शेतकऱ्यांनी फाइटो-मायक्रोबायोमचा प्रभावी वापर करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षणार्थिनी शिबिरे राबवावीत... कुलगुरू मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागामार्फत आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत शाश्वत शेतीत उपयुक्त फाइटो-मायक्रोबायोमची भूमिका, महत्त्व आणि तंत्रज्ञान या विषयावरील दहा दिवशीय लघु अभ्यासिका उद्घाटनचा समारंभ दिनांक २७ जानेवारी रोजी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडला. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.)इन्द्र मणि हे होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सीमा जग्गी आभासी माध्यमाद्वारे सहभागी होत्या. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल्ल घंटे, अभ्यासिका संचालक डॉ विक्रम घोळवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत शेती ही भविष्यातील अन्नसुरक्षेची किल्ली आहे आणि या प्रक्रियेत उपयुक्त फाइटो-मायक्रोबायोम (Phyto-microbiome) महत्त्वाची भूमिका बजावते. फाइटो-मायक्रोबायोम म्हणजे वनस्पतींवर, वनस्पतींच्या आत व मुळांभोवती असणाऱ्या सूक्ष्मजीवांचा समूह. हे सूक्ष्मजीव जैविक शेती व पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी उपयुक्त ठरतात. याचे सखोल ज्ञान या प्रशिक्षणातून घ्यावे आणि आपल्या परिसरामधील शेतकऱ्यांनी फाइटो-मायक्रोबायोमचा प्रभावी वापर करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षण शिबिरे राबवावीत, असे नमूद केले. पुढे ते म्हणाले की, वनस्पती रोग शास्त्र विभागामार्फत उत्पादित केलेल्या बायोमिक्स या जैविक बुरशीनाशकामुळे विविध रोगांचे नियंत्रण होऊन पिकाचे उत्पादन वाढल्याचे तसेच याचा फायदा मराठवाड्यातील तसेच इतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना झाला तसेच विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. सीमा जग्गी, सहाय्यक संचालिका, नवी दिल्ली यांनीही यावेळी आभासी माध्यमाद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी महत्त्वपूर्ण विषयावरती लघु अभ्यासिकेचे विद्यापीठा मार्फत आयोजन केल्याबद्दल माननीय कुलगुरू यांचे व प्रशिक्षण संचालक यांचे अभिनंदन केले व तसेच विद्यापीठासोबत सामंजस्य करार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली व विविध विषयावरती दीर्घ प्रशिक्षण आयोजित करावे अशी सुद्धा अपेक्षा व्यक्त केली.
शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांनी फाइटो-मायक्रोबायोम हे शाश्वत शेतीचा पाया आहे. याचा प्रभावी उपयोग केल्यास उत्पादनवाढीबरोबरच पर्यावरण संवर्धनही साधता येईल. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून या क्षेत्रात पुढाकार घेतल्यास शाश्वत शेतीचे उद्दिष्ट साध्य करता येईल असे प्रतिपादन केले.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग म्हणाले की, फाइटो-मायक्रोबायोम मातीतील पोषक घटकांचे विघटन करून वनस्पतींसाठी ते सहज उपलब्ध करून देतात. रोगप्रतिकारक सूक्ष्मजीव वनस्पतींना विविध बुरशीजन्य व जीवाणूजन्य रोगांपासून संरक्षण देतात. जैविक खतांचा वापर वाढवून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करण्यात मदत होते. मातीतील सूक्ष्मजीव पाण्याचा साठा वाढवून पाण्याचा वापर कार्यक्षम बनवतात. असे अनेक फायदे आहेत या करिता सहभागी शास्त्रज्ञानी यावर स्थानिक पातळीवर संशोधन करून शेतकऱ्यांना शिफारशी द्याव्यात असे सूचित केले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. तसेच सहयोगीअधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल यांनी सूक्ष्म जीवांचे माती स्त्रोत्र सुधारणा करिता उपयोग व त्याचे महत्त्व विशद केले.
या दहा दिवसांच्या लघु अभ्यासिकेत संपूर्ण भारतातून २५ प्रशिक्षणार्थी शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर, कर्नाटक, गुजरात इ. राज्यातील शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवला आहे. शाश्वत शेतीसाठी उपयुक्त सूक्ष्म जीवांचे कार्य, महत्त्व आणि तंत्रज्ञानावर आधारित हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे यांनी विभागातील प्रकल्पाबाबत माहिती दिली. तर प्रस्तावना करताना लघु अभ्यासिका संचालक डॉ. विक्रम घोळवे यांनी या दहा दिवसाच्या लघु अभ्यासिका मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध विषयाच्या प्रात्यक्षिके व व्याख्याने याबद्दल सविस्तर माहिती देऊन या या लघु अभ्यासिकेचे महत्त्व विशद केले.यावेळी अभ्यासिका सह समन्वयक डॉ. गजेंद्र जगताप यांची उपस्थिटी होती. सूत्रसंचालन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तर अभ्यासिका सह समन्वयक डॉ. संदीप बडगुजर यांनी आभार मानले.