Thursday, October 7, 2021

वनामकृवित हॉयड्रोपॉनीक आणि पॉलीहाऊस यावर ऑनलाईन प्रशिक्षणास प्रारंभ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक आणि भारतीय कृ‍षी अनुसंधान पुरस्‍कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) अंतर्गत आधुनिक स्‍वयंचलित हॉयड्रोपॉनीक आणि पॉलीहाऊस या विषयावर दोन आठवडीय ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 04 ते 16 ऑक्टोबर दरम्यान करण्‍यात आले असुन दिनांक 4 ऑक्‍टोबर रोजी या प्रशिक्षणाचे उदघाटन झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्‍ली येथील कृषि व शेतकरी कल्‍याण विभागाचे अतिरिक्‍त आयुक्‍त (उद्यानविद्या) डॉ. नवीन पटले हे उपस्थित होते तर नाहेप प्रकल्‍पाचे प्रमुख अन्‍वेषक डॉ, गोपाळ शिंदे व उप-अन्वेषक डॉ. आर. पी. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. नवीन पटले म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होत आहे.  भारत सरकार विविध योजनांच्या मार्फत आधुनिक तंत्रज्ञानात स्वंयपुर्ण करण्यासाठी सदैव प्रयत्‍नशील आहे. पॉलीहाऊस व हॉयड्रोपॉनीक सारख्या तंत्रज्ञानाची जोड शेतक-यांच्या सर्वांगीन विकासासाठी व नवीन व्यवसाय निर्मीतीसाठी आवश्‍यक असल्‍याचे ते म्‍हणाले. डॉ, गोपाळ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नाहेप प्रकल्पाविषयी माहिती दिली.

प्रास्‍ताविकात श्री.रहीम खॉन यांनी प्रशिक्षण आयोजनाच्या मागील संकल्पना विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन इंजी. खेमचंद कापगते यांनी केले तर आभार डॉ. हेमंत रोकडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. शिवराज शिंदे, इंजी. तझीम पठाण, इंजी. रवीकुमार कल्लोजी, डॉ. अविनाश काकडे, डॉ. अनिकेत वाईकर, इंजी. शिवानंद शिवपुजे,इंजी. गोपाळ रनेर, इंजी. अपुर्वा देशमुख, श्री. रामदास शिंपले, मुक्ता शिंदे, रेखा ढगे व मारोती रणेर, गंगाधर जाधव व जगदीश माने आदींनी परीश्रम घेतल. प्रशिक्षणास पन्‍नास पेक्षा जास्‍त विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्तर विद्यार्थ्‍यी यांनी सहभाग नोंदविला.  

Saturday, October 2, 2021

राष्‍ट्रीय छात्र सेनेच्‍या वतीने आयोजित फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रमास मोठा प्रतिसाद

महात्‍मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त फिट इंडिया फ्रीडम रन २.० कार्यक्रमाचे ५२ महाराष्ट्र बटालियन, नांदेड, शिवाजी महाविद्यालय, परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालय यांच्या सयुंक्त विद्यमाने दिनांक २ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्‍यात आले होते. इंडिया फ्रीडम रनला प्रमुख पाहुणे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते हिरवी झेंडा दाखवुन सुरूवात करण्‍यात आली. यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बाळासाहेब जाधव, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सय्यद इस्माईल, नांदेड येथील एनएनसी कमांडिंग ऑफिसर श्री वेटरी वेल्‍लु, श्री हेमंतराव जामकर, उपप्राचार्य  डॉ  केशेट्टी, वाहतूक नियंत्रक अधिकारी श्री सचिन इंगेवार, प्रबंधक श्री विजय मोरे, लेफ्टनंट डॉ प्रशांत सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, आज देश स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष साजरे करीत आहे. जगाला अहिंसा, सत्‍य व सहिष्‍णुता यांची शिकवण देणारे देशाला स्‍वातंत्र मिळविण्‍यात अमुल्‍य असे योगदान महात्‍मा गांधी यांचे होते तर स्‍वातंत्र्यानंतर देशा निर्माणात अतुलनीय योगदान देणारे भारतरत्‍न लाल बहादुर शास्‍त्री यांचे कार्य आजही स्‍मरणीय आहे, त्‍यांनी देशाच्‍या संरक्षणात जवानांचे व प्रगतीत शेतक-यांचे महत्‍व ओळखुन जय जवान जय किसान हा नारा दिला. कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावात मानव आपल्‍या आरोग्‍याबाबत अधिक सजग झाला आहे, स्‍वाथ्‍यपुर्ण जीवन जगण्‍याकरिता रोज व्‍यायाम व धावण्‍याचे महत्‍व लक्षात घेता देशाच्‍या माननीय पंतप्रधान यांच्‍या संकल्‍पनेतुन देशात फिट इंडिया फ्रीडम रन कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. प्रत्‍येक व्‍यक्‍तींने व्‍यायाम व धावणे हे आपल्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग म्हमुण अंगीकार केला पाहिजे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.  

