Friday, October 7, 2022

विक्रमी वेळेत वनामकृवित शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली कार्यान्‍वीत

शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणालीमुळे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्यात येणार सुसूत्रता.....कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली दिनांक ७ ऑक्‍टोबर रोजी कार्यान्‍वीय करण्‍यात आली. सदर प्रणालीचे उदघाटन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले, कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (शिक्षण) डॉ आर सी अग्रवाल हे होते तर भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्थेतील संगणक अनुप्रयोग विभागाचे प्रमुख डॉ सुदिप मारवाह, विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, आयटी सल्‍लागार डॉ आर सी गोयल आदीसह सर्व घटक महाविद्यालयाचे प्राचार्य ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्‍दतीने उपस्थित होते. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली मुळे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्यात सुसूत्रता येणार असुन विविध शैक्षणिक प्रक्रिया स्‍वयंचलित होणार आहेत. यामुळे विद्यापीठाच्‍या कार्यप्रणालीत पारदर्शकता येणार असुन वेळेची आणि श्रमाची बचत होणार आहे. यात अभ्‍यासक्रम व्‍यवस्‍थापन, विद्यार्थी व्यवस्‍थापन, विद्याशाखा व्‍यवस्‍थापन, ई लर्निंग आणि ऑनलान शुल्‍क संकलन याचा समावेश असुन यामुळे विद्यापीठाची कार्यक्षमता वाढीस लागणार आहे. नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्‍यासक्रम राबविण्‍यास मोठा हातभार लाभणार आहे.

मार्गदर्शनात उपमहासंचालक (शिक्षण) डॉ आर सी अग्रवाल म्‍हणाले की, माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या मार्गदर्शनात परभणी कृषि विद्यापीठात ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली केवळ एक महिन्‍याच्‍या आत प्रभावीपणे कार्यन्‍वयीत करण्‍यात आली आहे. यामुळे विद्यापीठाच्‍या शैक्षणिक कार्यास गती प्राप्‍त होणार आहे. सदर प्रणालीची व्‍याप्‍ती वाढविण्‍यात येणार असुन देशातील कृषि शिक्षणाचे डिजिटलायझेशन करण्‍यात येणार आहे.

डॉ सुदिप मारवाह म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाने शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली लागणारी माहिती कमी वेळेत अत्‍यंत अचुकपणे भरून प्रणाली कार्यान्‍वतीत केली, प्रणाली मुळे सर्व शैक्षणिक कार्य वेळेत पुर्ण होऊन विद्यार्थ्‍यीचे विविध अभ्‍यासक्रमातील प्रवेशापासुन ते पदवी अभ्‍यासक्रम पुर्ण होई पर्यंत सर्व माहिती प्रणालीत अद्यायावत होणार आहे,  याचा लाभ विद्यार्थ्‍यांना होणार आहे. 

मनोगतात डॉ आर सी गोयल यांनी सदर प्रणाली योग्‍यरित्‍या राबविण्‍याकरिता सर्वांनी एकत्रित प्रयत्‍न करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले. सुत्रसंचालन नोडल ऑफिसर डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार डॉ प्रविण कापसे यांनी मानले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्य डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ गिरीधर वाघमारे, प्राचार्य डॉ बी एम ठोंबरे, प्राचार्य डॉ जहागिरदार, प्राचार्य डॉ भगवान आसेवार, प्राचार्य डॉ संजीव बंटेवाड, प्राचार्य डॉ राकेश अहिरे, विभाग प्रमुख डॉ राजेश कदम आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्‍यापक, कर्मचारी उपस्थित होते. तांत्रिक सत्रात आयटी प्रोफेशनल श्री विभोर त्‍यागी, श्रीमती रजनी गुलीया यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी डॉ गजानन भालेराव, डॉ संतोष फुलारी, डॉ मिलिंद सोनकांबळे, डॉ गोदावरी पवार, भरत हिंगणे, डॉ शिवराज शिंदे, संजीवनी कानवते, नितीन शहाणे, विश्‍वप्रताप जाधव, अनिकेत वाईकर, मारूती रणेर, जगदिश माने आदीसह नाहेप प्रकल्‍पातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व घटक महाविद्यालयातील प्राध्‍यापक व कर्मचारी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्‍दतीने मोठया संख्‍येने उपस्थित होते.

