Saturday, August 14, 2021

ग्रामीण महिलांकरिता उपयुक्त गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबत ऑडियो कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

शास्त्रज्ञांनी ग्रामीण महिलांशी साधला संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प गृहविज्ञान, रिलायन्स फाउंडेशन ग्रुप आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्ह्यातील मिरखेल आणि नांदखेडा या गावच्या महिलासाठी नुकतेच दोन दिवसीय ऑडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पच्या शास्त्रज्ञांनी ग्रामीण महिलांकरिता उपयुक्त गृहविज्ञान तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ऑडिओ कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते.

मौजे मिरखेल तालुका पूर्णा येथील महिलांनी प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला. प्रकल्पाद्वारे महिलांसाठी श्रम व वेळ बचतीची शेती कामांमधील अनेक साधने विकसित केलेली आहेत, यांच्या वापराबाबत डॉ. जयश्री रोडगे यांनी मार्गदर्शन केले तर वस्त्र व परिधान अभीकल्पना विभागाच्या मार्फत शेती कामांमध्ये विशेषतः पीकावर कीटकनाशक, रोगनाशक तसेच तणनाशकांची फवारणी करताना विविध प्रकारचे वस्त्र यांमध्ये कोट घरच्या घरी कसा तयार करावा आणि त्याचा आवर्जून फवारणी करताना वापर करावा याबाबत प्रकल्पाच्या घटक सामन्विका डॉ. सुनिता काळे यांनी मार्गदर्शन केले. कोरोना काळात विविध व्यवसायातील समस्या आणि त्याचे निराकरण यावर बोलताना डॉ शंकर पुरी यांनी टिकाऊ वस्तू किंवा दिर्घकाळ टिकणा–या वस्तूंमध्ये गुंतवणूक करून आपला व्यवसाय उभारावा असे स्पष्ट केले. मिरखेल येथून सहभागी झालेल्या महिलांमधून पार्वती विष्णू घोंगडे यांनी कोरोना मधील आहार व काळजी कशी घ्यावी, मीना कनकुटे यांनी बचत गटांमध्ये रोजगार निर्मितीच्या नवीन संधी, छाया कनकुटे  यांनी आहार कसा असावा तर ज्योती चौरे यांनी महिलांचे काबाडकष्ट कमी करण्यासाठी उपाययोजना याबाबत शास्त्रज्ञांनी त्यांचे शंका समाधान केले.

मौजे नांदखेडा तालुका परभणी येथील महिलांशी संवाद साधताना मानव विकास व कौटुंबिक अभ्यास या विषयाच्या शास्त्रज्ञा प्रा. नीता गायकवाड यांनी कोरोना महामारी मध्ये कुटुंबाविषयी महिलांची जबाबदारी आणि मानसिक स्वास्थ्य यावर संबोधताना प्रत्येकाने आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन  प्राणायाम, ध्यानधारणा करावी  आणि ज्या कार्यामध्ये आनंद मिळतो ते कार्य जास्तीत जास्त करावे व स्वतःला त्यात गुंतवून ठेवावे  असा सल्ला दिला तर शारीरिक स्वास्थ्यासाठी योग्य आहार यावर माहिती देताना अन्नशास्त्र व पोषण विभागाच्या संशोधन सहाय्यक ज्योत्स्ना नेर्लेकर यांनी  प्रकल्पांतर्गत विकसित विविध पोषक पदार्थ बनविण्यासाठी लागणारे साहित्य, पाककृती  व त्याचा स्वास्थ्यासाठी उपयोग याबाबत माहिती देऊन लोह समृध्द आवळा-राजगिरा मिक्स टॉफीज यांचे सेवन करण्याचे आवाहन केले  

