Monday, May 2, 2022

सेंद्रीय शेती प्रकल्पाच्या प्रशिक्षण सभागृह व प्रयोगशाळा इमारत बांधकामाचे भुमिपुजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या प्रशिक्षण सभागृह व प्रयोगशाळा इमारत बांधकाम भुमिपुजन दिनांक १ मे रोजी एकात्मिक पीक पध्दती योजना कार्यालय प्रक्षेत्रावर कुलगुरू मा डॉ.अशोक ढवण यांच्या शुभहस्ते संपन्‍न झाला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर हे होते. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम,  विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दीपाराणी देवतराज, प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, विद्यापीठ उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ.अशोक ढवण म्हणाले की, सेंद्रीय शेती ही काळाची गरज असुन विद्यापीठातील सेंद्रीय शेती प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्‍या माध्‍यमातुन होणारे संशोधन तसेच विस्तार कार्य हे शेतकऱ्यांच्या हिताचे ठरेल. रासायनिक खते, किटकनाशके, इतर कृषि निविष्‍ठाच्‍या वाढत्या किंमती लक्षात घेता सेंद्रीय शेती व निविष्ठा हया शेतक­यांना पर्याय ठरतील. विद्यापीठ शास्त्राज्ञांनी सेंद्रीय निविष्ठा व कमी खर्चाचे तंत्रज्ञान विकसित करावे. या केंद्राने घेतलेल्या ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमामुळे मराठवाडयातीलच नव्हेतर देशातील शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन मिळाले, यामुळे विद्यापीठाला नवीन ओळख निर्माण झाली.

अध्‍यक्षीय भाषणात डॉ. दत्तप्रसाद वासकर म्‍हणाले की, प्रकल्पांतर्गत होणारा सेमिनार हॉल आणि प्रयोगशाळे मुळे सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षणास सुविधा प्राप्‍त होईल, हे शेतक­यांसाठी फायेदेशीर ठरेल.

प्रास्‍ताविकात डॉ. आनंद गोरे म्‍हणाले, की सदर योजना ही ५ वर्षाकरीता आहे. या योजनेस जमिन सुधार, अद्यायावत प्रशिक्षण हॉल, प्रयोगशाळा, संशोधन व विस्तार कार्य यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्‍ध करुन दिला आहे. कार्यालयास विविध कामांसाठी विद्यापीठ अभियंता यांच्या मार्फत कृषि परिषद पुणे येथे प्रस्ताव मंजुरीस्तव सादर केले असता माननीय कृषिमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २०.१२.२०२१ रोजी पार पाडलेल्‍या कृषि परिषदेच्या बैठकीत या कार्यालयाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी मान्यता मिळाली आहे.

कार्यक्रमात कामगार दिना निमित्ताने मा कुलगुरू यांच्‍या हस्‍ते श्री. विठ्ठल खटींग, श्री. दत्ता खटींग व श्री. आकाश खटींग यांचे पुष्पगुच्छ सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सदस्य शास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर आभार श्रीमती सारीका नारळे यांनी म्‍हणाले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ जया बंगाळे, प्रभारी प्राचार्य डॉ संजीव बंडेवाड, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. दिलीप मोरे, डॉ. एच. व्ही. काळपांडे, डॉ. राजेश कदम, डॉ. दिगांबर पेरके, मुख्य शास्त्रज्ञ डॉ. वासुदेवराव नारखेडे, कृषि अभियंता डॉ. मदन पेंडके आदीसह विविध कार्यालयाचे प्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी मोठया संखेने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. प्रितम भुतडा, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. सुनिल जावळे, अभिजित कदम, सतिश कटारे, भागवत वाघ, दशरथ गरुड, सचिन रनेर आदींनी परिश्रम घेतेले.

