Tuesday, September 3, 2024

अतिवृष्टीच्या दरम्यान खरीप पिकांची घ्यावयाची काळजी.....!


मागील दोन ते तीन दिवसात सतत पाऊस झाल्याने बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर व हळद यावर पिकांवर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. अशा परीस्थीतीत शेतामध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ताबडतोब या पिकांमधील अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच खालील नमुद केलेल्या उपाय प्रमाणे सोयाबीन, कापूस, तुर  व हळद पिकामधील अतिवृष्टी नंतर पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतकरी बंधुंनी अवलंबावे. असे आवाहन माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवर आणि विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ. जी.डी गडदे, डॉ. डी डी पटाईत आणि श्री एम बी मांडगे यांनी केले आहे.

सोयाबीन :

सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे आणि जमीनीत पाणी साचल्यामुळे पिकांना मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याची क्रिया मंदावली आहे. अशा परिस्थीतीमध्ये सर्व प्रथम शेतामधून अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा. या वातावरणामध्ये शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. गोगलगायीच्या नियंत्रणाकरीता दाणेदार मेटाल्डीहाईड हे गोगलगायनाशक 2 किलो प्रति एकर याप्रमाणे शेतामध्ये, बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरवून द्यावे.

सध्या सर्वत्र सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे... सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या, शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा तसेच खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर खालीलपैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी..

१.     क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5% - 60 मिली (3 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर किंवा

२.     इंडाक्झाकार्ब 15.8% - 140 मिली (7 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर किंवा 

३.     असिटामाप्रीड 25%+ बाईफैंन्थ्रीन 25% -100 मिली (5 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रति एकर किंवा 

४.      क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.30% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 4.60% - 80 मिली (4 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर किंवा     आयसोसाक्लोसिरम 9.2 % - 240 मिली (12 मिली प्रति 10 लिटर पाणी) प्रती एकर

तसेच येणाऱ्या काळात शेंगा करपा, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, चारकोल रॉट आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन टेब्युकोनॅझोल 10 %+ सल्फर 65 % (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 500 ग्रॅम प्रति एकर (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा टेब्युकोनॅझोल 25.9 % -250 मिली ( 12.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 20 % - 150  ते 200 ग्रॅम ( 7.5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन 13.3 %+ इपिक्साकोनाझोल 5 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) -300 मिली ( 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात ) प्रति एकर फवारावे.

याबरोबरच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स किंवा  ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी युक्त औषधाची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी. 

कपाशी :

कापूस पिकामध्ये अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी शेतात प्रत्येक एक ओळ सोडून लहान चर काढावेत. शक्य असेल तिथे वापसा येताच कोळपणी व खुरपणी करावी. आकस्मिक मर किंवा मूळकूज दिसू लागल्यास 200 ग्रॅम युरिया+ 100 ग्रॅम पांढरा पोटॅश (00:00:50 खत ) + 25 ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराईड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति झाड 100 मिली याप्रमाणे आळवणी करावी. या प्रमाणे द्रावणाची आळवणी केल्यानंतर सुकू लागलेल्या झाडाजवळची माती पायाने लवकरात लवकर दाबून घ्यावी. वरील सर्व उपाययोजना शेतामध्ये झाडे सुकू लागलेली दिसताच लवकरात लवकर म्हणजे २४ ते ४८ तासाच्या आत कराव्यात जेणेकरून पुढील होणारे मोठे नुकसान वेळीच टाळता येईल.