सदर ऑनलाईन शैक्षणिक व्‍यवस्‍थापन प्रणाली भारतीय कृषि सांख्यिकी संशोधन संस्‍थेमधील नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन देशातील संपुर्ण कृषि विद्यापीठात राबविण्‍यात येणार आहे. विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक प्रक्रियांचे स्वयंचलितकरण होणार असुन यामुळे प्राध्‍यापक व कर्मचारी यांची वेळेची आणि श्रमाची बचत होऊन प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्‍यास मदत होणार आहे. विद्यार्थ्‍यांनाही योग्‍य पध्‍दतीने विविध सेवा पुरविण्‍यास विद्यापीठास हातभार होणार आहे. प्रणालीद्वारे विविध राज्य कृषी विद्यापीठातील शैक्षणिक माहिती एकाच ठिकाणी उपलब्‍ध होणार आहे, यामुळे विविध शैक्षणिक धोरण व योजना राबविण्‍यासही मदत होईल. यात अभ्यासक्रम व्यवस्थापन, विद्यार्थी व्यवस्थापन, विद्याशाखा व्यवस्थापन, प्रशासन व्यवस्थापन, ई-लर्निंग, ऑनलाइन शुल्क संकलन आदीचा समावेश आहे. वनामकृवि अंतर्गत असलेल्‍या एकुण बारा घटक महाविद्यालयाचा समावेश करण्‍यात आला असुन सर्व पदवी अभ्‍यासक्रम, प्राध्‍यापक आणि विद्याथ्‍र्यांची माहिती यात अद्यायवत करण्‍यात आली आहे.


News in English .....

Wednesday, October 5, 2022

कसे कराल हळदीवरील करपा, कंदकुज आणि कंद माशीचे व्यवस्थापन

वनामकृविच्‍या  शास्‍त्रज्ञांचा  सल्‍ला

सध्यपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी सततचा रिमझिम पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर करपा, पानावरील ठिपके आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तरी येणाऱ्या काळात या बुरशीजन्य रोगांचा, कंदकुज तसेच कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी या रोगांचे तसेच कंदमाशीचे पुढील प्रमाणे व्यवस्थापन वेळीच करण्‍याचा सल्‍ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केद्रातील शास्‍त्रज्ञ डॉ डी डी पटाईत,  डॉ जी डी गडदे आणि श्री एम बी मांडगे यांनी दिला आहे.

हळदीमधील पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापन

करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी. रासायनिक व्यवस्थापन करतांना प्रादुर्भाव कमी असल्यास कार्बेडेंझीम ५० टक्के - ४०० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के -५०० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के - ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी. जर प्रादुर्भाव जास्त असल्यास एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) - २०० मिली किंवा प्रोपीकोनॅझोल २५ टक्के - २०० मिली किंवा क्लोरथॅलोनील ७५ टक्के - ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.

हळदीमधील कंदकुज व्यवस्थापन

कंदकुज करीता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एकरी २ ते २.५ किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे. जास्त पावसामुळे शेतात साठलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा. जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.

कंदकूज झाली असल्यास जमिनीतून कार्बेडेंझीम ५०% -१ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ७५ टक्के -३ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के -५ ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति लिटर पाण्यात मिसळून दरवेळी महिन्यातून एकदा आळवणी करावी. आळवणी करताना जमिनीमध्ये वापसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकास पाण्याचा थोडा ताण द्यावा.