Sunday, May 1, 2022

वनामकृवित महाराष्‍ट्र दिन साजरा

जागतिक कामगार दिनाचे औजित्‍य साधुन कर्मचा-यांचा सत्‍कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात दिनांक १ मे रोजी महाराष्‍ट्र दिन साजरा करण्‍यात आला. विद्यापीठाच्‍या मुख्‍य क्रिडा प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले. याप्रसंगी महाराष्‍ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्‍या कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ. सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, कृषि औद्योगिक क्रांतीचे स्‍वप्‍न पाहुन महाराष्‍ट्र राज्‍याची स्‍थापना करण्‍यात आली. कृषि आणि कृषि उद्योगच राज्‍यातील प्रगतीचा पाया आहे. साखर उदयोग, कापड उदयोग, दुग्‍धव्‍यवसाय आदींना कृषि क्षेत्राने बळ दिले. राज्‍यात चार कृषि विद्यापीठाच्‍या स्‍थापनेनंतर फळ, कडधान्‍य व तेलबीया वर्गीय पिक उत्‍पादनातही भरीव अशी वाढ झाली. राज्‍यात कृषि तंत्रज्ञानाच्‍या आधारे हरित क्रांती, धवल क्रांती, नील क्रांती झाली. गेल्‍या पन्‍नास वर्षात राज्‍यातील चारही कृषि विद्यापीठाने कृषि शिक्षण व संशोधनाच्‍या माध्‍यमातुन मोठे योगदान दिले आहे. परभणी विद्यापीठात गेली चार वर्ष हरित विद्यापीठ, स्‍वच्‍छ विद्यापीठ, सुंदर विद्यापीठ आणि सुरक्षित विद्यापीठ अभियान सर्वांच्‍या सहकार्यांंने यशस्‍वीपणे राबविले, असे ते म्‍हणाले.

कार्यक्रमात जागतिक कामगार दिनाचे औजित्‍य साधुन स्‍वच्‍छ विद्यापीठ, हरित विद्यापीठ अभियानात मोलाचे योगदान देणा-या परभणी मुख्‍यालयी निवडक कृषि सहाय्यक, पहारेकरी, मजुर आणि माळी प्रवर्गातील कर्मचा-यांचा शाल व श्रीफळ देऊन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनात योगदान देणारे श्री सखारामतात्‍या शिंदे, श्री हरिभाऊ ढगे, श्री कुंडलीकराव शिंदे, श्री आप्‍पाराव शिंदे, श्री ज्ञानेश्‍वर जाधव, श्री सय्यद ईरफान सय्यद उस्‍मान, श्री गजानन भारती, श्री मंचक डोंबे, श्री संदीप वावळे, श्री बालासाहेब कानडे, श्री उत्‍तम सुर्यवंशी, श्री बाळु मस्‍के, श्री मारोती शिंदे, श्री दत्‍ता देशमुख, श्री रमेश शिंदे, श्री किरण बनसोडे, सौ नंदाबाई वावरे, श्री सुभाष वाघ, श्री कैलाश आगलावे आदींची सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री उदय वाईकर आणि डॉ एच व्‍ही काळपांडे यांनी केले. कार्यक्रमास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.



Saturday, April 30, 2022

मौजे उजळंबा येथील तरूण शेतकरी श्री लक्ष्‍मण धोतरे यांना क्रीडा हैद्राबादचा उत्कृष्ट कोरडवाहू शेतकरी पुरस्कार

हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन केंद्राच्‍या ३८ व्‍या वर्धापन दिनी दिनांक २५ एप्रिल रोजी श्री लक्ष्मण विठ्ठल धोतरे यांना हैद्राबाद येथे “उत्कृष्ट कोरडवाहू शेतकरी पुरस्काराने” सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमास भारतीय कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष डॉ गुरूबच्‍चन सिंग, हैद्राबाद येथील क्रीडा संचालक डॉ व्‍ही के सिंग, माजी कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु, प्रकल्‍प समन्‍वयक डॉ रविंद्र चारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम (AICRPDA-NICRA) ही योजना सन २०११ पासून राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत परभणी जिल्‍हातील मौजे बाभुळगाव आणि मौजे उजळांबा या कोरडवाहू गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतावर कोरडवाहू तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध पीक प्रात्यक्षिके घेण्यात येतात. यात मौजे उजळांबा येथील तरूण शेतकरी श्री लक्ष्मण धोतरे यांनी विद्यापीठ शास्त्रज्ञानांच्या मार्गदर्शनानुसार रुंद वरंबा सरी - बीबीएफ पध्दतीने सोयाबीन पेरणी, सोयाबीनच्या ४ ओळीनंतर बळीराम नांगराने सऱ्या पाडणे, पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आदी कोरडवाहू तंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्‍यामुळे त्‍यांच्‍या उत्पादनात भरिव अशी वाढ झाली. यामुळे सदरिल कोरडवाहु तंत्रज्ञानाचा अवलंब गावातील तसेच शेजारील गावातील इतर शेतकरी बांधवानीही अवलंब करित आहेत. त्याबद्दल श्री लक्ष्मण विठ्ठल धोतरे यांची उत्कृष्ट कोरडवाहू शेतकरी पुरस्कारांसाठी निवड झाली. कोरडवाहु कृषि तंत्रज्ञानाबाबत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाचे मुख्य शास्रज्ञ डॉ वासुदेव नारखेडे आणि कृषि अभियंता डॉ मदन पेंडके यांनी श्री धोतरे यांना वेळो‍वेळी मार्गदर्शन केले. या पुरस्‍काराबाबत कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, मुख्य शास्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. मदन पेंडके, प्रा. रावसाहेब राऊत, डॉ. पपिता गोरखेडे आदींनी श्री लक्ष्‍मण धोतरे यांचे अभिनंदन केले.