नांदखेडा येथील महिला अनिता पेरके, पार्वतीबाई, त्रिवेणी वटाणे, अश्विनी आदने, दिपाली वल्लमवाड,  अनिता देशमुख, शालुबाई पूरणवाड आणि सविता वाटाणे यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधतांना दररोज आहार कसा असावा तसेच विविध आरोग्याच्या समस्या आणि मानसिक स्वास्थ्याच्या समस्या याबरोबरच उद्योगव्यवसायाबाबत प्रश्न विचारून समाधान करून घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ. शंकर पुरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी रिलायन्स फाउंडेशन ग्रुपचे राज्य समन्वयक दीपक केकान जिल्हा समन्वयक मनोज काळे, प्रोग्राम सपोर्टर रामजी राऊत, माविम परभणीच्या जिल्हा समन्वयक नीता अंभोरे आणि प्रकल्पातील संशोधन सहाय्यक शीतल मोरे, रुपाली पतंगे, मनीषा क–हाळे, धनश्री चव्हाण आणि रामा शिंदे यांचे सहकार्य लाभले.










Tuesday, August 10, 2021

सोयाबीन पिकात किडी व रोगाचा प्रादुर्भाव

वनामकृवितील शास्‍त्रज्ञ व कृषि विभागातील अधिकारी यांनी केली संयुक्‍तपणे पिक पाहणी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्‍या पथकानी दिनांक ९ ऑगस्‍ट रोजी जिल्‍हयातील मौजे राहटी व कात्‍नेश्‍वर शिवारातील शेतक-यांच्‍या सोयाबीन पिकांची पाहणी केली. या पथकात विद्यापीठातील सोयाबीन पैदासकार डॉ. शिवाजी मेहत्रे, कृषि विद्यावेत्‍ता डॉ. गजानन गडदे, मृदा शास्‍त्रज्ञ डॉ. रामप्रसाद खंदारे, वनस्‍पती रोग शास्‍त्रज्ञ डॉ. विक्रम घोळवे, किटक शास्‍त्रज्ञ डॉ. राजेंद्र जाधव तसेच कृषि विभागाचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. संतोष आळसे व तालुका कृषि अधिकारी परभणी श्री. प्रभाकर बनसावडे आदीचा समावेश होता. या पथकांनी सोयाबीन पिकांची पाहणी केली असता काही ठिकाणी कीड व रोगाचा प्रादुर्भाव दिसुन आला.

या पाहणी दरम्‍यान अनेक ठिकाणी जस्त व लोह ची कमतरता आढळुन आली व त्यामुळे सोयाबिनची पाने पिवळसर दिसत आहेत.  जुलै महिन्यामध्ये झालेली अतिवृष्टी व त्यानंतर पाऊसाचा पडलेला खंड, वाढलेले तापमान त्याच बरोबर दिवस व रात्र यामधिल तापमानाची तफावत यामुळे सोयाबीन पिकावर मावा, तुडतुडे व पांढरीमाशी यांचा प्रार्दुभाव सुरु झालेला दिसुन येत आहे. पुढे असेच वातावरण राहील्यास रसशोषण करणा−या किडींचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होवुन सोयाबीन माझॅक व पिवळा मोझॅक या विषाणुजन्य रोगांचा  प्रसारण होण्याची शक्यता असल्‍याचे शंका व्‍यक्‍त केली. काही भागात सध्या सोयाबीन पिकावर खोडमाशी, चक्रीभुंगा व पाने खाणा−या अळया या किडींचा देखिल प्रादुर्भाव दिसुन येत आहे. सोयाबीन पिकांवरील कीड व रोग प्रादुर्भाव पाहता विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी पुढील उपाय योजना करण्‍याचा सल्‍ला दिला आहे.