हळदी वरील कंदमाशी व्यवस्थापन

प्रत्येक १५ दिवसांच्या अंतराने क्विनॉलफॉस (२५% प्रवाही) २० मि.ली. किंवा डायमिथोएट (३०% प्रवाही ) १५ मि.ली. यापैकी एका कीटकनाशकाची प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे झाडावर आलटून पालटून फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे. उघडे पडेलेल्या कंदाजवळ कंदमाशीची मादी अंडी घालते त्यामुळे उघडे पडलेले कंद मातीने वेळोवेळी झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. पीक तण विरहित ठेवावे. जमिनीतून क्‍लोरपायरीफॉस ५० टक्के ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी. याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात निश्चित करावी. हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष, सडके कंद नष्ट करावेत. तसेच एकरी २-३ पसरट तोंडाची भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे बी २०० ग्रॅम घेऊन त्यात १ ते १.५ लिटर पाणी घ्यावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणामध्ये तयार होणाऱ्या विशिष्ट गंधाकडे कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्यात पडून मरतात.

हळद पिकावर केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्‍लेम नसल्याने विद्यापीठ शिफारशीत संशोधनाचे निष्कर्षाच्‍या आधारे वरील किटकनाशकांची सल्‍ला दिले आहेत. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्‍या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रांशी ०२४५२ २२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करावा.

संदर्भ

संदेश क्रमांक: ११/२०२२  (०३ ऑक्टोबर २०२२)

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी

हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली

Tuesday, October 4, 2022

नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कृषि अभ्‍यासक्रम विद्यार्थ्‍यांच्‍या कौशल्‍य विकासावर भर ........भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल

हैद्राबाद येथे आयोजित देशातील कृषी विद्यापीठाच्‍या कुलगुरूच्‍या तीन दिवसीय परिषदेत प्रतिपादन

हैद्राबाद : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या अनुषंगाने देशातील कृषी विद्यापीठासाठीचा पदवी अभ्‍यासक्रमाची पुनर्रचना करण्‍यात आली असुन यात विद्यार्थ्‍यांच्‍या कौशल्य विकासावर विशेष भर देण्‍यात आला आहे, अशी माहिती भारतीय कृषि संशोधन परिषदेचे उपमहासंचालक (कृषी शिक्षण) डॉ. आर. सी. अग्रवाल यांनी दिनांक १ ऑक्‍टोबर रोजी हैद्राबाद येथे आयोजित तीन दिवसीय देशातील कृषी विद्यापीठांच्‍या कुलगुरूच्‍या परिषदेत दिली. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणुन तेलंगणाचे माननीय राज्‍यपाल डॉ. तमिलिसाई सौन्दराराजन या उपस्थित होत्‍या. परिषदेस देशातील कृषि विद्यापीठातील कुलगुरूंचा समावेश होता.

डॉ. आर. सी. अग्रवाल पुढे म्‍हणाले की, योग आणि ध्यान या विषयावर तीन आठवडे कालावधीचा अनिवार्य पायाभूत अभ्यासक्रम नवीन कृषि अभ्यासक्रमात समाविष्‍ट करण्यात आला आहे. पदवी अभ्‍यासक्रमात बहुविध प्रवेश आणि बाहेर पडण्याची तरतूद करण्यात आली आहे. नैसर्गिक शेतीवर स्‍वतंत्र पदवी अभ्‍यासक्रम सुरू करण्‍याचा यात समावेश असुन नैसर्गिक शेती संशोधनास प्रात्‍सोहन देण्‍यात येणार आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देण्याचे कार्य कृषी विज्ञान केंद्रांना सोपवण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी नैसर्गिक शेतीसाठी प्रमुख पिकांची चाचणी केली जाईल. कृषी विद्यापीठांनी अंतर्गत महसूल वाढीचे उद्दिष्ट ठेऊन २०३५ पर्यंत आर्थिक स्वावलंबी होण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असा सल्‍ला दिला.