पिकाची वाढ पुर्ववत होऊन पाते लागण होण्यासाठी पिक 60 दिवसाचे झाल्यावर नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. त्यासाठी  कोरडवाहू कपाशीकरीता 31 किलो तर बागायती कपाशीकरीता 51 किलो निमकोटेड यूरीया प्रति एकरी द्यावा. कापूस सध्या पाते व बोंडे अवस्थेत असल्यास आणि अशा परिस्थितीत जर नैसर्गिक पातेगळ होत असेल तर याच्या नियंत्रणाकरीता एनएए या संजीवकाची 40 मिली प्रति 180 लिटर पाणी या प्रमाणे प्रति एकरी किंवा 2.5 मि.ली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी यामुळे नैसर्गिक पातेगळ थांबण्यास मदत होते. बोंडाना चिकटून राहिलेल्या सुकलेल्या पाकळ्या शक्यतो हाताने काढून टाकाव्यात. त्याठिकाणी ओलसरपणा राहून रोगकारक तसेच संधिसाधू जिवाणू व बुरशींची वाढ होणार नाही.  पात्या, फुले आणि बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत विशेषतः रस शोषक किडी व ढेकणांच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून वेळीच उपाययोजना कराव्यात. सध्याच्या अवस्थेत सततचे ढगाळ वातावरण, हवेतील अति आर्द्रता व रिमझिम पाऊस राहिल्यास खबरदारीचा उपाय म्हणून आंतरिक बोंड सड रोगाच्या व्यवस्थापनासाठी, कॉपर ऑक्सिक्लोराइड 50 % - 25 ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. (ॲग्रेस्को शिफारस)

बोंडाच्या पृष्ठभागावर होणारा बुरशीचा संसर्ग रोखण्यासाठीपायराक्लोस्ट्रोबीन 20 % - 10 ग्रॅम किंवा मेटीराम 55% + पायराक्लोस्ट्रोबीन 5% (पूर्व मिश्रित बुरशीनाशक)- 20 ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल 25% - 10 मिली किंवा ॲझोक्सिस्ट्रॉबीन 18.2 %  + डायफेनोकोनॅझोल 11.4 % (पूर्व मिश्रित बुरशीनाशक) - 10 मिली किंवा प्रोपीनेब 70 % - 25 ते 30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी

आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.

तुर :

तुर हे पीक जास्त पाऊसास संवेदनशील आहे. म्हणूनच तुरीच्या शेतातील साचून राहीलेले पाणी ताबडतोब शेताबाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. तुर पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यास मर ग्रस्त झाडे काढून टाकावीत व त्याठिकाणी तसेच चारही बाजूनी एक मिटर अंतरावर कार्बेडेंझीम 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात आळवणी करावी. तसेच जिथे कुठे मर रोगाची सुरूवात होत असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम अधिक युरीया 200 ग्रॅम अधिक पांढरा पोटॅश 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात घेवून झाडांच्या मुळांना प्रति झाड 100 मिली द्यावे. तसेच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मीत बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची 4 किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी. 

हळद: 

सध्याच्या वातावरणामध्ये हळदीवर कंदमाशी या किडीचा आणि पानावरील ठिपके, करपा व कंदकुज सारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे तरी शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.

कंदमाशीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक 15 दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस 25% प्रवाही- 400 मिली (20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा डायमिथोएट 30% प्रवाही- 300 मि.ली. (15 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका कीटकनाशकाची प्रति एकर या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस 50 टक्के 1 लिटर (50 मिलि प्रति 10 लिटर पाण्यात)  घेऊन प्रति एकरी या प्रमाणात आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी. पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापनासाठी करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.

रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.

प्रादुर्भाव कमी असल्यास -

कार्बेडेंझीम 50 टक्के - 400 ग्रॅम (20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा मॅन्कोझेब 75 टक्के -500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड 50 टक्के - 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

प्रादुर्भाव जास्त असल्यास

एजोक्सिस्ट्रोबीन 18.2 टक्के + डायफेनोकोनॅझोल 11.4 टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा प्रोपीकोनॅझोल 25 टक्के - 200 मिली (10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा क्लोरथॅलोनील 75 टक्के - 500 ग्रॅम (25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी* प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.

कंदकूज झाली असल्यास जमिनीतून

कार्बेडेंझीम 50% -200 ग्रॅम (10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा

मॅन्कोझेब 75 टक्के -600 ग्रॅम (30 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात) किंवा

कॉपर ऑक्झीक्लोराइड 50 टक्के -1000 ग्रॅम (50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात)

यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकरी या प्रमाणात दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी.

(आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.) (संदर्भ: हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली)

सर्व पिकांमध्ये फवारणी करताना घ्यावयाची विशेष काळजी:- 

-          कुठलीही फवारणी करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी

-          वरील कीटकनाशका सोबत कुठल्याही प्रकारचे इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य खते,सूक्ष्म मूलद्रव्ये अथवा रसायने मिसळू नये.

