Friday, January 20, 2017

वनामकृवित शिक्षण व संशोधन क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्‍या कौशल्‍य विकासावर एकवीस दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्‍या वतीने राज्यस्तरीय मृदा, पिक, जल, अन्न, चारा संशोधन व नविनतम परिक्षण तंत्रज्ञान कौशल्य विकास या विषयावरील 20 जानेवारी ते 09 फेब्रूवारी दरम्‍यान एकवीस दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमााचे आयोजन करण्‍यात आले आहे. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन दिनांक 21 जानेवारी रोजी माजी कुलगुरू मा. डॉ एस एस कदम यांच्‍या हस्‍ते होणार असुन कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे अध्‍यक्षस्‍थानी राहणार आहेत. विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्‍य मा. डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रशिक्षणाचे आयोजक विभाग प्रमुख डॉ विलास पाटील हे असुन समन्वयक म्‍हणुन डॉ सय्यद ईस्माईल हे काम पााहात आहेत. सदरील प्रशिक्षात बदलत्या हवामानामुळे होणाऱ्या अन्नधान्य, मृदा, जल, पिके आणि प्राणी यांच्यावार होणाऱ्या परिणामाचा प्रश्नावर विविध प्रात्याक्षिके व मान्‍यवरांचे व्याख्यानेे  होणार आहेत. कौशल्य विकासासोबत व्यक्तीमत्व विकास या विषयावारही मार्गदर्शन होणार आहे. प्रशिक्षणासाठी देशातील विविध संस्थामधील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. पी. चंद्रशेखर राव (हैद्राबाद), डॉ. भुपालराज (हैद्राबाद), डॉ. अंजली पारसनिस (मुंबई), डॉ. अे. एल. फरांदे (राहुरी), डॉ. व्हि. के. खर्चे (अकोला), डॉ. अे. डी. कडलग (राहुरी) तसेच विद्यापीठातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षणाचा सहभागी प्रशिक्षणार्थीना शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कौशल्‍य विकासासाठी फायदा होणार आहे. प्रशिक्षणास शिक्षण व संशोधन क्षेत्रातील 30 शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॅा. अनिल धमक, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, प्रा. प्रभाकर अडसुळ, प्रा. सनिल गलांडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. एस.पी. झाडे, डॉ. सदाशिव अडकीणे, श्री अनिल मोरे व इतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत.

Wednesday, January 18, 2017

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये ‘देशी कापूस पुनरूज्जीवन’ बाबत एकदिवसीय कार्यशाळा संपन्‍न

देशी कपाशीचे बिजोत्पादन मोठ्या प्रमाणावर घेणे आवश्यक......कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू


