Saturday, January 25, 2025

कुटुंबात मुलगी फुलवते नंदनवन! - कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 वनामकृवीत राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रम


कुटुंबात खऱ्या अर्थाने नंदनवन फुलवणारी व्यक्ती म्हणजे मुलगी असते असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत आयोजित राष्ट्रीय बालिका दिनाच्या कार्यक्रमात उपस्थिताना मार्गदर्शन करताना त्यांनी कुटुंबात मुलींचे असणारे महत्त्व अधोरेखित करताना दिनांक २४ जानेवारी रोजी आपले विचार मांडले. मुलगी म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत असून ती घरातील प्रत्येक सदस्याला प्रेम आधार आणि उत्साह देते. आज प्रत्येक क्षेत्रात मुली आघाडीवर असून विकसित भारत घडविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहणार असल्याने त्यांच्या सक्षमीकरणाची फार मोठी जबाबदारी ही कुटुंबाची असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. तसेच सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात असताना अद्यापही मुलांच्या तुलनेत मुलींचे कमी असणारे प्रमाण यावरही चिंता व्यक्त करत बेटी बचाव बेटी पढाव हे राष्ट्रीय अभियान यशस्वी करण्यासाठी यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजी-आजोबा महोत्सवाचेही आयोजन करण्यात आल्याने कुटुंबात आजी आजोबा असणे म्हणजे बालकाचे सौभाग्य असते असे मत कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केले. आजी आजोबांमुळे बालकांवर उत्तम संस्कार होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. आजी आजोबा म्हणजे कुटुंबाचे वैभव असल्याने त्यांची सर्वतोपरी काळजी घेणे हे कुटुंबाचे आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार हे प्रमुख अतिथी म्हणून विशेष उपस्थिती होती. त्यांनी कुटुंबातील मुलींना सक्षम करण्यासाठी विशेषतः त्यांचे स्वास्थ्य शिक्षणाची सुरुवातीपासून काळजी घेण्याची नितांत गरज आहे. याबरोबरच बालकांच्या संगोपनात त्यांच्या आजी-आजोबांचाही फार मोठा वाटा असतो असे मत व्यक्त केले.

कुटुंबात असणाऱ्या मुली तसेच आजी आजोबा यांची महती समाजाला अवगत होण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय बालिका दिन तसेच आजी-आजोबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात केले. मुलींचे महिलांचे सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंध अभियान यांसारख्या कार्यक्रमांवर महाविद्यालयातर्फे नेहमीच भर दिला जात असून यावर्षीही मुलींच्या सन्मानार्थ विशेष अभियान राबवण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. यानिमित्ताने प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या सर्व मुलींचा तसेच उपस्थित आजी-आजोबांचा माननीय कुलगुरू महोदयांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विद्यार्थी आजी- आजोबांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या समन्विका डॉ. निता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव, प्रा. प्रियंका स्वामी, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका श्रुती ओढेकर यांनी केले. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, आजी- आजोबा त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.