तेलंगणाचे माननीय राज्‍यपाल डॉ. तमिलिसाई सौन्दराराजन यांनी परिषदेत कुलगुरूंना संबोधित करताना सांगितले की, जगाचे अस्तित्व हे शेतीच्या विकासावर अवलंबून आहे आणि शेतीचा उल्लेख केल्याशिवाय भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ नाही. इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा कृषी अभ्यासक्रमाकडे अधिक कल दिसून येत असल्याचे त्‍यांनी सांगितले.

परिषदेत विद्यापीठ महसूल निर्मिती मॉडेल, सहाव्या अधिष्‍ठाता समितीच्या शिफारशी, नैसर्गिक शेतीसाठी नवीन पदवी अभ्‍यासक्रम, सार्वजनिक खाजगी भागीदारी मॉडेल, कृषी विद्यापीठांमध्ये नवीन शिक्षण धोरण २०२० ची अंमलबजावणी आणि पुढील २० वर्षांसाठी कृषी क्षेत्रातील मनुष्‍यबळ निर्मिती, देशातील कृषी विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीचे विश्लेषण आदीं विषयावर  चर्चा करण्‍यात आली.

News in English

Monday, October 3, 2022

एकाच दिवशी वनामकृविच्‍या वतीने मराठवाडयातील ६४ गावात ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रम

उपक्रमात विद्यापीठातील ११५ तज्ञांचा समावेश असलेल्‍या २७ पथकांनी साधला १२८२ शेतकरी बांधवांशी संवाद, माननीय कुुुलगुरू यांनी साधला मौजे कचरेवाडी येथे शेतकरी बांधवाशी संवाद

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात येत असुन उपक्रमांतर्गत दिनांक ३ आक्‍टोबर रोजी एकाच दिवशी मराठवाडयातील ६४ गावात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी शेतकरी बांधवाशी संवाद साधला. यात विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २७ पथके तयार करण्‍यात आली होती, यात ११५ शास्‍त्रज्ञाांचा समावेश होता. संपुर्ण दिवसात १२८२ शेतकरी बांधवाशी संवाद साधुन त्‍यांच्‍या कृषि विषयक समस्‍या जाणुन घेण्‍यात आल्‍या, शेतकरी बांधवाच्‍या शेतीस भेट देऊन विविध विषयांवर शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले.

सदरिल उपक्रमांर्गत कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मौजे कचरेवाडी (जालना) येथील कार्यक्रमात माननीय कुलगुरू डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या नेतृत्‍वखाली विद्यापीठ पथकानी भेट देऊन शेतकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, गावचे सरपंच श्री. प्रवीण ससाने, प्रगतिशील शेतकरी श्री उद्धवराव खेडेकर, कार्यक्रम समन्‍वयक (केव्‍हीके, खरपुडी) डॉ. एस. व्ही. सोनुने, कार्यक्रम समन्वयक (केव्‍हीके,  बदनापुर) डॉ सचिन सोमवंशी आदी उपस्थित होते. यावेळी शेतकरी  श्री  जगदीश  जाधव यांच्‍या शेतीस  कुलगुरू  यांनी भेट देऊन  कापुस पिकांच्‍या  प्रात्‍यक्षिकाची पाहणी केली.

'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि प्राध्‍यापक प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकरी बांधवाच्‍या समस्‍या जाणुन घेतल्‍या व विविध शेती विषयक विषयावर मार्गदर्शन केले. दिनांक १ सप्‍टेबर रोजी उपक्रमाची सुरूवात करण्‍यात आली होती, यावेळी एकाच दिवशी संपूर्ण मराठवाड्यात ८० विद्यापीठ शास्‍त्रज्ञांचा समावेश असलेल्‍या २२ पथकांनी ६० पेक्षा जास्त गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून शेतकरी बांधवांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. सदरिल उपक्रम कृषि विभागाच्‍या सहकार्यांने हे अभियान राबविण्यात येत आहे.

