयात व दोन ओळीतील अंतर 45 सें.मी ठेवावे. 30 सें.मी अंतर ठेवले तर चार ओळी येतील एखादे वेळेस ट्रॅक्‍टरच्‍या तडजोडीनुसार दोन ओळीतील अंतर कमी अधिक करावे लागेल.

      सन 2014-­15 साली बनसारोळा (जि.बीड) व सारोळा (जि. उस्‍मानाबाद) येथे गटाच्‍या माध्‍यमातुन मोठया प्रमाणावर शेतक­यांनी बीबीएफ वर पेरणी केली असता त्‍यांना पारंपारिक पेरणीच्‍या तुलनेत 15 ते 20 % अधिक उत्‍पन्‍न  मिळुन प्राप्‍त झाले. यावर्षीपण या शेतक­यांनी संपूर्ण यांत्रिकीकरण करुन खर्चात बचत करुन अधिक उत्‍पन्‍न वाढीचे उदि्दष्‍ट ठेवले आहे. तरी शेतकरी बंधूनी जमिन, पीक, पाऊस या सर्व बाबींचा अभ्‍यास करुन रूंद वरंबा व सरी पध्‍दतीचा अवलंब करण्‍याचे आवाहन विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी.बी. भोसले यांनी केले आहे.