यावेळी छात्रसैनिक, महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी फिट इंडिया फ्रीडम रन मध्‍ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिवाजी महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, कृषि महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, सैन्य दलाचे श्री जमन सिंग, श्री सुनील कुमार, डॉ संतोष कोकीळ, डॉ राजू बडूरे, प्रा. प्रल्‍हाद भोपे, प्रा. राजेसाहेब रेंगे, प्रा तुकाराम फिसफिसे, श्री व्ही आर मोरे, महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी, राष्‍ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, वाहतुक नियंत्रक विभाग व जिल्हा रुग्णालय बचाव पथक कर्मचारी आदीनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन छात्रसैनिक श्री चंद्रकांत सातपुते यांनी केले तर आभार लेफ्टनंट श्री प्रशांत सराफ यांनी मानले. यावेळी छात्रसैनिक, महाविद्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांनी फिट इंडिया फ्रीडम रन मध्‍ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिवाजी महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ, कृषि महाविद्यालयाचे लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख, सैन्य दलाचे श्री जमन सिंग, श्री सुनील कुमार, डॉ संतोष कोकीळ, डॉ राजू बडूरे, प्रा. भोपे, प्रा. रेंगे, प्रा फिसफिसे, श्री व्ही आर मोरे, महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी, राष्‍ट्रीय छात्रसेनेचे छात्रसैनिक, वाहतुक नियंत्रक विभाग व जिल्हा रुग्णालय बचाव पथक कर्मचारी आदीनी प्रयत्न केले. सुत्रसंचालन छात्रसैनिक श्री चंद्रकांत सातपुते यांनी केले तर आभार लेफ्टनंट श्री प्रशांत सराफ यांनी मानले.






Friday, October 1, 2021

वनामकृवित डॉ. आर.एस. मुर्ती स्मृती व्याख्यान संपन्न

“अण्विक मृद विज्ञान” यावर भोपाळ येथील मृद शास्त्रज्ञ डॉ. तपन अधिकारी यांनी केले मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय मृद विज्ञान संस्था नवी दिल्ली शाखा परभणी व मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. आर.एस. मुर्ती स्मृती ऑनलाईन व्याख्यानाचे दिनांक 30 सप्‍टेबर रोजी आयोजन करण्‍यात आले होते, यात अण्विक मृद विज्ञान यावर भोपाळ येथील भारतीय मृद विज्ञान संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. तपन अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण हे तर सहअध्यक्ष माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील हे होते.

