Tuesday, November 8, 2022

वनामकृविच्‍या कार्यकारी परिषदेवर नुतन चार सदस्‍यांची नेमणुक

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या कार्यकारी परिषदेवर नुकतेच महाराष्‍ट्र शासनाने नुकतेच चार सदस्‍यांची नेमणुक केली आहे. महाराष्‍ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३ नुसार विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर विद्यापीठाचे माननीय प्रति कुलपती तथा राज्‍याचे कृषिमंत्री मा ना श्री अब्‍दुल सत्‍तार यांनी प्रगतीशील शेतकरी या प्रवर्गातुन परभणी येथील श्री प्रविण देशमुख, सासवड (पुणे) येथील श्री सुरज जगताप, सिल्‍लोड (औरंगाबाद) येथील श्री विठ्ठल सकपाळ, कृषि उद्योजक प्रवर्गातुन हदगाव (नांदेड) येथील श्री भागवत देवसरकर यांची पुढील आदेश होईपर्यंत जास्‍तीत जास्‍त तीन वर्ष कालावधीकरिता करण्‍यात आली आहे. याबाबत नुकतेच राज्‍याच्‍या कृषि मंत्रालयाचे सहसचिवांचे आदेश विद्यापीठास प्राप्‍त झाले आहेत.

Monday, November 7, 2022

वनामकृविच्‍या वतीने संपुर्ण मराठवाडयातील ५० पेक्षा जास्‍त गावात मंगळवारी राबविण्‍यात येणार ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

उपक्रमात विद्यापीठातील १०० पेक्षा जास्‍त तज्ञांचा समावेश असलेल्‍या २५ पथकांचे करण्‍यात आले गठण, उपक्रमांतर्गत शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाशी साधणार संवाद

उपक्रमांतर्गत  कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि मौजे मंगरूळ येथील शेतक-यांच्‍या प्रक्षेत्राला भेट देऊन साधणार संवाद

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रम राबविण्यात येत असुन उपक्रमांतर्गत दिनांक ८ नोव्‍हेंबर रोजी एकाच दिवशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मराठवाडयातील ५० पेक्षा जास्‍त गावात जाऊन शेतकरी बांधवाशी संवाद साधणार आहेत. यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २५ पथके तयार करण्‍यात आली असुन यात १०० पेक्षा शास्‍त्रज्ञांचा समावेश आहे. संपुर्ण दिवसात विद्यापीठ शास्‍त्रज्ञ शेतकरी बांधवाशी संवाद साधुन त्‍यांच्‍या कृषि विषयक समस्‍या जाणुन घेणार असुन शेतकरी बांधवाच्‍या शेतीस भेट देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.

सदरिल उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे मानवत तालुक्‍यातील मौजे मंगरूळ येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रावर भेट देऊन संवाद साधणार आहेत. 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि प्राध्‍यापक गावात जाऊन शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या जाणुन घेणार आहेत, विविध शेती विषयक विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सदर उपक्रमांची सुरूवात दिनांक १ सप्‍टेबर रोजी करण्‍यात आली असुन दिनांक १ सप्‍टेंबर रोजी संपूर्ण मराठवाड्यात ८० विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २२ पथकांनी ६० गावांत तर दिनांक ३ ऑक्‍टोबर रोजी ११५ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २७ पथकांनी ६४ गावांत भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी बांधवांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. सदरिल उपक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्यांने राबविण्यात येत असुन कुलगुरू मा. डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनानुसार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली शास्‍त्रज्ञांची पथके गठित करण्‍यात आली आहेत, अशी माहिती विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी दिली.

Friday, November 4, 2022

मौजे उस्माननगर येथे विद्यापीठ विकसित रब्‍बी ज्‍वारीचे वाणाचे बियाणे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय ज्वार सुधार प्रकल्प - ज्वार संशोधन केंद्राच्‍या वतीने आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत दिनांक ३० ऑक्‍टोबर रोजी मौजे उस्माननगर ता. नांदेड जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांना रब्बी ज्वारीचे बियाणे व कृषि निविष्‍ठांचे वाटप करण्‍यात आले. 

कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तसेच भगवान घोरबांड आणि उपसरपंच भागीरथ घोरबांड प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमास ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एल एन जावळे, रोग शास्त्रज्ञ डॉ. के डि नवगिरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. महमद इलियास, कृषी विद्यावेता श्रीमती प्रीतम भुतडा, डॉ. अरविंद पंडागळे, कापुस कृषिविद्यावेत्ता आणि कृषि सहाय्यक श्री उबाळे व अर्जुन घोरबांड आदी उपस्थित होते.

रब्‍बी ज्‍वारीचे विद्यापीठ विकसित वाण परभणी सुपर मोती, परभणी शक्ती, परभणी मोती, परभणी ज्योती आदींचे बियाणे तर बीज प्रक्रियेसाठी गाउचू, ट्रायको बूस्ट आणि ट्रायको कार्डचे वाटप संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते करण्यात आले.

