Wednesday, January 8, 2025

वनामकृविच्या शेतकरी शास्त्रज्ञ ऑनलाईन संवादामध्ये एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचे तंत्रज्ञानावर मार्गदर्शन

 उस  पिकामध्ये ठिबक आणि सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढवावा... कुलगुरू मा.प्रा. (डॉ.)इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेच्या ३० व्या भागात एकरी १०० टन उसाचे उत्पादन मिळविण्यासाठीचे तंत्रज्ञान यावर दिनांक ७ जानेवारी रोजी ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर हे होते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, ऊस हे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण पिक असून विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसमत येथील ऊस संशोधन केंद्राद्वारे उसावर विविध प्रयोग राबवले जातात. विद्यापीठाने परभणी येथे कॉमन इन्कूबेशन सेंटरची स्थापना केलेली आहे. यातून विविध फळे तसेच पिकांच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यात येत आहे. ‘एक जिल्हा एक पदार्थ’ या उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यास गुळाचे उत्पादन करण्याचे ठरले आहे. यासाठी ऊस पिकाचे कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन महत्त्वाचे आहे. उसाची लागवड सोपी आहे, परंतु अंतर मशागत आणि काढणीस कठीण जाते. यासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञान आणि मशनरीचा विकास करून वापर करावा लागेल. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील साखर कारखान्यामध्ये तसेच इतर ठिकाणीही उसापासून साखर तर बनवली जातेच, शिवाय विविध प्रक्रिया करून इथेनॉल, बगास उत्पादन, तसेच वीज निर्मिती केली जाते. येणाऱ्या काळात शेती पद्धतीमध्ये नक्कीच बदल होईल. विशेषतः वातावरण बदलामुळे आपल्याला शेतीमध्ये बदल करावा लागेल यामुळे पिकांचे क्षेत्रे बदलतील. उसाच्या पिकास अधिक सिंचनाची गरज असते. यासाठी ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचनाचा प्रभावी वापर वाढवावा लागेल. विद्यापीठ आपल्या प्रक्षेत्रावर शेततळी विकसित करत असून सौरऊर्जेच्या वापर करून ठिबक सिंचनद्वारे सिंचन क्षेत्र वाढवत आहे. याचे प्रभावी मॉडेल विद्यापीठाने मध्यवर्ती प्रक्षेत्रावर विकसित केलेले आहे. या ठिकाणी शेतकरी बंधूंनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. याबरोबरच उसा एवढेच नफा देणारे इतर विविध पिके पाहावे लागतील. विद्यापीठाने तुरीचा गोदावरी हा वाण विकसित केलेला आहे. या वाणापासून कोरडवाहूमध्ये एकरी सरासरी १२ क्विंटल तर ठिबक सिंचनाद्वारे १८ क्विंटल पर्यंत उतार तसेच रुपये एक लाख रुपये पर्यंत उत्पन्न मिळवल्याचे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया विद्यापीठास मिळाल्या असून शेतकरी या वाणास शेतकरी पर्यायी पीक म्हणून देखील पाहत आहेत, असे प्रतिपादन केले.
तांत्रिक सत्रात डॉ भरत रासकर यांनी उसाचे अधिक उत्पादन देणारे वाण, लागवड व्यवस्थापन, आंतरमशागत, ऊस पिकातील आंतरपिके, ऊस पिकासाठी अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापन याबरोबरच ऊस पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
दोन तास चाललेल्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी उस्फुर्तपणे प्रतिसाद नोंदवून तंत्रज्ञान आत्मसात केले याबरोबरच विविध ऊस लागवडीच्या तंत्रज्ञानासंबंधी प्रश्न विचारले यास शास्त्रज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक, डॉ. मिनाक्षी पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. सूत्रसंचालन आणि आभारदेखील डॉ मीनाक्षी पाटील यांनी मानले.