-          लागोपाठ एकच एक कीटकनाशक फवारू नये

-        फवारणी करिता दुषित पाणी न वापरता स्वच्छ पाणी वापरावे आणि पाण्याचे प्रमाण शिफारसितच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही*

-          किडनाशके फवारणी करताना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी*

अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी दूरध्वनी क्रमांक ०२४५२ २२९००० किंवा व्हाट्सॲप क्रमांक ८३२९४३२०९७  यावर संपर्क करावा.












वनामकृवि संदेश क्रमांक – ०/२०२४ (०३ सप्टेंबर २०२४)

Monday, September 2, 2024

अन्नतंत्र महाविद्यालयात माजी विद्यार्थी स्नेहमिलन मेळावा

माजी विद्यार्थ्यांना प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस म्हणून सहभागी करुन घेण्यात येईल.... कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अन्नतंत्र महाविद्यालयातील १९९० ते १९९४ दरम्यान शिक्षण घेत असलेल्या बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा दिनांक ३१ ऑगस्ट रोजी स्नेहमिलन मेळावा महाविद्यालयात आयोजीत करण्यात आला होता. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांची भेट घेतली व माजी विद्यार्थ्यांतर्फे मेरिको इंडस्ट्रिजचे विभाग प्रमुख डॉ. प्रबोध हळदे, पुणे येथील नेक्स्टऑन फुड्स प्रा.लि.चे उद्योजक श्री. धनंजय कुलकर्णी, नवी मुंबई येथील अद्वैत ॲग्रो अँड फुड इंग्रेडीयंट्सचे श्री. महेंद्र इंगळे आणि नागपुर येथील हल्दीरामचे मॅनेजर (ऑपरेशन्स) श्री. प्रदिप देशमुख यांनी मा. कुलगुरु यांचा सत्कार केला. तसेच माजी विद्यार्थ्यांचेही कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांनी स्वागत केले. मा. कुलगुरु यांनी माजी विद्यार्थ्यांसोबत मराठवाड्यातील शेतक-यांच्या हिताच्या दृष्टिकोणातून अन्नप्रक्रिया उद्योकांशी निगडीत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी बोलताना कुलगुरू म्हणाले की, अन्नतंत्र महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा अन्नप्रक्रिया व तत्सम उद्योगातील प्रदिर्घ, व्यापक आणि मोठा अनुभव लक्षात घेता, त्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार अभ्यास प्राध्यापक (प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस) या उपक्रमाअंतर्गत सहभागी करुन घेण्यात येवून त्यांच्या उद्योगातील अनुभवाचा अन्नतंत्र व प्रक्रियाशी निगडीत पदवी व पदव्युत्तर स्नातकांना मोलाचे मार्गदर्शन प्राप्त होईल. या ज्ञानाचा "उद्योग व शैक्षणिक संस्था" यातील संबंध अधिक दृढ होण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी श्री धनंजय कुलकर्णी यांनी टोमॅटोचा कृमी मुक्त वाण विकसीत करण्याकरीता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासोबत सामंजस्य करार (MoU) करुन सहकारी तत्वावर (Contract farming) विविध फळ भाजीपाल्याची लागवड करता येईल असे प्रतिपादन केले. या भेटीदरम्यान संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद ईस्माईल, प्राचार्य डॉ. विश्वनाथ खंदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक  हेमंत देशपांडे, डॉ. प्रविण घाटगे, डॉ. स्मिता सोलंकी यांची उपस्थिती होती.

अन्न तंत्र महाविद्यालयामध्ये अन्नप्रक्रिया व तत्सम उद्योगातील प्रथीत यशप्राप्त उद्योजक व बहुराष्ट्रीय अन्नप्रक्रिया उद्योगातील विविध कार्यकारी पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयातर्फे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद ईस्माईल व अन्नतंत्र महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी सत्कार केला. माजी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच पदवी व पदव्यूत्तर आणि आचार्य विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी आपला परिचय देऊन व्यावसायीक, शैक्षणिक वाटचाल व जडण घडणीत या महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे अशा भावना व्यक्त केल्या. तसेच सर्वांनी मार्गदशनपर उद्बोधन करुन अन्नप्रक्रिया व तत्सम उद्योगातील व्यावसायीक संधी मिळवुन देण्याचे आश्वासीत केल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते महाविद्यालयात वृक्षारोपन करण्यात आले.