वनामकृवित विस्तार कार्यकर्त्यांकरिता रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान विषयी निवासी प्रशिक्षण संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि औरंगाबाद येथील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञान यावर दिनांक २६ ते २८ सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न झाले. सदरील प्रशिक्षणात मराठवाडातील लातूर आणि औरंगाबाद कृषि विभागातील आठही जिल्ह्यातील कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक पदावरील ४० विस्तार कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रशिक्षणात रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानाविषयी विविध विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले. यात रब्बी ज्वारीचे वाण यावर ज्वार पैदासकार डॉ.लक्ष्मण जावळे, ज्‍वार लागवड तंत्रज्ञानावर ज्वारी विद्यावेत्ता प्रा.प्रितम भुतडा, खत आणि पाणी व्यवस्थापनावर विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे, तण व्यवस्थापनावर कृषि विद्यावेत्ता डॉ. सुनिता पवार, रोग व्यवस्थापनावर पिक रोग शास्त्रज्ञ डॉ. विक्रम घोळवे, कीड व्यवस्थापनावर सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, रब्बी ज्वारीचे मूल्यवर्धन यावर सहाय्यक प्राध्यापक डॉ. मधुमती कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले. तसेच सध्या परिस्थितील कीटकनाशकांचा सुरक्षित वापर आणि घोणस अळी व्यवस्थापन याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

प्रात्यक्षिकातंर्गत ज्वार संशोधन केंद्र, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय आणि राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) याठिकाणी भेट देऊन विद्यापीठामध्ये चालू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदरील प्रशिक्षण रामेती, औरंगाबाद तर्फे प्रायोजित होते, रामेती औरंगाबाद चे प्राचार्य डॉ.अभयकुमार पडिले, सहाय्यक संचालक श्री.एम.एस.गुळवे, कृषी पर्यवेक्षक श्री.एम.एन.सिसोदिया, श्री.डी.आर.करांडे, श्री.भगवान वाकडे यांनी आयोजन केले होते. प्रशिक्षण यशस्वितेसाठी श्री. मधूकर मांडगे, श्री.डिगांबर रेंगे, श्री.ज्ञानेश्वर माहोरे, श्री.नितीन मोहिते, श्री. पांडुरंग डिकळे, शेख साजीद आदींनी परीश्रम घेतले.


Thursday, September 29, 2022

वनामकृवितील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास २०२२ चा जैविक इंडीया पुरस्कार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रास सेंद्रीय शेती संशोधनातील पुढाकार व सेंद्रीय शेतीसाठी दिलेले प्रोत्साहन व योगदान याकरिता शासकीय संस्था या वर्गातुन दिला जाणारा जैविक इंडीया पुरस्कार -२०२२ प्राप्त झाला आहे. सदरील पुरस्कार हा बेंगलुरु येथील सेंद्रीय शेती आंतरराष्ट्रीय क्षमता केंद्र, केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) आणि कृषि विभाग (कर्नाटक राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रा (उत्तर प्रदेश) येथे आयोजित भारतीय सेंद्रीय अन्न सभेत दिनांक २३ सप्टेंबर रोजी कर्नाटक राज्‍याचे कृषि मंत्री मा. श्री. बी. सी. पाटील यांच्या हस्ते केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव श्री. प्रियरंजन, सल्लागार डॉ. अशोककुमार यादव, कर्नाटक राज्याचे अप्पर मुख्य सचिव (कृषि) श्री. शिवयोगी कलसाद, मणिपुरचे अतिरिक्‍त मुख्‍य सचिव मा. श्री पी वायफेई, ईकोआचे  कार्यकारी संचालक श्री. मनोज कुमार मेनन आदी  उपस्थित होते. पुरस्‍काराबद्दल कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी तसेच विद्यापीठ परिवाराने अभिनंदन केले.

