Sunday, January 26, 2025

वनामकृवित ७६ वा प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा

 प्रजासत्ताक दिन आपली ताकद, संस्कृती, जिव्हाळ्याचे संबंध याची आठवण करून देतो...कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुख् प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक  दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अमेरिकेतील परडयू विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.धर्मेद्र सारस्वत हे प्रमुख पाहुणे होते. संशोधन संचालक डॉ खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकरप्राचार्य डॉ सय्यद इस्माईलप्राचार्या डॉ जया बंगाळेप्राचार्य डॉ राजेश क्षीरसागरप्राचार्य डॉ व्ही एस खंदारे, विभाग प्रमुख तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ राजेश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संविधानाच्या उद्देशिके वाचन करण्यात आले. कार्यक्रमात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, आपण ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिन आपल्याला आपली ताकद, संस्कृती, सर्वासोबत असलेले जिव्हाळ्याचे संबंध यातून जीवन जगण्याची कला याची आठवण करून देत आहे आणि अपेक्षाही ठेवत आहे. भारताच्या संविधान निर्माण करण्याचे महान कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. भारताच्या संविधानाचा आदर संपूर्ण जगात केला जातो. संविधानामध्ये आपली ओळखच, आम्ही भारताचे नागरिक अशी केली आहे. यामुळे आपण देशाच्या निर्मितीसाठी समर्पण भावनेने कार्य करणे आवश्यक आहे. आपण आपल्या देशाचा अभिमान आणि गौरव ठेवावा. महाराष्ट्र देशात सर्वात अग्रेसर आणि पुरोगामी आहे राज्य आहे. महाराष्ट्रात कार्य करण्याचा गर्व आणि अभिमान असावा, असे नमूद केले. पुढे ते म्हणाले की, विद्यापीठ प्रगती करत असून, यावर्षी नव्याने चार महाविद्यालये, दोन संशोधन केंद्रे, आठ प्रयोगशाळा स्थापन केले. याची व्याप्ती केवळ परभणी जिल्ह्यापुरती नसून संपूर्ण मराठवाड्यासाठी कार्य केले जात आहे. मराठवाड्यातील ८० टक्के  क्षेत्र पावसावर अवलंबून असून हवामान बदलासारख्या समस्या आहेत. या समस्येत महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानावर जाऊ शकतो, म्हणून हवामान बदलावर आधारित संशोधनाची गरज आहे. विद्यापीठाने संशोधनासाठी एनएएसएफ, डीएसटी, आरजीएसटी, आरकेव्हीवाय, सीएम निधी याद्वारे प्रकल्प उभारण्यास अग्रेसर असून जवळपास ६५ कोटीचे संशोधन प्रकल्प उभारले आहेत. याचा लाभ येत्या एक-दोन वर्षांमध्ये मराठवाड्यास मिळण्यास सुरुवात होईल.

विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांन्याही शैक्षणिक, खेळ, सांस्कृतिक आणि संशोधनात्मक कार्यामध्ये राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार मिळविलेले आहेत. यामध्ये सुवर्णपदक, रोप्य पदक, कास्य पदके, तसेच अविष्कारमध्ये महाराष्ट्रात प्रथम पुरस्कार प्राप्त केला. विद्यापीठाचे खरे लाभार्थी विद्यार्थी आणि शेतकरी आहेत. विद्यापीठ विद्यार्थी केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी केंद्रित विस्तार कार्य आणि कर्मचारी केंद्रित प्रशासन या तत्वावर कार्य करित आहे. विद्यापीठाच्या २६ वा दीक्षांत समारंभात महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल आणि विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री सी. पी. राधाकृष्णनजी यांनी विद्यापीठाच्या माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत आणि दर्जेदार बीजोत्पादनात तिप्पट वाढ केल्याबद्दल  केलेल्या गौरव उद्गाराचे माननीय कुलगुरू यांनी उल्लेख केला. ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादाची चांगली चर्चा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर होत आहे. विद्यापीठाने शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ता युक्त बियाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल इंदोर येथे सोयाबीन संशोधन संचालक यांनी बियाण्यांचा प्रश्न सुटल्याचे उद्गार काढून प्रसंशा केली. विद्यापीठाने मागील वर्षी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय यशस्वी, अतुलनीय कार्यक्रमाचे आयोजन केले, याबद्दल सर्व अधिकारी, शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राचे माननीय कृषिमंत्री यांनी या विद्यापीठास आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्याचे आवाहन केले आहे. विद्यापीठ सेवेतूनच देश सेवा साधू आणि भविष्यात यापेक्षा ही अधिक चांगले कार्य करू अशी शपथ त्यांनी यावेळी घेतली. शेवटी त्यांनी प्रजासत्‍ताक दिनांच्‍या सर्वांना शुभेच्‍छा दिल्या.

याप्रसंगी छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.