Sunday, September 1, 2024

कृषी आणि संलग्न अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत केंद्रनिहाय (जागेवरील) प्रवेश फेरीची प्रक्रिया दिनांक ५ सप्टेंबर पर्यंत

 कृषी शिक्षणात उज्वल भविष्यासाठी अनेक संधी.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

कृषी आणि संलग्न अभ्यासक्रमाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीभूत केंद्रनिहाय (जागेवरील प्रवेश) प्रवेश फेरीची प्रक्रिया सुरू असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रवेश प्रक्रिया केंद्रास विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी दिनांक १ सप्टेंबर रोजी भेट दिली व प्रवेश प्रक्रियेचे अवलोकन केले. या वेळी सहयोगी अधिष्ठाता तथा प्रवेश प्रक्रिया समिती अध्यक्ष डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, प्रवेश प्रक्रिया समितीचे सदस्य सचिव डॉ. डी.के. झाटे आदींची  उपस्थिती होती.    

यावेळी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ देशातील आणि महाराष्ट्रातील नामांकित विद्यापीठ असून विद्यापीठाने अनेक क्षेत्रात भरारी घेतलेली असून विद्यापीठाद्वारे कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन या कृषी आणि कृषी संलग्न शाखेमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीचे शिक्षण दिले जाते. त्यांनी या अभ्यासक्रमाच्या महत्त्वाबद्दल आणि संधींबद्दल माहिती देताना, कृषी हे एक प्रमुख क्षेत्र आहे जे भारताच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. कृषी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना कृषी तंत्रज्ञान, शेती व्यवस्थापन, पशुपालन, फळबागा, मत्स्यपालन इत्यादी विषयांवर सखोल ज्ञान प्राप्त होते. हे शिक्षण ग्रामीण विकास, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, आणि अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात मदत करते. तसेच कृषी शिक्षणातून विद्यार्थ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळते, ज्यामुळे ते अधिक उत्पादनक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धतीने शेती करू शकतात आणि उत्तम पद्धतींची माहिती मिळाल्याने त्याचा वापर करून शेतीची उत्पादन क्षमताही वाढते. तसेच कृषी शिक्षणामुळे ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यातून ग्रामीण भागातील लोकसंख्येचे जीवनमान उंचावण्यास मदत करते.

याबरोबरच कृषी शिक्षणात उज्वल भविष्यासाठी अनेक संधी आहेत. विद्यार्थी शेतीतील संशोधनात करिअर करू शकतात, ज्यातून नवे तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळते. कृषी आणि संलग्न शाखेतील सर्व आभ्यासक्रमास व्यवसायिक आभ्यासक्रम म्हणून मान्यता आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना अन्न प्रक्रिया, जैविक शेती, कृषी व्यापार, यंत्र निर्मिती, सेवा व शेती तांत्रिक सल्लागार, आहार तज्ञ, वस्त्र उद्योग, समुपदेशक, अशा विविध प्रकारच्या क्षेत्रांत व्यवसायिक संधी आहेत. यामध्ये शासकीय सेवेमध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या विविध संस्था, कृषी आणि पशुसंवर्धन विभाग, कृषि विद्यापीठे, या क्षेत्रात तांत्रिक शासकीय नोकऱ्या तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या व इतर स्पर्धात्मक परीक्षेमध्ये भव्य यश मिळण्यासाठी मोठ्या संधी आहेत. आजपर्यंत या विद्यापीठाचे विद्यार्थ्यां महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय सेवेत महत्वाच्या पदावर आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. यातून विद्यार्थ्यांना सामाजिक योगदान देण्याचीही संधी मिळते. असे हे कृषी आणि संलग्न शिक्षण आपल्या विभागाच्या आणि एकूणच देशाच्या समग्र विकासासाठी आणि शाश्वत कृषी विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. म्हणून प्रवेशासाठी आलेल्या तसेच अंतिम यादीतील सर्व  पात्र विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना कृषी व संलग्न अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. 

