Wednesday, January 15, 2025

कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री निलेश हेलोंडे पाटील यांची वनामकृविस भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठास महाराष्ट्र राज्याचे कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) माननीय श्री निलेश केशवराव हेलोंडे पाटील यांनी दिनांक १५ जानेवारी रोजी भेट दिली. यावेळी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठाच्या स्थापनेचा इतिहास आणि प्रगतीचा अहवाल सांगताना विद्यापीठास प्राप्त आंतराष्ट्रीय हरित विद्यापीठ पुरस्कार,  राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट संशोधन केंद्र प्रमाणपतत्रे, आय एस ओ मानांकनाची माहिती दिली. विद्यापीठाने सोयाबीन, ज्वार, बाजरा कापूस, तूर, हरभरा या मराठवाड्यातील महत्त्वाच्या पिकासह,  फळपिके आणि पशुधनावर संशोधन करून तंत्रज्ञान विकसित करून प्रसारण केले. विद्यापीठ कृषी-फलोत्पादन-पशुपालन यांची सांगड साधून एकात्मिक शेती पद्धती देत आहे. उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे तसेच कोरडवाहूसाठीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहे. विद्यापीठ विकसित तुरीचा गोदावरी वाण सध्या महाराष्ट्रामध्ये क्रांती करत आहे. गोदावरी या वाणापासून कोरडवाहू क्षेत्रात एकरी १० ते १२ क्विंटल आणि ठिबक सिंचन वर लागवड केल्यास जवळपास १८ क्विंटल पर्यंत उतार मिळू शकतो. शिवाय एखाद्या शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रावर लागवड केली तर त्यास कोरडवाहू मध्ये १२ ते १४ क्विंटल उतार मिळते तसेच अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे आंतरपीक घेवून सोयाबीनचे ७ ते ८ क्विंटल उत्पादन घेतले तसेच एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळाल्याच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. भविष्यात डाळीची आयात बंद करण्यासाठी तुरीचा गोदावरी हा वाण नक्कीच लाभदायक ठरेल. हा वाण ऊसाला पर्यायी पीक म्हणून पाहत आहेत. गोदावरी वाण हा शेतकरी प्रिय असल्यामुळे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक, उप संचालक यांनी देखील गोदावरी वाणाचा उल्लेख पुसा येथून विकसित राष्ट्रीय पातळीवर  बासमतीच्या ११२१ हा जसा देश पातळीवर गाजला होता, त्याची जागा घेण्याची शक्यता वर्तवलेली आहे. मानवाच्या आहारात सकस आहाराच्या दृष्टीने जैव समृद्ध बाजारीचे दोन तर ज्वारीचा परभणी शक्ती हा एक वाण दिला आहे. ड्रोन तंत्रज्ञानाची मानके ठरवण्याचे कार्य करत आहे. भारतात ड्रोन प्रशिक्षण देणारी एकमेव प्रशिक्षण संस्था या विद्यापीठात आहे. ॲग्री पीव्ही प्रकल्प देखील राबवला जात आहे. ड्रोन आणि ॲग्री पीव्ही मध्ये विद्यापीठ भारताचे नेतृत्व करत आहे. पशुधन विकासासह मोठ्या प्रमाणात जमीन विकास करून बीजोत्पादन कार्य  करत असून भविष्यात लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे. विद्यापीठ विद्यार्थी केंद्रित शिक्षण, शेतकरी केंद्रित संशोधन आणि कर्मचारी केंद्रित प्रशासन करत आहे. विस्तार कार्यात ‘शेतकरी देवो भव: या भावनेने कार्यकरत असून नियमित कार्यक्रमासोबतच दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत आणि आठवड्यातून दोनदा ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवाद साधत आहेत, यातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहोचवण्याचे कार्य करत आहे. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील विस्तार यंत्रणा अतिशय प्रभावी असून वर्षातून दोन वेळेस तालुका कृषी अधिकारी यांना विद्यापीठांमध्ये प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत माननीय कुलगुरू यांनी व्यक्त केले.

कै. वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) माननीय श्री निलेश केशवराव हेलोंडे पाटील यांनी विद्यापीठाच्या कार्याचे कौतुक केले. जिल्ह्यामध्ये मागील वर्षी ६४ आत्महत्या झाल्या असल्यामुळे दुःख व्यक्त केले. या आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीने विद्यापीठाकडे असलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची विनंतीवजा सूचना दिली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी गायरान सारख्या ई-क्लास शेतीवर चारा उत्पादन घेऊन तो शेतकऱ्यांना मोफत देण्याचे कार्य करत असल्याचे नमूद केले. विद्यापीठानेही या प्रकारच्या कार्यात सहभाग नोंदवावा, यातून पशुसंवर्धनास मदत होऊन दुग्ध व्यवसायास  चालना मिळेल. तसेच बिगर काटेरी कॅक्टसची लागवड करून पशुधन विकासासह प्रक्रिया उद्योग विकासात मदत होते, म्हणून याचीही लागवड आपल्या विभागात मोठ्या प्रमाणात राबवावी. याबरोबरच सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, विषमुक्त शेती करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे व उत्पादन खर्च कमी करण्यासाठीचे तंत्रज्ञान द्यावे. या प्रकारचा उपक्रम राबवण्यासाठी विद्यापीठाने एक गाव दत्तक घेऊन त्या गावास आदर्श गाव बनवावे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्याच्या दृष्टीने केवळ आपल्या विभागात शिफारस झालेले वाण आणि तंत्रज्ञानाचे अवलंबन होण्याच्या दृष्टीने जनजागृती मोहीम राबविण्यासाठी विशेष कार्य करण्याची अपेक्षा त्यांनी विद्यापीठ आणि कृषी विभागाकडून केली. तसेच त्यांनी विद्यापीठातील त्यांनी नाहेप प्रकल्प, अन्नतंत्र महाविद्यालयातील इनकोबॅशन केंद्र, कोरडवाहू शेती संशोधन केंद्रा, एकात्मिक शेती व्यवस्थापन प्रकल्प आणि पाणी व्यवस्थापन संशोधन केंद्र या ठिकाणी भेटी देऊन पाहणी केली.

प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी माननीय श्री निलेश केशवराव हेलोंडे पाटील यांची ओळख करून दिली.

बैठकीमध्ये विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. राजेश कदम, डॉ. विश्वनाथ खंदारे आणि विविध विभागाचे प्रमुख तसेच शास्त्रज्ञ यांच्यासह कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रवी हरणे आणि स्वावलंबन मिशनचे जनसंपर्क अधिकारी श्री कृष्णकुमार देठे आदींची उपस्थिती होती. बैठकीचे आभार डॉ. गजेंद्र जगताप यांनी मानले.