मार्गदर्शनात डॉ. तपन अधिकारी यांनी मृदशास्त्रातील नविनतम विषयास अनुसरुन मृद विज्ञानातील भविष्यातील संशोधनाची दिशा स्पष्ट केली. माती, पिके यातील जीवभौतिक व रासायनिक अभिक्रियांचा परस्पर संबंधावरील संशोधनाचे सादरीकरण दिले. जमिनी कशा प्रकारे होते याची माहिती दिली. आण्विक मृद विज्ञानात संशोधन पदव्युत्तर संशोधकांस व शास्त्रज्ञास संधी उपलब्ध असल्‍याचे ते म्‍हणाले. तर अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा.डॉ. अशोक ढवण यांनी सेंद्रीय घटक पदार्थाचे विघटन आणि ह्रुमस पदार्थांचे उत्पादन आणि अन्नद्रव्यांचा परस्पर संबंधाचा विस्तारीत अभ्यास या अण्विक शास्त्रात संशोधनाच्‍या अनेक संधी असल्‍याचे म्‍हणाले तसेच कै. डॉ. आर.एस. मुर्ती यांचे मृदशास्त्रातील सुक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकातील महत्व या संशोधनाविषयी मोठे योगदान असल्‍याचे ते म्‍हणाले.  यावेळी डॉ. विलास पाटील मृदा शास्त्रातील मातीचे मुळ संशोधन आण्विक शास्‍त्राव्दारे अभ्यासता येते असे स्पष्ट केले आणि आधुनिक दुरस्थ संवेदन उपकरणांचा या आण्विक मृदशास्त्रास मोठा उपयोग होतो असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमात भारतीय मृद विज्ञान संस्था शाखा परभणीचे अध्‍यक्ष तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी कै. डॉ. आर.एस. मुर्ती यांच्या मृद विज्ञानातील योगदानाबाबत माहिती देऊन प्रमुख पाहुण्‍याचा परिचय दिला. सुत्रसंचालन सचिव तथा प्राध्यापक डॉ. प्रविण वैद्य यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ. अनिल धमक, डॉ. रामप्रसाद खंदारे, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. स्वाती झाडे, डॉ. स्नेहल शिलेवंत, अजय चरकपल्ली आदीसह विभागातील कर्मचारी, पदव्युत्तर विद्यार्थी व विद्यार्थीनी सहकार्य केले. अत्यंत प्रतिष्ठीत समजल्या जाणा­या स्मृती व्याख्यान मालेचा मान यंदा परभणी विद्यापीठास मिळाला. ऑनलाईन व्याख्यानात संपुर्ण देशातुन मृद शास्त्रज्ञ, संशोधक आणि पदव्युत्तर विद्यार्थी असे दोनशे पेक्षा जास्‍त सहभाग नोंदविला.

Wednesday, September 29, 2021

कृषी विकासात कृषि अभियंत्याचे महत्वपूर्ण योगदान .... कुलगुरु मा डॉ. अशोक ढवण

वनामकृवितील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्‍या वतीने आयोजित वेबिनार मध्‍ये प्रतिपादन

हवामान बदलांमुळे दिवसेंदिवस शेतीक्षेत्रात महत्वपूर्ण बदल घडत असुन या बदलांना सामोरे जाण्यासाठी कृषि अभियांत्रिकीशी संबंधित आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे क्रमप्राप्त झाले आहे. शेतीक्षेत्रात ड्रोन, रोबोट, आयओटी, आयसीटी आदीसह विविध डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे गरजे आहे. शेतीची उत्पादन क्षमता व शेतकऱ्याचे उत्पनं वाढीसाठी मृद व जलसंधारण, आधुनिक व कार्यक्षम सिंचन पध्द्तींचा अवलंब, शेतीचे यांत्रिकीकरण आणि शेतीमाल प्रक्रिया व मुल्यवर्धन या कामात कृषि अभियंत्याचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविदयालयाच्‍या वतीने कृषी विकासात कृषी अभियांत्रिकीचे स्थान व कृषी अभियंत्यांना विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे सत्राचे आयोजन करण्यात आले होते, या सत्राच्या अध्यक्षीय भाषणात ते  बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख आणि नाहेप प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. सुनील गोरंटीवार हे सहभागी झाले होते तर  कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. उदय खोडके, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मुंबईच्या रिलायन्स रिटेलचे जनरल मँनेजर श्री दत्तात्रय मोरे, अहमदनगरचे गट विकास अधिकारी श्री संदीप वायाळ, लातुरचे विक्रीकर अधिकारी श्री व्यंकट शिंदे, नाशिकचे उदयोजक श्री दीपक भापकर, आयआयटी खरगपूर येथील संशोधक श्री सुयोग खोसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात डॉ. सुनील गोरंटीवार यांनी काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर याविषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले. यासाठी त्यानी रिमोट सेंसीग, कृषी क्षेत्रात वापरता येणारे विविध मोबाईल अप, हवामानाची माहिती, ड्रोन व रोबोट तंत्रज्ञानाचा पाणी व्यवस्थापणात उपयोग याबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील काही गावे डिजीटल शेतीकडे वाटचाल करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