या सर्व अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दिनांक ३० ऑगस्ट पासून सुरू असून केंद्रीभूत केंद्रनिहाय (जागेवरील प्रवेश) प्रवेश फेरीचा प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा द्वारे शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये कृषी व कृषी संलग्न अभ्यासक्रमासाठी प्रकाशित अंतिम गुणवत्ता यादीमध्ये आपले नाव असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी विद्यापीठाचे पदवी प्रवेश केंद्र कृषी महाविद्यालय परभणी येथे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील तर कृषी महाविद्यालय लातूर येथे लातूर, बीड व धाराशिव या जिल्ह्यातील तसेच कृषी महाविद्यालय बदनापूर येथे जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व घटक व विनाअनुदानित महाविद्यालयांच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश फेरी राबविली जात आहे. याकरिता दिनांक ३ सप्टेंबर रोजी  ३५  व त्यापेक्षा अधिक पर्सेंटाइल  (इतर अधिभारासह) तर दिनांक ४ सप्टेंबर रोजी सर्व पात्र उमेदवार आणि दिनांक ५ सप्टेंबर रोजी सर्व पात्र उमेदवार (जागांच्या रूपांतरासह) यांना बोलावले आहे. उमेदवारांनी https://agri2024.mahacet.org या संकेतस्थळावर भेट देऊन शाखानिहाय व महाविद्यालयनिहाय रिक्त जागांचा तपशील पहावा आणि संबंधित महाविद्यालयाच्या जिल्ह्याच्या केंद्रामध्ये दिनांक ३, ४ आणि ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत नोंदणी करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे व आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन पुनश्च एकदा विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले.




वनामकृवि मराठवाड्यात अपारंपरिक फळबागांचा विकास आणि आधुनिक फळ शेतीसाठी प्रयत्नशील

 शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ आणि कृषि विभाग एकत्र... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभाग आणि राज्य शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्रात दिनांक ३१ ऑगस्ट रोजी अपारंपरिक आणि महत्त्वाची उद्यान पिके व्यवस्थापनावर विचारमंथन कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते. या सत्रासाठी प्रमुख अथिती केंद्रीय फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार हे होते तर विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, प्रभारी अधिकारी डॉ. जी एम वाघमारे, केंद्रीय प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पाटील आदींची उपस्थिती होती.      

अध्यक्षीय भाषणात बोलताना कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी सांगितले की, मराठवाड्यात  कोरडवाहू शेती क्षेत्र हे अधिकचे असून, येथील फळबागांची लागवड एक आव्हानात्मक कार्य आहे. मराठवाड्यातील पारंपरिक फळबागा शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, कमी पाण्यावर येणाऱ्या देशातील इतर राज्यांमध्ये आणि जगभरात होत असलेल्या आधुनिक फळ पिकांना तसेच सीताफळ, पेरू यांसारख्या फळझाडांची लागवड वाढवून मराठवाड्यात पारंपरिक फळ बागांचा विकास आणि आधुनिक फळ शेतीसाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. मराठवाड्यातील फळबागांसाठी नव्या संधी आहेत. मराठवाडा ही संतांची भूमी असून या भूमीत आधुनिक फळ शेती आणण्यासाठी शेतकरी,  कृषि विद्यापीठ आणि राज्याचा कृषि विभाग एकत्रितपणे कार्य करत आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधुनिक फळ शेतीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. विद्यापीठास प्राप्त मुख्यमंत्री निधीतून अंबाजोगाई येथे सीताफळावर प्रक्रिया केंद्र स्थापन करण्यात येईल, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होईल असे त्यांनी प्रतिपादन केले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी केंद्रीय फलोत्पादन आयुक्त डॉ. प्रभात कुमार यांनी शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या अपारंपारिक फळझाडांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनांचा योजनांमध्ये समावेश केला जाईल अशी महत्त्वाची घोषणा विचारमंथन कार्यक्रमात केली. महाराष्ट्र राज्य विविध फळांच्या लागवडीसाठी ओळखले जाते. येथील शेतकरी उपक्रमशील असून, त्यांनी अपारंपारिक फळझाडांची लागवड केली आहे. डॉ. कुमार यांनी शेतकऱ्यांच्या या नावीन्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले आणि ते योजनेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी पुढे सांगितले की, भारतातील फळशेतीत विविधता आहे. देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळे घेतली जातात, ज्यामुळे आपल्या देशात फळांची मोठी विविधता निर्माण झाली आहे. तसेच, देशातील दळणवळण व्यवस्थेमुळे एका भागातील फळे दुसऱ्या भागात सहजपणे उपलब्ध होतात. त्यांनी सांगितले की, दरवर्षी फळबागांच्या क्षेत्रात वाढ होत असून, या क्षेत्रातून शेतकरी नक्कीच समृद्ध होणार आहेत.

