Thursday, January 23, 2025

माननीय राज्यपालांनी केले गोदावरी तुर उत्पादक शेतकऱ्यांचे अभिनंदन


 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा २६व्या दीक्षांत समारंभ माननीय राज्यपाल तथा माननीय कुलपती श्री. सी. पी. राधाकृष्णनजी यांच्या  अध्यक्षतेखाली दिनांक २३ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहा उत्साहात संपन्न झाला.  या  समारंभानिमित्त   कुलगुरू मा. प्रा. (डॉ) इन्द्र मणि  यांच्या सूचनेनुसार विद्यापीठ विकसित तुरीच्या गोदावरी वाणाचे उत्तम  उत्पादन घेणाऱ्या उत्पादकांना निमंत्रित केले होते. यामध्ये सर्वश्री हनुमंत रोकडे, सुनील दौंडे, रा. फिसरे (ता. करमाळा) आणि राजेंद्र शिनगारे अजिंक्य शिनगारे , रा. कंडारी (ता. बदनापुर) यांचा समावेश होता. या शेतकऱ्यांनी गोदावरी वाणाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. त्यांनी त्यांच्या शेतातील शेंगायुक्त तुरींची झाडे (जिवंत नमुने) समारंभात प्रदर्शित केले होते. याठिकाणी माननीय राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णनजी आणि समारंभास प्रमुख उपस्थित असलेले माननीय कृषि मंत्री तथा विद्यापीठाचे प्रतिकुलपती मा. नाश्री माणिकरावजी कोकाटे, जलसंपदा (गोदावरी कृष्णा खोरे विकास महामंडळ)मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष माननीय श्री पाशा पटेल, कुलगुरू मा. प्रा. (डॉ) इन्द्र मणि  आदी मान्यवरांनी भेट दिली आणि या शेतकऱ्यांचे कौतुक करून आभिनंदन केले.

हनुमंत रोकडे यांनी गोदावरी तूर वाणाचे प्रति एकरी १९.५० क्विंटल  हनुमंत दवंडे यांना १८.६० क्विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यांनी गोदावरी तुरीच्या वाणाची ठिबक सिंचनावर  लागवड करून पाणी फाउंडेशन ने निर्धारित केलेल्या लागवड पद्धतीचा अवलंब करून आणि शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन घेतले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी यावेळी दिली. ठिबक सिंचन, मर रोगाच्या प्रतिबंधासाठी बायोमिक्सचा वापर, ४५ व्या दिवशी शेंडा खुडणे, सात फूट अंतरावरती वाफा करून  केलेली लागवड यशाची गुरुकिल्ली असल्याचे शेतकऱ्यांनी आवर्जून सांगितले.

कंडारी गावातील शेतकऱ्यांनी गोदावरी वाणाची लागवड गेल्या तीन वर्षात हजार एकरापर्यंत नेली असल्याची माहिती अजिंक्य शिंगारे यांनी दिली. अजिंक्य शिनगारे कृषि पदवीधर असून त्यांनी ठिबकवर १७ एकरा वरती गोदावरी वाणाची लागवड केली आहे. ३०, ४५ आणि ७० व्या दिवशी शेंडा खुडून गोदावरी वाणाची अधिक चांगली संरचना राखत त्यांना अधिक उत्पादन मिळाले असल्याचे नमूद केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ किरण जाधव, गोदावरी वाणाचे पैदासकार डॉ. दीपक पाटील, पाणी फाउंडेशनचे आशिष लाड आणि प्रतीक गुरव आदी उपस्थित होते.