प्रास्‍ताविकात डॉ. उदय खोडके म्हणाले की, व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातील यशस्‍वी माजी विद्यार्थांचे मार्गदर्शन विद्यार्थांना अत्यंत प्रेरणादायी ठरते. थोर अभियंता भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्या व्यक्तिमात्वातील प्रामाणिकपणा, नैतीकता व प्रात्याक्षिक संकल्पना विद्यार्थांनी आपल्या अंगी बाळगावी असा सल्‍ला त्‍यांनी दिला. यावेळी जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहुल रामटेके यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमाची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. हरीश आवारी आणि प्रा. दत्तात्रय पाटिल यांनी करूं दिला. सूत्रसंचालन डॉ. रविन्द्र शिंदे यांनी केले तर आभार प्रा. मधुकर मोरे यांनी मानले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक कर्मचारी तसेच आजीव माजी विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते.

वेबिणार मध्‍ये रिलायन्स रिटेलचे जनरल मँनेजर श्री दत्तात्रय मोरे यांनी कृषि अभियांत्रिकी पदविधरांना खाजगी क्षेत्रात काम करतांना जिद्द व चिकाटी आवश्‍यक असल्याचे सांगितले. कृषि अभियंत्याचे ग्रामीण विकासात योगदान याविषयी बोलताना श्री संदीप वायाळ यांनी मार्गदर्शन केले. श्री व्यंकट शिंदे यांनी कृषि अभियंत्यांना वित्त आणि कर प्रणाली या क्षेत्रात तसेच बँकिग क्षेत्रात उपलबध असलेल्या संधी विषयी मार्गदर्शन केले. नाशिकच्या रेझोप्लास्ट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उद्योजक श्री दीपक भापकर यांनी स्वताचे उदाहरण देऊन उसतोड कामगाराचा मुलगा ते यशस्वी उद्योजक या जीवन प्रवासाचे कथन केले. माजी विद्याथी श्री सुयोग खोसे यांनी विध्यार्थ्याना स्पर्धा परिक्षाची तयारी व कृषी अभियंत्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी या विषयी मार्गदर्शन केले.  

            

Friday, September 17, 2021

थेट शेतकरी उत्‍पादक ते उपभोक्‍ता यातील साखळी मजबुत करावी लागेल......ज्‍येष्‍ट शास्‍त्रज्ञ मा डॉ योगेंद्र नेरकर