प्रास्तविकात संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी, मराठवाड्यातील फळबागांचे क्षेत्र वाढविण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी कार्य सुरू आहे. जमिनीच्या गुणधर्मानुसार फळझाडांची लागवड केली तर भविष्यातील समस्या टाळता येतील, असे नमूद केले.

विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेती उत्तम असल्याचे सांगितले. विविध पिकांसोबत फळझाडेही बहरत असल्याचे त्यांनी नमूद केले. परंतु, नाविन्यपूर्ण फळझाडांची रोपे महागडी असल्याने शेतकऱ्यांना केंद्रीय स्तरावरून पाठबळ देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

उद्घाटन सत्रानंतर दिवसभर राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्राच्या अधिकाऱ्यांनी ड्रॅगन फ्रूट, अवोकॅडो , खजूर, अंबा लागवड, व्यवस्थापन आणि प्रक्रिया व विक्री या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच काढणीपश्चात नुकसान कमी करण्यासाठी आणि मूल्यवर्धित उत्पादनांची वाढ करण्यासाठी समुदाय किंवा क्लस्टर प्रक्रिया युनिट्स स्थापन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले गेले. संरक्षित शेती आणि उर्ध्वगामी शेती यासारख्या संकल्पनांवर डॉ. मुरतुझा हसन यांनी चर्चा केली, तर अपेडा मुंबईच्या डॉ. नागपाल लोहकरे यांनी चांगल्या विपणनासाठी, ब्रँडिंग, थेट ग्राहकांना विक्री, आणि हॉर्टनेट प्लॅटफॉर्मद्वारे निर्यातीसाठी शेतनोंदणीसारख्या बाबी विशद केल्या तसेच डॉ. अनंत जावळे यांनी खजूर लागवड आणि डॉ दिनेशकुमार यांनी फळ पिकांचे मूल्यवर्धन याबाबत माहिती  सांगितली.

परिषदेचा समारोप डॉ. मधुकर पोतदार, डॉ. पी.के. सिंह, डॉ. प्रकाश त्रिपाठी, आणि डॉ. डी.एम. पंचभाई यांनी मराठवाड्यातील फलोत्पादन क्षेत्राला बळकटी देणे, शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देणे, आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उपजीविकेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने महत्वपूर्ण शिफारशी देवून करण्यात आला.

सूत्रसंचालन डॉ. सुरेखा कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सेवा निवृत्त कृषि शास्त्रज्ञ डॉ मोहन पाटील आणि विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञ डॉ राकेश अहिरे, डॉ सूर्यकांत पवार डॉ दीपक पाटील डॉ किरण जाधव डॉ पंडित मुंडे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, उद्यान विद्या बिभागाचे सर्व शास्त्रज्ञ, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य विद्यार्थी तर कृषी विभागाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, सुभाष आघाव, व्यंकट ठक्के, ज्ञानेश्वर तारगे, बाळराजे मुळीक आदी उपस्थित होते. तसेच शेतकरी बांधवांत छत्रपती सभजीनगर  आणि जालना जिल्ह्यातील निवडक फळ शेती करणारे शेतकरी यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. रवी नैनवाड, डॉ. विजय सावंत आणि श्री सुरडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.