उपाययोजना :

सोयाबीन पिकातील जस्त व लोहाची कमतरता कमी करण्यासाठी चिलेटेड झिंक व लोह यांची प्रत्येकी ५० ग्रॅम प्रति दहा लीटर पाण्यामध्ये घेवुन फवारणी करावी किंवा विद्राव्य सुक्ष्मअन्नद्रव्ये ग्रेड-२ ची ५० मिली प्रति दहा लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांसारख्या रसशोषणा−या  किडी व खोडमाशी, चक्रीभुंगा व पाने खाणा−या अळयांच्या नियंत्रणासाठी सोयाबीन पीकात एकरी १५ पिवळे व ५ निळे चिकट सापळे लावावे, इंग्रजी टि आकाराचे २० पक्षी थांबे उभारावे, एकरी चार कामगंध सापळे लावावे तसेच प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर आढळुन आल्यास संयुक्त किटकनाशक थायमिथोक्झाम १२.६० टक्के अधिक लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५० टक्के झेडसी (२.५ मिली) किंवा बिटासायफ्लुथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के (७ मिली) यांची प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.

बहुतेक ठिकाणी सोयाबीन पीक हे फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे तसेच काही ठिकाणी पानकरपा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावाची सुरुवात झालेली दिसुन आली व पुढे हा रोग शेंगावर देखिल पसरण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी टेब्युकोनाझोल २५.९ टक्के १५ ग्रॅम किंवा पायरॅक्लोस्ट्रॉबीन २० टक्के २० ग्रॅम किंवा संयुक्त बुरशीनाशक टेब्युकोनाझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के डब्लुजी २५ ग्रॅम प्रती दहा लिटर पाण्यात घेवुन फवारणी करावी.

मागील १० ते १२ दिवसांपासुन मराठवाडयातील  सर्वच जिल्हामध्ये पावसाचा खंड दिसुन येत आहे. तसेच तापमान वाढलेले आहे व जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे तरि पानातुन बाष्पीभवन टाळण्यासाठी पोटॅशिअम नायट्रेट (१३:००:४५) ची १०० ग्रॅम प्रती दहा लीटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. 

टिप : शेतक−यांना अवाहन करण्यात येते की त्यांनी किटकनाशके, बुरशीनाशके, विद्राव्य अन्नद्रव्य इ. यांची  एकत्रित फवारणी घेवु नये.


Monday, August 9, 2021

रानभाज्‍या महोत्‍सव साजरा

आत्मा परभणी आणि वनामकृवितील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा

परभणी तालुका कृषी अधिकारी आणि पूर्णा तालुका कृषी अधिकारी या दोन तालुक्याचे रानभाज्या महोत्सव कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) परभणी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्‍यात आला. महोत्‍सवाचे उद्घाटन विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षण संचालक डॉ डी बी देवसरकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला तर कृषि विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे व आत्‍मा प्रकल्‍प संचालक श्री एस बी आळसे, उपसंचालक आत्‍मा श्री के आर सराफ, परभणी तालुका कृषी अधिकारी श्री प्रभाकर बनसावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र येथे रानभाज्‍या दालन उभारणी करण्यात आले होती. महोत्सवामध्ये शेतकरी गटांनी सहभाग नोंदवला, परभणी तालुक्‍यातील लक्ष्मीदेवी स्वयंसाहाय्यता महिला शेतकरी गट (असोला), राजमाता जिजाऊ महिला स्वयंसहायता शेतकरी बचत गट (परळगव्हान),  ताराराणी महिला शेतकरी स्वयंसहायता बचत गट (परळगव्हाण), एकता स्वयंसहायता शेतकरी बचत गट (भोगाव), श्री चक्रधर स्वामी स्वयंसहाय्यता बचत गट (खानापूर), प्रगतशील शेतकरी बबनराव देशमुख (गावकर) आणि विशाल जावळे (असोला) आदींनी सहभाग नोंदवला तसेच पूर्णा तालुक्यातील ओंकार शेतकरी बचत गट (माखनी) अध्यक्ष जनार्दन आवरगंड, स्वराज्य स्वयंसहाय्यता बचत गट (बरबडी), कातनेश्‍वर येथील प्रगतशील शेतकरी नारायण चापके व विश्वनाथ चापके यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विभागातील सर्व कर्मचारी अधिकारी आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी येथील सर्व कर्मचारी व अधिकारी परिश्रम घेतले. 

