वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा तिसावा भाग माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ जमेवारी रोजी संपन्न झाला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु
मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी म्हणाले की, विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात
महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल तथा विद्यापीठाचे माननीय कुलपती श्री. सी. पी.
राधाकृष्णनजी यांनी विद्यापीठाच्या माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत या विस्तार कार्याची
आणि विद्यापीठाने मागील दोन वर्षात प्रक्षेत्र विकसित करून बीजोत्पादन तिप्पट केल्यामुळे
स्तुती करून अभिनंदन केल्यामुळे एक नवचैतन्य निर्माण झाले. यामुळे शेतकऱ्यांप्रती अधिकाधिक
समर्पित भावनेने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली आणि शेतकरी देवो भव: या भावनेतून शेतकऱ्यांच्या
शाश्वत शेतीसाठी अजूनही नाविन्यपूर्ण उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी प्रेरणा मिळाली.
विद्यापीठाचे विस्तार कार्य राज्य आणि देशपातळीवर
पोहोचलेले आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्यक्रमाचा
अधिक अधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले.
प्रास्ताविक विस्तार
शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात विस्तार विद्यावेत्ता प्रा.
अरुण गुट्टे यांनी भुईमूग लागवड विषयी तर छत्रपती संभाजी नगर येथील विस्तार विद्यावेत्ता
डॉ. सूर्यकांत पवार यांनी उन्हाळी तीळ लागवडीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी तिळाची
पेरणी करताना उगवणीतील समस्या विषयी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारणा केली. या
समस्येचे निराकरण लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील मौजे रावणगाव येथील प्रगतशील
शेतकरी श्री. भीमराव डोणगापुरे यांनी अतिशय सुलभ पद्धतीने समजावून सांगितले, ते
म्हणाले की तिळाची पेरणी करण्यासाठी कांदा पेरणी यंत्राचा वापर करावा. एक किलो
तिळासोबत एक किलो भाजलेले बाजरी मिसळावी आणि पेरणी करावी तसेच पाटाने पाणी न देता
तुषार सिंचनाचा वापर करावा. यामुळे पेरणी मध्ये कसलीही अडचण न येता उगवणक्षमता
चांगली होते. असा श्री. भीमराव डोणगापुरे यांचा नेहमीचा अनुभव असल्याचे त्यांनी कार्यक्रमात
नमूद केले.