Thursday, January 30, 2025

वनामकृवित महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

 

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे मा. कुलगुरू डॉ प्रशांतकुमार पाटील यांची दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी अल्पशा आजाराने प्राणज्योत मालवली. त्या अनुषंगाने त्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या सिम्पोजीयम हॉलमध्ये दिनांक ३० जानेवारी रोजी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, परभणी मुख्यालयातील सर्व महाविद्यालायांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी दोन मिनिटे मौन बाळगून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

 मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा अल्पपरिचय सहाय्यक कुलसचिव श्री. राम खोबे यांनी करून दिला. 

मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा अल्पपरिचय

मा. कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांचा जन्म दिनांक २६ जून १९७० रोजी सांगली जिल्हाच्या तासगांव तालुक्यातील कवठे एकंद येथे झाला.  त्यांचे वडील श्री. गुलाबराव  पाटील हे खानापूर (जि. सांगली) येथील मुलांच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणुन कार्यरत होते तर आई सौ. सरोजिनी गुलाबराव पाटील या खानापूर जि. सांगली येथील मुलींच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणुन कार्यरत होत्या. डॉ. पाटील यांचे १ ली ते ४ थी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण हे ठाणे जिल्ह्यातील खर्डा येथे तर ५ वी ते १२ वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण खानापूर जि. सांगली येथील महात्मा गांधी विद्यालयात झाले. त्यांनी सन १९८७ ते १९९१ या काळात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातून बी.टेक ची पदवी प्राप्त केली. यानंतर त्यांनी आय.आय.टी. खरगपूर येथून एम.टेक. ही पदव्युत्तर पदवी (१९९१-९३) मिळविली तर नागपूर येथील व्हीएनआयटीमधून आचार्य पदवी प्राप्त केली.

कापसामधील काढणी पश्चात तंत्रज्ञान व मूल्यवर्धन तसेच संशोधन आणि विकास आणि संशोधन व्यवस्थापना मधील त्यांना २८ वर्षाहून अधिक व्यावसायिक अनुभव आहे. त्यांनी भारत सरकारने गठित केलेल्या कापसावरील तंत्रज्ञान मिशनवर जिनिंग सल्लागार म्हणून काम केले आणि भारतातील कापूस जिनिंग उद्योगाच्या आधुनिकीकरणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात  फार्म स्ट्रक्चर विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख म्हणून अडीच वर्ष आणि आयसीएआर – सीरकॉट (सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी) मुंबईचे संचालक म्हणून सात वर्षे काम केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या कुलगुरू पदाची सूत्रे डॉ. पाटील सरांनी दिनांक २ मार्च २०२१ रोजी घेतली होती.

त्यांनी कॉमन फंड फॉर कमोडिटीज (नेदरलँड) UNCTAD (जिनेव्हा केलेल्या वित्त पुरवठा द्वारे प्रकल्पासह सुमारे २० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाताळले. उप प्रक्रिया कापसावर त्यांनी उत्पादन सेल्युलोज नॅनो आणि वापर उत्पादन तंत्रज्ञानावर १७ नवीन तंत्रज्ञान विकसित करून त्यांचे व्यापारीकरण केले.

त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर ही मोठा अनुभव होता आणि त्यांनी आफ्रिकन देशांमध्ये जसे की बेनिन, युगांडा, मलावी आणि टांझानियामधील कापूस क्षेत्राच्या विकासासाठी सक्रिय योगदान दिले. सरकारच्या कॉटन टीएपी फॉर आफ्रिका प्रोग्राम अंतर्गत बेनीनमध्ये जिनिंग नॉलेज क्लस्टर स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी व्यापार आणि विकासावर संयुक्त राष्ट्रांची परिषद जिनेव्हा तर्फे पूर्व आणि दक्षिण आफ्रिकन देशांच्या कापूस उप - उत्पादन क्षेत्रावर काम केले. ते आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती, वाशिंगटन एशियन कॉटन रिसर्च अँड डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष म्हणूनही कार्य केले. या सर्व कार्यांच्या संदर्भात त्यांनी अमेरिका, युगांडा, बेनीन, टांझानिया, बांगलादेश आणि मलावी यासारख्या देशांना भेट दिल्या.

त्यांच्या नेतृत्वाखाली आयसीएआर – सीरकॉटने प्रतिष्ठित सरदार पटेल उत्कृष्ट आयसीएआर इन्स्टिट्यूशन अवार्ड २०१९ मध्ये मिळवला. त्यांना द टेक्स्टाईल असोसिएशन इंडियाचे फेलो आणि इंडियन सोसायटी ऑफ एग्रीकल्चर इंजिनियर्स असे अनेक पुरस्कार आणि मान्यता मिळालेले आहेत.

त्यांनी नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये १२० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले असून त्यांच्या नावावर ४ पुस्तके ७५ पेक्षा जास्त बुलेटिन, लोकप्रिय लेख, पुस्तक अध्याय, सेमिनार आणि कॉन्फरन्स स्मरणिका, प्रशिक्षण अभ्यासक्रम इत्यादी साहित्य प्रकाशित आहे. ते अनेक व्यवसायिक संस्थांचे आजीवन सदस्य होते.

त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून ८ मार्च २०२२ ते २३ मे २०२३  दरम्यान कार्यभार पाहिला. त्यांच्या कार्यकाळात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला “अ” मानांकन मिळाले तसेच त्यांना सन २०२३ च्या वसंतराव नाईक कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना महाराष्ट्र एनसीसीचे मानद ‘कर्नल कमांडंट, या पदाने भूषविण्यात आले.