सद्य परिस्थितीत कपाशीमधील रसशोषण करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन

सतत ढगाळ वातावरणामुळे मावा व तुडतुडे किंडींचा प्रादुर्भाव

मराठवाडयात कपाशी वाढीच्या अवस्थेत असून कपाशी काही ठिकाणी पाते व फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. तसेच मागील काही दिवसापासून पाऊस उघडला असून सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे कपाशीवर मोठ्या प्रमाणात मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासोबतच काही प्रमाणात तुडतुडे सुद्धा दिसून येत आहेत. माव्यामुळे कपाशीच्या वाढीवर परिणाम होताना दिसून येत आहे. उशिरा लागवड केलेल्या कपाशी दोन ते चार पानावर आहेत त्यावर मावा किडीमुळे फार मोठा परिणाम होऊन त्या ठिकाणी कपाशीची वाढ खुंटते. म्हणून मावा किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. 

किडींचे व्यवस्थापनकरिता उपाय योजना  - मावा किडीचा प्रसार शेतामध्ये मुंगळ्यांद्वारे होतो, त्यामुळे कपाशीचा शेताच्या आजूबाजूला असलेले मुंगळ्याची वारुळे नष्ट करावीत जेणेकरून मावा किडीचा प्रसार कमी होईल. रसशोषक किडीच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा व्हर्टिसिलीयम लिकॅनी (जैविक बुरशीजन्य किटकनाशक) १ कि. ग्रॅ किंवा फ्लोनिकॅमिड ५० टक्के ६० ग्रॅम किंवा डायनेटोफ्युरॉन २० टक्के ६० ग्रॅम किंवा बुप्रोफेझीन २५ टक्के ४०० मिली किंवा असिटामाप्रीड २० टक्के ४० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. सदरिल प्रमाण सर्व प्रकारच्या पंपाकरिता आहे. या कीटकनाशकासोबत कुठलेही इतर कीटकनाशक, बुरशीनाशक, खते, संप्रेरक मिसळून फवारणी करु नये.

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी संपर्क करावा. संपर्कासाठी दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९०००.

संदर्भ - वनामकृवि संदेश क्रमांक - ०५/२०२१ (०५ ऑगस्ट २०२१)



Saturday, August 7, 2021

विद्यापीठातील डिजिटल शेती प्रकल्‍पामुळे परभणीचे नाव संपुर्ण देशात होईल ....... महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा श्री भगत सिंह कोश्यारी

महामहिम राज्यपाल मा श्री भगत सिंह कोश्यारी यांची वनामकृविच्‍या विविध उपक्रमास भेट