Friday, April 29, 2022

तुळजापुर (उस्‍मानाबाद) येथे कृषि विज्ञान केंद्रात शेतकरी मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रआणि  उस्मानाबाद कृषि विभागातील आत्मा व कृषि विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किसान भागीदारी – प्राथमिकता हमारी अंतर्गत तुळजापूर कृषि विज्ञान केंद्रात दिनांक 26 एप्रिल रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्‍यात आले होते. अध्यक्षस्थानी आत्मा, उस्मानाबादचे प्रकल्प उपसंचालक श्री.किरवले तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन तुळजापूरचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), डॉ. के. ऐ. खाडे, तालुका कृषि अधिकारी श्री.संजय जाधव, विद्यापीठ शास्ञज्ञ डॉ. रमेश पाटील, डॉ. संदेश देशमुख, शेळी उद्योजक श्री. गुंडूपवार, केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ विजयकुमार जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मेळाव्याच्या सुरूवातीला भारत सरकार चे कृषिमंञी मा. श्री. नरेंद्र तोमर यांनी देशातील विविध कृषि विज्ञान केंद्रांतंर्गत उपस्थित शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधत मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनात डॉ. खाडे म्हणाले की, शेतकरी हा देशातील सर्वात मोठया बँकेचा व्यवस्थापक असून त्याने शेतीशी आधरित जोडधंद्यामध्ये गुंतवणूक केलेले पैसे एक ते दोन वर्षात दुपटीपेक्षा जास्तीची वाढ होवू शकते. अशा प्रकारची क्षमता इतर कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये नाही. शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुधन आधारित जोडधंद्याकडे वळावे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला. डॉ. संदेश देशमुख म्हणाले की, जिल्हयातील शेतकऱ्यांनी विद्यापीठ निर्मित बैलचलित विविध शेती अवजारांची माहिती घेवून त्यांचा वापर आपल्या शेतीत करावा तसेच सदरील बैलचलीत अवजारे ही ट्रॅक्टर चलीत अवजारांपेक्षा स्वस्त असून सोबतच त्यामुळे पेट्रोल-डिझेल या इंधनाची देखील गरज भासत नाही. शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत जोडधंद्यांची निवड करताना सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन डॉ.रमेश पाटील यांनी केले. उस्मानाबाद जिल्हयातील शेळी उद्योजक श्री. गुंडूपवार भाषणात म्हणाले की, जिल्हयातील प्रसिध्द असलेली उस्मानाबादी शेळी महाराष्ट्राच्या बाहेर 8-9 राज्‍यांमध्ये त्यांनी पोहचवली असून, त्यासाठी सतत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ आदि राज्यातून उस्मानाबादी शेळीला प्रचंड मागणी असल्‍याचे सांगुन त्यांनी त्‍यांच्‍या गोटबँक या मोहिमे विषयीस माहिती दिली. श्री.संजय जाधव यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तर श्री.किरवले यांनी आत्मांतर्गत विविध प्रकल्पांची माहिती दिली. 

कार्यक्रमात जिल्हयातील कृषि व पुरक क्षेञात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विविध शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या आदिंचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सन्मान करण्यात आला. प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्वयक श्री. विजयकुमार जाधव यांनी केले. सुञसंचालन शास्ञज्ञ प्रा.वर्षा मरवाळीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. कृष्ण झगडे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.भगवान आरबाड, प्रा.गणेश मंडलिक, प्रा.अपेक्षा कसबे, डॉ.नकुल हारवाडीकर, श्री.शिवराज रूपनर, आत्म्याचे श्री. राहूल लोंढे यांनी प्रयत्न केले.