वनामकृवि आयोजित ऑनलाईन रब्‍बी शेतकरी मेळाव्‍यास शेतकरी बांधवाचा मोठा प्रतिसाद

पिक उत्‍पादन वाढीकरिता शुध्‍द व दर्जेदार बियाणे आवश्‍यक आहे. आज शेतकरी मोठया प्रमाणात शेतमाल उत्‍पादन घेत आहे, परंतु शेतमालास अपेक्षित मोबादला प्रत्‍यक्ष शेतकरी बांधवाना मिळत नाही, त्‍याकरिता उत्‍पादक ते उपभोक्‍ता यातील दरी कमी करावी लागेल, थेट उत्‍पादक शेतकरी व उपभोक्‍ता यांतील साखळी मजबुत करावी लागेल, असे प्रतिपादन राहुरी येथील महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्‍येष्‍ट शास्‍त्रज्ञ मा डॉ योगेंद्र नेरकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विस्‍तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग (महाराष्‍ट्र राज्‍य) यांचे संयुक्‍त विद्यमाने मराठवाडा मुक्‍ती संग्राम दिनानिमित्‍त दिनांक १७ सप्‍टेंबर रोजी आयोजित ऑनलाईन रबी शेत‍करी मेळाव्‍याच्‍या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर कार्यक्रमास विशेष अतिथी म्‍हणुन पुणे येथील अटारीचे संचालक मा डॉ लाखन सिंग हे उपस्थित होते व संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डि बी देवसरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा डॉ योगेंद्र नेरकर पुढे म्‍हणाले की, कोरोना विषाणु रोगाच्‍या पार्श्‍वभुमीत समाजास शेती व शेतकरी यांचे महत्‍व पटले आहे. आज मनुष्‍य आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने अधिक सजग झाला असुन पौष्‍टीक अन्‍नासाठी आग्रही झाला आहे. अन्‍न पोषणात ज्‍वारीचे मोठे महत्‍व असुन परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले परभणी मोती व सुपर मोती शेतक-यांच्‍या पसंतीस उतरले आहेत. जागतिकरणामुळे शेतीतही स्‍पर्धो वाढली आहे, जमिनीची उत्‍पादकता टिकविणे, शेतीत कमी खर्चात जास्‍त उत्‍पादन व नफा मिळविणे आवश्‍यक आहे. शेतक-यांचे उत्‍पन्‍न केवळ दुप्‍पट करून न थांबता अनेक पटीने वाढीसाठी प्रयत्‍न करावे लागतील. शेतकरी व शेती यांची प्रतिष्‍ठा वाढली पाहिजे. गट शेती, शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या यामाध्‍यमातुन प्रगती होत आहे. शेती यांत्रिकीकरणावर भर दयावा लागेल, कृषि अभियांत्रिकी विभागाने यावर अधिक संशोधन करण्‍याची गरज आहे. शेतीत ड्रोनचा फवारणीकरिता वापर तसेच ज्‍वारीच्‍या कणसावरील पक्षी उडविण्‍यासाठी होऊ शकतो. आज नॅनो युरिया बाजारात उपलब्‍ध होत आहे, यामुळे खतांची कार्यक्षमता वाढण्‍यास मदत होणार आहे. जैविक खते, जैविक किटकनाशके, कामगंध सापळे आदी निविष्‍ठा शेतक-यांपर्यंत पोहचल्‍या पाहिजेत. आज शेतकरी स्‍वत: शेतात अधिकाधिक उत्‍पादन घेत आहे. महाराष्‍ट्रात काही भागात अतिवृष्‍टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, सद्यस्थितीत जमिनीत ओल चांगली असुन रबी हंगामात याचा फायदा होऊ शकतो, असे ते म्‍हणाले.  