कृषि शास्‍त्रज्ञ, प्राध्‍यापक वृंदाशी मा राज्‍यपालांनी साधला संवाद

परभणी कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक पुरस्‍कृत डिजिटल शेतीवर आधारित नाहेप प्रकल्‍प निश्चितच स्‍त्‍युत्‍य उपक्रम असुन यामुळे जागतिक स्‍तरावरील कृषि संशोधन होत आहे. या प्रकल्‍पात केवळ देशातील नव्‍हे तर जगातील नामांकित विदेशी संस्‍थेशी सामजंस्‍य करार करण्‍यात आला आहे. या प्रकल्‍पामुळे परभणीचे नाव संपुर्ण देशात होईल, असे प्रतिपादन राज्‍याचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा श्री भगत सिंह कोश्यारी यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक ७ ऑगस्‍ट रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्‍यासपीठावर कुलगुरू मा डॉ अशोक ढवण, जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल व मा राज्‍यपालाचे विशेष सचिव मा श्री राकेश नैथानी यांची विशेष उपस्थिती होती. तर कार्यक्रमास पोलीस अधिक्षक मा श्री जयंत मीना, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महामहिम राज्यपाल मा श्री भगत सिंह कोश्यारी पुढे म्‍हणाले की, बदलत्‍या हवामानात शेतकरी बांधवाची कृषि तंत्रज्ञानाची गरज बदलत आहे, हे कृषि तंत्रज्ञान विकसित करण्‍याची जबाबदारी कृषि विद्यापीठावरच आहे. शेती यांत्रिकीकरण वाढी करिता प्रयत्‍न केला पाहिजे. संपुर्ण देश अधिक गतीने पुढे जात आहे, देशाची प्रगती ही कृषि क्षेत्राच्‍या प्रगतीवरच अवलंबुन आहे. सन 2022 हे देशाच्‍या स्‍वातंत्र्याचे अमृत महोत्‍सवी वर्ष व परभणी कृषि विद्यापीठाच्‍या स्‍थापनेचे हे सुवर्ण महोत्‍सवी वर्ष असुन या वर्षात शेतकरी बांधवाच्‍या समृध्‍दी करिता सर्वांनी एकत्र येऊन संस्मरणीय कार्य करूया. संपुर्ण जगातील व देशातील ज्ञान संपादन करून सर्वांच्‍या विकासाकरिता उपयोग करूया. विद्यापीठात विकसित झालेले कृषि तंत्रज्ञान शेतक-यांच्‍या बांधावर पोहचले पाहिजे. विद्यापीठास रिक्‍त पदाची समस्‍या आहे, शैक्षणिक दर्जा टिकविण्‍या करिता अध्‍यापकांच्‍या पदभरती करिता प्रयत्‍न केला जाईल. विद्यापीठ राबवित असलेले हरित विद्यापीठ, स्‍वच्‍छ विद्यापीठ उपक्रम चांगला उपक्रम असल्‍याचेही ते म्‍हणाले. 

कार्यक्रमात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांनी विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, कृषि संशोधन व विस्‍तार शिक्षण उपक्रमाची माहिती सादरीकरणाव्‍दारे दिली. यात त्‍यांनी विद्यापीठात राबविण्‍यात येत असलेल्‍या डिजिटल शेती, बीबीएफ तंत्रज्ञान, विविध पिकांच्‍या शेतक-यांमध्‍ये प्रचलित असलेल्‍या विद्यापीठ विकसित वाण, बॉयोमिक्‍स आदींचा विशेष उल्‍लेख केला.

याप्रसंगी विद्यापीठाने राबविलेल्‍या स्‍वच्‍छ भारत अभियान व हरित विद्यापीठ उपक्रमाबाबतची चित्रफित सादर करण्‍यात आली. माननीय राज्‍यपाल महोदयांनी उपस्थित शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले.

माननीय राज्‍यपाल यांनी विद्यापीठातील विविध प्रकल्‍पास भेट देऊन माहिती घेतली. यात बांबु संशोधन प्रक्षेत्रास भेटी दरम्‍यान संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे, डॉ मदन पेंडके आदीनी माहिती दिली तसेच जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्‍कृत नाहेप प्रकल्‍पास भेटी दरम्‍यान शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रकल्‍प प्रमुख डॉ गोपाल शिंदे आदींनी माहिती दिली तसेच अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालयातील फळे व भाजीपाल प्रक्रिया  प्रकल्‍पास भेट देऊन महाविद्यालयातील यशस्‍वी माजी विद्यार्थी, अन्‍न प्रक्रिया उद्योजक व जिल्‍हयातील अन्‍न प्रक्रिया उद्योजक निर्मित उत्‍पादन दालनास भेट दिली व संवाद साधला यावेळी प्राचार्य डॉ उदय खोडके यांनी माहिती दिली. जिजाऊ पदव्‍युत्‍तर मुलींचे वसतीगृहातील विविध राज्‍यातील पदव्‍युत्‍तर विद्यार्थींनीशी संवाद साधला, डाॅ आर पी कदम यांनी वसतीगृहाबाबत माहिती दिली तसेच विद्यापीठ ग्रंथालयातील डिजिटल व अद्ययावत ग्रंथालय सुविधा यास भेट दिली. 