कोरडवाहू लागवडीमध्ये कापसाचे किफायतीशीर उत्पन्न मिळण्यासाठी देशी कापसाची लागवड करणे आवश्यक आहे. देशातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी किमान २० टक्के क्षेत्रावर देशी कापसाची लागवड होणे आवश्यक असुन त्याकरीता विभागनिहाय योग्य वाणांची निवड करून त्यांचे मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन हाती घ्‍यावे लागेल, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी व्यक्त केले. नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये ‘देशी कापूस पुनरूज्जीवन’ बाबत एकदिवसीय कार्यशाळेचे दि. १६ जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेत हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास राव, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे डॉ. ब्लेझ डीसूझा, बेंगलुरू येथील सहज समृद्धी स्वयंसेवी संस्थेचे श्री कृष्णा प्रसाद, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे माजी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एल. ए. देशपांडे व डॉ. ए. एस. अनसिंगकर, खांडवा येथील प्रमुख कापूस शास्त्रज्ञ डॉ. शास्त्री आदींची प्रमुख उपस्थिती होती.
हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास राव यांनी कोरडवाहू लागवडीमध्ये लांब धाग्याचा देशी कापूस अधिक फायदेशीर ठरेल असे मत व्‍यक्‍त केले तर कपाशीच्‍या नविन विकसित वाणांचे धाग्याचे गुणधर्म अमेरिकन कपाशीच्या तोडीचे असल्यामुळे या वाणांची लागवड कर्नाटक व तामिळनाडू राज्यांमध्ये करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे श्री. कृष्णा प्रसाद यांनी सांगितले. देशी कापसाच्या वाणांचे बिजोत्पादन करण्यासाठी विद्यापीठ प्रक्षेत्र तथा बिजोत्पादक कंपन्यांशी सामंजस्य करार करून अधिक प्रमाणात बियाणे उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे संचालक संशोधन डॉ. वासकर यांनी सांगितले.
प्रास्ताविकात कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी कार्यशाळेच्या आयोजनाविषयीची भूमिका मांडली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अरविंद पांडागळे यांनी केले. कार्यशाळेत देशी (गावराण) कापूस लागवडीविषयी असणा-या शेतक-यांच्या अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि देशामध्ये देशी कापसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी दिशा याबाबत चर्चा करण्यात येऊन भविष्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात आला. कापूस संशोधन केंद्राच्या कपाशीच्‍या विविध देशी वाणांच्‍या प्रक्षेत्रास सहभागी शेतकरी व शास्त्रज्ञांनी भेट दिली. प्रक्षेत्रावर विद्यापीठ विकसीत विविध वाण हे धाग्याचे गुणधर्म व उत्पादकता याबाबत सरस असल्याचे आढळून असुन हे वाण विविध राज्यांतील देशी कापूस लागवड करणा-या शेतक-यांना उपलब्ध करून देण्याची मागणीही सहभागी शेतक-यांनी यावेळी केली. देशी कापसाच्या धाग्याचे गुणधर्मामध्ये प्रदीर्घ संशोधन व अथक परिश्रमाने अमुलाग्र बदल घडविणा-या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे माजी कापूस विशेषज्ञ डॉ. एल. ए. देशपांडे व डॉ. ए. एस. अनसिंगकर यांचा विशेष सत्कार यावेळी मा. कुलगुरू यांचे हस्ते करण्यात आला.

तांत्रिक सत्रात विद्यापीठ विकसीत विविध देशी कापसाचे वाण व त्यांची लागवड याबाबत कापूस संशोधन केंद्राचे प्रा. अरविंद पांडागळे, इतर राज्यातील वाणांबाबत नागपूर येथील डॉ. ब्लेझ आणि देशी कापसातील कीड व्यवस्थापन याबाबत डॉ. शिवाजी तेलंग यांनी विस्तृत माहिती दिली. कार्यशाळेत कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश व पश्चिम बंगाल आदी राज्यांतील तसेच राज्‍यातील नांदेड, परभणी, यवतमाळ, अकोला, औरंगाबाद, नंदुरबार आदी जिल्ह्यातील शास्त्रज्ञ, कृषि विस्तारक व देशी कापूस उत्पादक शेतकरी मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.

Friday, January 13, 2017

तरुणांनी आपल्‍या ज्ञानाचा उपयोग शेतक-यांच्‍या विकासासाठी करावा.... शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालयाच्‍या वैद्यनाथ पदव्‍युत्‍तर वसतीगृहात राष्‍ट्रमाता जिजाऊ आणि स्‍वामी विवेकानंद यांची जयंती निमित्‍त दिनांक 12 जानेवारी रोजी व्याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी अधिष्‍ठाता डॉ. अशोक ढवण होते तर विभाग प्रमुख डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रा. रणजीत चौव्‍हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. अध्‍यक्षीय भाषणात डॉ. ढवण म्‍हणाले की, नितीशास्‍त्र आणि युध्‍द शास्‍त्राचा मुळ गुरु म्‍हणजे राष्‍ट्रमाता जिजाऊ होत तर स्‍वामी विवेकानंद म्‍हणजे आजच्‍या युवकांचा आदर्श होत. कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांनी त्‍यांच्‍या बुध्‍दीचा व शक्‍तीचा उपयोग  देशाच्‍या विकासासाठी करावा. तल्‍लक बुध्‍दी व कुशाग्र तरुणांचे मुर्तीमंत उदाहरण म्‍हणजे स्‍वामी विवेकानंद होत. विवेकानंदानी भारतीय संस्‍कृती व तत्‍वज्ञानाचा गाडा अभ्‍यास केला. त्‍यांनी भारत भ्रमणकरुन संस्‍थानांशी संपर्क साधुन समाजामध्‍ये जनजागृतीचे कार्य केले. आजच्‍या तरुणांनी ज्ञानलालसा अंगीकृत करुन शेतक-यांच्‍या विकासासाठी या ज्ञानाचा वापर करावा. प्रास्‍ताविकात डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्‍हणाले की, आजचा तरुण हा कार्यक्षम, उत्‍साही व अहंम जागृत असणे आवश्‍यक आहे. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी स्‍पर्धामंचचे अध्‍यक्ष जितेंद्र गायकवाडा, सदस्‍य रवि उगले, सुशांत धवारे, विनोद पवार, महावीर मैद, मनोज बोक्‍से, प्रशांत तोटेवाड, नवनाथ राठोड, पंकज वाघ यांनी परिश्रम घेतले.