अध्‍यक्षीय समारोपात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कोरोना विषाणुच्‍या प्रादुर्भावातही विद्यापीठाचे विस्‍तार कार्य थांबलेले नाही. ऑनलाईन माध्‍यमातुन विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाच्‍या सातत्‍याने संपर्कात आहेत. ऑनलाईन माध्‍यमामुळे विद्यापीठ तंत्रज्ञान केवळ मराठवाडयातील शेतकरी बांधवा पर्यंतच नव्‍हे तर संपुर्ण राज्‍यात तसेच इतर राज्‍यातील मराठी भाषिक भागात पोहचत आहे. परभणी कृषि विद्यापीठ निर्मिती बायोमिक्‍स तसेच जैविक खतांची मागणी वाढत आहे. विद्यापीठात डिजिटल शेती प्रकल्‍प राबविण्‍यात येत आहे. शेतमाल प्रक्रिया व मुल्‍यवर्धन यावर विद्यापीठ काम करित आहे. शेतीतील बारकाव्‍याचा अभ्‍यास करून नवनवीन तंत्रज्ञान देण्‍यासाठी विद्यापीठ कटिबध्‍द आहे. गेल्‍या तीन वर्षापासुन परभणी कृषि विद्यापीठ निर्मित बियाणे, जैविक खते, जैविक किटकनाशके व बुरशीनाशके केवळ परभणी मुख्‍यालयी उपलब्‍ध न करता, विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या मराठवाडयातील कृषि विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, महाविद्यालये येथे उपलब्‍ध करून देण्‍यात आले, या विकेंद्रित विक्री सुविधेस शेतक-यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. रबी पिकांचे विद्यापीठ निर्मित बियाणे सप्‍टेंबर महिन्‍याच्‍या शेवटच्‍या आठवडयात मराठवाडयात विविध ठिकाणी उपलब्‍ध होणार असल्‍याची माहितीही त्‍यांनी दिली.

विशेष अतिथी मा डॉ लाखन सिंग म्‍हणाले की, कोरोना रोगाच्‍या प्रादुर्भाव काळात परभणी कृषि विद्यापीठाने आयोजित केलेल्‍या विविध ऑनलाईन कार्यक्रमास शेतकरी बांधवानी मोठा प्रतिसाद दिला. परभणी विद्यापीठ विकसित तुरीच्‍या बीडीएन ७११ हा वाण मोठया प्रमाणात मराठवाडयातच नव्‍हे तर संपुर्ण राज्‍यात प्रचलित झाला आहे. कृषि विभाग, कृषि विद्यापीठाच्‍या समन्‍वयाने कृषि तंत्रज्ञान विस्‍तार कार्य अधिक गतिमान होत आहे, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.  

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ डि बी देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित विविध रबी पिकांच्‍या वाणाची माहिती देऊन शेतकरी बांधवांनी रब्‍बी हंगामात उगवण शक्‍ती तपासुन स्‍वत:च्‍या घरचे बियाणे वापरण्‍याचा सल्‍ला दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ विणा भालेराव व डॉ प्रविण कापसे यांनी केले तर आभार मुख्‍य शिक्षणाधिकारी डॉ व्‍ही बी कांबळे यांनी मानले.

मेळाव्‍याच्‍या तांत्रिक सत्रात ज्‍वार लागवडीवर डॉ एल एन जावळे, हरभरा लागवडीवर डॉ सी बी पाटील, जवस लागवडीवर डॉ एम के घोडके, करडई लागवडीवर डॉ जी डी गडदे, गहु लागवडीवर डॉ यु एम उमाटे, अतिवृष्‍टीच्‍या पार्श्‍वभुमीवर पीक व्‍यवस्‍थापनावर डॉ व्‍ही पी सुर्यवंशी, ई पीक पाहणी व नोदंणी वर श्री आनंद कदम आदींनी मार्गदर्शन केले तसेच शेतकरी बांधवाच्‍या प्रश्‍नांना विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ एस बी पवार, डॉ के टी आपेट, डॉ ए व्‍ही गुटटे, डॉ व्‍ही पी सुर्यवंशी, डॉ डी डी पटाईत आदींनी उत्‍तरे दिली. ऑनलाईन मेळावा यशस्‍वीतेसाठी नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ अविनाश काकडे, इंजी. रवीकुमार कल्लोजी आदींनी काम पाहिले. मेळाव्‍यास शेतकरी बांधव व कृषि विभागातील कृषि अधिकारी यांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला. 

भारतीय पशुवैद्यक परिषदेचे पशुवैद्यक शास्‍त्रज्ञांची पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेस भेट