जागतिक बॅक व पुरस्‍कृत प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत 'कृषि उत्‍पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍पास भेटी दिली, यावेळी त्‍यांच्‍या हस्‍ते प्रकल्‍पात विकसित करण्‍यात आलेल्‍या कृषि यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित कृषि यंत्रे प्रयोगशाळेचे उदघाटन करण्‍यात आले तसेच नाहेप प्रकल्‍प निर्मित ऑफिस अॅडमिनिस्‍ट्रेशन सॉफ्टवेअर, कृषि हवामान सल्‍ला अॅप आदीसह विविध मोबाईल अॅप्‍स व विविध प्रकाशनाचे विमोचन महामहिम राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. हरित विद्यापीठ उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय परीसरातील वसंतराव नाईक उद्यानात महा‍महिम राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते वडाचे झाड लावुन वृक्षारोपण करण्‍यात करण्‍यात आले.

कार्यक्रमास अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी श्री राजेश काटकर, निवासी उपजिल्‍हाधिकारी श्री महेश वडदकर, मनपा आयुक्‍त श्री देविदास पवार, उपविभागीय महसुल अधिकारी डॉ संजय कुंडेटकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकवृंद उपस्थित होते.



बांबु संशोधन प्रक्षेत्रास भेट


जागतिक बॅक पुरस्‍कृत नाहेप प्रकल्‍पास भेट 


नाहेप प्रकल्‍प - कृषि यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित कृषि यंत्रे प्रयोगशाळेचे उदघाटन

अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालयातील यशस्‍वी माजी विद्यार्थी, अन्‍न प्रक्रिया उद्योजक व जिल्‍हयातील अन्‍न प्रक्रिया उद्योजक निर्मित उत्‍पादन दालनास भेट



हरित विद्यापीठ उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय परीसरातील वसंतराव नाईक उद्यानात महा‍महिम राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते वडाचे झाड लावुन वृक्षारोपण 



Thursday, August 5, 2021

महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा श्री भगत सिंह कोश्यारी यांच्‍या दौ-या दरम्‍यान विद्यापीठातील विविध प्रकल्‍पास भेट देणार

महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा श्री भगत सिंह कोश्यारी यांचा दिनांक 7 ऑगस्‍ट रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या भेटी दरम्‍यान विद्यापीठातील विविध प्रकल्‍पास भेट देऊन कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात विद्यापीठाच्‍या कार्याचा आढावा घेणार आहेत.  

संपुर्ण कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती

कुलगुरू मा डॉ अशोक ढवण व जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल यांची विशेष उपस्थिती. पोलीस अधिक्षक मा श्री जयंत मीना, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

बांबु संशोधन प्रक्षेत्रास भेट  : मराठवाडयातील 85 टक्के भाग हा कोरडवाहु शेतीचा आहे, बहुसंख्‍येने शेतकरी हे लहान व अल्‍पभुधारक असुन बदलत्‍या हवामान परिस्थितीत शाश्‍वत उत्‍पादनाकरिता एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. या एकात्मिक शेती पध्‍दतीत बांधावर बांबु लागवड हा लहान व अल्‍प भुधारक शेतक-यांकरिता फायदेशीर होऊ शकते हा दृष्‍टीकोन समोर ठेऊन विद्यापीठातील अखिल भारतीय समन्‍वयीत कोरडवाहु शेती संशोधन प्रकल्‍प अंतर्गत बांबु संशोधन प्रक्षेत्रावर चार प्रकारच्‍या बाबुच्‍या जातीचे लागवड विविध अंतरावर करण्‍यात आली आहे. मराठवाडा विभागाच्‍या परिस्थितीत कोणती बांबुची जात जास्‍त व शाश्‍वत उत्‍पादन देईल व त्‍याकरिता लागणारे लागवड तंत्रज्ञान यांचे संशोधनात्‍मक प्रात्‍यक्षिक घेण्‍यात आले आहे. यात ईशान्‍य भारतात आढळणा-या मानवेल, कटांग, मानगा निवडक चार जातीचा समावेश आहे. 