मौजे ब्राम्‍हणगांव येथे गृहविज्ञान तंत्रज्ञानावर कार्यशाळा संपन्‍न


टिप - सदरिल बातमी प्राचार्या, गृहव्‍ािज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्‍त

Tuesday, January 10, 2017

वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलेक्‍युलार तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयांतर्गत असलेल्‍या कृषि वनस्‍पतीशास्‍त्राच्‍या वतीने दिनांक २७ डिसेंबर २०१६ ते ९ जानेवारी २०१७ दरम्‍यान ‘वनस्‍पती ऊती संवर्धन व मॉलेक्‍युलार तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन पिक सुधार’ या विषयावर चौदा दिवशीय प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले होते. प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता दिनांक ९ जानेवारी रोजी झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी सहाय्यक महासंचालक (बियाणे) डॉ. एन. डी. जांभळे हे उपस्थित होते तर व्‍यासपीठावर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले, प्रशिक्षणाचे आयोजक तथा विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर, प्राचार्य डॉ अशोक कडाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी डॉ. एन. डी. जांभळे आपल्‍या मार्गदर्शनात म्‍हणाले की, विविध पिकांच्‍या चांगल्‍या वाण निर्मितीसाठी पारंपारीक पैदास पध्‍दती सोबतच जैविक तंत्रज्ञानाचा संशोधकांनी वापर करावा. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी सदरिल प्रशिक्षण यशस्‍वीरित्‍या राबविल्‍याबाबत आयोजकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक विभाग प्रमुख डॉ डि बी देवसरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीना वानखडे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. एल. एन. जावळे यांनी केले. याप्रसंगी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण करण्‍यात आले. प्रशिक्षणास राज्‍यातील विविध महाविद्यालय व संशोधन केंद्राातील २२ प्रशिक्षणार्थीनी सहभागी झाले होते. प्रशिक्षण कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी प्रा. एस. व्‍ही. कल्‍याणकर, डॉ. जी. डी. देशमुख, प्रा. के एम शर्मा, डॉ. ए. बी. बागडे, डॉ. डी. जी. दळवी, प्रा. एच एच भदरगे, के एल सांगळे आदींनी परिश्रम घेतले.

Tuesday, January 3, 2017

महिलांनी स्‍वत: वरील विश्‍वास वाढवावा, स्‍वयंसिध्‍द व्‍हावे.....सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर

तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजित वनामकृविच्‍या महिला शेतकरी मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद
महिला शेतकरी मेळाव्‍याचे उदघाटन करतांना मान्‍यवर  
कृषि  प्रदर्शनाचे उदघाटन करतांना मान्‍यवर 