मार्गदर्शनात डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, येणारे वर्ष २०२३ हे जागतिक पातळीवर भरड धान्य वर्ष म्‍हणुन साजरे केले जाणार असुन जगाला भरड धान्‍याचे महत्‍व लक्षात आले आहे. भारतीय शेतीत मोठा प्रमाणात भरड धान्‍य घेतली जातात, परंतु गेल्‍या काही वर्षात भरड धान्‍य लागवडी खालील क्षेत्र कमी झाले आहे. हे क्षेत्र वाढीकरिता प्रयत्‍न केला जात असे सांगुन त्‍यांनी ज्वारीचे आहारातील महत्‍व, त्याबरोबरच विद्यापीठ संशोधनाबाबत माहिती दिली.

प्रास्‍ताविकात डॉ. एल एन जावळे यांनी सुधारित वाणांविषयी माहिती दिली. डॉ. नवगिरे यांनी ट्रायको बूस्ट  व जैविक रोग नियंञण या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. इलियास यांनी कीड, ट्रायको कार्ड व एकात्मीक किड व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. सुत्रसंचालनात श्रीमती प्रीतम भुतडा यांनी आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक योजनेबद्दल माहिती दिली तर आभार डॉ. अरविंद पंडागळे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Wednesday, November 2, 2022

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कार जाहीर

ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने देण्‍यात येणारा कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्काराकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयचे विद्यार्थी विशाल कुलकर्णी, अभयराज परमार आणि सिध्दानाथ बिरादार यांची निवड करण्यात आली असुन पुरस्काराच्या निवडीबद्दल कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. उदय खोडके, समन्वय अधिकारी डॉ. प्रमोदिनी मोरे आदीसह विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.

कृषिक्षेत्रात शिक्षण घेत असताना कृषि विस्तार, कृषि संशोधन, सामाजिक ग्रामविकास आदी क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सदर पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने कृषीशिक्षण घेणाऱ्या व या क्षेत्रात  नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव कृषीथॉनमध्ये केला जातो, या पुरस्कारांची घोषणा कार्यक्रमाचे संयोजक संजय न्याहारकर यांनी केली. कृषीक्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतीविषयक नवीन संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कृषी पदवीधरांची भूमिका महत्‍वाची असुन अशा उपक्रमातून त्यांना प्रेरणा मिळावी कृषी विकासामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची मानसिकता तयार करण्याचे काम करत असताना कृषीक्षेत्रात आदर्शवत कार्य व्हावे,  हा यामागील मुख्य हेतू आहे.

विशाल कुलकर्णी

अभयराज परमार

Monday, October 31, 2022

स्‍व. इंदिरा गांधी आणि स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्‍या स्‍मृतीस विनम्र अभिवादन

माजी पंतप्रधान भारतरत्‍न स्‍व. इंदिरा गांधी यांची पुण्‍यतिथी आणि प्रथम गृहमंत्री लोहपूरुष स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक ३१ ऑक्‍टोबर रोजी विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते माजी पंतप्रधान भारतरत्‍न स्‍व. इंदिरा गांधी आणि स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्‍पहार अपर्ण करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. यावेळी स्‍व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून पाळण्यात येऊन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज  आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Monday, October 24, 2022

मौजे ब्रम्‍हपुरी येथे विद्यापीठ विकसित रब्‍बी ज्‍वारीचे वाणाचे बियाणे वाटप

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय ज्वार सुधार प्रकल्प - ज्वार संशोधन केंद्राच्‍या वतीने आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत दिनांक २४ ऑक्‍टोबर रोजी मौजे ब्रम्‍हपुरी येथील शेतकरी बांधवांना रब्बी ज्वारीचे बियाणे व कृषि निविष्‍ठांचे वाटप करण्‍यात आले.

कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते तर मंडळ कृषी अधिकारी श्री गायकवाड, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एल एन जावळे, रोग शास्त्रज्ञ डॉ.के डि नवगिरे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. महमद इलियास, कृषी विद्यावेता श्रीमती प्रीतम भुतडा, कृषी सहाय्यक श्री नदीम सय्यद, श्री अमोल चव्हाण आदींची उपस्थिती होती.

रब्‍बी ज्‍वारीचे विद्यापीठ विकसित वाण परभणी सुपर मोती, परभणी शक्ती, परभणी मोती, परभणी ज्योती आदींचे बियाणे तर बीज प्रक्रियेसाठी गाउचू, ट्रायको बूस्ट आणि ट्रायको कार्डचे वाटप संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर यांच्‍या हस्‍ते करण्यात आले.

मार्गदर्शनात डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, येणारे वर्ष २०२३ हे जागतिक पातळीवर भरड धान्य वर्ष म्‍हणुन साजरे केले जाणार असुन जगाला भरड धान्‍याचे महत्‍व लक्षात आले आहे. भारतीय शेतीत मोठा प्रमाणात भरड धान्‍य घेतली जातात, परंतु गेल्‍या काही वर्षात भरड धान्‍य लागवडी खालील क्षेत्र कमी झाले आहे. हे क्षेत्र वाढीकरिता प्रयत्‍न केला जात असे सांगुन त्‍यांनी ज्वारीचे महत्त्व आहारातील महत्‍व, ज्‍वारी प्रक्रिया उद्योग आणि युवकांसाठी स्वयम उद्योग उभारणी यावर मार्गदर्शन केले.