माहिती देणार – संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, डॉ डब्‍ल्‍यु एन नारखेडे, डॉ मदन पेंडके आदी.

जागतिक बॅक पुरस्‍कृत नाहेप प्रकल्‍पास भेट : जागतिक बॅक व भारतीय कृषि संशोधन परिषद पुरस्‍कृत प्रगत कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍पांतर्गत 'कृषि उत्‍पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित यंत्राव्‍दारे डिजिटल शेती' यावरील सेंटर ऑफ एक्सेलन्‍स प्रशिक्षण प्रकल्‍पास भेट देणार आहेत. यावेळी त्‍याच्‍या हस्‍ते प्रकल्‍पात विकसित करण्‍यात आलेल्‍या कृषि यंत्रमानव, ड्रोन व स्‍वयंचलित कृषि यंत्रे प्रयोगशाळेचे उदघाटन करण्‍यात येणार असुन नाहेप प्रकल्‍प निर्मित ऑफिस अॅडमिनिस्‍ट्रेशन सॉफ्टवेअर, कृषि हवामान सल्‍ला अॅप आदीसह विविध मोबाईल अॅप्‍स व विविध प्रकाशनाचे विमोचन करण्‍यात येणार आहे. 

माहिती देणार – शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रकल्‍प प्रमुख डॉ गोपाल शिंदे आदी

अन्‍न तंत्रज्ञान महाविद्यालयास भेट : अन्‍नतंत्र महाविद्यालयातील फळे व भाजीपाल प्रक्रिया  प्रकल्‍पास भेट देणार असुन महाविद्यालयातील यशस्‍वी माजी विद्यार्थी, अन्‍न प्रक्रिया उद्योजक व जिल्‍हयातील अन्‍न प्रक्रिया उद्योजक निर्मित उत्‍पादन दालनास भेट देणार आहेत. येथे महािवद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्‍यांनी अनुभव आधारित शिक्षण कार्याक्रमांतर्गत तयार केलेल्‍या फळे व भाजीपाला पासुन उत्‍पादीत केलेल्‍या स्‍क्‍वॅश, केचप, सॉस आदी पदार्थ दालनास भेट देणार आहेत. यावेळी कृषि प्रक्रिया उद्योजकांशी महा‍महिम राज्‍यपाल संवाद साधणार आहेत.

माहिती देणार – प्राचार्य डॉ उदय खोडके व इतर

जिजाऊ पदव्‍युत्‍तर मुलींचे वसतीगृह : विद्यापीठांतर्गत असलेले  जिजाऊ पदव्‍युत्‍तर मुलींचे वसतीगृहात राहत असलेल्‍या विविध राज्‍यातुन प्रवेश घेतलेल्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थींनीशी संवाद साधणार आहेत.

माहिती देणार – शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, मुख्‍य वसतीगृह अधिक्षक डॉ राजेश कदम

विद्यापीठ ग्रंथालय : विद्यापीठ ग्रंथालयातील डिजिटल व अद्ययावत ग्रंथालय सुविधा व मा राष्‍ट्रपती डॉ एपीजी अब्‍दुल कलाम प्रेरणा केंद्र यास भेट देणार आहेत.

माहिती देणार – विद्यापीठ ग्रंथपाल डॉ संतोष कदम

महा‍महिम राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण : हरित विद्यापीठ उपक्रमांतर्गत कृषि महाविद्यालय परीसरातील वसंतराव नाईक उद्यानात महा‍महिम राज्‍यपाल यांच्‍या हस्‍ते वडाचे झाड लावुन वृक्षारोपण करण्‍यात येणार आहे.

माहिती देणार – प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, डॉ हिराकांत काळपांडे, डॉ महेश देशमुख आदी

सभागृहात आढावा बैठक व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व प्राध्‍यापकांशी संवाद

कृषि महाविद्यालयाच्‍या सभागृहात महामहिम राज्‍यपाल यांच्‍या समोर विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण विद्यापीठाच्‍या कृषि शिक्षण, कृषि संशोधन व विस्‍तार शिक्षण कार्याचा आढावा सादर करणार आहेत. तसेच विद्यापीठाने राबविलेल्‍या स्‍वच्‍छ भारत अभियान व हरित विद्यापीठ उपक्रमाबाबतची चित्रफित सादर करण्‍यात येणार आहे. माननीय राज्यपाल महोदय उपस्थितांना संबोधित करणार आहेत.

स्थळ - सभागृह, कृषि महाविदयालय, परभणी, दिनांक 7.8.2021 शनिवार, वेळ - सकाळी 10.28 ते 12.00




Sunday, August 1, 2021

हळदीवरील कंदमाशीच्या प्रादुर्भावाकडे वेळीच लक्ष द्या

वनामकृविचा सल्‍ला


सद्यपरिस्थितीमध्ये हळदीच्‍या शेतात गेल्यानंतर मुंगळ्याच्या आकाराचे कंदमाशीचे प्रौढ उडताना मोठ्या प्रमाणात दिसून येत असून त्याकरिता वेळीच लक्ष देऊन पुढील प्रमाणे व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्‍या वतीने देण्‍यात आला आहे.

कंदमाशी कीड - कंदमाशी ही हळद पिकावरील नुकसान करणारी प्रमुख कीड आहे. कंदमाशीचा प्रौढ डासासारखा परंतु मुंगळ्याप्रमाणे आकाराने मोठा व काळसर रंगाचा असतो. माशीचे पाय शरीरापेक्षा लांब असतात. पायांची पुढील टोके पांढऱ्या रंगाची असतात. दोन्ही पंख पातळ व पारदर्शक असून, त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात. या किडीच्या अळ्या उघड्या गड्डयामध्ये शिरून त्यांच्यावर उपजीविका करतात. अशा गड्डयामध्ये नंतर बुरशीजन्य रोगांचा आणि काही सुत्रकृमींचा शिरकाव होतो. त्यामध्ये खोड व गुद्दे मऊ होतात व त्यांना पाणी सुटून ते कुजतात. जास्ती दिवस लांबलेला पावसाळा कंदमाशीसाठी अधिक प्रमाणात अनुकूल असतो. वेळीच लक्ष दिले नाही तर या कीडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. ही कीड ऑगस्ट ते पिकाच्या काढणीपर्यंत नुकसान करते.

उपाय योजना : 

ऑगस्ट ते ऑक्टोंबर महिन्‍याच्‍या दरम्यान १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १० मि.ली. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. उघडे पडेलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. तसेच जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात करावी. तसेच कंदमाशी मुळे कंद कूज झाली असल्यास मुख्य किटकनाशकासोबत एका बुरशीनाशकाची तज्ञांच्या सल्ल्याने मिसळून आळवणी करावी.

हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

सदरिल शिफारसी कसबे डिग्रज (जि. सांगली) येथील हळद संशोधन केंद्राने केलेल्‍या असुन हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्ष दिले आहेत.

वरील प्रमाणे कंदमाशीच्या प्रादुर्भावास वेळीच लक्ष देऊन भविष्यात होणारे नुकसान टाळावे, असा सल्‍ला कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्‍या वतीने देण्‍यात आला आहे. अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा दुरध्‍वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर संपर्क करावा.

संदर्भ : वनामकृवि संदेश क्रमांक- ०४/२०२१ ( ०१ ऑगस्ट २०२१)