सन २०१८ पासुन वनामकृवि, परभणी येथे राज्य शासनातर्फे मंजुर व कार्यरत असलेल्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रा तर्फे सेंद्रीय शेतीमध्ये संशोधन व प्रशिक्षणाचे कार्य सुरु आहे. अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, मृदाविज्ञान, कृषिविद्या, उद्यानविद्या, कृषि कीटकशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, कृषि प्रक्रीया अभियांत्रिकी, पशुसंर्वधन व दुग्धशास्त्र आदी विविध विषयात कार्य सुरू आहे. केंद्रातर्फे शेतक­यांना सेंद्रीय शेती विषयात जमीन व पाणी व्यवस्थापन, वाणांची निवड व सेंद्रीय पध्दतीने लागवड तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सेंद्रीय शेती उत्पादनासाठी बाजारपेठ व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग, सेंद्रीय प्रमाणीकरण अशा विविध विषयावर नियमितपणे प्रशिक्षण देण्यात येते. सेंद्रीय शेती प्रकल्पातर्फे अभिनव प्रशिक्षण उपक्रमांतर्गत कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर सन २०२० व २०२१ मध्ये राज्यस्तरीय ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमास राज्यातील व राज्याबाहेरील शेतक­यांनी मोठया प्रमाणावर लाभ घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राज्यातील व देशातील नामांकीत कृषि विद्यापीठे व संस्थेतील तज्ञांनी सेंद्रीय शेतीमध्ये विविध विषयात शेतक­यांना मार्गदर्शन केले. केंद्रात डॉ. आनंद गोरे हे प्रमुख अन्वेषक तर डॉ. स्मिता खोडके, डॉ. कैलास गाडे, डॉ. रणजित चव्हाण, डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. श्रध्दा धुरगुडे, डॉ. अमोल भोसले, डॉ. प्रितम भुतडा, डॉ. आर. सी. सावंत आदी सदस्य शास्त्रज्ञ असुन श्रीमती सारीका नारळे, श्री. दिपक शिंदे, डॉ. सुनिल जावळे, श्री. अभिजित कदम, श्री. सतिश कटारे, श्री. सचिन रणेर, श्री. भागवत वाघ, श्री. दशरथ गरुड आदी  कार्यरत आहेत.

Wednesday, September 28, 2022

रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम संपन्‍न

जिल्हा रेशीम कार्यालय व कृषि विभाग आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ सप्‍टेंबर रोजी रेशीम संशोधन योजना येथे कृषि विभागातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी रेशीम उद्योग प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणुन संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. अरुण ज-हाड हे होते तर होते. व्‍यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. विजय लोखंडे, प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. रवि हरणे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. गोविंद कदम, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, बदलत्या हवामानात लहान व मध्यम भुधारक शेतक-यांनी शेतीपुरक व्यवसाय सुरु करावा. एकच एक पिक पध्दती धोक्याची असुन पिकां बरोबर एक ते दिड एकर क्षेत्रावर रेशीम उद्योग केल्यास आर्थिक स्‍थैर्य  मिळु शकते, असे प्रतिपादन केले.  

डॉ. अरुण ज-हाड व विजय लोखंडे यांनी कृषि विभागातील अधिकारी यांना नानासाहेब कृषि संजीवनी कार्यक्रम (पोक्रा) व मनरेगा अंतर्गत ५०० एकर तुती लागवड उदिष्टये या वर्षात पुर्ण करण्याविषयी मार्गदर्शक सुचना दिल्या. डॉ. सय्यद ईस्माईल यांनी महाविद्यालयाचे कृषिदुत  विद्यार्थी  रेशीम उद्योग मंगरुळ व कोल्हावाडी ता. मानवत येथे राबवत असल्याचे सांगितले. तर डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मधुमक्षिका पालन व जैविक कीड नियंत्रण विषयची माहिती दिली. श्री. गोविंद कदम यांनी यांना तुती रोपवाटीका विषयी दिली. तांत्रिक सत्रात डॉ.चंद्रकांत लटपटे यांनी तुती लागवड व रेशीम कीटक संगोपन या विषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. धनंजय मोहोड यांनी केले तर आभार डॉ.संजोग बोकन यांनी मानले. कार्यक्रमास परभणी जिल्हयातील सर्व तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि ‍‍पर्यवेक्षक व कृषि सहाय्यक उपस्थित होते.