प्रास्‍ताविकात डॉ. एल एन जावळे यांनी सुधारित वाणांविषयी माहिती दिली. डॉ. नवगिरे यांनी ट्रायको बूस्ट चा वापर व पिकांवरील रोगांविषयी मार्गदर्शन केले तर डॉ. इलियास यांनी कीड, ट्रायको कार्ड व गाऊचु या निविष्ठेविषयी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालनात श्रीमती प्रीतम भुतडा यांनी आद्य रेषीय पीक प्रात्यक्षिक योजनेबद्दल माहिती दिली तर आभार श्री गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.

Monday, October 17, 2022

दिल्‍ली येथे आयोजित प्रधानमंत्री किसान सम्‍मान संमेलनाच्‍या थेट प्रक्षेपणाचा शेतकरी बांधवानी घेतला लाभ

वनामकृविच्‍या वतीने पाच ठिकाणी करण्‍यात आले होती थेट प्रक्षेपणाची सुविधा 


पुसा (नवी दिल्‍ली) येथील भारतीय कृषी संशोधन संस्‍थेत केंद्र सरकारच्‍या कृषि आणि शेतकरी कल्‍याण मंत्रालयाच्‍या वतीने दोन दिवसीय पीएम किसान सन्‍मान संमेलन २०२२ चे दिनांक १७ ऑक्‍टोबर रोजी पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांच्‍या ह्रस्‍ते उदघाटन झाले. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात ठेवण्‍यात आले होते. तसेच विद्यापीठांतर्गत असलेल्‍या औरंगाबाद, तुळजापुर, बदनापुर आणि खामगांव येथील कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी बांधवाना थेट प्रक्षेपण पाहण्‍याची सोय करण्‍यात आली होती. यात १८९५ व्‍यक्‍तींनी सहभाग नोंदविला, यात शेतकरी बांधव, महिला शेतकरी, विद्यापीठातील अधिकारी, शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्‍यां याचा समावेश होता.

संपुर्ण देशातुन या कार्यक्रमाचा लाभ विविध संस्‍थांमधुन एक कोटीहुन अधिक शेतकरी या कार्यक्रमाला आभासी पध्‍दतीने उपस्थित होते. यात संशोधक, धोरणकर्ते आणि इतर कृषिशी निगडीत भागधारकांचा समावेश होता. रसायने आणि खते मंत्रालयाच्‍या अंतर्गत ६०० पंतप्रधान किसान समृध्‍दी केंद्राचे उदघाटन माननीय पंतप्रधान यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. या योजनेंतर्गत देशातील खतांची किरकोळ दुकाने टप्‍प्‍याटप्‍प्‍याने या योजनेमध्‍ये रूपांतरित केली जाणार आहे. याव्‍दारे शेतक-यांच्‍या विविध प्रकारच्‍या गरज पुर्ण करण्‍यात येणार आहे. यावेळी पंतप्रधानांच्‍या हस्‍ते शेतक-यांच्‍या कल्‍याणासाठीच्‍या पंतप्रधान सन्‍मान योजने च्‍या १२ व्‍या हप्‍त्‍याचे १६००० कोटी रूपये डिबीटी व्‍दारे वितरित करण्‍यात आले. कार्यक्रमात पंतप्रधान भारतीय जन उर्वरक परियोजना एक देश एक खत योजनेचेही उदघाटन केले.

मार्गदर्शनात माननीय पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी म्‍हणाले की, किसान समृद्धी केंद्र हे केवळ शेतकर्‍यांसाठी खत खरेदी-विक्रीचे केंद्र नाही, तर शेतकर्‍यांना नाते दृढ करणारी केंद्र असुन प्रत्येक गरजेच्या वेळी मदत करणारे केंद्र आहे. वन नेशन, वन खतामुळे शेतकऱ्याची सर्व प्रकारच्या संभ्रमावस्थेतून सुटका होणार आहे आणि चांगले खतही उपलब्ध होणार असल्‍याचे ते म्‍हणाले.   

परभणी कृषि महाविद्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात व्‍यासपीठावर शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य उदय खोडके, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, कृषि अधिकारी श्री बी एस कच्‍छवे आदींची उपस्थिती होती. यावेळी शेतकरी प्रतिनिधी म्‍हणुन श्री नरहरी शिंदे, श्री गंगाधर शिंदे, महिला शेतकरी श्रीमती अनुराधा कटारे यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. कार्य्रक्रमाचे प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर यांनी विद्यापीठ विकसित विविध वाणांची माहिती देऊन शेतकरी बांधवानी शेती पुरक व्‍यवसाय करण्‍याचे आवाहन केले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञ डॉ गजानन गडदे , डॉ डि के पाटील यांनी रबी पीक लागवड तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले तर श्री बी एस कच्‍छवे यांनी कृषि विभागाच्‍या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ प्रशांत देशमुख यांनी केले तर आभार डॉ गजानन गडदे यांनी मानले.