सावित्रीबाई फुले यांचे चरित्र अभ्‍यासुन त्‍या मार्गाने जाणे आज आवश्‍यक आहे, देश महासत्‍ता होण्‍यासाठी महिलांचा विकास आवश्‍यक आहे. महिलांनी स्‍वत: वरील विश्‍वास वाढवावा, स्‍वयंसिध्‍द व्‍हावे, असे प्रतिपादन कोल्‍हापुर येथील स्‍वयंसिध्‍दा संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालनालय, हिंगोली येथील कृषि विज्ञान केंद्र व महाराष्‍ट्र शासनाचा कृषि विभाग, हिंगोली यांचे संयुक्‍त विद्यमाने क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्‍त दिनांक ३ जानेवारी रोजी तोंडापुर (ता. कळमनुरी जि. हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्रात आयोजित महिला शेतकरी मेळाव्‍याच्‍या उद्घाटनाप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु हे होते तर विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. रामराव वडकुते, मुख्‍य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. एच. पी. तुम्‍मोड, हिगोंली जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष मा. श्री. राजेश्‍वर पतंगे, माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्राचार्या प्रा विशाला पटनम, प्राचार्य डॉ पी एन सत्‍वधर, नाबार्डचे श्री प्रितम जंगम, मुख्‍य विस्‍तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख, वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ पी पी शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर पुढे म्‍हणाल्‍या की, महिला आर्थिक व राजकीय साक्षर झाल्‍या पाहिजेत. शिक्षण व शेतीची सांगड घातली पाहिजे. महिला बचतगटांनी कर्जाचा उत्‍पादक कामासाठी उपयोग करावा. महिला बचत गट हे विकासाचे व्‍यासपीठ व्‍हावे. महिला बचत गटांनी गटशेती, कंत्राटी शेती करावी. महिलांनी चौकटी बाहेर पडुन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. रोज नवनवीन शिक्षण घ्‍या. महिलांनी घर सांभाळुन एकमेकींना प्रोत्‍साहन देत रोपवाटीका, जीवाणु खत व गांडुळ खत निर्मिती, फळ प्रक्रिया उद्योग, कुटिर उद्योग करावेत. आज सर्वांना नौकरी मिळणे दुरापास्‍त आहे, शेती व शेतीपुरक व्‍यवसायात उतरावे लागेल. आज पिकविता येते पण विकता येत नाही अशी गत झाली आहे, विक्री कौशल्‍य महिलांनी शिकावे. महिलांनी एकतरी हस्‍तकला जोपासवी. महिलांनी शेती, माती व ज्ञान संस्‍कृती जपावी, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.
अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्वरलु यांनी राज्‍यातील महिला बचत गटात मराठवाडयातील महिला बचत गट सर्वांत सक्रिय असुन या बचत गटांना तांत्रिक, आर्थिक व बाजारपेठेबाबत प्रशिक्षण देण्‍यासाठी विद्यापीठ पुढाकार घेईन. शेतकरी बियाणे कंपन्‍या व महिला बचत गटांचा माल विक्रीसाठी थेट विक्रते ते ग्राहक यांच्‍यात एक व्‍यासपीठ उपलब्ध करण्‍यासाठी विद्यापीठ उपक्रम घेईन, असे आश्‍वासन दिले.
आमदार मा. श्री रामराव वडकुते आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, महिलांना आपल्‍या शक्‍तीची जाणीव झाली पाहिजे, समाज परिवर्तनासाठी महिलांनाच पुढाकार घ्‍यावा लागेल. माजी खासदार मा. अॅड. शिवाजी माने आपल्‍या भाषणात म्‍हणाले की, शेती विषयक निर्णय प्रक्रियेत महिलाचा सहभाग वाढवावा लागेल, महिला जोपर्यंत पुरूषांच्‍या खांद्यालाखांदा लावुन समाजात उभ्‍या राहणार नाहित तोपर्यंत देशाची प्रगती होणार ना‍ही. जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्ष श्री राजेश्‍वर पतंगे यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
प्रास्‍ताविक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व विजय ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ पी पी शेळके यांनी केले. मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात शेतकरी महिलाचे काबाटकष्‍ट कमी करणारे तंत्रज्ञान, अन्‍न व फळप्रक्रिया तंत्रज्ञान, बालकांचा विकास आदी विषयांवर विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले तसेच नाबार्डच्‍या वतीने कॅशलेस प्रणालीबाबत मार्गदर्शन करण्‍यात आले. मेळाव्‍यात विद्यापीठाच्‍या शेतीभातीच्‍या महिला विशेषांकाचे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिकेचे विमोचन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. दाळ प्रक्रिया उद्योग करणा-या ग्रामीण महिला उद्योजिका सुलोजना नरवाडे यांच्‍या यशोगाथावर आधारीत आम्रपाली या लघुपटाचे विमोचन यावेळी करण्‍यात आले. याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनास शेतकरी महिलांनी मोठया प्रतिसाद दिला तर मेळाव्‍यास मोठया संख्‍येने शेतकरी महिला उपस्थित होत्‍या.
मार्गदर्शन करतांना सामाजिक कार्यकर्त्‍या मा. कांचनताई परूळेकर
मार्गदर्शन करतांना विधान परिषद सदस्‍य मा. आ. श्री. रामराव वडकुते

अध्‍यक्षीय समारोप करतांना कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु
मार्गदर्शन करतांना माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने


प्रास्‍ताविक करतांना विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले